जीवरक्षक

डॉ. राहुल अशोक वारंगे,  अध्यक्ष, सह्याद्री मित्र गिरिभ्रमण  क्रीडा संस्था, महाड
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी
आंबेनळीच्या दरीत कोसळलेल्या बसचा अपघात सगळ्या महाराष्ट्राला चटका लावून गेला. हा भीषण अपघात झाल्यानंतर शासकीय यंत्रणेची वाट बघत न बसता आसपासच्या ग्रामस्थांनी आणि ट्रेकर्सच्या ग्रुपने कोणतीही अपेक्षा न ठेवता 'रेस्क्‍यू ऑपरेशन'ला सुरुवात केली. चोवीस तास अखंड चालू असलेल्या या 'रेस्क्‍यू ऑपरेशन'चा अनुभव...

शनिवार २८ जुलैला दुपारी १२ सुमारास महाड पोलादपूरचे आमदार भरतशेट गोगावले यांचा फोन आला ‘महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटामध्ये दाभीळ टोक येथे दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला आहे आणि बस दरीत कोसळली आहे’. हे ऐकताच काळजात चर्रर्र झाले, कारण महाबळेश्वर घाटाची दुर्गमता, कोकणात उतरलेले सरळसोट कातळकडे आणि अपघातग्रस्त वाहन हे बस असल्याने त्यात सापडलेल्या व्यक्तींची अंदाजे संख्या हे सगळे एका क्षणात डोळ्यासमोर आले. पुण्याच्या प्रसिद्ध गिरीप्रेमी संस्थेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘MMRCC’ अर्थात ‘महाराष्ट्र माऊंटन रेस्क्‍यू कोऑर्डिनेशन सेंटर’ या ग्रुपवरदेखील अपघाताची माहिती तत्काळ मिळाली होती. ताबडतोब एक ‘गिर्यारोहक’ म्हणून असलेल्या आपल्या जबाबदारीची जाणीव झाली.  एरवी छंद म्हणून सह्याद्रीच्या बेलाग कड्यांवर लीलया बागडणारे गिर्यारोहक अशी घटना घडली, की लगेचच कर्तव्याच्या भावनेतून बचावकार्यामध्ये स्वतःला झोकून देत असतो. अर्ध्या तासाच्या आत गिर्यारोहणाची साधनसामग्री घेऊन महाबळेश्वरकडे मार्गस्थ झालो. तोपर्यंत महाबळेश्वर येथील महाबळेश्वर ट्रेकर्स व सह्याद्री ट्रेकर्स या दोन्ही संस्थांच्या टीम घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या. त्यांनी कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता बचाव कार्याला सुरवातही केली होती. दापोलीचे आमदार संजय कदम व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे देखील आपल्या कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी हजर होते. आंबेनळी घाटात ज्या ठिकाणाहून बस खाली दरीत गेली होती तो कातळकडा ६०० फूट खोल होता. त्यामुळे अपघातात कोणी बचावले असण्याची शक्‍यता कमी होती. हा विचार मनात आला आणि क्षणभर स्तब्ध झालो. साधारण दीडच्या सुमारास आम्ही घटनास्थळी पोचलो तोपर्यंत दोन मृतदेह दरीतून वर काढण्यामध्ये महाबळेश्वर ट्रेकर्सच्या टीमला यश आले होते. एकंदर त्या ठिकाणाची भौगोलिक परिस्थिती व मृतांचा आकडा जास्त असल्याने बचाव कार्य अतिशय अवघड असणार याची कल्पना आली. आम्ही महाबळेश्वरच्या ट्रेकर्ससोबत कामाला लागलो. आम्ही सोबत आणलेल्या आधुनिक उपकरणांमुळे मृतदेह वर ओढण्याचे काम अधिक सोपे झाले. सगळे मिळून ५० गिर्यारोहक त्या बेलाग कड्यांवर ४ वेगवेगळ्या टप्प्यात उभे होते. सगळ्यात तळाशी जेथे बसचे अवशेष व मृतदेह विखुरलेले होते, तिथे काम करत असलेल्या गिर्यारोहकांचे काम सर्वाधिक कठीण होते. दरीमध्ये इतस्ततः: पसरलेल्या निष्पाप जिवाचे मृतदेह एक एक करून दोराच्या जवळ काळजीपूर्वक आणणे आणि ते जाळीत गुंडाळून दोराला अडकवणे. नंतर डोंगराच्या निसरड्या कड्यांवर पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या सदस्यांना हे मृतदेह वर खेचण्यास सांगणे ही सगळी प्रक्रिया जिकरीचे होती. दरीतून वर खेचताना वजनामुळे मृतदेह कड्यांवर काही ठिकाणी अडकायचे. त्या प्रत्येक टप्प्यावर उभे असलेल्या महाबळेश्वरच्या गिर्यारोहकांना प्रत्यक्ष हातांनी उचलून पुढे ढकलावे लागायचे. दरीत सर्वजण तहान भूक विसरून एक दिलाने काम करत होते. साधारण दुपारी दोनच्या सुमारास प्रशासनाने क्रेन मागवली. पण त्याच्याकडे केवळ १५० फूट लोखंडी दोर असल्याने त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. पण आमच्यातील अनुभवी गिर्यारोहक राजेश बुटाला यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी मुख्य दोर क्रेनच्या हुकमध्ये टाकला. त्याने दोराला उंची मिळाली व मृतदेह दरीतून वर आणणे थोडे सोपे झाले तसेच वेळही वाचू लागला. त्याच वेळी बचावकार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले कुंडलिका ट्रेकर्सचे महेश सानप आपल्या सहकाऱ्यांसोबत सहभागी झाले. याच दरम्यान पोलिस यंत्रणेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन महाबळेश्वर घाटाची वाहतूक बंद केली. स्थानिक प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी मदतकर्त्यांना अन्न, पाणी ,ग्लोव्हज, मास्क व औषधांचा पुरवठा केला. पोलादपूर व महाबळेश्वर परिसरातील अनेक ग्रामस्थांनी दोर ओढण्याच्या महत्त्वपूर्ण कामात मोलाचा हातभार लावला.

