पेंग्विनच्या जगात

राधिका टिपरे
गुरुवार, 28 जून 2018

कव्हर स्टोरी
पृथ्वीच्या दक्षिण टोकावर पेंग्विन्सची अद्‌भुत अशी दुनिया वसलेली आहे. वर्षभर कडाक्याची थंडी असणाऱ्या अंटार्क्टिकाच्या प्रदेशातील या  विस्मयकारी प्राणिविश्‍वाची अनोखी सफर...
 

अठ्ठावीस डिसेंबरला संध्याकाळी सहाच्या सुमारास ‘ॲकॅडमिक लोफे’ या आमच्या जहाजाने अर्जेंटिना देशातील ‘उशवाया’ शहराचा किनारा सोडला. ‘उशवाया’ हे या जगाचे दक्षिण टोक म्हणून ओळखले जाते. सोळा दिवसांच्या अंटार्क्‍टिका क्रुझसाठी आम्ही उभयतांनी (मी व माझे यजमान) दोन दिवस आधीच उशवाया गाठलं होतं. या क्रुझसाठी जय्यत तयारी केली होतीच, पण मनातील उत्कंठा शिगेला पोचली होती. कारण या प्रकारच्या समुद्र पर्यटनाचा आयुष्यातील हा पहिलाच अनुभव होता. हा अनुभव घेण्यासाठी आम्ही निघालो; तेव्हा मनात काळजीचा डोंगर उभा होता. हे साहसी पर्यटन आपल्याला झेपेल ना? हा प्रश्‍न मनाला थोडं कानकोंडं करत होता.

जहाज उशवायाच्या समुद्रातून बाहेर पडत असताना आम्ही सर्वजण जहाजाच्या डेकवर जमा झालो होतो. ती पूर्ण संध्याकाळ बिगल चॅनलमधून बाहेर पडण्यात गेली. त्यानंतर पुढील दोन दिवस ‘ड्रेक पॅसेज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुद्रातून जहाजाचा प्रवास चालू होता. अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर हे दोन महासागर ड्रेक पॅसेज दरम्यान एकमेकांना भिडतात. त्यामुळे त्या भागात समुद्र कायमच  खवळलेला असतो. हा पॅसेज समुद्रप्रवासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत अवघड आणि धोकादायक असतो. सी सिकनेसमुळे बरेच जण या प्रवासादरम्यान आजारी पडतातच. याला मीही अपवाद नव्हते. दोन दिवस आणि दोन रात्री अखंड प्रवास केल्यानंतर आमचे जहाज अंटार्क्‍टिकाच्या महासागरात पोहोचले. ड्रेक पॅसेज ओलांडल्यानंतर समुद्र एकदम शांत वाटायला लागला. समुद्र प्रवास करायचा तर हे सी सिकनेसचं दुखणं पाठीमागे लागता कामा नये एवढं नक्की.

