देशी सूप्स

उमाशशी भालेराव
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

कव्हर स्टोरी
हिवाळा सुरू झाला आहे. संध्याकाळी थंडी वाढू लागली, की काहीतरी गरमागरम खाण्यापिण्याची इच्छा होते. अशावेळी काहीतरी तळकट खाण्यापेक्षा गरम सूप पिणे अधिक पौष्टिक व आरोग्यदायी असते. ‘सूप’ हा प्रकार परदेशी वाटत असला, तरी आपल्याकडेही असे गरमागरम देशी प्रकार आहेत. पेज, कळण व तऱ्हेतऱ्हेचे साराचे प्रकार आपल्याकडे प्रचलित आहेत. आपल्या स्वयंपाकघरात नेहमी आढळणाऱ्या जिन्नसांपासून हे सर्व बनवता येते. फक्त यांना जरा ‘सूप’ असे नाव दिले, की मुले नक्की आवडीने व आनंदाने पितात .

जोंधळ्याची पेज (जोंधळ्याचे सूप)
साहित्य : ज्वारीचे (जोंधळ्याचे) पीठ २ मोठे चमचे, ४ कप पातळ ताक, मीठ, हिंगपूड, मिरपूड.
कृती : पातळसर ताक घ्यावे. ४ कप ताकास दोन चमचे ज्वारीचे पीठ हातानेच नीट कालवावे व शिजत ठेवावे. सतत ढवळावे म्हणजे गाठी होणार नाहीत. शिजल्यावर त्याच चवीनुसार मीठ, हिंगपूड व मिरपूड घालून गरम गरम पिण्यास द्यावे. झटपट बनवता येते.
(अशा प्रकारे नाचणीचे पीठ ताकास लावून नाचणीची पेज बनवता येते. ती अधिक पौष्टिक असते.)

कळण (हेल्दी क्‍लिअर सूप)
आपल्याकडे मूग, चवळी, कुळीथ, चणे, वाटाणे यांचे कळण बनवतात. ज्या कडधान्याचे कळण बनवायचे असेल ते कडधान्य रात्री भिजत घालावे व सकाळी भरपूर पाणी घालून शिजवावे.
साहित्य : दोन वाट्या कोणतेही कडधान्य, अर्धी वाटी नारळाचे दूध, जिरेपूड, मीठ, थोडी साखर, अर्धी वाटी ताक.
कृती : भरपूर पाणी घालून कडधान्य कुकरमध्ये शिजवल्यावर त्याचे फक्त वरचे पाणी घ्यावे. (कडधान्याची नंतर उसळ करावी). कडधान्याच्या पाण्यात नारळाचे दूध, चवीनुसार मीठ, साखर, जिरेपूड घालून उकळून घ्यावे. सर्व्ह करण्यापूर्वी थोडे ताक घालावे. नारळाचे दूध घातले नाही, तरी हे कळण छान लागते. अतिशय पौष्टिक व प्रथिनयुक्त असा हा प्रकार आहे.
(ज्या दिवशी कडधान्याची उसळ बनवायची असेल, त्या दिवशी कळण बनवणे सोईस्कर पडते.)

मुगाच्या डाळीचे सूप (लेंटील सूप)
साहित्य : मुगाची डाळ १ वाटी, १ छोटा कांदा, १ बटाटा, ४-५ लसूण पाकळ्या, मीठ, मिरपूड.
कृती : मुगाची डाळ स्वच्छ धुऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, बटाट्याच्या फोडी, ४-५ लसूण पाकळ्या व ४-५ कप पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावे. शिजवल्यावर घोटून एकजीव करावे. गाळून घेण्याची वा मिक्‍सरमध्ये घालण्याची गरज नाही. मुगाची डाळ व बटाट्यामुळे दाटपणा असतो. सूप हवे त्याप्रमाणे पातळ वा दाट करून चवीनुसार मीठ, मिरपूड घालून उकळून घ्यावे. गरम सर्व्ह करावे.

टॉमेटोचे सार (टोमॅटो सूप)
साहित्य : पाव किलो पिकलेले टॉमेटो, लाल बीटरूटचे दोन-तीन तुकडे, वाटीभर नारळाचे दूध, आल्याचा तुकडा, एखादी हिरवी मिरची, ४ चमचे साखर, जिरे पाव चमचा, २-३ लसूण पाकळ्या, मीठ.
कृती : टॉमेटो चिरून शिजवून घ्यावेत. टॉमेटो शिजतानाच त्यात बीटरूटचे दोन-तीन तुकडे घालावेत म्हणजे रंग छान येईल. टॉमेटो शिजल्यावर गाळून घ्यावे. त्यात नारळाचे दूध घालावे. मिरची (ऐच्छिक), आले, लसूण, जिरे वाटून तो गोळा त्यात मिसळावा. मीठ, साखर घालून चांगले उकळून सर्व्ह करावे.

