सोन्याचा मुहूर्त साधताना

प्राजक्ता ढेकळे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

कव्हर स्टोरी : विवाह विशेष
अक्षय तृतीया झाली, की अनेक घरांत तयारी सुरू होते ती ‘यंदा कर्तव्य आहे’ची.  लग्नासाठीचा शुभ मुहूर्त साधत तयारीला सुरवात  केली जाते, अन् घरातील ज्येष्ठांचा मोर्चा साहजिकच सोने खरेदीकडे वळतो. लग्नाच्या तयारीतील एक महत्त्वाचा क्षण म्हणजे सोने खरेदी. या लग्नसराईच्या मुहूर्तावर आलेल्या दागिन्यांच्या नव्या ट्रेंडविषयी...  

अलीकडच्या काळात लग्न हे शुभकार्य म्हणून पारपाडत असताना त्यात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो. मग तो पोशाख, सजावट यांच्या बरोबरच दागिन्यांमधून दिसू लागतो.   

पारंपरिक ज्वेलरीला आधुनिकतेचा टच
पूर्वी आजी- आईच्या काळात घातल्या जाणाऱ्या दागिन्यांमध्ये थोडे बदला करत तयार केलेल्या दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी सराफाच्या दुकानात पहायला मिळतात.

वज्रटिक 
ठुशी सारखा किंवा चोकर सारखा असणारा हा दागिना आता वजनाने हलका , सुंदर नक्षीकाम असलेल्या प्रकारात  पहायला मिळतो. याशिवाय मोहन माळ, बोरमाळ, जोंधळी पुतळी हार यासारख्या जुन्याप्रकारचे दागिने आता आकर्षक नक्षीकाम वा वजनाने  हलक्‍या प्रकारत उपलब्ध आहेत.  सर्वसाधारण पंधरा ते वीस ग्रॅमपासून पुढे हे दागिने  उपलब्ध आहेत.
चोकर

मंगळसूत्रासोबत उठावदार दिसणाऱ्या ठसठशीत चोकर हा आता मण्यांमध्ये, अर्धचंद्र कोर, बेलपान याप्रकारात पहायला मिळतो.

इतर दागिन्यांमध्ये नेहमी उठून दिसतो. याबरोबरच चोकर कम बाजूबंध असा टून इन वन चा नवीन पॅटर्न असलेले चोकर देखील बाजारात पहायला मिळतात. ब्रायडल सेट तयार करत असताना या प्रकारच्या चोकरची खरेदी ही मोठ्या प्रमाणात केली जाते. हे चोकर साधारण वीस ग्रॅमपासून पुढे विक्रीस उपलब्ध आहेत.

गुलाब तोडे
टेंपला वर्कमध्ये  गुलाबाचे नक्षीकाम असलेले तोडे सध्या आकर्षणाचा विषय आहे. या प्रकारचे तोडे साधारणता ऐंशी ग्रॅमपासून पुढे विक्रीस उपलब्ध आहेत. ’गोकरू तोड्यामध्ये’ हस्तमुखी गोकरू, फ्लॉवरमधील गोकरू, बॉलची डिझाईन्स असलेले गोकरू असे प्रकार पहायला  मिळतात. याप्रकारातील तोडे साधारणता पन्नास ग्रॅम पासून पुढे आहेत.   

सौभाग्य अंलकार
लग्नातील सोने खरेदीमध्ये अत्यंत महत्त्वाची खरेदीही मंगळसूत्राची असते. मंगळसूत्राची खरेदी करत असताना पांरपरिक मंगळसूत्राबरोबरच आधुनिक ट्रेंडच्या मंगळसूत्रांना देखीलमागणी वाढत आहेत. यामध्ये अलीकडच्या काळात अनेक वधू या ’वर्किंग वूमन’ असतात. त्यामुळे  मंगळसूत्राची खरेदी करताना केवळ लग्नातच नव्हे तर पुढे ऑफीसवेअरच्या दृष्टिनेदेखील घालता येईल अशी पद्धतीने त्या मंगळसूत्राची खरेदी केली जाते. या मिनी मंगळसूत्रामध्ये बारीक नक्षीकाम असलेल्या वजनाने अत्यंत हलक्‍या असलेल्या, सिंपल आणि सोबर अशा व्हरायटी पहायला मिळतात.  याबरोबरच मालिका आणि चित्रपटातील ट्रेंडी  मंगळसूत्रांची खरेदी केली जाते. याप्रकारची मिनी मंगळसूत्र हे साधारण तीन ग्रॅमपासून पुढे विक्रीस उपलब्ध आहेत.