तिसऱ्या दिवसाची सुरवात झाली आणि तापमान बऱ्यापैकी घसरायला लागलं. एखादं दुसरा आईसबर्गही सागरात तरंगताना दिसायला लागला. मी पेंग्विनच्या जगात प्रवेश करायला कमालीची उत्सुक झाले होते. पेंग्विनचं पहिलं दर्शन घडलं ते एका भल्या मोठ्या तरंगत्या आईसबर्गवर उभ्या ॲडलीचं. एकटाच उभा होता. पांढऱ्याशुभ्र बर्फावर तो काळापांढरा पेंग्विन उठून दिसत होता. जहाजाने अंटार्क्‍टिक महासागराच्या पाण्यात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा झोडियाकमधून महासागराच्या पाण्यात उतरलो तो अनुभव केवळ अद्वितीयच म्हणायचा. मुख्य जहाजामधून झोडीयाकमध्ये म्हणजेच हवेने फुगवलेल्या रबरी नावेमध्ये उतरायचे आणि त्या बोटीतून समुद्रात फेरफटका मारायचा. हा अनुभव घेण्यासाठी डेव्हीडने आम्हा सर्वांना अंटार्क्‍टिकाच्या थंडगार समुद्रात उतरवले. डेव्हिड हे आमच्या या अंटार्क्‍टिका मोहिमेचे प्रमुख होते. त्यात अंगात तीन ते चार कपड्यांचे थर घालून त्यावर थंडीपासून संरक्षण देणारे विंडप्रूफ जॅकेट आणि त्यावर लाइफ जॅकेट घातलेले असायचे. पायात मोठे मोठे दगड बांधावेत असे जडशीळ, भलेमोठे गमबूट घालावे लागायचे. अशा परिस्थितीत कॅमेरा हाताळायचा म्हणजे कसरतच व्हायची. पण आमच्या दृष्टीने झोडीयाकमधील तो पहिला फेरफटका म्हणजे चक्क जॅकपॉटच ठरला. कारण ‘र्नियर बे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, तीन बाजूंनी पांढऱ्या शुभ्र बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेल्या उपसागराच्या शांत समुद्रात जहाजाने नांगर टाकला. आम्ही सर्वजण जहाजातून खाली उतरून, एकूण अकरा झोडीयाकमधे बसून, समुद्रात चक्कर मारायला तयार झालो. चोहोबाजूंनी केवळ बर्फ आणि बर्फ आणि बर्फच दिसत होते. आम्ही अंटार्क्‍टिका द्वीपकल्पाच्या परिसरातील आगळ्या वेगळ्या निसर्गाचे सौंदर्य अधाशासारखे नजरेने अनुभवत होतो तोच अचानक हंपबॅक व्हेल माशांचा खूप मोठा कळप त्या भागात आला. हे प्रचंड आकाराचे देवमासे, अर्थात व्हेल इकडून तिकडे फिरत होते, श्‍वास घेण्यासाठी पृष्ठभागावर येते होते, मग मोठाच्या मोठा कारंजा हवेत उडताना दिसायचा आणि व्हेल पाण्यात जाताना त्याची भलीमोठी शेपटी आणि शेपटीचे दोन पंख पाण्याबाहेर दिसायचे. पण व्हेल माशाचे इतक्‍या जवळून झालेले ते पहिले आणि शेवटचे दर्शन. नंतर मात्र ते दिसले पण डेक वरून आणि दूर अंतरावरच.

 आम्ही पहिल्यांदा अंटार्क्‍टिकाच्या भूमीवर पाय ठेवला तो ‘डेंको’ या बेटावर. तिथे उतरलो आणि खऱ्या अर्थाने पेंग्विन या पक्ष्यांची भेट झाली. ‘जेंटू’ या नावानं ओळखले जाणारे हे काळ्या पांढऱ्या रंगाचे पेंग्विन आम्हाला या डेंको बेटावर पाहायला मिळाले. त्यांच्या ‘रूकरीज’ या बेटावर होत्या. रूकरीज म्हणजे अगणित पक्ष्यांची घरटी. हे पक्षी ठरावीक काळात किनाऱ्यावर अंडी द्यायला येतात. त्यामुळे सगळीकडे या पेंग्विंनची घरटीच घरटी असतात.

आमच्या अंटार्क्‍टिकाच्या या प्रवासात पाच प्रकारच्या पेंग्विन पक्षांची ओळख झाली. त्यांची घरटी पाहता आली. त्यांची लहान लहान पिल्लं पाहता आली. हे सगळं पाहताना एका वेगळ्या विश्‍वाची ओळख झाली. कसे आहे हे पेंग्विन पक्ष्यांचे विश्‍व?