आमसुलाचे सार (स्वीट अँड सोवर सूप)
साहित्य : पाच-सहा आमसुले, १ वाटी घट्ट नारळाचे दूध, साखर, एखादी हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरे, मीठ.
कृती : सार करण्यापूर्वी अर्धा तास आमसुले गरम पाण्यात भिजवून ठेवावीत. भिजल्यावर चांगला रंग येतो व त्याचा अर्कही चांगला निघतो. त्याचे ५-६ कप आमसुलाचे पाणी बनवावे. गरज वाटल्यास गाळून घ्यावे. त्यात नारळाचे घट्ट दूध घालावे. एखादी मिरची व जिरे वाटून घालावे. तिखट नको असल्यास मिरची न घालता अर्धा चमचा जिरेपूड घालावी. आंबट-गोड जशी चव हवी असेल त्या प्रमाणात साखर घालावी (गूळही चालेल). चवीनुसार मीठ घालून सर्व उकळून घ्यावे. हे सूप पाचक आहे.

चिंच-गुळाचे सार (स्वीट अँड सोवर सूप)
साहित्य : मोठ्या लिंबाएवढी चिंच गरम पाण्यात भिजवून त्याचा कोळ, आंबटगोड जसे हवे असेल त्या प्रमाणात गूळ, मीठ, चमचाभर साजूक तूप, जिरे, हिंग, कढीपत्ता, एखादी लाल सुकी मिरची.
कृती : चिंच कोळून ४-५ कप चिंचेचे पाणी करावे. त्यात चवीनुसार गूळ, मीठ घालावे. चमचाभर साजूक तुपात जिरे, हिंग, कढीपत्ता व सुक्‍या मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करून त्यावर घालावी. हे सार खूप उकळावे. सर्व्ह करताना कढीपत्ता व मिरच्यांचे तुकडे काढून टाकावेत. हे आंबट-गोड सार फार रुचकर लागते.

लिंबाचे सार (लेमन कोरीअँडर सूप)
साहित्य : दोन मोठे चमचे लिंबाचा रस, आंबट-गोड जसे हवे असेल त्या प्रमाणात साखर, मीठ, चमचाभर साजूक तूप, जिरे, हिंग, कढीपत्ता, एखादी हिरवी मिरची, छोटा आल्याचा तुकडा वाटून अथवा त्याचा किस, कोथिंबीर, पाव चमचा धनेपूड, तुरीची डाळ शिजवलेली असल्यास त्याचे थोडे पाणी.
कृती : लिंबाच्या रसात ४-५ कप पाणी घालावे. चवीनुसार साखर, मीठ घालावे. चमचाभर साजूक तुपात जिरे, हिंगपूड, कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करावी. त्यात आल्याचे वाटण वा कीस घालावा. हे सर्व लिंबाच्या सारात घालून छान उकळावे. पाव चमचा धनेपूड घालावी, असल्यास तुरीच्या डाळीचे पाणी घालावे अथवा चमचाभर शिजलेली तुरीची डाळ घोटून मिसळावी. सार छान उकळून घ्यावे. सर्व्ह करण्यापूर्वी मिरचीचे तुकडे व कढीपत्ता काढून टाकावा व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

कैरीचे सार (रॉ मॅंगो सूप)
साहित्य : साल काढून कैरीच्या फोडी अर्धी वाटी, अंदाजे गूळ १ वाटी, चवीनुसार मीठ, तिखट, पाव चमचा मेथीपूड (थेंबभर तेलात मेथ्या परतून पूड करून ठेवणे), २ चमचे चण्याचे पीठ (बेसन) चमचाभर साजूक तूप, जिरे, हिंगपूड, कढीलिंब.
कृती : चमचाभर साजूक तुपात पाव चमचा जिरे, हिंगपूड व पाव चमचा मेथीपूड घालावी, कढीलिंबाची ४-५ पाने घालावीत. त्यात कैरीच्या फोडी व ५-६ वाट्या पाणी घालून चांगले शिजवावे. फोडी शिजल्यावर घोटून एकजीव करून घ्यावे. त्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट, गूळ घालावा. चण्याचे पीठ थोड्या पाण्यात कालवून घालावे. सर्व नीट उकळावे. सार घट्ट वाटल्यास आणखी थोडे पाणी घालावे व उकळावे. कैरीच्या स्वादाचे हे सार मस्त लागते.