मराठमोळी नथ 
लग्नातील शृंगाराला उठावदार पणा आणण्याचे काम ही नथ करत असते. लग्नातील दागिन्यांच्या खरेदीमध्ये नथीची खरेदी ही आवर्जून केलेली पहायला मिळते. यामध्ये मराठा पद्धतीची नथ, कारवारी नथ, ब्राम्हणी पद्धतीची नथ,  सरजाची नथ, नाक टोचले नसेल तर दाबाची नथीसारख्या अनेक व्हरायटी तुम्ही बाजारात पहायला मिळतात. याबरोबरच चंद्रकोरीची, म्हाळसाची, बाजीराव मस्तानी मधील काशीबाईची नथीच्या डिझाईन्स ही बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. या नथीची किंमत  सर्वसाधारण एक हजार रुपयांपासून पुढे पहायला मिळते.

टेंपल ज्वेलरी
साउथ इंडियन आणि मराठी दागिन्यांच्या कॉबीनेशनमधून टेंपल प्रकारातील दागिने तयार केले जातात. मंदिरे, मूर्ती, देवी देवतांची चित्रांमधून याप्रकारच्या दागिन्यांची निर्मिती केली जाते. दिसायला अत्यंत टपोरे मात्र वजानाने अत्यंत हलके असे हे दागिने असतात. टेंपल प्रकारात येणाऱ्या हे दागिने गेरू पॉलिश केलेले असते. ब्रायडल सेट तयार करताना  टेंपल ज्वेलरीच्या दागिन्यांना अधिक महत्त्व दिले जाते. याप्रकारच्या दागिन्यांमध्ये अगदी मंगसूत्रापासून ते नेकलेस, लाँग गंठन, अंगठी, लक्ष्मी हार, बाजूबंध, कमरपट्टा, झुमकेयाच्या अनेक व्हरायटी पहायला मिळतात. स्टोन वर्क असलेले दागिने देखील यामध्ये पहायला मिळतात. या प्रकारच्या दागिने सर्वसाधारण पस्तीस ग्रॅमपासून पुढे असतात. याविषयी बोलताना अष्टेकर ब्रदर्सचे नितीन अष्टेकर म्हणाले ’’आता लग्ना सराईच्या खरेदीला वेग येऊ लागला आहे. या काळात साधारणता मंगळसूत्र , बांगड्या यांना जास्त मागणी असते. याबरोबरच मागील काही वर्षापासून टेंपल प्रकारातील दागिन्यांना अधिक मागणी वाढत आहे.  आता जीएसटी आणि नोटा बंदीचा परिणाम जाणवत नाही. लोकांकडून ही मोठ्याप्रमाणात खरेदी केली जात आहे.’’

पवळ्याचे नेकलेस
मोती 

पवळ्याच्या दागिने नेहमी शुभ मानले जातात. त्यामुळे लग्नामध्ये इतर पारंपरिक दागिन्यांबरोबरच मोती पवळ्याच्या नेकलेसची खरेदीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. दागिन्यांच्या कलेक्‍शनमध्ये मोती पवळ्याच्या दागिन्याचा समावेश करण्याला महिला वर्गाकडून नेहमी प्राधान्य दिले जाते. यामध्ये अनेक सुंदर नक्षीकाम असलेले नेकलेस पहायला मिळतात. साधारण वीस ग्रॅमपासून पुढे या प्रकारचे नेकलेस बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त लाइटवेट मध्ये ’पद्‌मावत लूक’ असलेला नेकलेस, कलकत्ती नेकलेस, रेग्युलर मिनाकारी वर्क असलेला नेकलेसचे प्रकार पहायला मिळतात.