अगदी सुरवातीच्या काळात अंटार्क्‍टिकावर मोहिमा घेऊन जाणाऱ्या संशोधकांना, तेथील रहिवासी असणारे हे पेंग्विन म्हणजे मासे आहेत असेच वाटले होते आणि तसेच गृहीत धरून त्यांचे वर्गीकरणही केले गेले. पण पेंग्विन हे न उडणारे पक्षी असून त्यांना आकाशात उडण्यासाठी पंख नाहीत हे नंतर लक्षात आले. मात्र हे जरी खरे असले तरी त्यांना पंखांच्याऐवजी निसर्गानं दिलेल्या वल्ह्यासदृश पंखांमुळे (फ्लीपर्स) ते पाण्यात चक्क उडतात असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या जीवनकाळात जवळ जवळ पंच्याहत्तर टक्के काळ ते समुद्राच्या पाण्यातच घालवतात. उरलेला वेळ किनाऱ्यावर येऊन अंडी देणे, उबवणे आणि पिलांची जोपासना करणे यासाठी दिला जातो. अंटार्क्‍टिका खंडातील अत्यंत कठोर हवामानाशी जुळवून घेण्यासाठी निसर्गाने या पक्ष्यांना तशाच प्रकारचे वरदान दिलेले आहे. या पक्ष्यांच्या शरीरात कातडीच्या खाली असलेला चरबीचा जाड थर आणि शरीराच्या वरती पाण्यात न भिजणाऱ्या पिसांचा उबदार कोट असतो, यामुळे कुठल्याही थंडीपासून यांचे संरक्षण होते. आपल्या पृथ्वीच्या पाठीवर पेंग्विनच्या एकूण सतरा प्रजाती आहेत. मात्र अंटार्क्‍टिका खंडामध्ये यापैकी चार जातींचे पेंग्विन पाहायला मिळतात, राहतात आणि त्यांचे तेथे प्रजनन होते. उर्वरित प्रजातींपैकी काही प्रजाती सबअंटार्क्‍टिक भागात किनारपट्टीवरील बेटांवर राहतात. जेंटू, चिनस्ट्रॅप, आणि ॲडली या तीन प्रकारचे पेंग्विन अंटार्क्‍टिकाच्या द्वीपकल्पीय भूमीवर पाहायला मिळतात. परंतु चौथे, ‘एम्परर’ या नावाने ओळखले जाणारे अतिशय देखणे, आकाराने जवळ जवळ माणसासारखे असणारे पेंग्विन अंटार्क्‍टिका खंडाच्या कॅपवर म्हणजेच पृथ्वीच्या दक्षिण टोकावरील बर्फाच्या टोपीप्रमाणे असणाऱ्या मुख्य भूमीवर, खोलवर, आतमध्ये राहतात. तेथे जाऊन त्यांना पाहणे फारच दैवदुर्लभ गोष्ट आहे. त्यासाठी खास मोहिमा काढल्या जातात. आमच्या अंटार्क्‍टिका सफरींमध्ये आम्हाला पाच प्रकारच्या पेंग्विनला पाहता आले. ते म्हणजे जेंटू, चिनस्ट्रॅप ॲडली किंग आणि मॅकरोनी. पैकी किंग पेंग्विन हे सबअंटार्क्‍टिक भागात म्हणजेच फॉकलंड बेटं आणि जॉर्जिया बेटांवर पाहायला मिळाले. रॉक हॉपर म्हणून ओळखले जाणारे पेंग्विन ‘सी लायन’ या फॉकलंड बेटांपैकी एका बेटावर पाहायला मिळाले असते, पण ज्या दिवशी आम्ही या बेटावर उतरणार होतो, त्या दिवशी समुद्र खूपच खवळलेला होता. उंच उंच लाटा जहाजाला धडकत होत्या. अशावेळी जहाजावरून झोडियाकमध्ये उतरणेही धोकादायक असल्यामुळे डेव्हीडने तो कार्यक्रम रद्द केला आणि त्यामुळे आम्हाला या रॉक हॉपर पेंग्विनचे दर्शन झाले नाही. यावरून एकच म्हणता येते, ते म्हणजे अंटार्क्‍टिका खंड, अंटार्क्‍टिका द्वीपकल्प आणि त्याच्या सभोवतालच्या सबअंटार्क्‍टिक बेटांवर राहणारे पेंग्विन अशा सात प्रजाती ‘अंटार्क्‍टिका पेंग्विन’ म्हणून ओळखता येतात.

