हवामान बदलाचा इशारा

वैभव पुराणिक
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

कव्हर स्टोरी
 

अलीकडेच संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल (क्‍लायमेट चेंज अथवा ग्लोबल वॉर्मिंग) विषयक समितीने एक अहवाल जाहीर केला. या अहवालामध्ये जगभरातील नव्वदहूनही अधिक शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष मांडले आहेत. या निष्कर्षानुसार शास्त्रज्ञांनी जगभरातील सरकारांना अतिशय गंभीर इशारा दिला आहे. जागतिक उष्मीकरण रोखण्यासाठी कडक उपाय उचलले नाहीत, तर २०४०पर्यंत - म्हणजे केवळ १२ वर्षातच आपल्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असे या अहवालात म्हटले आहे. 

या अहवालात नक्की काय आहे ते समजून घेण्याआधी आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग, क्‍लायमेट चेंज अथवा हवामान बदल म्हणजे नक्की काय आहे ते समजून घेतले पाहिजे. पृथ्वीचे वातावरण विविध प्रकारच्या वायूंनी बनलेले आहे. नायट्रोजन आणि ऑक्‍सिजन हे त्यातील महत्त्वाचे वायू होत. परंतु या वायूबरोबरच कार्बन डायऑक्‍साईड वायूही याच वातावरणाचा भाग असतो. कार्बन डायऑक्‍साइडचे काही विशिष्ट गुणधर्म आहेत. या गुणधर्मामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईड वाढला, तर सूर्यापासून मिळालेली उष्णता बाहेर परावर्तित होण्याऐवजी या वायूंमध्ये, पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळच साठून राहते आणि त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमानवाढते. अशा वायूंना ग्रीनहाउस गॅस असे म्हणतात. कार्बन डायऑक्‍साईड व्यतिरिक्त मिथेन, नायट्रस ऑक्‍साइड, ओझोन आणि पाण्याची वाफ हे ही ग्रीनहाउस गॅस आहेत. तेही थोड्याफार प्रमाणात वातावरणात असतात. सर्वसाधारणतः विविध इंधनांच्या ज्वलनामुळे - विशेषतः कोळसा, पेट्रोल व डिझेलच्या ज्वलनाने हे वायू वातावरणात सोडले जातात व त्यामुळे नैसर्गिक प्रमाणापेक्षा या वायूंचे वातावरणातील प्रमाण वाढते. या वायूमुळे तापमानवाढल्याने पृथ्वीच्या अतिशय थंड भागावर - म्हणजेच आर्क्टिक, अंटार्टिका आणि ग्रीनलॅंडवर मोठा परिणाम होत आहे. या भागातील हिमनग वितळायला लागले असून त्याचे पाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर समुद्रात पडायला सुरवात झाली आहे. त्यामुळे समुद्राची पातळी वाढायला लागली आहे. ती वाढायला लागल्यामुळे जगातील अनेक देशातील किनाऱ्यावरील भागाला धोका निर्माण झाला आहे. त्यातल्या त्यात मालदीव, फिजीप्रमाणे लहान बेटं संपूर्णपणे समुद्रात बुडून जाण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. या उष्णतेचा अजून एक मोठा परिणाम म्हणजे त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात विचित्र बदल व्हायला सुरवात झाली आहे. खूप मोठी वादळे तयार होणे, अनियमित पाऊस पडणे - म्हणजेच कधी गरजेपेक्षा जास्त पाऊस पडणे अथवा गरजेपेक्षा खूपच कमी पाऊस पडणे असे बदल व्हायला सुरवात झाली आहे. जेव्हा एखादे प्रचंड वादळ येते तेव्हा जीवित आणि मालमत्तेची किती हानी होते हे आपण अलीकडेच केरळमध्ये पाहिले आहे. जर अशा प्रकारे मोठी हानी करणारी सायक्‍लोन (वादळे) दरवर्षी यायला लागली तर किती जिवांची आणि मालमत्तेची हानी होईल? हीच परिस्थिती अमेरिकेतही आहे. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील वादळांमध्ये वाढ झाली आहे. अलीकडेच ‘मायकल’ नावाच्या वादळाने अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात अफाट मालमत्तेचे नुकसान केले. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमानवाढत असले, तरीही त्याचा अर्थ संपूर्ण पृथ्वीवरील हिवाळा कमी होतो असे नाही. वातावरणातील विचित्र बदलांमुळे अनेक ठिकाणचे हिवाळे अधिक कडक झाले आहेत. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील बर्फाच्या वादळांमध्येही वृद्धी झाली आहे. या बदलांचा नक्की परिणाम कुठे आणि कसा होईल हे सांगणे शास्त्रज्ञांनाही सोपे नाही. आणि या सर्वांचा मोठा परिणाम म्हणजे अनियमित पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे आणि त्यामुळेच संपूर्ण जगाच्या खाण्यापिण्याच्या स्त्रोतावरच एकप्रकारे गदा आली आहे. तसेच अनियमित पावसामुळे पिण्याच्या पाण्याचीही टंचाई संपूर्ण जगातील अनेक भागात भासू लागली आहे. महाराष्ट्रात व अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे.

