गरमागरम सूप

सुजाता नेरुरकर
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पावसाळा सुरू झाला, की आपल्याला काहीतरी गरमा गरम, चटक मटक खावेसे वाटते. पण प्रत्येक वेळी हा तेलकट-तुपकट पर्याय पचेलच असे नाही. अशावेळी गरम गरम सूपचा पर्याय नेहमीच रुचकर, पौष्टिक आणि चविष्टही ठरू शकतो. लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत सगळ्यांनाच चालू शकतील अशा काही सूप्सच्या पाककृती देत आहोत.. सूप्सचा स्वाद घेताना या पाऊसधारा आपल्याला विशेष आवडतील याची खात्री आहे...

कॉलिफ्लावर- पोटॅटो सूप
साहित्य : अडीचशे ग्रॅम कॉलीफ्लावर, ३ मध्यम आकाराचे बटाटे, १ मोठा कांदा (चिरून), ४ मध्यम आकाराची गाजर, ४ कप व्हेजिटेबल स्टॉक, १ टीस्पून गरम मसाला, १ टीस्पून लसून (चिरून), १ टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून हळद, १ टीस्पून जिरे पावडर, मीठ चवीने, आवश्‍यकता भासल्यास अजून व्हेजिटेबल स्टॉक वापरणे.
कृती : कॉलीफ्लावर स्वच्छ धुवून त्याचे तुरे कापून घ्यावे. बटाटे सोलून धुवून त्याचे चौकोनी तुकडे करून घ्यावे. एका मोठ्या आकाराच्या भांड्यात वरील सर्व साहित्य एकत्र करून, भाज्या बुडेल एवढे पाणी घालून १५-२० मिनिटे मंद विस्तवावर शिजवून घ्यावे. मग भाज्या थोड्या थंड झाल्यावर मिक्‍सरमध्ये बारीक वाटून घ्याव्यात. त्यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक मिक्‍स करून कॉलीफ्लावर- पोटॅटो सूप गरम करून घ्यावे. गरम गरम कॉलीफ्लावर - पोटॅटो सूप सर्व्ह करावे. सर्व्ह करताना कोथिंबीर घालून सजवावे.

कारल्याचे सूप 
कारल्याचे सूप हे हितावह आहे. हे सूप एक आठवडा सतत घेतल्यामुळे पचनक्रिया सुधारते.
साहित्य : चार मध्यम आकाराची कारली,मीठ व साखर चवीने, १ टेबल स्पून कोथिंबीर (चिरून), १ टीस्पून मिरे पावडर
कृती : कारली स्वच्छ धुवून त्याच्या गोलाकार चकत्या कापून घ्याव्यात. एका भांड्यात दोन कप पाणी घेऊन त्यामध्ये कारल्याच्या चकत्या घालून मंद विस्तवावर १०-१५ मिनिटे शिजवून घ्यावी. कारली शिजल्यावर पाणी गाळून घ्यावे. गाळलेल्या पाण्यात मीठ, साखर, मिरी पावडर , चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावे.

चिंचेचे रसम 
रसम हे एक चटपटीत गरमागरम पेय आहे. याला सूप म्हटले तरी चालेल.
साहित्य : एक टेबल स्पून चिंच कोळ, १ टेबल स्पून गूळ, १ कप पाणी फोडणीकरिता -  एक टीस्पून तेल, ४ लसूण पाकळ्या (ठेचून), अर्धा टीस्पून मोहरी, १ छोटा कांदा (चिरून), २ लाल सुक्‍या मिरच्या (दोन तुकडे करून), ८-१० कढीपत्ता पाने, ५-६ काळी मिरी, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीने
कृती : प्रथम एका मध्यम आकाराच्या भांड्यात चिंच, गूळ व एक कप पाणी मिक्‍स करून एक उकळी आणून बाजूला ठेवावे. कांदा बारीक चिरून घ्यावा. मिरचीचे दोन तुकडे करावे. दुसऱ्या एका भांड्यात तेल गरम करून लसून, मोहरी, कांदा, लाल मिरची, कढीपत्ता, काळी मिरी, हळद, मीठ घालून फोडणी तयार झाली, की त्यामध्ये ४ ग्लास पाणी घालून चांगली उकळी आल्यावर चिंचेचे उकळलेले पाणी घालून मिक्‍स करून थोडे गरम करून घ्यावे. मग रसम गाळून ग्लासमध्ये गरम गरम सर्व्ह करावे.

