हत्ती विरुद्ध माणूस ?! 

सुधाकर काशीद
गुरुवार, 7 जून 2018

कव्हर स्टोरी
जंगली हत्ती शेतात आला, त्याने पीक खाल्ले, याचे अप्रूप काही काळापूर्वी कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांना होते. मात्र आता सतत होत असलेल्या हत्तींच्या आक्रमणामुळे, ते करत असलेल्या नुकसानीमुळे हा शेतकरी बिथरला आहे. यातून कसा मार्ग काढावा, या विवंचनेत आहे... वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, घेतलेला या स्थितीचा मागोवा... 

जंगली हत्ती शेतात आला. त्याने शेतातील पीक खाल्ले किंवा त्याच्या पायाचे ठसे शेतातल्या मातीत उमटले, तरी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अप्रूप मानत होता. हत्तीच्या पायाच्या ठशांवर हळदी कुंकू वाहून हत्तीबद्दलचे प्रेम व्यक्त करत होता. ‘आमच्या शेताला हत्तीचे पाय लागले बघा,’ असे कौतुकाने सांगत होता. पण आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, आजरा, भुदरगड या सहा तालुक्‍यांत हत्तींच्या कौतुकाचा विषय संपला आहे. सुरवातीला कौतुक वाटणाऱ्या हत्तींकडून होणाऱ्या शेतीच्या नुकसानीमुळे शेतकरीच बिथरला आहे. या शिवाय हत्तींच्या आक्रमकतेमुळे धास्तावला आहे. हत्तींच्या भीतीने रात्री शेतीच्या राखणीला कोणी जात नाही, अशी परिस्थिती आहे. ‘हत्ती चले अपनी चाल’ हे म्हणायला चांगले असले तरी आता दिसला हत्ती की त्याला हुसकावे असा ‘हत्ती विरुद्ध माणूस’ असा खेळ सुरू झाला आहे. 

पन्हाळा तालुक्‍यात मानवाड पिसात्री हा परिसर आहे. ही गावे ओलांडून आपण पुढे दहा - पंधरा किलोमीटरवर गेलो, की कोल्हापूर जिल्ह्याची हद्द संपते आणि रत्नागिरी जिल्ह्याची हद्द सुरू होते. अर्थात कोल्हापूर जिल्ह्यातल्या पडसाळे या शेवटच्या गावातून एक जुनी पायवाट दरीमध्ये उतरते. ही पायवाट कोकणातल्या काजिर्डे गावाला येऊन पोचते. 

एका बाजूला कोकणात उतरणारी दरी, एका बाजूला दाट झाडी, एका बाजूला अगदी छोट्या छोट्या टेकड्यांवरील हिरवागार ऊस आणि बऱ्यापैकी पाणी असणारी जांभळी नदी असा हा परिसर आहे. हत्तीला त्याच्या दृष्टीने खूप सोयीचा हा परिसर आहे. दिवसभर तो दाट झाडीमध्ये थांबतो. दिवस मावळला, की हिरव्यागार उसाच्या शेतीकडे वळतो. रात्री दीड - दोन वाजेपर्यंत जांभळी नदीच्या पात्रात उतरतो. कडेच्या चिखलात लोळतो व पुन्हा पहाटे - पहाटे जंगलाकडे वळतो. 

पण या मधल्या काळात हत्ती - ऊस, केळीचे सोट, मका खाण्याच्या निमित्ताने शेतीचे जे नुकसान करतो. तेथेच ‘हत्ती विरुद्ध माणूस’ हा संघर्ष सुरू होतो. मानवाड परिसरात भैरीचा धनगरवाडा, ढवणाचा धनगरवाडा, वाशी, कोलीक अशी छोटी छोटी गावे आहेत. दिवस मावळला, की या गावातील लोक आपापल्या घराकडे परततात. हत्ती आला तर त्याला हुसकवायचे म्हणून बॅटरी, काठ्या घेऊन एकत्र जमतात. 

