श्रावणातील रुद्राभिषेक

श्रीकांत नवरे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी

श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ महिना मानला जात असल्यामुळे या महिन्यातील प्रत्येक दिवशी, म्हणजे शुद्ध प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत काही ना काही धर्मकृत्य करावयास सांगितलेले आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक करणे, हे एक विशेष कृत्य मानले जात असे. वरवर आणि कमी महत्वाच्या वाटणाऱ्या या रुद्राभिषेकाच्या अनुषंगाने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक अशा घडामोडींच्या इतिहासाचे ज्ञान होते. 

हे रुद्राभिषेक प्रकरण समजून घेण्यापूर्वी ‘रुद्र’ या देवतेविषयी प्राथमिक माहिती करुन घेणे समयोचित होईल. ऋग्वेदात रुद्र ही मध्यम श्रेणीची देवता आहे. तिचे महत्व विष्णूपेक्षा कमी आहे. केवळ तीन पूर्ण सुक्ते त्याच्या वाट्याला आलेली आहेत. (ऋग्वेद १.११४, २.३३ व ७.४६) या व्यतिरिक्त ऋग्वेदाच्या १.१४३ सूक्तातील पहिल्या सहा ऋचा रुद्रस्तुतीपर आहेत; तर ६.४७ या सूक्तात रुद्र व सोम यांचे एकत्र स्तवन केलेले आहे. 

शिव हे रुद्राचे जे प्रसिद्ध नाव आहे, ते यजुर्वेदातून आलेले आहे. रुद्राचा क्रोध नाहीसा करणाऱ्या स्तुतींनी त्याला ‘शिव’ (कल्याणकारी) ही उपाधी दिली. ऋग्वेदकालीन आर्यांना शिव माहित नव्हता. त्यांना ठाऊक होता तो रुद्र. वैदिकांचा रुद्र, द्रविडांचा शिव आणि अनेक जातीजमातींचे तत्सदृश देव यांचा गुणकर्मसमन्वय होऊन सांप्रतचा पौराणिक शिव आकाराला आला. पुढील काळात विष्णूपेक्षा शिवाचे क्षेत्र खूपच व्यापक झाले. आज देशभर समाजाच्या विविध थरांमध्ये रुद्रानुष्ठान किंवा शिवोपासना प्राचुर्याने आढळते. अर्थात पौराणिक शिवाचे स्वरुप व उपासना यातील बरेचसे अंश वैदिक रुद्राचे स्वरुप आणि त्याची उपासना यातूनच घेतले गेलेले आहेत. 

रुद्राभिषेकासाठी ज्या मंत्रांचे पठण केले जाते तो मंत्रसमूह कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेच्या चौथ्या कांडात आलेला आहे. रुद्राचे नमक आणि चमक विभाग असून प्रत्येका ११ अनुवाक आहेत. पहिल्या विभागात नमःशब्द वारंवार येत असल्यामुळे त्याला ‘नमक’ असे म्हणतात व दुसऱ्या विभागात ‘च मे’ हे शब्द वारंवार येत असल्यामुळे त्याला ‘चमक’ असे म्हणतात. नमकाला ‘शतरुद्रीय’ आणि चमकाला ‘वसोर्धारानुवाक’ असे म्हणतात. हे दोन्ही अध्याय मिळून रुद्र होतो. 

रुद्राची संख्या अकरा असल्याने शंकराच्या अभिषेकासाठी रुद्राची अकरा आवर्तने म्हटली जातात. म्हणून त्या अभिषेकाला ‘एकादशिनी’ असे नाव आहे. त्याचाच अपभ्रंश ‘एकादष्णी’ असा झालेला आहे. अर्थात गणपती, देवी, विष्णू या देवतांच्या अभिषेकाला ‘एकादष्णी’ शब्द वापरला जात नाही. कारण त्या प्रत्येक देवतेच्या अभिषेकाची आवर्तनसंख्या भिन्न आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी जो रुद्राभिषेक केला जातो त्याचे सर्वसाधारण दोन प्रकार आहेत. एक म्हणजे घरातील मूर्तीवर किंवा पिंडीवर अभिषेक करणे आणि दुसरे म्हणजे शंकराच्या मंदिरात जाऊन अभिषेक करणे. पुरोहितांच्या दृष्टीने या दोहोंमध्ये फायदे-तोटे होते. मंदिरात अभिषेक करण्यासाठीही त्या यजमानाच्या घरी गुरुजींना जावे लागत असे. तेथून पुजेच्या तयारीचे तबक घ्यायचे. पायात चपला न घालता धोतर किंवा पंचा नेसून अंगावर केवळ उपरणे पांघरुन त्या विशिष्ट देवळात जायचे आणि षोडशोपचार पूजा करुन रुद्राची अकरा आवर्तने म्हणून परत यजमानाच्या घरी पुजेचे तबक पोचते करायचे, एवढे सोपस्कार त्यामागे असत. तबक आणणे आणि तबक पोचविणे या शब्दांना याज्ञिकी लोकात अनेक अर्थ होते. 