एम्परर पेंग्विन आम्हाला जरी पाहता आला नाही तरी तो आकाराने सर्वांत मोठा, देखणा असतो. किंग पेंग्विन दिसायला अगदी एम्परर सारखाच असतो पण त्याचा आकार एम्पररपेक्षा लहान असतो. जेंटू, ॲडली आणि चिनस्ट्रॅप हे तीन प्रकारचे पेंग्विन आकाराने साधारण थोड्याफार फरकाने सारखेच असतात. पण प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य त्यांना एकमेकांपासून वेगळं असल्याची ओळख देतात. ॲडली हा फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा असतो. पाठ आणि डोके संपूर्णपणे काळेभोर असते, मात्र डोळ्यांच्या भोवती पांढऱ्या पिसांची बारीकशी पांढरी रेष असते. शरीराचा समोरील भाग पांढराशुभ्र असतो. ॲडली अंटार्क्‍टिका खंड आणि द्वीपकल्प या भागात, किनाऱ्याजवळ, बेटांवर कॉलनी करून राहत असल्याचे पाहायला मिळतात. त्यांच्या रूकरीजमध्ये एकाच वेळी लाखो पक्ष्यांच्या जोड्या घरटी करून पिलं वाढवितात. 

चिनस्ट्रॅप पेंग्विन त्यांच्या पांढऱ्याशुभ्र चेहऱ्यावर, हनुवटीच्या खाली, या कानापासून त्या कानापर्यंत असणाऱ्या काळ्या रंगाच्या पिसांच्या रेषेमुळे चटकन ओळखू येतात. त्यामुळेच त्यांना चिनस्ट्रॅप हे नाव दिलेले आहे. चिनस्ट्रॅप पेंग्विन मुख्यत्वे करून, सब अंटार्क्‍टिक, अंटार्क्‍टिक बेटं आणि अंटार्क्‍टिक द्वीपकल्प या भागात किनाऱ्याजवळ आपली कॉलनी तयार करतात. चिनस्ट्रॅप डिसेंबर ते मार्च या दरम्यान किनाऱ्यावर येऊन घरटे तयार करतात. या तीन प्रजातींच्या पेंग्विन्सची घरटे बनवण्याची पद्धत सारखीच आहे. लहान लहान दगड गोळा करून त्यांचे गोल आकाराचे घरटे बनवले जाते. त्यात बहुतेक वेळा दोन अंडी दिली जातात. नर आणि मादी दोघे मिळून अंडी उबवतात, पिले झाल्यावर दोघे मिळून पिलांना भरवतात. बऱ्याच वेळा सुदृढ पिलाला जास्त खाऊपिऊ घातले जाते. साधारणपणे चिनस्ट्रॅप, जेंटू आणि ॲडली पेंग्विन त्यांचे प्रजनन याच प्रकारे करतात. फरक फक्त थोडा मागे पुढे होणारा काळ एवढाच असतो. समुद्रात जाऊन पोटभर मासे, क्रील वगैरे खाऊन यायचे आणि तेच पुन्हा घशातून बाहेर काढून पिलांना भरवायचे हीच या तीनही पेंग्विंन्सची पिलांना भरवण्याची रीत असते. 

जेंटू पेंग्विन या तिघांपैकी आकाराने थोडे मोठे असतात. रंग काळा आणि पांढरा असतो. पण जेंटूची चोच मात्र लालभडक असते. सर्वांची पिले सुरवातीला राखी रंगाची असतात. नंतर त्यांच्यात रंगांचे वेगळेपण दिसायला लागते.

लहान लहान दगड, खडे चोचीतून घेऊन येणाऱ्या नर पेंग्विनला पाहून मजा येते. तो दगडं गोळा करून घरटं तयार करतो. पण बारीक बारीक दगडांची कमतरता असल्यामुळे बऱ्याच वेळा घरटं बांधतेवेळी दगडांची पळवापळवी चालू असते. आपल्या घरट्यातील दगडं दुसऱ्या पेंग्विन नराने पळवू नये म्हणून नर भरपूर आरडाओरडा करताना दिसतात. पण चोरी करायच्या उद्देशाने घुटमळणारा जेंटू किंवा चिनस्ट्रॅप किंवा ॲडली अगदी साळसूदपणे पटकन एखादा दगड चोरतोच. नर दगड गोळा करून थकून जातो, पण मादी त्याला लवकर दाद देत नाही. मात्र एकदा का मनासारखे घरटे तयार झाले, की मग दुसऱ्या क्षणाला नर आणि मादीचा प्रणय सुरू होतो. पेंग्विन आपल्या जोडीदाराशी जीवनभरासाठी प्रामाणिक राहतात. हे  पेंग्विन माणसाला पाहून घाबरत नाहीत, की बिचकतही नाहीत. कारण त्यांना निश्‍चितपणे हे ठाऊक असते, की मनुष्य प्राण्यांपासून त्यांना अजिबात धोका नाही. उलटपक्षी माणसं काय करतात हे पाहायला त्यांना अतिशय आवडते. त्यामुळे उत्सुकतेपोटी ही मंडळी आपल्या अगदी जवळ येतात. कॅमेरा वगैरे पाहण्यासाठी अगदी जवळ येऊन निरखत राहतात.