गेल्या काही दिवसांत त्यांना हत्तींचा बऱ्यापैकी अंदाज आला आहे. पश्‍चिमेकडच्या बाजूला दाट झाडीमध्ये हालचाल जाणवू लागली किंवा फांद्या मोडण्याचा कडाकडा आवाज येऊ लागला, की हत्ती आला आहे हे ओळखतात. अर्थात हत्ती एकाच वाटेने येतो असे नाही. त्याच्यी हालचाल एका दिशेने होते आणि तो येतो दुसऱ्याच बाजूने! हत्ती येतो तो थेट उसाच्या शेतात घुसतो आणि ऊस खायला सुरवात करतो. शेतकऱ्यांच्या मते, हत्ती खातो कमी पण ऊस तुडवून नुकसान अधिक करतो. केळीची झाडे तर तो बघता बघता उपसतो.. आणि हे सारे नुकसान शेतकरी लांबून पाहात असतो. अंधारात कधी हत्ती स्पष्ट दिसतो - कधी नाही; पण बॅटरीचा झोत टाकला तर हत्ती कधी अर्धा दिसतो तर कधी झाडाआड दडतो. अर्थात आपल्या डोळ्यांदेखत होणारे हे नुकसान शेतकरी पाहूच शकत नाही. मग तो हत्तीच्या दिशेने बॅटरीचे झोत टोकतो, जोरजोरात ओरडतो, फटाके उडवतो, मोकळे डबे वाजवतो. पण हत्ती इकडे तिकडे ढुंकूनही पाहात नाही. मधूनच फुत्कारून आपले अस्तित्व दाखवतो आणि शेतीचे प्रचंड नुकसान करूनच शेतातून बाहेर पडतो. आज या शेतात हत्ती आला, आता उद्या - परवा आपल्याही शेतात येणार, असेच नुकसान करणार; म्हणून शेजारचा शेतकरीही अस्वस्थ होतो आणि हत्ती आपल्या शेतात आला तर त्याला कसे हुसकवायचे, या प्लॅनिंगला लागतो. 

हत्तीचे अस्तित्व फक्त मानवाड परिसरातच आहे असे नाही. आजरा तालुक्‍यातही असाच एक हत्ती आहे. तो त्याच्याच ऐटीत आहे. आजरा - आंबोली या महामार्गावर तर त्याचे रोज दर्शन आहे. एखादे झाड आडवे पडले म्हणून वाहतूक खोळंबली असे पाहतो. पण वाटेत हत्ती उभा आहे. म्हणून वाहनधारकांनी वाहने थांबवण्याचा प्रकार दर दोन-तीन दिवसाला येथे घडतो आहे. या हत्तीलाही दिवसभर सावलीत थांबायला दाट झाडीचा परिसर आहे.. आणि रात्री फारसा प्रयास न करता खायला मिळणारा ऊस आहे. पाणवठे तर ठिकठिकाणी आहेत. त्यामुळे या हत्तीने तर वर्षभर आजरा तालुक्‍यातच तळ ठोकला आहे. 