दापोली कृषी विद्यापीठातील मृत व्यक्तीचे सहकारी त्यांच्या मित्रांच्या मृतदेहांची ओळख पटविण्याचे अतिशय दुःखद काम करीत होते. नेहमीप्रमाणेच कोणत्याही आपत्तीत होणारा बघ्यांची त्रास याही बचाव कार्यामध्ये होत होता. त्यांना व अशाही प्रसंगी सेल्फी काढणाऱ्या संवेदनाशून्य महाभागांना पिटाळून लावण्याचे काम पोलिसांना करावे लागत होते. विशेष म्हणजे घटनास्थळी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी बचाव कार्य सुरळीत पार पडण्यासाठी सतत सहकार्य केले. त्यामध्ये महाड-पोलादपूरचे आमदार भरतशेट गोगावले परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते, तर दापोलीचे आमदार संजय कदम, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत ठेवण्याचे काम करीत होते. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, कृषिमंत्री सदाभाऊ खोत, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार माणिकराव जगताप आदी नेत्यांनी घटनास्थळी भेट दिली. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व पोलिस अधीक्षक तोरस्कर पूर्णवेळ मदत कार्यावर लक्ष ठेवून होते. दिवसभरात साधारण ६ वाजेपर्यंत १४ मृतदेह दरीतून काढण्यात यश आले होते. मात्र रात्री मोहीम चालू ठेवणे दरीत व कड्यावर काम करणाऱ्या गिर्यारोहकांच्या दृष्टीने धोक्‍याचे होते. अंधारात एखादा दगड खाली पडून इजा होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे संध्याकाळी ६ वाजता मोहीम थांबवून दुसऱ्या दिवशी लवकर सुरू करण्याचे ठरले. आम्ही सर्व दरीतून वर आलो. त्याच वेळी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) तेथे पोचले. त्यांनी ही मोहीम रात्रीही चालू ठेवण्याचे आम्हास शासनाचे आदेश असल्याचे सांगितले. त्यांनी आम्ही लावलेली यंत्रणा, गिर्यारोहणाचे, साधने याची पाहणी करून पुढील कार्य याच तंत्राने चालू ठेवण्याचे निश्‍चित केले. त्यामुळे सर्व गिर्यारोहक पुनश्‍च कामाला लागले. सर्वप्रथम दरीत वेगवेगळ्या टप्प्यांवर हॅलोजनचे प्रखर दिवे सोडले. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची साधने, गॅस कटर. एअर लिफ्टिंग बॅग व तत्सम समान दरीत उतरवले. संध्याकाळी ७ ते रात्री ११:३० वाजेपर्यंत हे काम सुरू होते. कारण प्रकाशाशिवाय कोणतीच गोष्ट शक्‍य नव्हती. दिवसभर काम करून थकलेल्या गिर्यारोहकांच्या जागी ताज्या दमाचे सदस्य राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या जवानांना घेऊन पुन्हा दरीत उतरले. 