चीज चिकन सूप 
साहित्य : चार कप चिकन स्टॉक, २ टेबल स्पून चीज (किसून), १ छोटा कांदा (चिरून) २ टेबल स्पून कॉर्नफ्लोअर, १ टीस्पून बटर, २ मोठे चिकनचे तुकडे, २ कप दूध, मीठ चवीने
कृती : एका जाड बुडाच्या भांड्यात ६ कप पाणी व चिकनचे तुकडे घालून १०-१२ मिनिटे शिजवून घ्यावे. पाणी थोडे आटले पाहिजे म्हणजे ४ कप पाणी झाले पाहिजे इतके आटवायचे. (हा चिकन स्टॉक तयार झाला) एका जाड बुडाच्या भांड्यात बटर गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. त्यामध्ये चिकनचे उकळलेले पाणी घालून एक उकळी आली, की पाणी गाळून घ्यावे. चिकनचे पाणी परत मंद विस्तवावर ठेवावे. एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर व थोडे पाणी घालून मिक्‍स करून चिकनच्या पाण्यात मिक्‍स करून मंद विस्तवावर ठेवून सारखे हलवत राहावे. मिश्रणाला उकळी आली, की त्यामध्ये दूध, चिकनचे शिजवलेले तुकडे, किसलेले चीज घालून मिक्‍स करून मंद विस्तवावर ४-५ मिनिटे शिजू द्यावे. चवीनुसार मीठ घालावे. पण सतत हलवत राहावे.

टोमॅटो-बीटरूट सूप
साहित्य : चार मोठ्या आकाराचे टोमॅटो, १ मोठे बीटरूट, १ मध्यम आकाराचा कांदा, ६-७ लसूण पाकळ्या (चिरून), ८-१० काळी मिरी, दीड दालचिनी तुकडा, लवंग, हिरवे वेलदोडे, २ टेबल स्पून बटर, मीठ चवीने
कृती : टोमॅटो व बीटरूट धुऊन चिरून घ्यावे. लसूण बारीक चिरून घ्यावा. कांदा चिरून घ्यावा. प्रेशर कुकरमध्ये बटर गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा, लसून, मिरे, दालचिनी, लवंग, वेलदोडा घालून एक मिनीट परतून घ्यावे. मग त्यामध्ये चिरलेले टोमॅटो, बीटरूट, मीठ, दोन कप पाणी घालून मिक्‍स करून दोन शिट्या काढाव्यात. कुकर थंड झाल्यावर आतील मिश्रण एका बाऊलमध्ये काढून थंड करायला ठेवावे. मिश्रण थंड झाल्यावर मिक्‍सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. नॉनस्टिक भांड्यात टोमॅटो-बीटरूटचे वाटलेले मिश्रण ओतून त्यामध्ये एक कप पाणी घालून चांगली उकळी आणावी. सर्व्ह करताना वरतून मिरे पूड व क्रीम घालून सर्व्ह करावे.

दाल शोरबा 
साहित्य : एक कप तुरीची डाळ, अर्धा कप मसूर डाळ, २ टेबल स्पून कोकोनट  ऑइल, १५-२० कढीपत्ता पाने, २ टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा कप कांदा (चिरून), ७-८ लसूण, १ टेबल स्पून मद्रास करी मसाला, १ टीस्पून हळद, १ टेबल स्पून चिंच (कोळ), पाव कप कोथिंबीर (चिरून)
कृती : एका कुकरच्या भांड्यात तुरीची डाळ व मसूर डाळ एकत्र करून चांगली धुवून घेऊन त्यामध्ये डबल पाणी व हळद घालून ३ शिट्या कराव्यात. एका कढईमधे खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये हिंग, मोहरी, कढीपत्ता पाने, चिरलेला कांदा व लसून घालून मंद विस्तवावर गुलाबी रंगावर परतून घ्यावे. मग त्यामध्ये मद्रास करी पावडर घालून मिक्‍स करून शिजवलेली डाळ घालून ५-७ मिनिटे उकळी येईल तोवर शिजवून घ्यावे. थोडे पातळ करण्यासाठी पाणी गरज असेल तर घालू शकतो. मग त्यामध्ये चिंचेचा कोळ घालून मिक्‍स करून वरून कोथिंबिरीने सजवून गरम गरम सर्व्ह करावे.

