कासवांचे गाव 

रोहित हरीप
गुरुवार, 3 मे 2018

कव्हर स्टोरी
रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेळासमध्ये दरवर्षी फेब्रुवारी ते मे या काळात कासवाच्या पिल्लांचा जन्मोत्सव पार पडतो. वेळास गावाची ओळख बनलेली कासवे आणि त्यांच्या संवर्धनाचा आश्‍वासक प्रयत्न करणारे वेळासचे गावकरी याविषयी...
 

पहाटेची शांत वेळ...अंगाला झोंबणारा समुद्रावरचा थंडगार वारा... आसमंतात भरून राहिलेली लाटांची गाज... अजून पुरेसे उजाडले नव्हते, तरी समुद्रावर हळूहळू माणसं गोळा होऊ लागली होती. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळीच तेथे जमले होते. वेगवेगळ्या प्रांतातून, प्रदेशातून आलेली माणसं, काही तर परदेशातूनसुद्धा आली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उत्सुकता दाटून राहिली होती. किनाऱ्यावर एका बाजूला उभारलेल्या खोपटामध्ये दहा-बारा टोपल्या गोणपाट घालून झाकून ठेवल्या होत्या. त्याच्याभोवती जाळीचे कुंपण उभारले होते. कुंपणाच्या आजूबाजूला माणसे कोंडाळे करून बऱ्याच वेळापासून आपापल्या जागा अडवून बसून राहिली होती. तेवढ्यात गावातले कार्यकर्ते लगबगीने आले आणि तडक खोपटात शिरले. तेथे उपड्या करू ठेवलेल्या टोपल्या ते एक एक करून उघडून पाहू लागले... खोपटाबाहेरच्या माणसांची उत्कंठा शिगेला पोचली होती. टोपल्यांखाली नेमके दडले तरी काय होते? शे-दोनशे माणसं भल्या पहाटे किनाऱ्यावर कशासाठी जमली होती? पहिल्या दोन टोपल्या उघडल्या तरी पदरी निराशाच पडली... तिसरी टोपली उघडली आणि खोपटाबाहेरच्या माणसांचा एकच गलका उडाला. 

तिसऱ्या टोपलीखालून इवली इवलीशी पाऊले अलगद बाहेर पडली, नुकत्याच उघडलेल्या डोळ्यांनी पहिल्यांदाच या जगाचे दर्शन घेतले. बाहेर पडल्या पडल्या त्या पिलांना आस लागली होती ती समुद्राची... नैसर्गिक प्रेरणेने अंड्यातून बाहेर पडल्याच्या काही क्षणात ती पिले समुद्राकडे झेपावली. भल्या पहाटे हा जन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी जमलेल्या त्या गर्दीचे कष्ट सार्थकी लागले होते. काही महिन्यांपूर्वीच या किनाऱ्यावर येऊन अंडी घालून या पिलांची आई समुद्रात निघून गेली होती. कधीच न परतण्यासाठी... आता पुढचा संघर्ष पिलांना स्वतः करायचा होता. अंड्यातून बाहेर पडून ती पिले आज बाहेर पडली होती. जीवनचक्रातला एक टप्पा पूर्ण झाला होता. ही पिले होती ‘ऑलिव्ह रिडले’ या प्रजातींच्या कासवाची आणि हा सोहळा रंगला होता ते ठिकाण होते रत्नागिरीतील वेळास! 

वेळास... रत्नागिरी जिल्ह्याची सुरवात होते तिथले पहिले गाव! 
हरिहरेश्‍वराच्या सान्निध्यात असलेले आणि बाणकोट जवळून वाहणाऱ्या सावित्री नदीच्या खाडीच्या दक्षिण तीरावर वसलेले हे गाव तसे आडवाटेवरचे. बाणकोटच्या खाडीवरून जोपर्यंत फेरीबोट सेवा सुरू झाली नव्हती, तोपर्यंत कोकणच्या या भागात येऊनही या बाजूला फारसे कोणी फिरकत नसे. 
विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेले आडवाटेवरचे हे गाव काही दशकांपूर्वी फारसे कोणाच्या खिजगणतीतही नव्हते. नाही म्हणायला गावाला ऐतिहासिक वारसा मोठा आहे. याच गावात राहणाऱ्या ‘भानू’ आडनावाच्या कुटुंबातील एकाने देशावर जाऊन स्वतःच्या बुद्धीच्या बळावर इंग्रजांनाही सळो की पळो करून सोडले. ते प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणजे पेशवाईतील साडेतीन शहाण्यांमधील एक नाना फडणवीस! वेळास गावातला त्यांचा स्मारकवजा पुतळा एवढीच काय ती त्यांची आठवण आज वेळास गावात शिल्लक आहे. 