पेंग्विन्सची अंडी आणि लहान पिलं खाण्यासाठी काही समुद्रपक्षी सदैव घिरट्या घालत असतात. यामध्ये ब्राऊन पेट्रल, स्क्‍यू, जायंट पेट्रल असे अंटार्क्‍टिक प्रदेशातील मोठमोठे समुद्रपक्षी आघाडीवर असतात. पूर्ण वाढ झालेल्या पेंग्विन्सची शिकार सील आणि सी-लायन तसेच ओरका हा किलर व्हेल करतात. साधारणपणे पिलं महिन्याभराची झाल्यानंतर रूकरीमधील सर्व पिले एकत्र येऊन एकमेकाला चिकटून ग्रुप करून उभी राहतात. कारण सगळ्यांचेच आईबाबा त्यांना सोडून समुद्रात गेलेले असतात. जो पर्यंत आईबाबा येत नाहीत तोपर्यंत ही पिलं एकमेकांच्या आधाराने, एकमेकांना ऊब देत एकत्र राहतात. याला ‘नर्सरी’ किंवा ‘क्रेश’ असे म्हणतात. गंमत म्हणजे समुद्रावरून परत आलेले पेंग्विन्स आपापल्या पिलांना बरोबर शोधून काढतात. 

‘ओर्ने हार्बर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका जागी आम्ही आमचे तिसरे लॅंडीग केले होते. या ठिकाणी चिनस्ट्रॅप पेंग्विन्सची खूप मोठी कॉलनी होती. त्यानंतर ‘बेले हेड’ या जागी जेव्हा झोडीयाकमधून उतरलो तेव्हा मात्र जेंटू पेंग्विन्सची खरोखरच प्रचंड मोठी कॉलनी पाहायला मिळाली. एकतर या ठिकाणी बऱ्यापैकी मोठे, बर्फ विरहित मैदान, टेकड्या होत्या. जिथे नजर टाकता येईल तिथे जेंटूंनी घरटी बांधलेली होती. विशेष म्हणजे बरेच जेंटू समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने चालताना दिसायचे. तर तितकेच जेंटू समुद्राची चक्कर करून, पोटभर खाऊन पिऊन अंडी उबवण्यासाठी परत येत होते. पेंग्विन्सचे हे येणं जाणं अखंड चालू होते. तितकेच पेंग्विन घरट्यावर बसलेले होते. काही घरट्यात अंडी होती, तर काही घरट्यात छोटी छोटी पिले तयार झालेली होती. 

फोर्ट पॉइंट या ठिकाणी केलेल्या लॅंडींगमधे तर प्रचंड आकाराचे एलिफंट सील पाहायला मिळाले. त्याच्या जोडीला जेंटू, चिनस्ट्रॅप यांची कॉलनी होती. बाजूलाच प्रचंड आकाराचे ग्लेशियर होते... याच ठिकाणी एक मॅकरोनी पेंग्विन पाहायला मिळाला. हे मॅकरोनी आकाराने या इतर तीन प्रकारच्या पेंग्विन्स एवढेच असतात मात्र त्यांच्या डोक्‍यावर, दोन्ही डोळ्यांच्या मधे पिवळ्या रंगाचे, पिसांचे लांब तुरे किंवा लांब पिसं असतात. चेहरा आणि चोच थोडी वेगळी असते. रंग काळापांढरा असतो.