पालक सूप 
साहित्य : एक पालक जुडी, १ दालचिनीचा तुकडा, २ कप दूध, २ चीज क्‍यूब (किसून), मीठ व मिरपूड चवीने कृती : पालकाची जुडी निवडून धुवून उकडून घ्यावी. थंड झाल्यावर त्याची पेस्ट करून घ्यावी. पेस्ट करताना थोडे थोडे दूध घालून बारीक वाटून घ्यावे. एका जाड बुडाच्या भांड्यात पालकची पेस्ट काढून त्यामध्ये दालचिनी पावडर, मीठ, मिरे पावडर घालून मिक्‍स करून एक चांगली उकळी आणावी.

अक्रोडाचे सूप 
साहित्य : पाव कप अक्रोड (तुकडे), एक कप दही, १ टीस्पून आले (किसून), १ टीस्पून ऑलिव्ह तेल, १ टीस्पून कोथिंबीर, अर्धा कप काकडी (सोलून बारीक चिरून), मीठ चवीने
कृती : दही, मीठ व आले मिक्‍सरमधून ३० सेकंद ब्लेड करून एका सूप बाऊलमध्ये काढून घ्यावे. नंतर वरून काकडीच्या चकत्या, कोथिंबीर व अक्रोडचे तुकड्यांनी सजवावे. सर्व्ह करताना ऑलिव्ह तेलाने सजवून थंड करून द्यावे.

मसूरच्या डाळीचे सूप 
साहित्य : एक कप मसूर डाळ, अर्धा टीस्पून हळद, ३-४ लसूण पाकळ्या (ठेचून), १ छोटा कांदा (बारीक चिरून), १ टीस्पून लिंबूरस, १ टीस्पून चिली सॉस, १ टेबल स्पून कांदा पात (चिरून), मीठ व मिरी पावडर चवीने
कृती : मसूर डाळ स्वच्छ धुवून घ्यावी. मग एका भांड्यात मसूर डाळ व ५-६ कप पाणी मिक्‍स करून ३० मिनिटे झाकून ठेवावे. मग प्रेशर कुकरमध्ये भिजवलेली डाळ, हळद, लसून व कांदा मिक्‍स करून २-३ शिट्या काढून घ्याव्यात. प्रेशर कुकर थंड झाल्यावर मिक्‍सरमध्ये एकदा फिरवून घ्यावे. मग त्यामध्ये लिंबू रस, चिली सॉस, मीठ, मिरे पावडर घालून एक छान उकळी आणावी. गरम गरम मसूरच्या डाळीचे सूप सर्व्ह करावे. सर्व्ह करताना कांदा पात बारीक चिरून घालून सजवून सर्व्ह करावे.

मिक्‍स व्हेजिटेबल सूप 
साहित्य : शंभर ग्रॅम केशरी ताजी गाजर, १ कप कोबी (चिरून), १ कप पातीचा कांदा, अर्धा कप मटार,अर्धा कप श्रावण घेवडा (बीन्स), १ छोटा बटाटा, ५-६ पालकची पाने, अर्धा कप कॉलीफ्लावर, १ मध्यम आकाराचा कांदा(चिरून), १ मध्यम आकाराचा टोमॅटो (चिरून), १ टेबल स्पून मुगाची डाळ, १ टेबल स्पून बटर, मीठ व मिरे पावडर चवीने, ४ कप पाणी
कृती : प्रथम सर्व भाज्या धुवून साफ करून बारीक चिरून घ्याव्यात किंवा मिक्‍सरमध्ये एकदा ग्राईंड करून घ्याव्यात. बटर किंवा तूप कुकरमध्ये गरम करून घ्यावे. मग त्यामध्ये चिरलेला कांदा घालून थोडा परतून घ्यावे. जर तुम्हाला मैदा घालायचा असेल तर १ टेबल स्पून मैदा घालून गुलाबी रंगावर परतून घेऊन अर्धा कप पाणी घालून एक उकळी आणावी. उकळी आल्यावर चिरलेल्या भाज्या घालून मुगाची डाळ पाहिजे असेल तर घालावी नाहीतर मैदा कसा वापरायचा ते सांगितले आहे. मग त्यामध्ये ४ कप पाणी घालून कुकरचे झाकण लावून ८-१० मिनिटे शिजू द्यावे. कुकर थंड झाल्यावर सूप गाळून घेऊन मीठ, मिरे पावडर घालून एक उकळी आणून गरम गरम सूप सर्व्ह करावे.