मात्र गेल्या दशकभरापासून वेळास जगाच्या नकाशावर येत आहे ते तिथे येणाऱ्या कासवांमुळे! फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात इथला समुद्रकिनारा माणसांनी गजबजून जातो. याचे कारण या किनाऱ्यावर येणारी कासवे. वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर पूर्वीपासून विणीच्या हंगामात कासवाच्या माद्या अंडी घालायला दरवर्षी येतात. निसर्गचक्रानुसार ही प्रक्रिया वर्षानुवर्षे अव्याहत सुरू आहे. वेळासच नाही तर इथून खाली दक्षिणेकडे हर्णे, केळशी, सालदुरे, अंजर्ले, कोळथरे, आडे, लाडघर, गुहागर, वेळणेश्‍वर, गावखडी, वेत्ये, मालगुंड, मुणगे, मालवण, वेंगुर्लेपर्यंतच्या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर दरवर्षी या कासवाच्या माद्या येत होत्या. काळाच्या ओघात इतर ठिकाणांचा पर्यटनस्थळं म्हणून विकास झाल्यामुळे कासवं त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला कायमची मुकली आणि कासवांचे येणे बंद झाले. पण आज वेळासला मात्र या कासवांचे हमखास दर्शन होते. दशकभरापूर्वी ही कासवं आणि त्यांची घरटी याबद्दल फारशी माहिती वेळास गावातसुद्धा कोणाला नव्हती. स्थानिक गावकऱ्यांना ‘कासवांची गोष्ट’ माहिती होती. किनाऱ्यावर फिरताना अधेमधे ही कासवं त्यांना दिसायची. या कासवाच्या किनाऱ्यावर जाण्यायेण्याचा वेळा त्यांना माहिती होत्या, पण त्याला फारसे महत्त्व कधी दिले नाही. कासवांचे महत्त्व काय? त्यांचे संरक्षण आणि संवर्धन कशासाठी करायला हवे याबाबतची पुरेशी जाण त्यांना नव्हती. 

गावातल्याच लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील काही लोक विणीच्या हंगामात कासवांवर नजर ठेवून असत. कासवांनी घातलेली अंडी पळवून नेत. कासवांचा खाण्यासाठी वापर या भागात सर्रास केला जात असे. मानवी शिकारांच्या तावडीतून सुटलेली अंडी आणि कासवे नंतर अन्नसाखळतील इतर घटकांच्या (कोल्हे, कुत्रे,तरस, समुद्री पक्षी, कावळे) तावडीत सापडत. त्यांतून बचावलेली काही नशीबवान पिले पाण्यापर्यंत पोचत. त्यांच्यामधल्या दीर्घायुषी होण्याचे भाग्य हजारामधील एखाद्याच पिलाला मिळत असे.   

