‘चोर्ला’ने चोरले मन!

उदय ठाकूरदेसाई 
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कव्हर स्टोरी

एखाद्या अपरिचित ठिकाणाचे नाव ऐकले की ‘ते कुठे आले?’ असे आपण साहजिकच विचारतो. विचारलेल्या बऱ्याच जणांना त्या ठिकाणाचा पत्ताच नाही असे आपल्या लक्षात आले की मन नेमके ‘त्या’ ठिकाणाचाच विचार करू लागते. ‘चोर्ला’च्या बाबतीत तसेच झाले. ‘चोर्ला घाट कुठे आहे?’ असे विचारल्यावर चटकन कुणाला त्याचा अता-पता सांगता येईना. गोव्याकडची मंडळी ‘हां हां, चोर्लाचे नाव ऐकलेय खरे, परंतु तिकडे राहायची वगैरे काय सोय आहे ते मात्र काही माहिती नाही’ असे सांगायला लागल्यावर, एका पावसाळ्यात चोर्लाला जायचे नक्की झाले. मी, स्वाती आणि मेघना, चक्रधर ज्योतिबाबरोबर चोर्ला घाटात जाण्याच्या तयारीला लागलो. 

चोर्ला घाटातले अप्रतिम असे ‘विल्डरनेस्ट रिसॉर्ट’ बुक केले होते. परंतु तिथे कसे जायचे हे निघेपर्यंत माहिती नव्हते. आडवळणावरच्या चोर्लाला सकाळी सकाळी पोचणे शक्‍य नव्हते. अशा वेळी स्वाती आणि मी आमच्या वालावलच्या नातेवाइकांकडे, तर मेघनाने सावंतवाडीतल्या तिच्या मैत्रिणीकडे मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी आम्ही वालावलवरून निघून सावंतवाडीला मेघनाला घेऊन पुढे जायचे असे ठरले... आणि एका सुंदर सकाळी, भर पावसात, नेहमीप्रमाणे सकाळी साडे सहा वाजता मुंबईतून निघालो. 

आम्ही कोकणात चाललो होतो. हिरवाई तर दिसणारच होती. कर्नाळा पाठी पडेपर्यंत तासभर थांबावे लागले. तासाभराने रस्त्याच्या दुतर्फा विविध रानफुले स्वागत करायला जणू सज्ज होती. सावित्री नदीचे रुपडे इतके सुंदर दिसत होते की बस रे बस! नदीकाठची हिरवाई, खाचरातल्या भातशेतीतल्या हिरवाईच्या अक्षरशः अनेक रंगछटा प्रवासादरम्यान इतक्‍या आकर्षून घेत होत्या की गाडी जरा दमानेच पुढे रेटणे झाले. वालावल गाठेपर्यंत आपण खूप चांगला निसर्ग पाहिला असे आपल्या मनाला वाटेपर्यंत, चिमुकल्या वालावल गावात यायला झाले आणि वालावल गावाच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध करून टाकले. हेमाडपंथी शैलीत बांधलेल्या लक्ष्मी-नारायणाच्या मंदिराचा परिसर न्याहाळताना मंदिराच्या पाठी असलेले तळे लक्ष वेधून घेत होते. शांत तळ्याकाठी काही तास बसल्यावर शांत मनाने गावरहाटीत रुळायला झाले. गप्पांमध्ये रात्र कशी गेली ते कळलेदेखील नाही. सकाळी आवराआवर करून निघायची तयारी सुरू झाली. तेवढ्यात मला पावसात तरारलेली फुले दिसली. मग फुलांचे फोटो काढणे झाले. त्यानंतर वालावलवरून निघून सावंतवाडी आणि तेथून दोडामार्गाने ‘आई’, ‘केरी’ अशा सुंदर गावांना वळसे मारून चोर्ला घाटात आलो. डावीकडे दिसणारा अंजुनेम धरणाचा विशाल परिसर आणि हिरवीकंच हिरवाई, ‘चोर्ला घाट’ हे प्रकरण ‘गुडी-गुडी’ नाही, तर अस्सल देशी बाज असलेले सौंदर्यलेणे आहे हे मनावर निश्‍चित करून गेली. त्या अद्‌भुत परिसराचे फोटो घेऊन ‘विल्डरनेस्ट रिसॉर्ट’मध्ये प्रवेश करते झालो. 

इतक्‍या सुंदर परिसरात रिसॉर्ट बांधणे हेच आधी कौतुकास्पद आणि निसर्गाच्या कुशीत ते स्वच्छ आणि नीट राखणे हे तर त्याहूनही कौतुकास्पद! तो दर्जा राखण्यासाठी रिसॉर्टच्या मंडळींनी घेतलेली मेहनतही महत्त्वाची आहे. त्यातील शिस्तीचा भाग म्हणून सर्वांत प्रथम आपली गाडी आणि चक्रधर आपल्यापासून अलग होतात. आपल्याकडील पिशव्यांतून आणलेले खाण्याचे सामान लॉकररूममध्ये ठेवले जाते. 