क्रीम ऑफ मशरूम सूप
साहित्य : एक कप मशरूम (बारीक चिरून), एक कप मशरूम (उभे पातळ स्लाईस), एक मध्यम आकाराचा कांदा, ४ लसूण पाकळ्या (बारीक चिरून), २ टेबल स्पून कॉर्नफ्लोअर, १ टीस्पून मिरे पावडर, १ टेबल स्पून क्रीम (ताजी साय), १ टेबल स्पून बटर, मीठ चवीने
कृती : मशरूम चांगले धुवून घ्यावे. मग चिरून घ्यावे. कांदा व लसूण बारीक चिरून घ्यावा. क्रीम फेटून घ्यावे. एका कढईमध्ये बटर गरम करून कांदा, लसूण थोडे परतून घ्यावे. मग त्यामध्ये चिरलेले मशरूम घालून ४ कप पाणी घालून कढईवर झाकण ठेवून ५ मिनिटे मंद विस्तवावर शिजू द्यावे. अर्धा कप पाणी व कॉर्नफ्लोअर मिक्‍स करून मशरूमच्या मिश्रणात हळूहळू घालून, मीठ, मिरे पूड घालून मिक्‍स करून चांगली उकळी येऊ द्यावी. सर्व्ह करताना क्रीम घालून मिक्‍स करून सर्व्ह करावे. गरम गरम क्रीम ऑफ मशरूम सूप सर्व्ह करताना वरून परत मिरे पावडर घालावी.

ब्रोकोली सूप
ब्रोकोली म्हणजे हिरवा कॉलीफ्लावर. 
साहित्य : पाचशे ग्रॅम ब्रोकोली, १ मध्यम आकाराचा बटाटा, १ छोटा कांदा, ३ कप भाज्यांचे पाणी (stock), १ टेबल स्पून बटर,  कप क्रीम, मिरे पावडर, मीठ चवीने
कृती : कांदा बारीक कापून घ्यावा. ब्रोकोली बारीक कापून घ्यावी. बटाट्याची साले काढून कापून घ्यावीत. भाज्यांचे पाणी गरम करायला ठेवावे. कढईमध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा २-३ मिनिटे शिजवून घ्यावा. मग त्यामध्ये कापलेली ब्रोकोली, बटाटा, भाजांचे गरम पाणी घालून झाकण ठेवून दहा मिनीट मंद विस्तवावर शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर मिक्‍सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी. मग त्यामध्ये क्रीम, मीठ, मिरे पावडर घालून परत उकळी आणावी. गरम-गरम चीज टोस्ट बरोबर सर्व्ह करावे.

चिकन स्वीट कॉर्न सूप
साहित्य : एक मध्यम आकाराचे स्वीट कॉर्न (किसून), ४ मोठे चिकनचे तुकडे , १ छोटा कांदा (चिरून), १ टीस्पून आले (किसून), १ टीस्पून लसूण (बारीक चिरून), १ टीस्पून सोया सॉस, १ टीस्पून काळी व पांढरी मिरी पावडर, १ टीस्पून पांढरे व्हेनिगर, 
२ टेबल स्पून कॉर्नफ्लोअर, १ टेबल स्पून बटर, मीठ चवीने
कृती : प्रथम एका जाड बुडाच्या भांड्यात ६ कप पाणी, १ छोटा कांदा, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे मीठ व चिकनचे तुकडे घालून  ५-७ मिनिटे मध्यम विस्तवावर शिजवून घ्यावे. (हा चिकनचा स्टॉक तयार झाला) चिकनचे तुकडे बाजूला काढून ठेवावे. स्वीट कॉर्न कणीस किसणीवर किसून घ्यावे. एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर व थोडेसे पाणी घालून मिक्‍स करून घ्यावे. अंडे फोडून अंड्याचा फक्त पांढरा भाग घेऊन काट्याचमच्यानी फेटून घ्यावा.  प्रेशर कुकरमध्ये बटर गरम करून कांदा थोडा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. मग त्यामध्ये आले-लसून घालून थोडे परतून घेऊन, मग त्यामध्ये किसलेले स्वीट कॉर्न घालून २ कप पाणी घालून एक शिटी काढून घ्यावी. कुकर थंड झाल्यावर शिजवलेल्या स्वीट कॉर्नमध्ये कॉर्नफ्लोअर, सोय सॉस, व्हाइट व्हेनिगर, सोया सॉस, काळी व पांढरी मिरी पावडर, मीठ चवीने घालून चिकनचा स्टॉक घालून २-३ मिनिटे चांगली उकळी येऊ द्यावी. पण मिश्रण सतत हलवत राहावे. मग त्यामध्ये फेटलेले अंडे घालून सतत २-३ मिनिटे हलवत राहावे.
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या