‘सह्याद्री नेचर कर्न्झवेशन’ने रोवली मुहूर्तमेढ 
वेळासचा किनारा हा कासवाच्या प्रजननाचे नैसर्गिक केंद्र आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कासवे प्रजाननासाठी नियमितपणे येतात. याची सर्वप्रथम नोंद घेतली ती चिपळूणच्या ‘सह्याद्री नेचर कन्झरवेशन’ या संस्थेने. या संस्थेने २००२ पासून कासवाच्या संवर्धनासाठी संघटित स्वरूपात आणि शास्त्रीय पद्धतीने काम सुरू केले. या संस्थेचे कार्यकर्ते, वेळासचे गावकरी आणि वन खात्याचे अधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून वेळास कासव संवर्धनाचा ‘कासव महोत्सव’ सुरू झाला. सुमारे दहा-अकरा वर्ष संवर्धनाचे काम केल्यानंतर संवर्धनाची ही जबाबदारी ‘सह्याद्री नेचर कन्झर्वेशन’ने वेळासच्या ग्रामस्थांकडे सोपवली. आज वेळास गावात ग्रामपंचायत, वन्य संवर्धन समिती आणि निर्मल सागर तट या तीन संस्था एकत्र मिळून कासव संवर्धनाचे काम करतात. पाच वर्षापूर्वी ‘सह्याद्री नेचर कर्न्झवेशन’ने आपले काम वेळासच्या ग्रामस्थांकडे सोपवले. तेव्हापासून कासवांचे संरक्षणाचे आणि त्यांची घरटी आणि अंडी सांभाळण्याचे काम वेळासचे गावकरी करतात. ‘सह्याद्री नेचर कर्न्झवेशन’चे सुरवातीपासूनचे कार्यकर्ते आणि वेळास गावचेच रहिवासी मोहन उपाध्ये आणि त्यांचे सहकारी हे काम करत होते. गेल्या दोन वर्षापासून मोहन उपाध्ये यांनी आंजर्ले गावात कासवाच्या संवर्धनाचे काम सुरू केले आहे आणि तिथे त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. आंजर्ले गावातही आता कासवांबाबत जागृती वाढत आहे. वेळास गावात हेमंत सालदूरकर आणि इतर ग्रामस्थ संवर्धनाची धुरा सध्या वाहत आहेत.

संवर्धनाची प्रक्रिया 
साधारणतः नोव्हेंबर ते मार्च हा काळ या कासवाच्या प्रजननाचा काळ असतो. या काळात कासवाची मादी समुद्र किनाऱ्यावर येते. बहुतेक वेळेला ही मादी मध्यरात्री किनाऱ्यावर येते. भरतीची वेळ या कासवांना सोयीची असते. भरती ओहोटीची गणिते जुळवूनच या माद्या किनाऱ्यावर येतात. किनाऱ्यावर आल्यानंतर पाण्यापासून अंदाजे पन्नास ते सत्तर मीटर अंतरावर सुमारे दीड ते अडीच फूट खोल खड्डा करून मादी त्यात अंडी घालते. एका वेळी साधारणतः ८० ते १७० अंडी मादी घालते. या खड्डयावर रेती लोटून ही मादी पुन्हा समुद्रात निघून जाते. यानंतर ही मादी कधीच माघारी येत नाही. ‘पालकत्व’ (Parental Care) हा प्रकार कासवांमध्ये नसल्याने पिलांची जवाबदारी त्यांची आई नाकारते. यानंतर अंड्यातून बाहेर येणाऱ्या पिलांना त्यांची जन्मदाती आयुष्यात कधीच भेटत नाही. 

अंडी घालून कासवे समुद्रात परत जाताना रेतीवर एक वैशिष्ट्यपूर्ण नक्षी रेखाटून जातात. त्यांचे वल्ह्यासारखे पाय आणि शेपटी यामुळे किनाऱ्यावर एक विशिष्ट प्रकारची नक्षी तयार होते. या माद्या अंडी घालून समुद्रात परत गेल्या की गावातल्या कार्यकर्त्यांचे काम सुरू होते. नोव्हेंबर ते मार्च या काळात दररोज पहाटे हे कार्यकर्ते पहाटेच्या अंधारात किनाऱ्यावर कासवाची घरटी शोधण्यासाठी येतात. रात्री कासवांनी घरटे करून अंडी घातली, की दोन ते तीन तासाच्या कालावधीतच ही घरटी शोधून त्यामधील अंडी ही सुरक्षित ठिकाणी हलवावी लागतात. कासवांनी किनाऱ्यावर केलेल्या एक विशिष्ट प्रकारच्या नक्षीचा माग काढत रात्रीच्या अंधारात ही घरटी शोधावी लागतात. घरटे सापडल्यानंतर त्या घरट्याचा आकार, त्यांची खोली, लांबी याच्या सविस्तर नोंदी घेतल्या जातात. त्यानंतर त्या घरट्यातल्या अंड्याची नोंद केली जाते. नंतर ही अंडी हलक्‍या हाताने कासव संवर्धन केंद्रात आणली जातात. तिथे पुन्हा बरोबर तेवढ्याच खोलीचा खड्डा करून त्यात ही अंडी व्यवस्थित पुरली जातात. अंडी पुरल्यानंतर त्यावर घरटे सापडले तो दिवस आणि तारीख लिहिली जाते. तसेच अंदाजे अंड्यातून पिले कधी बाहेर येतील याचा दिनांकही लिहिला जातो. तशी पाटी प्रत्येक घरट्यावर लावली जाते. कासवाची मादी जेव्हा अंडी घालते, तेव्हा ती अंड्याभोवताली एक विशिष्ट प्रकारच्या स्राव सोडत असते. त्या स्त्रावामुळे अंड्यांचे बुरशीपासून रक्षण होते. त्यामुळे अंडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवताना मूळ घरट्यातील ही स्त्रावमिश्रीत मातीही हलवावी लागते. जेणेकरून अंड्यांना नैसर्गिक संरक्षण मिळते. चार महिने कार्यकर्त्यांचे हे काम अव्याहतपणे सुरू राहते. यावेळेस वेळासला मार्चअखेरपर्यंत वीस घरटी सापडली आहेत. हजार बाराशे अंडी सापडली आहेत. हे सगळे झाल्यानंतर प्रतीक्षा सुरू होते ती या पिल्यांच्या जन्मोत्सवाची....

