धडपड जीव वाचविण्याची...

शैलेंद्र पाटील
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी
पोलिस आणि प्रशासन जिथं हात टेकतात, तेथून त्यांचं काम सुरू होतं. वारा, पाऊस, धुकं, थंडी, अंधार... कशाकशाची पर्वा न करता हे जवान स्वतःला झोकून देतात. महाबळेश्‍वर ट्रेकर्स आणि सह्याद्री ट्रेकर्स हे महाबळेश्‍वरमधील ट्रेकर्सचे दोन ग्रुप अपघात, घातपात, दुर्घटनेच्या काळात प्रशासनाला मोलाचे सहकार्य करतात. जुलै महिन्यात पोलादपूर- महाबळेश्‍वर मार्गावरील आंबेनळी घाटातील बस दुर्घटनेनंतर या जवानांचे कार्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले. 

सह्याद्रीची विस्तीर्ण रांग सातारा जिल्हा आणि कोकण यांच्या सीमारेषा गडद करते. कातळात कोरल्यासारखे भासणारे उंचचउंच कडे, पाच-पाच हजार फूट खोलीच्या दऱ्या, नजरही पोचू शकत नाही एवढ्या दूरवर पसरलेल्या डोंगररांगा, हिरवाकंच परिसर, दऱ्याखोऱ्यांतून घोंगावणारा वारा, नको- नको करून सोडणारा पाऊस... म्हणूनच महाबळेश्‍वर-पाचगणीचा परिसर देशविदेशांतील पर्यटकांना पुन्हा पुन्हा येथे यायला भाग पाडतो. ही विपुल निसर्गसंपदाच एखाद्या दुर्घटनेच्या वेळी पोलिस आणि जिल्हा प्रशासनापुढील मोठा अडथळा ठरला आहे. 

आंबेनळी घाटात ता. २८ जुलैच्या सकाळी कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना वर्षा सहलीला घेऊन जाणारी बस अपघातग्रस्त झाली. घाटरस्त्यावरुन सुमारे सातशे फूट खोली दरीत बस कोसळली. अपघातस्थळ रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असले तरी ते महाबळेश्‍वरला जवळ होते. त्यामुळे महाबळेश्‍वर पोलिसांनी ट्रेकर्सना बोलावले. महाबळेश्‍वर-वाई एवढंच काय साताऱ्याहूनही काही ट्रेकर्स आंबेनळी घाटाच्या दिशेने रवाना झाले. ‘आख्खी बस घाटातून खाली गेली आहे. ३३ प्रवासी होते. कोणी वाचले असण्याची शक्‍यता धूसर आहे, असा पोलिसांचा पहिला फोन होता. जमेल त्या वाहनाची सोय करून आम्ही आंबेनळी घाटाच्या दिशेने कूच केली. पायात चपला घातल्या आहेत की नाहीत, याचेही आम्हाला भान नव्हते. ट्रेकिंगसाठी विशिष्ट प्रकारचे बूट असतात. मात्र, काहींच्या पायात साधे बूटही नव्हते’ दुर्घटनेनंतर मदत कार्यात सहभागी झालेले साताऱ्यातील काही ट्रेकर्स अनुभव सांगत होते.

सुमारे दीड हजार फूट खोल दरी, वरून पडणारा पाऊस, त्यातच दाट धुके त्यामुळे मदत कार्यात अनेक वेळा अडथळा येता होता. बघ्याची झालेली गर्दी हा मदत कार्यात आणखी एक अडथळा होता. कड्याखालील दाभिल गावातून काही ग्रामस्थ मदतीसाठी प्रयत्न करत होते. दरीत ७०० फुटांवर बस पडल्याने कार्यकर्त्यांची गरज मोठ्या संख्येने भासत होती. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ट्रेकर्सना १५ मृतदेह लवकर बाहेर काढता आले. मात्र, शेवटच्या टप्प्यात बसच्या उखडून पडलेल्या टपाखाली बरेचसे मृतदेह होते. कोसळणारा पाऊस, झोंबणारा वारा आणि धुक्‍याची चादर अशा अडचणीत जाऊन एवढ्या खालून ते मृतदेह काढण्याचे आव्हान ट्रेकर्सपुढे होते. रात्री प्रकाशझोत सोडून मदतकार्य सुरू होते. त्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) पुण्याहून आल्याने सर्वांचा हुरूप वाढला. दरीतून अखेरचा मृतदेह बाहेर काढेपर्यंत मदतकार्य थांबवणार नाही, या निर्धाराने सगळे कामाला लागले. रात्रभर कार्य करीत दुसऱ्या दिवशी बारा वाजता शेवटचा मृतदेह दरीच्या वर आल्यानंतरच या ट्रेकर्संनी आपले कार्य थांबवले.