युरोपात झालेल्या औद्योगिक क्रांतीमध्ये मानवाला इंधनाचे ज्वलन करून कार्य करता येऊ लागले. जेम्स वॅटने वाफेचे इंजिन तयार केले. हे वाफेचे इंजिन चालवण्यासाठी त्यावेळी कोळशाचा वापर करण्यात येत असे. कोळशाच्या ज्वलनाने वातावरणात अनेक ग्रीनहाउस व मानवाला घातक असे वायू वातावरणात सोडले जातात. पुढे युरोप आणि अमेरिकेत अनेक यंत्रांचा शोध लागला. इंधनाचे ज्वलन करून रेल्वे, विमाने व रस्त्यावरील गाड्या धावू लागल्या. मोठा कारखाने उभे राहिले. त्यात मोठमोठ्या भट्ट्या उभ्या राहिल्या. प्रदूषण वाढले, वातावरणातील ग्रीनहाउस गॅसचे प्रमाण वाढले. आणि त्यामुळे जागतिक सरासरी तापमानातही वाढ झाली. संयुक्त राष्ट्रांच्या समितीच्या अहवालानुसार २०४० पर्यंत पृथ्वीचे तापमान औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या तापमानाच्या मानाने तब्बल १.५ डिग्री सेल्सिअसने वाढेल. हे तुम्हाला थोडे वाटले तरी ते प्रत्यक्षात खूप मोठी वाढ आहे. त्यामुळे जगात अनेक ठिकाणी अनियमित हवामान निर्माण होईल. अनेक लोकांना आपली घरे सोडावी लागतील. पूर्वी शास्त्रज्ञांना २ डिग्री सेल्सिअसने तापमानवाढले, तरी मोठ्या प्रमाणात अनियमित हवामान निर्माण होईल असे वाटत होते. परंतु नवीन माहितीनुसार १.५ डिग्री सेल्सिअस वाढीमुळेच अनियमित हवामान तयार होईल असा अंदाज शास्त्रज्ञांनी लावला आहे. शास्त्रज्ञांनी अर्थतज्ज्ञांच्या मदतीने अनियमित हवामानामुळे होणाऱ्या नुकसानाचा अंदाजही बांधला आहे. या अंदाजानुसार तब्बल ५४ हजार अब्ज डॉलर्सचे नुकसान होऊ शकेल. तापमानवाढ २ डिग्री सेल्सिअस एवढी झाली तर हे नुकसान तब्बल ६९ हजार अब्ज डॉलर्सपर्यंत पोचू शकेल. ते टाळायचे असेल, तर बहुधा सर्व मोठ्या देशांना आपल्या कायद्यात खूप मोठे बदल करून वातावरणात सोडल्या जाणाऱ्या ग्रीनहाउस गॅसचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी करावे लागेल. उदाहरणार्थ, भारताला कोळशावरून होणारी वीजनिर्मिती बंद करावी लागेल, जुन्या गाड्यांना टाकून देऊन नवीन विजेवर चालणाऱ्या गाड्या रस्त्यावर आणाव्या लागतील. वातावरणात १ टन कार्बन सोडल्यास त्यावर तब्बल २७ हजार डॉलर्सचा टॅक्‍स आकारावा लागेल! आणि हे सर्व पुढील ५ ते ६ वर्षात करावे लागेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा टॅक्‍स आकारला, तर या देशातील उद्योगांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. त्यामुळे अशा प्रकारची पाऊले कुठल्याही देशातील राजकारण्यांना उचलता येणार नाहीत हे ही या अहवालात मान्य केले गेलेले आहे. 