अंडी उबण्यासाठी ४५ ते ५५ दिवसांचा कालावधी लागतो. तोपर्यंत रोज या घरट्यांवर लक्ष ठेवावे लागते. हा काळ संपला, की पिले स्वतः अंड्यातून बाहेर येतात आणि आजूबाजूची रेती उकरू लागतात. पिल्यांच्या या हालचालींमुळे घरट्याच्या पृष्ठभागावरील रेतीला लहान छिद्र पडतात. ही छिद्रे म्हणजे पिले अंड्यातून बाहेर पडल्याचे संकेत असतात. या सगळ्याचा अंदाज घेऊन पिले बाहेर कधी येतील याची तारीख निश्‍चित केली जाते. पिले स्वतःहून बाहेर येऊन तेव्हा ती इकडे तिकडे जाऊ नये यासाठी ही घरटी टोपलीने झाकली जातात. ही पिल्ले बाहेर आली, की लगेच समुद्रात सोडली जातात. पिल्ले घरट्यातून जमिनीवर आल्यानंतर दोन ते अडीच तासात त्यांना समुद्रात सोडावे लागते. यासाठी सकाळी सहा आणि संध्याकाळी सहा वाजता ही पिल्ले समुद्रात सोडली जातात. नवजात पिल्लांना प्रखर सुर्यप्रकाश सहन होत नसल्याने सुर्योदय व सुर्यास्ताची वेळ सोय़ीची ठरते.

वेळासमध्ये सध्या हे काम विजय सालदुरकर आणि विक्रांत देवकर हे दोघे करतात. वेळासचा किनारा चार किलोमीटर लांब आहे. कासवाच्या प्रजननाच्या काळात रोज हा किनारा पायी फिरून या घरट्यांचा शोध घ्यावा लागतो. कासवांचे घरटे सापडले, की लगेच वनखात्याला ते कळवावे लागते. किती अंडी सापडली, कधी सापडली या सर्व बाबींची नोंद तिथे केली जाते. वेळास आणि इथे येणारी कासवे यांचे नाते अतूट आहे. ही कासवं आता वेळास गावाची ओळख बनली आहेत. 

सागरी पर्यटनाचा नवा पैलू
एरवी कोणाच्या अध्यात ना मध्यात असणारे हे गाव केवळ तिथे येणाऱ्या कासवांमुळे कसे प्रसिद्ध होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे वेळास!! गेल्या पाच, सहा वर्षापासून इथे कासव महोत्सव भरवला जातो. या काळात वेळासमध्ये दहा ते पंधरा हजार पर्यटक हजेरी लावतात. वेळासला अजून तरी शहरी पर्यटनाचे वारे लागलेले नाही. त्यामुळे इथे मोठी हॉटेल नाहीत. शहरी बुजबुजाट नाही. इथे येणाऱ्या पर्यटकांची व्यवस्था घरगुती पद्धतीने अस्सल कोकणी पद्धतीने केली जाते. इथल्या पाहुणचारात अजून तरी अगत्य टिकून आहे. कासवांसाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे गावातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. आज वेळास गावात एकूण ३५ ठिकाणी मुक्कामाची आणि जेवण्याची सोय होते. आज गावात एकावेळी हजार एक पर्यटकांची मुक्कामाची सोय होते. वेळासचे हे वेगळेपण लक्षात घेऊन सरकारदेखील हा किनारा विकसित करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलत आहे. याच गावातील सुमारे ७२ एकर जागा ग्रामपंचायतीने सरकारला उपलब्ध करून दिली आहे. त्यावर सरकारकडून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास केला जाणार आहे.