अशा दुर्गम भागात एखाद्या दुर्घटनेची घटना कानी पडते आणि पोलिस अथवा स्थानिक नागरिकांचा पहिला कॉल जातो ट्रेकर्सना. व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून हे ट्रेकर्स परस्परांशी सतत संपर्कात असतात. ग्रुपवर पडलेल्या एका निरोपानंतर हातातील कामे टाकून सर्वांची वाहने दुर्घटनेच्या दिशेने धावू लागतात. त्यांच्यातल्याच कोणा एकाच्या घरी संस्थेचे सर्व साहित्य असते. ते झपाझप गाडीत भरून वाहने दुर्घटना स्थळाच्या दिशेने रवाना होतात. एखादं साहित्य आणायचे विसरले तर केवळ पश्‍चात्ताप आणि पश्‍चात्तापच, त्याशिवाय दुसरे काहीही करता येत नाही. पाण्याच्या तळात आणि कड्यांच्या खोलात अशा दोन ठिकाणी काम करण्याची तयारी ट्रेकर्सना ठेवावी लागते. दुर्घटना, घात-अपघातामध्ये जलाशयात बुडालेला मृतदेह शोधून बाहेर काढणे आणि दऱ्याखोऱ्यामध्ये फिरून जखमी अथवा चार-चार हजार फुटांवरील अवघड परिस्थितीमधील मृतदेह बाहेर काढण्याचे काम ट्रेकर्स करतात.

'कोण जेवलेले असते, कोण नसते. बचाव कार्यात किती वेळ लागेल याचा अंदाज नसतो. कोणाला तरी आपली गरज आहे, आणि आपण जखमींपर्यंत वेळेत पोचलो नाही तर अपघातग्रस्तांच्या जिवावर बेतू शकते, हा एकच विचार ट्रेकर्सच्या डोक्‍यात असतो. सॅकमध्ये स्वतःबरोबरच पुढे गेलेल्या युवकांसाठी बिस्कीट पुडे आणि पाण्याच्या बाटल्या घेण्याची जबाबदारी पाठीमागून जाणाऱ्या युवकांवर असते. कोणतेही काम ठरलेले नसते; तरीही प्रत्येकजण आपापली जबाबदारी ओळखून बिनचूकपणे कर्तव्य पार पाडत असतो. या कडीत एकजण जरी चुकला तरी दुसऱ्याच्या जिवावर बेतू शकते, याची जाण प्रत्येकाला असते. हीच जबाबदारी प्रत्येक जण ओळखून काम करत असतो. कधी चार तास तर कधी २४- ४८ तास; शेवटचा माणूस, मृतदेह बाहेर निघेपर्यंत! दरीत कोणी कोठून, कसे उतरायचे यासाठी आधी घटनास्थळी टेहळणी होते. जाणकार, अनुभवी ट्रेकर याचा निर्णय घेतो. दरीत उतरणारा ट्रेकर अनुभव व जाणकार असतो. त्याला बाहेरून सर्पोट टीम मदत करत असते.' महाबळेश्‍वर ट्रेकर्सचे सुनीलबाबा भाटिया ट्रेकर्सची काम करण्याची पद्धत सांगत होते. 

बचाव कार्यात ट्रेकर्सना नैसर्गिक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. काटेरी झुडपे, सर्प- विंचू, मधमाशांचे पोळे, कड्यातून सुटणारे दगड यांचा सामना करावा लागतो. दुर्गम भागात बऱ्याचदा मोबाईल रेंज नसते. आधुनिक साधनसामग्रीची वाणवा असते. इशाऱ्यांवर अथवा ओरडून संदेशवहन केले जाते. बचाव कार्यातील युवकांना परफ्यूम मारण्यास मनाई असते. परफ्यूमच्या वासानेही डोंगरकपारीत असलेल्या पोळ्यावरील मधमाशा पिसाळून उठू शकतात. बहुतांश दुर्घटना पावसाळ्यातच होतात. त्यामुळे पाऊस, चिखल, घसरडे, धुके, बोचरा वारा हे तर ट्रेकर्सच्या पाचवीलाच पुजलेले. पावसामुळे दगडावर, झाडावर शेवाळे साचलेले असते. त्यावर पाय ठेवणे सर्वांत धोकादायक आणि दरी उतरताना- चढून परत वर येताना हे दोनच आधार ट्रेकर्सना असतात.  