भुदरगड तालुक्‍यातील पाटगावमध्ये एक हत्ती नव्हे, तर पाच हत्तींचा कळप आहे. त्यामध्ये तीन लहान पिल्ले आहेत. पाटगावला एका बाजूला मौनीसागर जलाशय तर दुसऱ्या बाजूला थेट कोकणातल्या खोल दरीपर्यंत पसरलेले जंगल आहे. अस्वलांच्या अस्तित्वासाठी हे जंगल प्रसिद्ध होते. पण आता तेथे पाच हत्तींचा कळप म्हणजे एक कुटुंबच आहे. या परिसरातील जंगल इतके दाट आहे, की पाच हत्तींचा कळपच काय हजारभर हत्तींचा कळप सामावून घेऊ शकेल अशी इथली परिस्थिती आहे. पण हत्ती चरायला शेतकऱ्यांच्या शेतात आणि राहायला जंगलात, असे होते आहे. यामुळे शेतकऱ्यांच्यात हत्ती म्हटले की चिड आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात हत्तींचा वावर वाढण्यास इथली नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती कारणीभूत आहे. कोल्हापूर जिल्ह्याची हद्द पश्‍चिमेकडील बाजूला कर्नाटक व गोव्याला लागून आहे. कर्नाटकात हत्तींचा वावर खूप वर्षांपासून आहे. पण त्यातील काही हत्ती चंदगड, तिलारीमार्गे कोल्हापूर जिल्ह्यात आले आहेत. हत्तीला कर्नाटक काय किंवा महाराष्ट्र काय; जिथे दिवसभर राहण्यासाठी दाट झाडी, खाण्यासाठी हिरवागार चारा किंवा हिरवीगार पिके आणि भरपूर पाणी अशी परिस्थिती असेल, तर तो त्याच्या जगण्यासाठी इतर कोठेही जाणार नाही हे स्पष्टच आहे. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्याला जबाबदार कोण? हा खरा प्रश्‍न आहे. या प्रश्‍नाचे उत्तर समाधानकारक नसल्याने संघर्ष निर्माण होऊ लागला आहे. नुकसान भरपाईबद्दल शेतकरी असमाधानी आहेत. वनविभागाकडून मिळणारी नुकसान भरपाई आणि प्रत्यक्ष नुकसान यातील तफावत हा असंतोषाचा मुद्दा आहे. नुकसान भरपाई मिळते म्हणून उभ्या पिकाचे नुकसान शेतकऱ्यांनी बघत बसायचे का, हा शेतकऱ्यांचा पोटतिडकीचा प्रश्‍न आहे. 

हत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीकडे शेतकरी त्याच्या नजरेने पाहतो. वनखाते त्यांच्या चौकटीतून पाहते. पर्यावरणवादी, वन्यजीवप्रेमी यांचे मत त्याहून वेगळे असते. हत्तीला शेतकऱ्यांनीच समजून घेतले पाहिजे किंवा त्याचे अस्तित्व मान्यच केले पाहिजे अशी त्यांची भूमिका असते. या तीनही भूमिका त्या त्या पातळीवर योग्य आहेत. पण वास्तवात चित्र वेगळे आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतांचे हत्तीने प्रचंड नुकसान केले आहे; त्या शेतकऱ्याला पर्यावरणवादी ‘हत्तीला सांभाळून घ्या’ असे समजवायला गेले, तर शेतकऱ्यांचे डोके सणकते. अशी परिस्थिती आहे. मग उरते वनखात्याची भूमिका! आम्ही योग्य ती नुकसानभरपाई देतो, जेवढी तातडीने देता येईल तेवढी देतो, असे वनखाते सांगते. पण ही नुकसानभरपाई शेतकऱ्याला मान्य नसते. नुकसानभरपाईची रक्कम त्याच्याही संतापात भर टाकणारी असते. त्याचवेळी हत्ती जगावा, वाचावा अशी भूमिका पर्यावरण प्रेमी व वन्यजीव प्रेमींची असते. तीही योग्यच असते. पण शेतकरी, वनखाते व वन्यजीव प्रेमी या तिघांच्या दिशा तीन दिशेला आहेत. त्या भूमिका एका दिशेने येणे गरजेचे आहे. नाही तर ‘हत्ती विरुद्ध माणूस’ हा संघर्ष तीव्र होणार आहे.  

घरासमोर हत्ती 
आजरा गावाजवळ थोड्याशा अंतरावर शेतात हर्षवर्धन महागावकर यांचे घर आहे. त्यांनी केळी, ऊस लावला आहे. दर दोन - तीन दिवसांनी पहाटे पहाटे हत्ती त्यांच्या दारात येणार, हे ठरलेले आहे. हत्ती येतो. काही काळ थांबतो. सोंडेच्या आवाक्‍यात येणारे झाडावरील फणस एका झटक्‍यात तोडतो. फणस फोडून त्यातील गरे खातो. हा हत्ती पहाटे आला, की महागावकर कुटुंबीय खबरदारी म्हणून एका खोलीत येतात. हत्ती अचानक आक्रमक झाला तर त्याच्या दिशेला फटाके फोडण्याच्या तयारीत राहतात. एक रात्र वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या घरात राहून ही परिस्थिती अनुभवावी असे त्यांचे मत आहे. 

