वधू-वराची कपडे खरेदी 

रोशन मोरे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

कव्हर स्टोरी : विवाह विशेष
लग्न म्हणजे आयुष्यातले एक महत्त्वाचे वळण! या वळणावरून एका नवीन प्रवासाला सुरवात होत असते. आपल्या लग्नात आपण सर्वांत सुंदर दिसावे अशी प्रत्येक जोडप्याची मनीषा असते. साहजिक लग्नाच्याआधी दोन तीन महिने कपडे खरेदीला सुरवात केली जाते. आज बाजारपेठेमध्ये वधू-वरासाठी पारंपरिक कपड्यांबरोबरच नवीन फॅशनचे कपडे उपलब्ध आहेत.  
 

शेरवानी
शेरवानी ही वरांच्या खास पसंतीची. सर्व प्रकारच्या कलरमध्ये ती उपलब्ध असून लाइट क्रीम कलरला विशेष मागणी आहे.तर बेज पेस्टल शेडबरोबर मरून रंगांचे कॉम्बिनेशनही वरांच्या पसंतीस उतरत आहे. प्लेन शेरवानी पेक्षा हॅंड वर्क असणाऱ्या शेरवानीला मागणी वाढत आहे. साधारणतः ८ हजारांपासून पुढे शेरवानीची किमत आहेत.  

इंडो वेस्टर्न
इंडो वेस्टर्न प्रकार काहीसा शेरवानी सारखाच असतो, मात्र शेरवानी पेक्षा त्याची लेंथ कमी असते. ब्लू कलरमध्ये असणाऱ्या इंडो वेस्टर्न प्रकारला चांगली मागणी आहे. नवाबी ड्रेसच्या खालोखाल हा ड्रेस वरांच्या पसंतीस पडतो आहे. याचे वैशिष्टे म्हणजे हा कोणत्याही उंचीच्या वराला सूट होतो. इंडो वेस्टर्नकुर्ती सोबत धोती किंवा बलून पॅन्ट येते.

जोधपुरी
बंद गळा नावाने प्रसिद्ध असणाऱ्या जोधरपूरीमध्ये टॉप आणि पॅन्ट असते. शक्‍यतो दोन्ही एकाच रंगामध्ये घेतले जातात. मात्र टॉप फॅन्सी असेल तर त्यावर काँट्रास पॅंन्ट वापरली जाते. याच्या किंमत ४ हजार रुपयापासून १० हजारा पर्यंत आहेत. लग्नापेक्षा रिसेप्शनला जोधपुरी घालण्यावर वरांचा भर असतो.

सूट
थ्री-पीस, टूपीस सूट वापरले जातात. ब्लू, ब्लॅक कलरला सर्वाधिक पसंती मिळते आहे. किमती साधारणतः ४ हजारांपासून पुढे आहेत. दुकानातून सूटचे कापड घेण्याबरोबर सूट शिवून घेण्याकडे कल वाढतो आहे.

नवाबी
शेरवानीसारखा दिसणार मात्र शेरवानीपेक्षा कमी उंचीचा नवाबी, वरांच्या पसंतीस पडतो आहे. हा ड्रेस सर्व प्रकारच्या रंगामध्ये डार्क व लाइट शेड्‌समध्ये उपलब्ध आहे. साधारणतः पाच हजारांपासून हा ड्रेस उपलब्ध होतो. या ड्रेसची किंमत अगदी २५ हजार रुपयांपर्यंतही आहे. हॅंडवर्क केलेल्या नवाबी ड्रेसच्या किंमती जास्त असते.

फेटा
शेरवानी आणि इंडो वेस्टर्नवर फेटा घालण्याचे नवे समीकरण जुळून आले आहे. त्यामुळे फेटांच्या मागणीत चांगलीच वाढ झालेली आहे. मोत्यांचे वर्क असलेले फेटे देखील बाजारात उपलब्ध आहेत. फेटांच्या किमती साधरणतः आठशे रुपयांपासून पुढे आहेत. तयार फेट्यांना जास्त मागणी आहे.

वधूची खरेदी
वधूची कपडे खरेदी करताना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पारंपरिक पद्धतीने लग्न करताना वधुवकडून शालूला तसेच नऊवारीला पसंती दिली जाते.