हजार फुटांवरून सुटलेला एखादा गोटीएवढा दगड बंदुकीच्या गोळीसारखा परिणाम करून दरीत काम करत असलेल्या ट्रेकर किंवा अपघातग्रस्त जखमीचा जीव घेऊ शकतो. या सर्वांचे भान ठेवून ट्रेकर्स काम करत असतात. दुर्गम भागात मोबाईल रेंज नसते. वॉकीटॉकीसारखी साधने परवडणारी नसतात. अशा वेळी ओरडून प्रत्येक टप्प्यावरील युवकामार्फत निरोप पुढे पोचवला जातो. दुर्घटनेतील जखमीची भाषा ट्रेकर्सना अवगत असेलच असे नाही. 

'एका दुर्घटनेत कन्नड भाषिक जखमी मुलगी दरीत अडकलेली. मदत कार्यासाठी पोचलेल्या ट्रेकरला ती काय सांगते कळेना. संवादात अडथळा आला. केवळ हातवारे करून, हावभाव करून तिला धीर देण्याचा प्रयत्न केला,' अशी आठवण महाबळेश्‍वर ट्रेकर्सचा जयवंत बिरामणे याने सांगितली. 

आंबेनळी घाटात बस दरीत कोसळून दुर्घटना झाली. त्यावेळी मदतकार्य करताना काही ट्रेकर्सच्या पायात बूटही नव्हते. अपघातामुळे बसच्या फुटलेल्या काचांचा खच दुर्घटनास्थळी होता. अनेकांच्या पायात काचा रुतल्या. काहींच्या पायात साधे बूट होते, त्याचे सोल निघून पडले. सलग २४ तासांहून अधिक काळ मदतकार्य सुरू होते. दरीतून अखेरचा मृतदेह काढल्याशिवाय मोहीम थांबवणार नाही, असा निर्धार ट्रेकर्सनी केला होता. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) अधिकाऱ्यांनी या ट्रेकर्सनी दाखवलेल्या धैर्याचे कौतुक केले. 

सज्जनगडजवळ ठोसेघर (ता. सातारा) धबधब्यातून, सुमारे हजार फूट खोल दरीत उतरून बालिकेचा मृतदेह शोधून बाहेर काढण्याची कामगिरी होती. पत्रकार असलेला महाबळेश्‍वर ट्रेकर्सचा कार्यकर्ता राहुल तपासे सांगत होता. ‘कोसळणाऱ्या पावसात ट्रेकर्स दरीत बेपत्ता मुलीचा शोध घेत होते. संध्याकाळी दमून- भागून वर यायचे. दुसऱ्या दिवशी उजाडले की पुन्हा दरीत... तिसऱ्या दिवशी मावळतीच्या वेळी शोधकार्य थांबवून आम्ही मंडळी हताशपणे वर बसलो होतो. पाणावलेल्या डोळ्यांनी एक मध्यमवयीन गृहस्थ समोर हात जोडून उभे होते. ‘‘भाऊ मला जाणीव आहे, माझी मुलगी वाचली नसेल. परंतु माझी एकच विनंती आहे. लेकीच्या मृतदेहावर स्वतः:च्या हातांनी अंत्यसंस्कार करण्याचे भाग्य तरी या हतबल बापाला मिळू द्या.’’ अशी आर्जव ते करत होते. बेपत्ता मुलीच्या वडिलांची ती अगतिकता पाहून आम्ही शोध मोहीम सुरूच ठेवण्याचा निर्धार केला. चौथ्या दिवशी पुन्हा दरीत उतरून शोधकार्य सुरू झाले. दुर्घटनेच्या पाचव्या दिवशी कॅमेऱ्याच्या साहाय्याने ठोसेघर धबधब्याच्या दरीतील कडे- कपाऱ्या धुंडाळल्या. आणि अखेर या शोध मोहिमेला यश मिळाले. चाळकेवाडीच्या पवनचक्‍क्‍यांमागे सूर्य बुडत असताना बेपत्ता मुलीचा मृतदेह घेऊन ट्रेकर्स वर येताना दिसले.‘ 