घरचा अभिषेक म्हटला, की काही ठिकाणी अभिषेकाबरोबरच इतर देवांची पूजाही करावी लागत असे. संपूर्ण पूजा झाल्यानंतर अभिषेक करणे, हे पारंपारिक पूजा पद्धतीला मान्य नाही. आजही कन्नड समाजात सर्व देवांची पूजा झाल्यानंतर अभिषेक करु देत नाहीत. पूर्वीच्या देवांची पूजा म्हणजे एका अभिषेकाचा वेळ जात असे. अभिषेक साधारण सूर्योदयाला प्रारंभ होऊन दुपारी बाराच्या आत संपत असत. ते पूजा, अभिषेक, पाठ, जप यांचा जो शास्त्रार्थ आहे त्याला धरुनच होते; पण रुद्राभिषेक करण्यास प्रदोषकाळापर्यंत म्हणजे संध्याकाळपर्यंत परवानगी असे. याचे कारण सोमवार हा उपवासाचा दिवस असे, हे आहेच; पण शिवपूजनाला प्रदोष काल हाच प्रशस्त आहे. पुढे पुढे पुरोहितांचे कामाचे व्याप वाढल्यानंतर केवळ अभिषेकासाठी अडकून राहणे गैरसोयीचे होऊ लागले. साधारण दुपारी दोननंतर पौरोहित्याची मोठी कामे कमी होतात. प्रदोषकाला घरी जे रुद्रभिषेक होत असत, ते साधारण भोजनासह असायचे; त्यामुळे या व्यवसायात नवीन आलेले ब्रह्मचारी विद्यार्थी, गृहस्थाश्रमी असूनही कायमस्वरुपी बिऱ्हाड न केलेले आणि विधुरावस्था प्राप्त झालेले जेवणाच्या बाबतीत परावलंबी किंवा परस्वाधीन असल्याने ही प्रदोषकाळच्या रुद्राभिषेकाची आंमत्रणे स्विकारण्याबाबत दक्ष असतं. त्यामुळे त्या दिवसापुरता का होईना संध्याकाळच्या जेवणाचा प्रश्‍न सुटत असे. अर्थात परान्न न घेणारी म्हणजे आपले अन्न आपण शिजवून खाणारी मंडळीही होती. ती अशा क्षणिक मोहाला बळी पडत नसत. ‘अन्नमयं मनः’ या उपनिषद्‌ वाक्‍यांचा त्यांना साक्षात्कार झालेला होता. 

रुद्राभिषेक विशिष्ट देवळातच झाला पाहिजे, असा अनेक यजमानांचा आग्रह असे. पुण्यात ओंकारेश्‍वर, पाताळेश्‍वर, वृद्धेश्‍वर, अमृतेश्‍वर, केदारेश्‍वर ही शंकराची मंदिरे प्राचीन समजली जातात. ती पुण्याच्या मूळ वस्तीपासून जवळ आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात आहेत. शनिवार पेठेतील विश्‍वेश्‍वर मंदिर, नेने घाटावरील कामेश्‍वर मंदिर यात दर्शनेच्छू लोकांची गर्दी आणि अभिषेक करणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे जाणवते. शनिवार पेठेतील नातूंची शंकरांची मंदिरे, सदाशिव पेठेतील द्रविडांचे महादेव मंदिर, रविवार पेठेतील लोणार आळीतील फडके महादेव मंदिर, मंडईजवळील खाजगीवाल्यांचे रामेश्‍वर मंदिर या खाजगी मालकीच्या देवळांतून अभिषेक करण्यासाठी जाण्याचा प्रसंग पुरोहितांना क्वचितच येत असे. 