अंटार्क्‍टिका द्वीपकल्पाची सफर संपवून जेव्हा जॉर्जिया आणि फॉकलंड बेटांच्या दिशेने जहाजाचा प्रवास सुरू झाला तेव्हा किंग पेंग्विन्सला भेटायची ओढ लागली.  ही प्रजाती अंटार्क्‍टिका खंडावर राहत नाही. यांचे वास्तव्य तसेच, प्रजनन सब अंटार्क्‍टिक प्रदेशात असल्यामुळे आतापावेतो ही प्रजाती पाहायला मिळाली नव्हती. जॉर्जिया बेटांच्या समूहातील गोल्ड हार्बर बेटावर उतरल्यानंतर आम्हाला पहिल्यांदाच किंग पेंग्विन पाहायला मिळाले. त्यांच्या हालचाली, त्यांचे विभ्रम, त्यांचे प्रणयाराधन, लटके, झटके, रूसणे, पिपाणीच्या आवाजासारखा आवाज काढून एकासुरात सर्वांनी ओरडणे हे पाहताना मन थक्क झाले. आतापर्यंत पाहिलेल्या पेंग्विन्समधे किंग आकाराने सर्वांत मोठे आणि देखणे वाटले. त्यांचा पाठीमागचा रंग राखाडी किंवा चंदेरी असून डोक्‍याकडील भाग काळपट रंगाचा असतो, मात्र कानाजवळ पिवळसर, सोनेरी किंवा नारिंगी रंगांच्या पिंसांचे पुंजके असतात. चोच लांब आणि केशरी किंवा लाल असते. एम्परर पेंग्विनही रंगाने असेच पण मोठे असतात परंतु किंग पेंग्विनच्या छातीवर नारिंगी रंगाचा पिसांचा पुंजका त्यांचे वेगळेपण दर्शवतो. नर आणि मादी दोघेही आकाराने सारखेच असतात. पेंग्विनच्या बाबतीतील महत्त्वाची आणि आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांच्यापैकी मादी कुठली आणि नर कोण हे मात्र आपल्याला ओळखता येत नाही. 

कदाचित त्यांच्यावर काही काळासाठी नजर ठेवून निरीक्षण केल्यास वागण्यावरून मादी आणि नर यांना ओळखता येणे शक्‍य होईल असे वाटते. येथे अगदी छोटासाच किनारा होता. मात्र या ठिकाणी प्रचंड मोठ्या आकाराचे एलिफंट सील होते. या एलिफंट सीलची एकमेकांशी चाललेली लठ्ठालठ्ठी आणि मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत गरजणे पाहून छातीत धडकीच भरली होते.  एलिफंट सील, फर सील, सी लायन, हे प्राणी, ब्राऊन पेट्रल, जायंट पेट्रल, शिट बिल, सीगल अशा समुद्र पक्ष्यांची गर्दी आणि हजारोंच्या संख्येने असलेले किंग पेंग्विन्स असं एकूणच सब-अंटार्क्‍टिक प्रदेशातील प्राणिजीवन पाहायला मिळालं. या जागी बहुतेक किंग पेंग्विन पूर्ण वाढ झालेले होते. किंग पेंग्विन या प्रजातीची प्रजनन प्रक्रिया अतिशय क्‍लिष्ट आणि विचित्र पद्धतीची आहे. 

सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे किंग तसेच एम्परर पेंग्विन अंडी देण्यासाठी घरटं बांधत नाहीत. या पेंग्विन्समधे जोड्या कायमसाठी एकमेकांशी बांधील राहतात. नोव्हेंबर ते एप्रिल या काळात प्रणयराधनानंतर कधीतरी मादी एक अंडे देते. हे अंडं दोन्ही पायावर ठेवून,पोटाखालच्या उबदार भागामधे लपवून, उबवले जाते. नर आणि मादी दोघेही अंडे उबवण्याची जबाबदारी आळीपाळीने घेतात. हजारोंच्या संख्येने किंग पेंग्विन अंडी उबवण्याच्या प्रक्रियेअंतर्गत जोडीने उभे राहून हा महिना-सव्वा महिन्याचा कालावधी पार पाडतात. या काळात हे पेंग्विन अजिबात हालचाल न करता एकाच जागी उभे राहतात. मात्र त्रास देणारं, दुसरंतिसरं कुणी जवळ आले तर फ्लिपरने झापड देऊन त्रास देणाऱ्याला पळवून लावण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. अंड्यातून बाहेर आल्यानंतरही, मोठे होईपर्यंत पिल्लूही आईवडिलांच्या पायावरच वाढत राहते. हे पिल्लू मोठे झाल्यानंतर त्याच्या अंगावर तपकिरी रंगाची फर वाढलेली असते. खाऊन खाऊन हे पिल्लू गोलमटोल झालेले असते. मग हिवाळा सुरू होतो आणि सर्व किंग पेंग्विन जोड्या आपापल्या पिलाला तिथेच सोडून हिवाळ्यासाठी समुद्रात निघून जातात. या चार ते पाच महिन्यांच्या काळात ही अर्धवट वयाची सर्व पिल्लं एकमेकाला चिकटून,भल्या मोठ्या ग्रुपमधे एकत्र उभी राहतात. 