दुर्दैवाने भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशला याचे मोठे परिणाम भोगावे लागणार आहेत. न्यूयॉर्क टाइम्समधील एका वृत्तानुसार अमेरिका, चीन, बांगलादेश, इजिप्त, भारत, इंडोनेशिया, जपान, फिलिपिन्स व व्हिएतनाममधील तब्बल ५ कोटी लोकांना हवामान बदलाचे परिणाम २०४० पर्यंत भोगावे लागतील. २०१५ मध्ये भारत व पाकिस्तानमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले होते. अशा प्रकारच्या लाटा वारंवार यायला लागतील. कलकत्ता व कराची या दोन शहरांना याची जास्त झळ भोगावी लागेल. अनियमित पावसामुळे भारताच्या कृषीव्यवस्थेवर परिणाम होईल. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल. अनेक वेगवेगळ्या वादळांचा समुद्रालगतच्या राज्यांना सामना करावा लागेल.  बांगलादेश तर गेल्या कित्येक वर्षापासून निसर्गाशी झुंजतो आहे.  बांगलादेश गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे. मार्च ते सप्टेंबर महिन्यात बांगलादेशात अनेक वेळा पूर येतात. तेथील समुद्राची पातळी झपाट्याने वाढत आहे. सायंटिफिक अमेरिकनमधील एका वृत्तानुसार २१०० पर्यंत बांगलादेशातील समुद्राची पातळी ३ फुटाने वाढेल व त्यामुळे तब्बल २० टक्के भूभाग समुद्रात बुडून जाईल. तीन कोटी लोक यामुळे स्थलांतरित होतील ! बांगलादेशची समस्या एका दुसऱ्या देशाची समस्या आहे असे म्हणून भारताला त्याकडे काणाडोळा करता येणार नाही. कारण विस्थापित झालेले लोक कुठे जातील? ते भारतामध्ये येतील ! भारतीय अर्थव्यवस्थेवर या लोकांची जबाबदारी येऊन पडेल. भारताच्या उत्तर पूर्वेतील राज्यांना त्याची झळ बसेल. बांगलादेशातून भारतात होणारे विस्थापन ही काही नवीन समस्या नाही. त्यामुळे निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आपण आजही आसाममध्ये पाहतो आहे. 

अर्थातच अजूनही वेळ गेलेली नाही. निराश होऊन चालणार नाही. जगातील प्रत्येक नागरिकाला पृथ्वी वाचवण्यासाठी आवश्‍यक त्या गोष्टी कराव्या लागतील. प्रदूषण- विशेषतः: वायू प्रदूषण करणाऱ्या गोष्टी कमी कराव्या लागतील. डिझेल भारतात स्वस्त असल्याने अनेक लोक डिझेलवर चालणाऱ्या गाड्या चालवतात. पण डिझेल हे पेट्रोलपेक्षा जास्त प्रदूषण करते. त्यामुळे पर्यावरणाची जास्त हानी होते. भारताला राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेऊन विजेवर चालणाऱ्या गाड्यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. आणि हे चालू असताना वीजनिर्मिती कोळशापासून करण्याऐवजी नैसर्गिक स्रोतापासून - सौरऊर्जा आणि पाण्यापासून वीजनिर्मिती करण्याकडे भर द्यावा लागेल. अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीतील पियुष गोयल यांनी २०२२ पर्यंत संपूर्ण भारतीय रेल्वे विजेवर चालवण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यामुळे डिझेलच्या ज्वलनामुळे होणारे प्रदूषण तर कमी होईलच, पण रेल्वेचा इंधनावर होणारा खर्चही कमी होईल. इकॉनॉमिक टाइम्समध्ये सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार भारत सध्या १६४ गिगावॉट वार्षिक वीज वापरतो. २०२१-२२ पर्यंत हा वापर २३५ गिगावॉटवर जाऊन पोचेल. त्यातील २३५ गिगावॉट वीज सौरउर्जेचा वापर करून तयार करायचा भारत सरकारचा मानस आहे. परंतु या प्रकल्पात अनेक अडथळे आहेत. भारत २०२२ पर्यंत १०० गिगावॉट वीज सौरऊर्जेपासून तयार करू शकेल, की नाही यावर आता प्रश्नचिन्ह आहे.

ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येकडे लक्ष देणे आता सामान्य माणसाला आवश्‍यक ठरत आहे. वाढता उन्हाळा, पाण्याचे दुर्भिक्ष्य या गोष्टींना ग्लोबल वॉर्मिंग जबाबदार आहे हे एव्हाना सिद्ध झालेले आहे. ग्लोबल वॉर्मिंगशी झुंजण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. प्रत्येकाने आपल्या परीने जमेल तेवढा ऊर्जेचा वापर कमी केला पाहिजे. प्रदूषण आणि ग्रीनहाउस गॅस निर्माण करणाऱ्या गोष्टी टाळायचा प्रयत्न केला पाहिजे. एखादी गोष्ट पाच मिनिटे चालत जाण्याच्या अंतरावर असेल, तर त्यासाठी कार किंवा मोटरसायकल न वापरण्याचा प्रत्येकाने निश्‍चय केला तरी त्यामुळे बराच फरक पडू शकेल. आणि अधिक चालण्यामुळे जो शारीरिक व्यायाम होईल तो वेगळाच!  

संबंधित बातम्या