अशारीतीने शहरीकरणातून मोकळे झाल्यावर आपल्याला आपल्या राहण्याच्या कॉटेजजवळ दुसऱ्या खासगी वाहनाने आणले जाते. तेव्हा आपल्याला समजते, की चहा हवा असला, काही खायला हवे असले तरी (ग्राम्य भाषेत सांगायचे तर) तंगड्या तोडत, छोटी घाटी चढून किंचित लांबच्या कॅंटिनमध्ये जावे लागते. त्यामुळे आपल्याला आपोआप शिस्तीत राहायचा धडा मिळतो. दारे जरासुद्धा किलकिली करायची नाहीत हा इशारा तोपर्यंत अनेकवेळा आपल्या कानावर आलेला असतो. कारण वाटेत किडा-मुंगी, सरपटणारे प्राणी ‘आमच्या प्रांतात तुम्ही आले आहात’ हे जणू दाखवून गेलेले असतात. तीच गोष्ट पक्ष्यांची आणि प्राण्यांचीसुद्धा! इथला एक-एक पक्षी पाहून आनंद झाला नाही तरच नवल! आम्हाला प्राणी बघायला मिळाला नाही, परंतु एका कुटुंबाला काळ्याकुट्ट रात्री गव्याने दिलेली भेट चांगलीच ‘गांगरवून’ गेली होती. 

थोडक्‍यात, चढ चढू शकणाऱ्या, गुढग्यांच्या तक्रारी नसलेल्या, निसर्ग आवडणाऱ्या लोकांसाठीच चोर्ला घाट पावसाळ्यात जाण्यासाठी आदर्श आहे. खुशालचेंडू लोकांना कदाचित तिथे कंटाळा येऊ शकेल. कारण तिथे तीन दिवसांच्या वास्तव्यात प्रोग्रॅम्स आखलेले असतात. तिथे तुम्ही गेला नाहीत तर दिवसभराचा सुनसानपणा मात्र वाट्याला यायचा. कुठून इथे आलो असे व्हायचे. 

आम्ही ‘कुंदी’ नावाच्या झकास कॉटेजमध्ये राहात होतो. न्हाणीघरात शॉवर्स, बादली नव्हती, तर घंगाळ होते. साबण नव्हता, उटणे होते. एसी नव्हता, उत्तम ‘वायुविजन’ होते. फ्रेंच विंडो नव्हती, बाल्कनीबाहेर एकदम दरीच होती. तबियत खुश झाली हे सर्व पाहून! चहा घ्यायला म्हणून डायनिंग हॉलमध्ये आलो. समोरचे दृश्‍य पाहून चहा घ्यायचाच विसरलो. पाऊस जोरात कोसळत होता. समोर दोन धबधबे शांतपणे कोसळत होते. एखादे पेंटिंग पाहावे तसे पाहतच राहिलो समोरच्या दृश्‍याकडे! आवडलेली कॉटेज, समोरचे पेंटिंग, हवेतला गारवा आणि समोर चहा! वा वा म्हणत चहा पिणे झाले. मग कळले की चहा, नाश्‍ता, जेवण या ठिकाणी - डायनिंग हॉलमध्ये करायचे. आमच्या ३ दिवसांच्या वास्तव्यात सतत पाऊस, छान गारवा, उत्तमोत्तम चमचमीत बदलता मेनू असलेला नाश्‍ता, शाकाहारी-मांसाहारी जेवण यांची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. अतिशय सुखद वातावरणात एकूणच फार मजा आली. 

संध्याकाळी रिसॉर्टच्या खास वाहनाने एक छोटासा ट्रेक करून अंजुनेम धरणाचे आणि संपूर्ण परिसराचे अवलोकन करीत असतानाच पावसाची सर सगळ्यांची पळापळ करून गेली. त्यानंतर आलेल्या कापूसपिंजल्या तरल ढगांनी संपूर्ण दृश्‍यात अशी भर टाकली की बस्स! 

नुसते समोर दरीत बघतच बसावे अशी अवस्था करून टाकली सगळ्यांची. 

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा छोटा ट्रेक करून जंगलातल्या धबधब्यावर गेलो. तोसुद्धा छान अनुभव होता. पाऊस, छत्री घेणाऱ्यांची पंचाईत करीत होता. बूट न घालणाऱ्यांच्या पायाला जळवा कधी डसल्या हे त्यांचे त्यांनाच कळले नाही. एकाला जळवा डसल्याचे कळल्यावर मग बाकीचे सावध झाले. आमच्या छोट्या ट्रेकची लीडर कुंदा होती. ती इच्छा असणाऱ्या सगळ्यांना मोठमोठ्या दगडांतून आणि पाण्यातून सावरून नेत धबधबा कोसळतो तिथपर्यंत नेत होती. मार्ग दाखवीत होती. बाकीचे तिथपर्यंत जाऊ न शकणारे लांबूनच धबधब्याचे दर्शन घेत, जळवांपासून वाचण्यासाठी खुल्या वातावरणात, जरा घाबरूनच बसत होते. 