रविवार पेठेतील सोमेश्‍वर मंदिर, सोमवार पेठेतील नागेश्‍वर मंदिर, कसबा पेठेतील केदारेश्‍वर मंदिर, रास्ता पेठेतील लक्ष्मीश्‍वर मंदिर, संभाजी पुलावरील पांचाळेश्‍वर मंदिर, एरंडवण्यातील महादेव मंदिर इत्यादी मंदिरातून त्या त्या भागातील लोक दर्शनसाठी गर्दी करताना दिसत असले तरी त्या ठिकाणी रुद्राभिषेक करण्याचे प्रमाण फारच कमी आहे.

अभिषेकासाठी यजमानाला त्याचे व स्वतःचे नाव व गोत्र विचारुन घ्यावे लागत असे. अर्थात त्यामागे शास्त्रीय विचार आहेच; पण व्यवहाराचाही भाग आहे. कारण तेच नाव व गोत्र असलेले अनेक लोक असण्याची शक्‍यताही असे; पण नाव व गोत्र विचारले म्हणजे आपण अभिषेक करणार किंवा केला असा विश्‍वास निर्माण होत असे. पुरोहित हा यजमानाच्याच कुटूंबाचा एक घटक अशी भावना असल्याने असे प्रसंग यजमान व पुरोहित यांच्या परस्पर श्रद्धा आणि विश्‍वासावर चालत असत.

‘अभिषेकाच दक्षिणा’ हा आज मनोरंजनाचा विषय वाटेल. पण पूर्वीची अभिषेकाची जी दक्षिणा मिळत असे ती त्या काळाच्या मानाने भरपूरच होती.

सध्याच्या धावपळीच्या, घाईगर्दीच्या, विभक्त कुटूंबपद्धती मान्य केलेल्या या अर्थप्रधान भौतिक संस्कृतीचा परिणाम अभिषेक प्रकरणावरही झाला आहे. या सर्वांवर श्रद्धा आणि निष्ठा असणारी जुनी मंडळी कमी कमी होत चाललेली आहेत. नवीन पिढीला यामध्य आस्था आहे, स्वारस्य आहे. परंपरेचा अभिमानही आहे; पण त्यांच्या दैनंदिन कार्यक्रम पत्रिकेत याला द्यायला पुरेसा सोयीचा वेळ नाही. अशा लोकांनी स्वतःच यातून मार्ग काढला आहे. आणि तो म्हणजे देवळात जाऊन पैसे नेऊन देणे आणि तेथेच अभिषेक करायला सांगणे. आज बहुतेक देवळांमधून असे अभिषेक स्विकारले जातात आणि त्यांची जशी व्यवस्था असेल त्याप्रमाणे ते केले जातात. 

माणसांप्रमाणेच देवतांचीही ऊर्जितावस्था येण्यासाठी काही काळ जावा लागतो, वेळ यावी लागते. १२ जुलै १९६१ मध्ये पानशेत धरण फुटून पुण्यात पुर आला आणि पुण्यातील शनिवार, नारायण, कसबा, मंगळवार या नदीकाठच्या पेठांच्या परिसरात राहणाऱ्या पूरग्रसत लोकांना अपरिहार्यपणे कोथरुड, सहकारनगर, विठ्ठलवाडी-आनंदनगर, गोखलेनगर, जनवाडी या ठिकाणी स्थलांतर करणे भाग पडले. अर्थात या ठिकाणी वास्तव्याला गेल्यामुळे त्या परिसरातील जी उपेक्षित आणि दुर्लक्षित शिवाची प्राचीन मंदिरे होती त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य प्राप्त झाले. कोथरुडचे मृत्युंजयेश्‍वर, सहकारनगरचे अरण्येश्‍वर, धायरीतील धारेश्‍वर, कर्वेनगर (हिंगणे) येथील सिद्धेश्‍वर, इत्यादी मंदिर पुण्यातील स्थलांतरीत लोक आणि पुणे शहराच्या बाहेरुन आलेल्या लोकांनी दर्शन, पूजा, अभिषेक या निमित्ताने अव्याहत गजबजलेली असतात. 