एंगेजमेंट रिंग 
अलीकडच्या लग्नामध्ये  ’एंगेजमेंट’ देखील मोठ्या दिमाखात पार पाडली जाते. या कार्यक्रमासाठी खरेदी केलेल्या जाणाऱ्या अंगठ्यामध्ये अनेक व्हरायटी आहेत. नवरदेवसाठी गणपती, बालाजी, शिवमुद्रा यासारख्या अंगठ्यांच्या डिझाईन्स उपलब्ध आहेत. तर नवरीसाठी टेंपल ज्वेलरी, फुलांचे नक्षीकाम असलेली, मिनावर्क, स्टोनवर्क याप्रकारातीला अंगठ्या उपलब्ध आहेत. याबरोबरच कपल बॅंडला देखील खूप महत्त्व आहे. या कपल बॅंड्‌च्या माध्यमातून  नवरदेव- नवरीसाठी खास एकाच डिझान्सच्या या अंगठ्या तयार करून घेतल्या जातात. नवरदेवसाठी या प्रकरातील अंगठ्या सर्वसाधारण सहा ग्रॅमच्यातर नवरीसाठी तीन ग्रॅमपासूनपुढे आहे.

नवरदेवाचा ट्रेंडी लुक
लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करताना नवरी बरोबरच नवरदेवाच्या दागिन्यांच्या देखील अनेक व्हरायटी  बाजारात उपलब्ध आहेत.

हातातील कडे वा ब्रेसलेट
नवरदेवाच्या हातात घालण्यासाठी सोन्याच्या कड्याच्या देखील अनेक व्हरायटी बाजारात उपलब्ध आहेत.  यामध्ये प्लेन कडे, पिळाचे कडे असे प्रकार उपलब्ध आहेत. याबरोबरच हातात घालण्यासाठी ब्रेसलेट मधील देखील अनेक आकर्षक डिझाईन्स उपलब्ध आहेत.
याशिवाय सोन्यामध्ये आकर्षक डिझाईंन्स असलेले कुर्ता बटन, टायापिनच्या असंख्य व्हरायटी येथे उपलब्ध आहेत. याशिवाय  लग्नातील सूटावर शोभून दिसणाऱ्या कफलिंगचे देखील अनेक प्रकार आहेत. यामध्ये स्टोन वर्क असलेले, प्रिंटेड डिझाईन्स असलेले  कफलिंग उपलब्ध आहेत.
 शेरवाणी वरती उठून दिसणाऱ्या ब्रोचमध्ये देखील मोत्याचे ब्रोच, स्टोनवर्क ब्रोच, सोन्यामध्ये प्रिंटेड ब्रोच उपलब्ध आहेत.   

शिवमुद्राची फॅशन 
नवरदेवासाठी दागिन्यांच्या खरेदीमध्ये शिवमुद्रा असलेली अंगठी आणि शिवमुद्रा असलेल्या पेंडट्‌चा एकत्रित सेट  उपलब्ध आहे. या प्रकारचा सेट साधारणता आठ ग्रॅमपासून अंगठी तर वीस ग्रॅमपासून पुढे चेन उपलब्ध आहे. राजेशाही लूक देणारी भारदस्त वा रुबाबदार दिसणारी वेगवेगळ्या डिझाईंन्स चेन विथ पेंड देखील विक्रीस उपलब्ध आहेत. याबरोबरच स्नेक चेन, साखळी चेन, पट्टी चेन हे प्रकार देखील उपलब्ध आहेत.