‘कासवालय’ची अभिनव कल्पना
वेळास गावातले कासव संवर्धनाचे काम आत्ता बघणारे हेमंत सालदुरकर यांनी वेळास गाव, इथल्या पर्यटनाच्या संधी याबाबत ‘कासवालय’ या ड्रीम प्रोजेक्‍टबद्दल माहिती दिली. या प्रोजेक्‍टमध्ये जगभरातल्या विविध प्रजातीची कासवे आणून त्यांचे संग्रहालय उभारण्याचा मानस आहे. या कासव संग्रहालयात जगातील ८० ते १२० 

प्रजातीची कासवे असतील. या महत्वाकांशी प्रकल्पासाठी गावकऱ्यांचे सरकारदरबारी प्रयत्न सुरू आहेत. हे ‘कासवालय’ प्रत्यक्षात आल्यास वेळास गावाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचेल यात शंका नाही कारण जगभरातील कासवे एकाच ठिकाणी बघण्याची संधी जगात कुठेच नाही.

कासवांच्या जिवावर उठलेले पर्यटन
वेळासची ओळख जरी कासवांमुळे जगभरात झाली आहे, जर्मनीसारख्या देशांमधून या गावात कासवाच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी मिळतो. वेळासच्या किनाऱ्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. या ठिकाणी एका बाजूने थेट समुद्रात उतरलेला डोंगर तर दुसऱ्या बाजूने असलेले नदीचे पुळण यामुळे समुद्रावर माणसांचा तसेच गाड्यांचा वावर मर्यादित आहे. पर्यायाने इथे कचरा कमी होतो. त्यामुळे इथे अजूनही मोठ्या प्रमाणात कासवे येतात. वेळास व्यतिरिक्त अन्य किनाऱ्यांवरसुद्धा पूर्वी कासवे प्रजाननासाठी येत असत. पर्यटनाच्या नावाखाली फोफावलेली गर्दी आणि पर्यटकांची प्रचंड प्रमाणात वाढलेली संख्या याचा थेट परिणाम कासवाच्या संख्येवर होत आहे. आजकाल समुद्राला खेटून हॉटेल उभारली जात आहेत, रात्रभर समुद्रावर कॅम्पिंगच्या नावाखाली हैदोस घातला जातो. अनेक ठिकाणी थेट समुद्र किनाऱ्यांवर चार चाकी वाहने पळवली जातात. या सर्व घटकांचा थेट परिणाम कासवांवर होतो. अंडी घालायला आलेली कासवे माणसांची चाहूल लागताच अंडी न घालताच पुन्हा समुद्रात निघून जातात. याशिवाय हवामान बदलामुळे आणि तापमानातील चढ उतारामुळेदेखील या कासवाच्या संख्येत घट होते. यंदा ओखी वादळामुळे कासवांचा प्रजननाचा काळ बराच लांबला आहे. 

उत्साही पर्यटकांची समस्या
 वेळासच्या कासव महोत्सवाला पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात मिळणारा प्रतिसाद, कासवांबद्दलची वाढलेली जागरूकता या गोष्टी दिलासा देणाऱ्या आहेत. मात्र ही गर्दी कधी कधी कासवाच्या पिलांसाठी डोकेदुखी ठरते. कासवाची पिले अंड्यातून बाहेर येण्यासाठीच्या वेळा या पूर्ण निसर्गाधीन असतात. त्यामुळे तुम्ही वेळासला या हंगामात गेलात, तरी दर वेळेला तुम्हाला कासवांची पिले बघायला मिळतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे बऱ्याच पर्यटकांचा हिरमोड होतो. कासवाची पिल्ले समुद्रात सोडताना फोटो काढण्यासाठी प्रचंड झुंबड उडते. पिल्लांच्या मार्गात फोटो काढण्यासाठी उभे राहणे, फ्लॅशचा वापर करणे, बेकायदेशीररित्या पिल्ले हाताळणे यासारखे प्रकार हौशी पर्यटकांकडून घडतात. पिल्ले पाण्यात सोडल्यावर समुद्रात कोणी जाऊ नये कारण पिल्ले पाण्याच्या प्रवाहात पुन्हा किनाऱ्यावर येऊन पायाखाली चिरडण्याचा धोका असतो. मात्र पर्यटकांकडून या नियमाचे सर्रास उल्लंघन केले जाते. यातून काही वेळा पिले जखमी होण्याची घटना उघडकीला आली आहे. वेळासच्या कार्यकर्त्यांची संख्या आणि तिथे जमणाऱ्या पर्यटकांची संख्या यांचे व्यस्त प्रमाण लक्षात घेता, बऱ्याचदा पर्यटकांवर नियंत्रण ठेवते अवघड होऊन बसते. पिल्लांच्या सुरक्षिततेचे भान राखणे ही जबाबदारी आपली आहे, याची जाणीव पर्यटकांनी ठेवायला हवी. 