कडाक्‍याच्या थंडीत, बर्फात, वेगवान वाऱ्याचा मारा सहन करीत ही बापडी पिल्ले, न खाता, न पिता एकाच जागी उभे राहून चार-पाच महिने काढतात. मग उन्हाळा येतो. तसे  त्यांचे आईबाबा परतून येतात. आपापल्या पिलाला हजारो पिलांमधून बरोबर शोधून काढतात आणि त्याला पुन्हा खाऊ पिऊ घालायला सुरुवात करतात. याच दरम्यान त्यांचे प्रणयाराधनही चालू असते. पुन्हा नव्यानं अंडे दिलं जाते. एक पिलू पूर्ण वाढ होण्याच्या मार्गावर असताना दुसरं पिलू जन्माला येतं. या लहानग्या पिलाला एकटं सोडून जाण्याची वेळ येते तोपर्यंत पहिले पिल्लू तरुण होऊन आईवडिलांच्यापासून वेगळे झालेले असते. प्रजननाची ही प्रक्रिया साधारण तीन वर्षांची असते आणि या तीन वर्षात किंग पेंग्विनची दोन पिले जन्माला येतात. तपकिरी रंगाचे लोकरीचे गाठोडे इकडे तिकडे फिरत आहे असा भास त्यांना पाहून होतो. ही पिलं मोठी व्हायला लागली की त्यांच्या अंगावरची तपकिरी रंगाच्या लोकरीसारखी ती फर झडून जाते. अंगावरील फर झडून जाण्याच्या या प्रक्रियेला ‘मोल्टींग’ म्हणतात. त्याच्या कानाजवळचे नारिंगी, केशरी रंगाच्या पिसांचे पुंजके जोपर्यंत गडद केशरी किंवा नारिंगी होत नाहीत तोपर्यंत ते पेंग्विन प्रजननासाठी सक्षम नसतात. सब-अंटार्क्‍टिकामधील फॉकलंड, जॉर्जिया मॅक्वॉरी,हार्ड, क्रोझेट अशा बेटांवर किंग पेंग्विन्सच्या प्रचंड मोठ्या वसाहती आहेत. काही वर्षांपूर्वी दर्यावर्दी मंडळींनी किंग पेंग्विनची बेसुमार हत्या केली होती. पण आता सुदैवाने त्यांची संख्या वाढते आहे. एखाद्या जोडीतील मादीच्या पाठीमागे दुसरा एखादा नर पेंग्विन लागला तर पहिला नर किती रागावतो हे मला पाहायला मिळाले.

आठ महिने बर्फ आणि चार महिने बर्फ नसलेली थंडी आणि वारा, अशा अंटार्क्‍टिक खंडाच्या भवतालामधे अत्यंत प्रतिकूल वाटणाऱ्या हवामानात हे पक्षी राहत असतात. या पक्ष्यांच्या अधिवासाला कुणाचीही नजर लागू नये यासाठी पर्यावरणाची काळजी घेणं किती महत्त्वाचे आहे हे तिथं प्रत्यक्षात गेल्यावर कळते.

आमच्या अंटार्क्‍टिकाच्या सफरीमध्ये तिथले मूळ रहिवासी असलेल्या पेंग्विन्सच्या आयुष्यात डोकावण्याची संधी मिळाल्यामुळे, जो काही सुखद अनुभव मिळाला तो केवळ अवर्णनीय होता हे मात्र खरेच.

फोटो फीचर

संबंधित बातम्या