धनगरवाड्यात हत्ती 
राधानगरीत मानबेट नावाचा धनगरवाडा आहे. तेथे धनगरांची दोनच घरे आहेत. आजूबाजूला दाजीपूर अभयारण्याची हद्द आहे. या धनगरवाड्यात दिवस मावळला, की रोज हत्ती यायचा. भाताच्या पिकात लोळायचा. लाकडाचा एक ओंडका उचलून पुन्हा पुन्हा फेकत राहायचा. हे सर्व सुरू असताना धनगर कुटुंबातील लोक अक्षरशः देवाचा धावा करत रात्र काढायचे. दुसऱ्या दिवशी वनखात्याचे कर्मचारी यायचे. ‘हत्तीला येथून घालवणे शक्‍य नाही, तुम्हीच दुसरीकडे राहायला जा’ असे सांगायचे. ऐन दिवाळीत ही दोन्ही कुटुंबे घरात दिवा न लावता रात्रभर बसून राहायची.  

उपाययोजना 

  • वन विभागाने हत्तीला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना अशा प्रत्येक तालुक्‍यात हत्ती नियंत्रण पथक. 
  • हत्तींबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन. 
  • पाण्यासाठी हत्ती गावात येऊ नये म्हणून जंगलात ग्रामतळी खोदली. 
  • हत्ती मिरचीच्या धुराला घाबरत असल्याने किंवा मिरचीचा धूर त्याला सहन होत नसल्याने ग्रामस्थांना मिरचीचा धूर करण्याबाबत मार्गदर्शन.

आक्रमणाचा थरार 
हत्तींचे येणे किती आक्रमक असते याचा थरार ग्रामस्थांना अनुभवावा लागतो. ढवणाचा धनगरवाडा येथे बी. डी. पाटील यांचे फार्म हाउस आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस हत्ती त्यांच्या फार्महाऊस जवळ आला. पाटील परिवाराने सर्व दारे लावून घेतली. उत्सुकतेपोटी त्यांच्या मुलाने खिडकी उघडली. तर चाणाक्ष हत्ती त्या खिडकीसमोर येऊन उभा राहिला. का कोणास ठाऊक त्यांच्या घराभोवती फेरी मारून परतला. पण त्या क्षणाचा थरकाप अजूनही पाटील परिवाराच्या मनावर आहे. त्यामुळे हत्तीच्या वावराची नेमकी स्थिती अनुभवता यावी यासाठी वन अधिकाऱ्यांनी एकदा तरी ग्रामस्थांसोबत रात्र काढावी अशी लोकांची अपेक्षा आहे. 

नुकसानभरपाई 
हत्तीने कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत जे नुकसान केले आहे, त्यापोटी एक कोटी आठ लाख रुपयांची नुकसानभरपाई वन विभागाने दिली आहे. २०१५ मध्ये ४० लाख ९२ हजार, २०१६ मध्ये २५ लाख ८९ हजार व २०१७-१८ मध्ये ४२ लाख एक हजार रुपये भरपाई असे त्याचे प्रमाण आहे.

नुकसानीचे स्वरूप 
हत्तीने तीन वर्षांत २३९३ ठिकाणी शेतीचे नुकसान केले. या नुकसानीत शेती पीक तर आहेच. पण केळीच्या बागा, बांबूची बेटे, फणस झाडे याचे प्रमाण जास्त आहे. या शिवाय पाण्याचे हौद फोडणे, बैलगाडी ट्रॅक्‍टर उलटवून टाकणे, रस्त्याकडेचे फलक पिळंगाटून टाकणे, खांब वाकवणे, कुंपण तोडणे, पाइपलाइन फोडणे असेही नुकसानीचे स्वरूप आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या