वनखात्याची भूमिका 
कासव संवर्धनाच्या कामासाठी वन खात्याकडून सुरवातीपासून सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. कासवाची घरटी आणि अंडी जे कार्यकर्ते शोधून काढतात त्यांना वनखात्याकडून मानधन दिले जाते. कासवांचे महत्त्व काय, त्यांचे संवर्धन कसे करावे याचे प्रशिक्षण देणाऱ्या कार्यशाळा दरवर्षी वनखात्याकडून घेतल्या जातात. या कार्यशाळामध्ये कासव संवर्धन केंद्र कसे उभारावे, अंड्यांची आणि पिलांची काळजी कशी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते. वनखात्याच्या या प्रयत्नांचे फळ म्हणजे काही वर्षांपूर्वी वेळासपुरता मर्यादित असणारा कासव महोत्सव आता गावखडी, वेत्ये, लाडघर, कोळथरे या गावांमध्येही सुरू झाला आहे. 

ऑलिव्ह रिडले कासव 
या कासवाचे शास्त्रीय नाव Lepidochelys Olivacea हे आहे. या प्रजातींच्या कासवाची सरासरी वयोमर्यादा पन्नास वर्ष इतकी असते. नराचे वजन ४० किलोपर्यंत तर मादीचे वजन ४५ किलोपर्यंत असते. या प्रजातीमध्ये मादी ही नरापेक्षा आकाराने मोठी असते. या कासवाची सरासरी लांबी २ फूट असते. विणीच्या हंगामात मादी ८० ते १७० अंडी एकावेळेस घालते. ही अंडी उबण्याचा कालावधी ४५ ते ५५ दिवसांचा असतो. नवजात पिलाचे वजन १५ ते २५ ग्रॅम इतके असते. नोव्हेंबर ते मार्च हा या कासवांचा विणीचा हंगाम असतो. भारतीय समुद्र किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक बिल, लॉगर हेड या चार प्रकारची कासवे आढळून येतात. यापैकी कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे आढळून येतात. या भागातील उष्ण समशीतोष्ण हवामान या कासवांना मानवते तसेच हे हवामान प्रजाननासाठी अनुकूल मानले जाते. ही कासवे वयात आल्यानंतर दर दोन ते तीन वर्षांनी अंडे घालतात. ही अंडी घालण्यासाठी त्यांना किनाऱ्यावर यावे लागते. याव्यतिरिक्त या कासवांचे पूर्ण आयुष्य समुद्रात जाते. समुद्रात ज्या भागात कासवे वास्तव्य करतात ती जागा आणि अंडी घालतात यामध्ये काही हजार किलोमीटर अंतर असते असे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. तसेच या कासवांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी या कासवांचा जन्म होतो त्याच ठिकाणी ही कासवे अंडी घालण्यासाठी परततात.

ऑलिव्ह रिडले कासवांचा वन्यजीवन (संरक्षण) अधिनियमन अन्वये अनुसूची-१ मध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच कासवांची अंडी घालण्याची जागा ही सीआरझेड कायद्यान्वये संरक्षित करण्यात आली आहे. सागरी कासवांची हत्या करणे, त्यांची अंडी पळवणे अगर कोणत्याही प्रकारे त्यांना इजा करणे व त्यांना धोका पोचेल असे वर्तन करणे इत्यादी बाबींचे उल्लंघन केल्यास जबर शिक्षेची तरतूद केली आहे.

संबंधित बातम्या