संध्याकाळी जवळच्या गावातल्या रहिवाशांना भेट देण्याचा बेत होता. परंतु अति पावसामुळे आम्ही जवळच्या उंच पठारावरून खाली दरीत असलेल्या त्यांच्या वस्तीचे दुरून दर्शन घेतले. तो अनुभवसुद्धा रोमांचक होता. वारा तर असा सुसाट होता त्या पठारावर, की तुम्ही घट्ट धरलेल्या गोष्टी म्हणजे टोपी, मफलर, हातात धरलेले फूल, छत्री वगैरे, वारा आपल्याबरोबर पळवीत होता. त्या उत्कृष्ट प्रवासानंतर आमच्या ‘कुंदी कॉटेज’मध्ये अखेरची रात्र काढून दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईत परतायला सिद्ध झालो. 

‘विल्डरनेस्ट’च्या प्रवेशद्वाराजवळ चक्रधर ज्योतिबा आमची वाट पाहात होताच. त्याला म्हटले जाताना तिलारी घाटातून कोल्हापूरमार्गे जाऊया. दोडामार्गावरून तिलारी घाटात गाडी शिरल्यावर पुन्हा एकवार मजा यायला लागली. समईची फुले, कुंपणापलीकडच्या हिरव्या शेताबाजूची छान-छान घरे, त्या सुंदर देखाव्याला आभूषित करणारी माडाची झाडे, आम्हाला पटकन पुढे जाऊ देईनात. परिसर पायी फिरून, फोटो काढून मग तिलारी घाट चढायला सज्ज झालो. 

तिलारी घाट काय सोपा आहे चढायला? सणसणीत चढ आणि नागमोडी वळणे यांनी नवशिक्‍या बेजार व्हायचा! तेवढ्यात अनुभवी ज्योतिबाने माहिती पुरवली की या घाटातून एसटी बसेस वर चढत नाहीत. फक्त घाटातून खाली उतरतात. तिलारी घाटाचा चढ संपतो त्या टोकावरून अतिखोल दरीचे रम्य दर्शन घडते. ते पाहून गाडीत बसल्यावर चोर्ला घाटातील हिरवेकंच जंगल, तेथील पक्षी-प्राणी-कीटक, वन्यसंपदा, असंख्य प्रकारची दुर्मिळ झाडे, औषधी नस्पती, आमची कुंदी कॉटेज, विल्डरनेस्टचा प्रेमळ, सदा हसतमुख कर्मचारीवर्ग.. या साऱ्यांच्या आठवणी काढत आम्ही हायवेला लागलो. तुम्हाला जर स्वतःलाच चकित करायचे असेल तर पावसात चोर्लाला नक्की भेट द्या.  

 

कसे जाल? 
    रेल्वेने गेल्यास गोव्यातल्या ‘थिविम’ स्थानकावर उतरून तेथून टॅक्‍सीने किंवा रिसॉर्टवरून आगाऊ विनंती केल्यास नेण्या-आणण्याची सोय आहे. 
    पावसात कोकणचा निसर्ग पाहात जाण्याची मजा असल्याने गाडीने महाड-कणकवली-दोडामार्ग-आई-केरी-चोर्ला असे जाऊन, चोर्ला-दोडामार्ग-तिलारीघाट-कोल्हापूरवरून परत; असा रिंगरूटही करू शकता. 

काय पाहाल? 
चोर्ला घाट, अंजूनेम धरण, तिलारी घाट, खूप विविध प्रकारचे प्राणी-पक्षी-कीटक, धबधबे आणि निसर्गाचे अद्‌भुत सौंदर्य! 

कुठे राहाल? 
स्वप्नगंधा रिसॉर्ट आणि विल्डरनेस्ट रिसॉर्ट हे दोनच महागडे वाटू शकणारे पर्याय सध्या तरी उपलब्ध आहेत. चहा, नाश्‍ता, जेवण हे उत्तमरीत्या देणाऱ्या आणि एसी नसलेल्या (जरूरसुद्धा नसलेल्या) या रिसॉर्टचे दिवसाचे भाडे साधारण ५-७ हजारापुढे आहे. 

कधी जाल? 
वर्षभर कधीही गेलात तरी छानच वाटेल. परंतु पावसात अवघा भवताल बहरून जात असल्याने सर्वांत जास्त मजा पावसात येते असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. किमान २ रात्री ३ दिवस राहिल्यास चोर्ला घाट परिसरात राहिल्याचा आनंद अनुभवू शकाल. 

अंतर 
    मुंबई - चोर्ला घाट = ५४० किमी ११ तास. 
    पुणे - चोर्ला घाट = ४०० किमी ८ तास. 
    थिविम - चोर्ला घाट = ४५ किमी १ तास.

फोटो फीचर

संबंधित बातम्या