रात्री ११.३० वाजता पुन्हा मृतदेह वर पाठवण्यास सुरवात झाली. साधारण पहाटे २:३० वाजेपर्यंत काम झाल्यावर गाडीच्या छप्पराखालील व त्यापाठी अडकलेले मृतदेह मोकळे करून ते दोरापर्यंत आणणे या कामासाठी दोन ते तीन तास लागले. त्यामुळे तेवढा वेळ मृतदेह वर पाठवण्याचे काम थांबले होते. त्याच दरम्यान ठाण्याचे गिर्यारोहक राहुल समेळ, अमोल देशपांडे, मंदार गुप्ते हे अत्याधुनिक साधन सामुग्रीसह रात्री २ वाजता पोचले. तसेच भोरची सह्याद्री सर्च व रेस्क्‍यू संस्थेची टीमही पोचली. त्यांनी एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला, ज्या तंत्राच्या आधाराने दिवसभर हे मदतकार्य चालू होते. त्यामध्ये सुलभता येण्यासाठी त्यांच्याकडील साधनाद्वारे काही बदल केले. नवीन तंत्राची उपयुक्तता तपासून पाहिली. त्यामुळे ६०० फूट दरीतून मृतदेह वर खेचण्यासाठी लागणारे परिश्रम खूप कमी झाले. रविवारी सूर्योदयानंतर पुन्हा कामाला वेग आला. महाबळेश्वर घाटातील अत्यंत दुर्गम ठिकाणी घडलेल्या अपघाताच्या मदतकार्याला दोन दिवस लागतील असे वाटत होते ते काम साधारण २४ तासात दुपारी १२ वाजता शेवटचा (तिसावा) मृतदेह वर आल्यानंतर पूर्ण झाले. प्रशासनाच्या दृष्टीने हे काम त्यावेळी पूर्ण झाले असले, तरी गिर्यारोहकांच्या दृष्टीने अजून बरेच काम शिल्लक होते. दरीत उतरवलेले सामान, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची अत्यंत वजनदार सामग्री वर घेणे. दरीत उतरलेले सर्व संस्थांचे शिलेदार सुखरूप वर येणे. सर्व साधनाची योग्य मोजणी करून त्या त्या संस्थांना सुपूर्द करणे हे सर्व होईपर्यंत २ तास गेले. जेव्हा महाडच्या संस्थेचा चिंतन वैष्णव हा संध्याकाळी ७ ते दुपारी १२:३० या १८ तासांच्या अविश्रांत परिश्रमानंतर वर आला तेव्हा खऱ्या अर्थाने ही मोहीम संपली. चिंतन वैष्णव च्या कामाचे विशेष कौतुक राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्याची पाठ थोपटून केले. अवघ्या महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या अपघाताच्या मदतकार्यामध्ये अनेकांचा हातभार लागला. यात सिंहाचा वाटा उचलला तो महाबळेश्वरच्या दोन प्रमुख गिर्यारोहण संस्थानी. महाबळेश्वर ट्रेकर्सचे संस्थापक अध्यक्ष अनिल केळगणे, सुनील बाबा भाटिया, नगरसेवक कुमार शिंदे व इतर सहकारी, तसेच सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पारठे, संजय भोसले व सहकारी. त्यांच्या साथीला होते महाडच्या सह्याद्री मित्र गिरीभ्रमण संस्था, सीस्कॅप संस्थेचे व युथ क्‍लबचे एकूण २० सदस्य. याशिवाय कोकणकडा संस्थेचे कार्यकर्ते, यंग ब्लड ॲडव्हेंचर पोलादपूरचे सदस्य, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची संपूर्ण टीम, भोर व खेडचे बचाव दल तसेच स्वदेस संस्थेचे सुधीर वाणी. त्याचबरोबर आरोग्य खात्याच्या रुग्णवाहिका, दोन क्रेन, एल ॲण्ड टी कंपनीचे हॅलोजन दिवे व जनरेटर, महाबळेश्वर नगरपरिषदेचे विशेष दिवे आणि विविध सामाजिक संस्थांची या कार्यात मदत झाली. या घटनेनंतर सहा ऑगस्टला माननीय विनोदजी तावडे यांनी मंत्रालयात सर्व सहभागी गिर्यारोहकांचा आदर सत्कार केला. अशा घटनांच्या वेळी स्थानिक गिर्यारोहक त्वरित पोचतात व आपल्याकडील उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून बचाव कार्यात सहभागी होतात. ही उपकरणे महागडी असतात व प्रत्येक संस्था ते घेऊ शकत नाहीत म्हणून शासनाच्या आपत्कालीन निवारण यंत्रणेमध्ये या गिर्यारोहणाच्या साधनाचा समावेश करण्यात येईल.

त्याचा वापर त्या भागातील संस्थांचे प्रशिक्षित गिर्यारोहक करू शकतील. या गिर्यारोहकांना राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाकडून प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचप्रमाणे यासारख्या मोहिमांमध्ये गिर्यारोहक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने स्वतःचा जीव धोक्‍यात घालून काम करतात. म्हणून यांना शासनाकडून विम्याचे संरक्षण देण्यात येईल. असे आश्वासन मंत्री महोदयांनी या प्रसंगी दिले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीमध्ये अनेक घाट रस्ते आहेत त्यावरून असंख्य वाहने दररोज ये-जा करतात. सर्वच रस्ते शासनाने सुरक्षित करणे गरजेचे आहे. तसेच सध्या गड किल्ल्यावर ट्रेकिंगला जाणाऱ्यांनी भान ठेवून गिर्यारोहणाचा आनंद घ्यावा. जेणेकरून ट्रेकच्या वेळेस होणारे अपघात कमी होतील. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या