डायमंड्‌चे दागिने
 लग्नाची खरेदी करताना आता अमेरिकन डायमंड्‌च्या दागिन्यांची खरेदी करण्याला देखील काही ग्राहक प्राधान्य देते आहेत. यामध्ये कपल रिंग , मंगळसूत्र अशा प्रकारच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. याबरोबर छोटा नेकलेसही लग्नानंतरच्या स्वागत समारंभासाठी म्हणून खरेदी केला जातो. डायमंड्‌च्या या दागिन्यांच्या किंमती साधारण पंचवीस हजार रुपयांपासून पुढे असलेल्या पहायला मिळतात.

पैंजण
लग्नातील दागिन्यांच्या खरेदीमध्ये सोन्यांच्या दागिन्यांबरोबरच चांदीच्या दागिन्यांची खरेदीदेखील केली जाते. यामध्ये नवरीसाठी पैंजणाची खरेदी केली जाते. रेग्युलर पैंजणाबरोबर ऑक्‍सज्डाईज्ड पैंजण, स्टोन वर्क पैंजण, मिनाकारी वर्क असलेले ब्रोचचे पैंजण या व्हरायटी बाजारात पाहायला मिळतात. याच्या किमती साधारण दोन हजार पाचशे रुपयांपासून पुढे आहे.

लाँग गंठन 
लग्नामध्ये उठावदार दिसणारा  दागिना म्हणून लाँग गंठन खरेदी केली जाते. यामध्ये लाँग पट्टी मंगळसूत्र, टेम्पल ज्वेलरी असलेले मंगळसूत्राच्या अनेक आकर्षक व्हरायटी आपल्याला येथे पहायला मिळतात. याप्रकारातील मंगळसूत्र ही तीस ग्रॅमपासून पुढे दीडशे ग्रॅमपर्यंत उपलब्ध आहेत.

कानातले झुमके
मंगळसूत्र, नेकलेस यावरती मॅच होतील अशा प्रकारच्या दागिन्यांची खरेदी नवरी कडून केली जाते. ब्रायडल सेट तयार करताना मॅचिंग कानातल्यांचा देखील विचार केला जातो.  बरोबरच टेंपल ज्वेलरीमध्ये आकर्षक नक्षीकाम असलेले टपोऱ्या झुमक्‍यांना अधिक मागणी आहे. सर्वसाधारण दहा ग्रॅमपासून या प्रकरातील झुमके विक्रीस उपलब्ध आहेत. याबरोबरच लाईट्‌वेट प्रकरातील कानांतची खरेदी करताना लग्नानंतर ही ते आहे तसे कॅरीकरता येतील हा दृष्टिकोन ठेवून त्यांची खरेदी केली जात आहे. या प्रकरातीला कानातले ही साधारणता चार ग्रॅमपासून पुढे विक्रीस उपलब्ध आहेत.

बांगड्यांची खरेदी 
लग्नासाठी इतर दागिन्यांची खरेदी करताना बांगड्यामध्येही अनेक प्रकार पहायला मिळतात. यामध्ये परंपरेने चालत आलेल्या शिंदेशाही तोडे, गोकरू, गहू तोड्यांना लग्नाच्या खरेदीमध्ये अधिक प्राधान्य दिले जाते. याबरोबरच फॅन्सी वर्क तोड्याचे प्रकारही पहायला मिळतात.
 

अक्षय तृतीयेनंतर सुरू होणाऱ्या लग्नाच्या मुहूर्तामुळे दागिन्यांच्या खरेदीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी दुकानात उपलब्ध आहेत. याशिवाय आता अधिक महिना सुरू होतोय, त्यामुळे जावयाला देण्यासाठीदेखील अनेक चांदीच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. मागील वर्षातील नोटाबंदी, जीएसटीनंतर सोन्या चांदीची बाजारपेठ पुन्हा एकदा स्थिरावली आहे. याबरोबरच ग्राहकांकडून खरेदीनंतर कार्ड पेमेंट, चेक पेमेंट सर्वाधिक केली जातात.   
       - अभय गाडगीळ, पी.एन.जी.
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या