पालकाचे सूप (ग्रीन व्हेज सूप)
साहित्य : एक जुडी पालक, अर्धी वाटी हिरवे मूग, १ कांदा, १ बटाटा, ४ लसूण पाकळ्या, दालचिनीचा छोटा तुकडा, चवीपुरती थोडी साखर, मीठ, मिरपूड.
कृती : पालकाची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावीत. अर्धी वाटी मूग रात्रभर भिजवून ठेवून सकाळी सुपासाठी घ्यावे. पालक, मूग, बारीक चिरलेला कांदा, बटाट्याच्या लहान लहान फोडी, लसूण पाकळ्या, दालचिनीचा तुकडा सर्व एकत्र करून ४-५ कप पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावे. नंतर मिक्‍सरमध्ये एकजीव करून घ्यावे व गाळून घ्यावे. किंचित साखर, मीठ, मिरपूड घालून चांगले उकळून घ्यावे. मूग व बटाट्यामुळे सुपास दाटपणा येतो. सतत ढवळावे. हे हिरवेगार सूप सर्व्ह करताना प्रत्येकाच्या बाऊलमध्ये सुपावर थोडे क्रीम अथवा दूध घालावे.

बटाट्याचे सूप (पोटॅटो सूप)
साहित्य : चार-पाच उकडलेले बटाटे, १ कांदा, पाव चमचा आले-लसूण पेस्ट, मीठ मिरपूड, चमचाभर साजूक तूप अथवा लोणी.
कृती : चांगले मऊ उकडलेले ४-५ बटाटे, ४-५ कप पाण्यात चांगले कुस्करून एकजीव करावेत व गाळून घ्यावे. एक चमचा साजूक तूप अथवा लोण्यात बारीक चिरलेला कांदा लालसर परतून घ्यावा. त्यात स्वादासाठी थोडे आले-लसूण पेस्ट घालावी. त्यावर बटाट्याचे पाणी घालून उकळावे. मीठ, मिरपूड घालावी. या सुपाला बटाट्याचाच दाटपणा असतो. गरम गरम सर्व्ह करताना त्यावर क्रीम अथवा थोडे चीज किसून घालावे.

रसम्‌ (हॉट स्पायसी सूप)
हे दाक्षिणात्य सार जेवणापूर्वी गरमागरम पिण्यास रुचकर लागते. अनेक पंचतारांकित हॉटेल्समध्येही जेवणापूर्वी ‘सूप’ म्हणून ‘रसम’ देण्याची पद्धत पडली आहे. हे सार पाचक आहेत.
साहित्य : एक वाटी धने, एक मोठा चमचा मिरे, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा मेथीदाणा व ८-१० लाल सुक्‍या मिरच्या. हे सर्व जिन्नस वेगवेगळे थोड्या तेलावर परतून कोरडेच बारीक पूड करून बाटलीत भरून ठेवणे. रसम्‌ बनवताना गरजेप्रमाणे हा मसाला वापरावा.
‘रसम’साठी साहित्य : तुरीची डाळ शिजल्यावर त्यावरचे पाणी चार कप (अथवा थोडी तुरीची डाळ भरपूर पाणी घालून शिजवून घोटून घेणे), एक मोठा चमचा चिंचेचा कोळ, २ चमचे रसम्‌ मसाला, फोडणीचे साहित्य, कढीलिंबाची पाने, मीठ, १ टोमॅटो (ऐच्छिक)
कृती : चमचाभर तेल तापवून त्यात पाव चमचा मोहरी, हिंगपूड व हळद घालून फोडणी करावी. कढीलिंबाची ६-७ पाने घालावीत. नंतर चिंचेचा कोळ व थोडे पाणी घालून चांगले उकळावे. त्यात दोन चमचे रसम्‌ मसाला, तुरीच्या डाळीचे पाणी व चवीनुसार मीठ घालावे. एक टॉमेटो अगदी बारीक चिरून अथवा टॉमेटोचा रस घालावा. चांगले उकळून सर्व्ह करावे. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या