नऊवारी
वधू आपला लग्नातील पेहराव ठरवताना नऊवारीला पसंती देताना दिसत आहेत. विविध वाहिन्यांवर दाखविण्यात आलेल्या आणि पसंतीला उतरलेल्या मालिकांमुळेही हा ट्रेंड आल्याचे साडी विक्रेते सांगत आहेत. वेगळे काही म्हणूनही नऊवारीला पसंती देण्यात येत आहे. नऊवारी खास लग्नातील धार्मिकविधी करताना घातली जाते. नऊवारीत सिल्क आणि हिरवे काठ असलेली पिवळ्या रंगाची साडी हे हटके कॉम्बिनेशन आहे. मात्र नऊवारीत आणखी डार्क म्हणजेच सोनेरी बुट्टे असेलेली मरुन रंगाची साडी, निळा, हिरवा, गडद गुलाबी, केशरी असे रंग वधूंच्या पसंतीस पडत आहेत. पाच हजार रुपयांपासून चांगल्या नऊवारी साड्या मिळतात.

पैठणी
नऊवारीसोबतच पैठणीला जास्त मागणी आहे. तसेच, सहावारी आणि पाचवारी पैठण्यांनांही तितकीच मागणी आहे. पाच हजार रुपयांना पासून मिळणारी सेमी पैठणीही वधूंच्या पसंतीस उतरत आहे. अगदी तीन हजार रुपयांपासून १२ हजार रुपयांपर्यंत विविध व्हरायटीमध्ये पैठणी बाजारपेठेत उपलब्ध आहेत. पेशवाई पैठणी व सेमी पैठणी या दोन्ही साड्यांना जास्त मागणी आहे. वर्क केलेली पैठणी, ब्लॉकेट पैठणी, बेंगलोर पैठणी असे कितीतरी प्रकार बाजारपेठेत उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे बदलत्या काळात पैठणीने अनेक बदल केले असून वर्क केलेल्या पैठणीलासुद्धा चांगली मागणी आहे. 

वर्क केलेल्या साड्या
शालूपाठोपाठ वधुंकडून खूप वर्क केलेल्या साड्यांची मागणी केली जाते. या साड्या सर्वच कलरमध्ये उपलब्ध असतात. मात्र गोल्डन, सिल्वर आणि डार्क मरुन रंगांचं जरदोजी वर्क असलेल्या साड्यांना सर्वाधिक पसंती मिळते. वर्कमुळे या साड्या वजनदार असतात. 

शालू
नऊवारी नंतर शालूला वधू कडून पसंती मिळते आहे. शालूमध्ये पारंपरिक शालू व एम्ब्रॉयडरी शालू असे दोन प्रकार आहेत. यामध्ये मोरपंखी, लाल, पिवळा, हिरवा, निळा, केशरी असे रंग उपलब्ध आहेत. नक्षीकाम तसेच खड्याचे वर्क शालूवर केलेले असते. पारंपरिक शालूंच्या किंमती या ४ हजारांपासून आहेत. 

साडी ड्रेपिंग
सहावारी असो वा नऊवारी जी साडी नवरी नेसणार असेल तर तिला आणखी हटके लुक देण्यासाठी वेगवेगळ्या  पद्धतीने ती नेसण्यावर भर दिला जातो. मग त्यावर शेला घ्यायचा, की चुनरी हे देखील आधीपासून ठरवले जाते. नवरीला प्रत्येक धार्मिकविधीला साडी बदलावी लागते.  प्रत्येक वेळी आपला वेगळा लुक दिसावा म्हणून वेगवेगळ्या राज्यातील साडी नेसण्याच्या पद्धतीचा देखील वापर केला जातो. गुजराती, मारवाडी, बंगाली आणि दक्षिणात्य पद्धतीच्या साड्या लग्नात नेसण्याचा हा नवा ट्रेंड आला आहे. 

ब्लाऊज
साडीच्या रंगाच्या विरोधी रंगाचे ब्लाऊज घालणे सध्या फॅशन आहे. पूर्वीसारखे फक्त साडीतलेच मॅचिंग ब्लाऊज शिवायचे हा प्रकार जुना  झाला आहे. साडीच्या रंगाला मिळताजुळता किंवा अतिशय वेगळे असे ब्लाऊज शिवून त्यावर आणखी काही वर्क करून घेतले जात आहे. 

घागरा
 रिसेप्शनसाठी वधू घागऱ्याला पसंती देताना दिसत आहेत. बजेटप्रमाणे हे ड्रेसेस डिझाइन करूनही मिळतात. घोळदार हा घागऱ्याचा प्रकार आपल्याकडेही पसंतीस पडत आहेत. राजस्थानी घागरा प्रकाराला सर्वाधिक मागणी आहे. बॅकलेस, लो नेक किंवा गळा पूर्ण भरलेले डिझाईन्स यामध्ये उपलब्ध आहेत पाच हजारांपासून ५० हजार रुपयांपर्यंत वर्क केलेले घागरे बाजारात उपलब्ध आहेत.

फोटो फीचर

संबंधित बातम्या