या रुद्राभिषेकाचा दुसरा प्रकार म्हणजे लघुरुद्र. यामध्ये ब्राह्मणसंख्या आणि आवर्तनसंख्या यांना महत्व असते. मधल्या काळात अशा लघुरुद्राची संख्या वाढल्याने आणि त्यामानाने गुरुजींची संख्या घटल्याने ती एक समस्या निर्माण झाली होती; पण याज्ञिकांबरोबरच वैदिक, प्रवचनकार, पुराणिक, कीर्तनकार, ज्योतिषी आणि निरनिराळ्या क्षेत्रातील सेवानिवृत्त लोक हेही या अभिषेक, लघुरुद्र, महारुद्रासारख्या अनुष्ठानात सहभागी होऊ लागल्याने हा प्रश्‍न बऱ्याच अंशी मिटला आहे. लघुरुद्राच्या वेळी अकराच्या अकरा ब्राह्मण ठरलेल्या एकाच वेळात येऊन ठरलेल्या वेळीच सुरवात झाली पाहिजे, असा दंडक होता. अनुष्ठानाचा शिस्तीचा तो एक भाग होता. आणि तो यजमान आणि गुरुजी या उभय पक्षांकडून कटाक्षाने पाळला जात असे. भिक्षुकी पेशा न घेतलेल्या पण नित्यकर्म-ब्रह्मकर्म हा अध्ययन, आचरणाचा विषय असणाऱ्या निरनिराळ्या क्षेत्रातील लोकांना रुद्र मुखोद्‌गत (पोथी न घेता) येत असे. त्यामुळे रुद्राचे स्वच्छ, स्पष्ट, शुद्ध शब्दोच्चार होत आहेत की नाहीत, हे काळजीपूर्वक ऐकले जात असे. मंत्रांचे स्वर आणि अक्षरांचे नियम न पाळणाऱ्या आणि रुद्र पाठ नसणाऱ्या म्हणजेच पोथी घेऊन रुद्र म्हणणाऱ्याला रुद्राचे निमंत्रण मिळत नसे. ‘लिखित पाठक’ हा पाणिनीने शिक्षाग्रंथात वेदपाठकाचा दोष सांगितलेला आहे. 

परंपरेने वेदातील रुद्रमंत्राप्रमाणेच पुष्पदन्त विरचित ‘शिवमहिम्न स्तोत्र’ हे अभिषेकासाठी अकरा वेळा म्हणावे, असे सांगितले आहे. संथा न घेता, मंत्रांचे स्वर आणि अक्षरांच्या नियमाचे पालन न करता अशुद्ध आणि चुकीचा रुद्र म्हणण्यापेक्षा संथा घेऊन शिवमहिम्नस्तोत्र म्हणून जर शिवोपासना केली, तर भाषा, आशय, आणि अध्यात्म या सर्वच दृष्टीने उच्चदर्जा असलेल्या या स्तोत्राचा घराघरात प्रचार-प्रसार होईल. 

सध्याचा काळ हा केवळ मंत्राचा नाही, तर तंत्र आणि यंत्राचाही आहे. त्यामुळे रुद्राभिषेकासाठी किंवा रुद्र पठणासाठी रुद्राच्या निरनिराळ्या कॅसेटही बाजारात येत आहेत. मात्र पारंपारिक पद्धतीने गुरुजवळ बसून संथा पद्धतीने ज्याने रुद्राचे अध्ययन केलेले आहे, त्याने म्हटलेल्या रुद्रामध्ये अधिकार, अचुकता, पावित्र्य, शुचिता, आत्मिक चैतन्य यासारख्या ज्या गोष्टी आहेत, त्या तंत्राने कितीही आघाडी मारली तरी यंत्रामध्ये येणे शक्‍य नाही. तरीही या सर्वांकडे ‘कालानुरुप सोय’ म्हणून पाहिले पाहिजे. रुद्राभिषेकासाठी उपयोगात आणला जाणारा हा ‘रुद्राध्याय’ सुरवातीच्या काळात केवळ शैव संप्रदायातच आपले महत्व टिकवून होता. पण कालांतराने वैष्णवांनाही त्याचे महत्व पटले, लक्षात आले आणि त्यांनी ते समजून घेऊन आपल्या नित्याच्या अनुष्ठानात त्याचा स्विकारही केला. रुद्राध्यायाच्या जपाने विष्णूलोकाची प्राप्ती होते, असे स्कंदपुराणाच्या रेवा खंडात (११.७१) सांगितलेले आहे. इसवी सन सोळाव्या शतकात होऊन गेलेले वेदांत्ताच्या अद्वैत सिद्धांताचे खंदे आणि कट्टर समर्थक मधुसुदन सरस्वतींनी शिवमहिम्न स्तोत्रातील प्रत्येक श्‍लोकाचा शिवपर आणि विष्णूपर अर्थ लावून या दोन देवतांमधला अभेद स्पष्ट केला. हा या स्तोत्रातील सामाजिक तत्वज्ञानाचा गाभा होय!

संबंधित बातम्या