ट्रेकर्सपैकी कोणी चहाची टपरी चालवतो, कोणाचे महाबळेश्‍वरमध्ये दुकान आहे, तर कोणी पर्यटन निवासाचा व्यवसाय करतो. प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून हे युवक आपल्या परीने योगदान देत असतात. ‘एनडीआरएफ’ तसेच इतर तत्सम संस्था, ंसंघटना ट्रेकर्ससाठी प्रशिक्षण शिबिरे घेतात. त्याठिकाणी बहुतेकांचे प्रशिक्षण झाले आहे. मात्र, या मंडळींना रोजच्या धामधुमीमुळे सरावाला वेळच मिळत नाही. पोलिसांचा कॉल आला, की या ट्रेकर्सचा सराव आणि परीक्षा एकत्रितच होते. ठिकाण, वेळ आणि परिस्थिती भिन्न असते एवढंच!

या ग्रुपमध्ये काम करणाऱ्या तरुणांना लग्न जमविताना अडथळे येतात. मृतदेह उचलण्याचे काम करता म्हणून नाकं मुरडली गेली. तर काहींनी ‘एवढा मोठा धोका पत्करून काम करता, कशाचीच शाश्‍वती नाही’ असं म्हणून मुली देण्यास नकार दिला. सुरुवातीच्या काळात काळजीपोटी कुटुंबीयांकडूनही या कामास विरोध झाला. ट्रेकर्स संस्थेचे काम सोडून द्या, अशा अटीही घालण्यात आल्याचे युवक सांगतात.  

रोप, हार्नेस (कंबरपट्टा), डोक्‍यावरील बॅटऱ्या, हेल्मेट, बूट, कप्पी, हॅंडग्लोज आदी साहित्य ट्रेकिंगसाठी आवश्‍यक असते. याशिवाय मोटरबोट, जलाशयातून मृतदेह काढण्यासाठी गळ, मृतदेह दरीतून वर आणण्यासाठी जाळी, फिश डिटेक्‍टर आदी साहित्याची जरुरी असते. हजार फूट लांबीच्या एका रोपाची किंमत ३५ ते ४० हजार रुपये असते. आपत्कालीन स्थितीत काम करताना साहित्य हरवणे, विसरणे, खराब होणे यामुळे नुकसान सोसावे लागते. ट्रेकींगबरोबरच प्रथमोपचाराचेही प्रशिक्षण यातील काहींनी घेतलेले आहे. खोल दरीत जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीवर प्रथमोपचार करणे आवश्‍यक असते. हात, पाय, मणका, माण मोडलेला असतो. जखमीला कशा पद्धतीने कमीतकमी त्रासात दरीतून बाहेर काढता येईल, याचे ज्ञान त्यांना दिले जाते.

ट्रेकिंगसाठी आवश्‍यक किमती साहित्य आमच्याकडे आहे. आम्हाला पैसे नकोत; शासनाने दुर्घटनास्थळी नेण्या- आणण्यासाठी वाहन व्यवस्था करावी. ट्रेकर्सना आवश्‍यक साहित्य (इक्विपमेंट) पुरवावे. मदतकार्य करताना ट्रेकर्सच्याही जिवावर बेतू शकते. त्यामुळे महाराष्ट्रात असे काम करणाऱ्या ट्रेकर्सचा राज्य शासनाने विमा उतरवून त्याचा ‘वन टाइम प्रीमियम’ भरावा.
- अनिल केळगणे (अध्यक्ष, महाबळेश्‍वर ट्रेकर्स, महाबळेश्‍वर)

महाबळेश्‍वरमध्ये आम्ही २००५ मध्ये संस्था नोंदणीकृत केली असली तरी प्रत्यक्षात संस्थेचे काम १९९९ पासून सुरू आहे. आम्हाला सरकारकडून काहीही नको आहे. आम्ही निरपेक्ष भावनेतूनच काम करतो. तथापि, शासनाने ट्रेकर्सच्या भल्यासाठी चांगला निर्णय घेतला तर त्याचे स्वागतच आहे. 
- संजय पार्टे (अध्यक्ष, सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्‍वर)

फोटो फीचर

संबंधित बातम्या