वधू-वरांची पादत्राणे!

सोनाली बोराटे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

कव्हर स्टोरी : विवाह विशेष
लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा क्षण! या सोहळ्यात कोणतीच कमतरता राहू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले जातात. विवाहस्थळ, निमंत्रणपत्रिका, फोटोग्राफर यासोबतच नवरा-नवरीचे दागिने, कपडे वेगवेगळ्या ॲक्‍सेसरीजच अशी मोठी लांबलचक यादी तयार होते. वेगवेगळ्या कपड्यांसोबत पादत्राणांचाही प्रामुख्याने विचार केला जातो. त्या नववधू-वरांच्या पादत्राणांविषयी...

एप्रिल-मे महिना म्हणजे लग्नसराईचा काळ! मुहूर्त जास्त असल्यामुळे या काळात सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळते. 

लग्नसोहळा हा मुला-मुलीसाठी खास असतोच तसाच तो त्यांच्या कुटुंबियांसाठीही महत्त्वाचा असतो. या खास दिवशी कोणतीच कसूर राहू नये म्हणून घरातले तसेच जवळचे नातेवाईक रात्रीचा दिवस करत असतात. या खास दिवशी नवरा-नवरी नखशिखान्त सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करतात. दोन-तीन महिने आधीच त्यादृष्टीने खरेदीची तयारी सुरू होते. विवाहस्थळ, निमंत्रणपत्रिका, फोटोग्राफर यासोबतच नवरानवरीचे दागिने, कपडे वेगवेगळ्या ॲक्‍सेसरीजच अशी मोठी लांबलचक यादी तयार होते. अलीकडच्या काळात मुला-मुलीच्या पेहरावातील ॲक्‍सेसरीजमध्ये पादत्राणांचाही प्राधान्याने विचार केला जातो. ज्या प्रकारचा पेहराव असेल त्याप्रमाणे साजेसे पादत्राणे घेण्याकडे तरूणाईचा कल असतो.

नववधूसाठी बरंच काही 
मुलींची खरेदी म्हणजे चार ठिकाणी चौकशी करून, हवी तशी वस्तू मिळाल्यानंतरच तिची खरेदी. मग ती साडी असो, ड्रेस असो वा चप्पल, खरेदीतील हा चोखंदळपणा कमी होत नाही. त्यातही लग्नासाठीची खरेदी म्हटल्यावर किमान चार-पाच जोड घ्यावेच लागणार! लग्नाळू मुलींसाठी चप्पल, सॅंडल, जूती, कोल्हापूरी चप्पल या प्रकारांतून असंख्य व्हरायटी बाजारात उपलब्ध आहेत. मणी, स्टोन, डायमंड, जरदोसी वापरून नाजूक नक्षीकाम केलेल्या कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या चपला मुलींना लग्नाच्या खरेदीवेळी विचारात घेता येतात. फ्रंट क्‍लोज्ड, फ्रंट ओपन, अंगठ्याची, अंगठा नसलेली, मागे बेल्ट असलेली, बेल्ट नसलेली चप्पल किंवा सॅंडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. चपलेच्या टाचांनुसार फ्लॅट हिल्स, प्लॅटफॉर्म हिल्स, बॉक्‍स हिल्स, पेन्सिल हिल्स असे काही प्रकार पडतात. पूर्वी मरून, गोल्डन, सिल्व्हर या रंगांत उपलब्ध होणाऱ्या या चपलांमध्ये आता पिवळा, हिरवा, निळा, लाल असे वेगवेगळे रंगही आले आहेत. साधारणपणे हजार रुपयांपासून या डिझाइनर चपला उपलब्ध आहेत. पैठणी, नऊवारी साड्यांवर कोल्हापूरी चप्पल छान दिसतात. या चप्पलांमध्येही आकर्षक रंग व डिझाइन्स पाहायला मिळतात. पाचशे-सहाशे रुपयांपासून या चपला बाजारात उपलब्ध आहेत.

लग्नाच्या दिवशी घालता येईल असा एक प्रकार म्हणजे जूती. नवरीसाठी किंवा करवल्यांसाठीही हा प्रकार एकदम स्टायलिश आहे. एकाच रंगांतून किंवा मल्टिकलरमध्येही जूती उपलब्ध आहेत. बॅक ओपन, बॅक क्‍लोज्ड, बेल्ट असलेल्या जूती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. बॅक ओपन म्हणजेच फ्लिपफ्लॉप मोजडी मागून चप्पलसारखी असल्यामुळे पटकन काढता-घालता येते. लग्न-समारंभात जाण्यासाठी कोणत्याही पेहरावावर मुली या मोजडी घालू शकतात. या मोजडी जीन्सवर, चुडीदारवर, साडीवर घालता येत असल्यामुळे नंतरही त्याचा वापर होऊ शकतो. प्लेन मोजडी आणि डिझायनर मोजडी हेही दोन पर्याय आहेत. डिझायनर मोजडीमध्ये स्टोन, मणी वापरून नाजूक नक्षीकाम करून अधिक आकर्षकपणा आणला आहे. मोजडी शक्‍यतो फ्लॅट हिल्समध्येच येते पण उंच टाचेची हवी असल्यास तशी बनवून घेता येऊ शकते. 

हाय हिल्स, की फ्लॅट हिल्स 
लग्नासाठी पादत्राणे निवडताना हिल्स फ्लॅट, की हाय असाव्यात, हा प्रश्‍न पडतोच. हील्स ठरवताना काही गोष्टींचा विचार नक्की केला पाहिजे. तुमचे लग्न पारंपरिक पद्धतीने होणार आहे, की बीचसारख्या डेस्टिनेशनवर आहे, ते लक्षात घ्या. तुम्हाला उंच दिसायचे आहे, की आहे त्या उंचीपेक्षा जास्त उंची नको आहे, तुमचा पेहराव कोणत्या पद्धतीचा असणार आहे, अशा काही गोष्टींचा विचार करून तुम्ही कोणत्या प्रकारच्या हील्सची पादत्राणे घ्यायची ते ठरवू शकता. तुमची उंची कमी असेल आणि उंच दिसण्यासाठी तुम्ही हाय हील्सचा घेत असाल तर फार उंच हील्स निवडू नका. एरव्ही तुम्ही जास्त उंचीचे सॅंडल वापरत नसाल तर लग्नाच्या दिवशी घातलेल्या हाय हील्सचे पाय दुखायला लागतील आणि तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस खराब होईल. त्याउलट, तुम्ही उंच आहात आणि तुम्हाला अधिक उंची नको आहे अशा वेळी सुंदर वर्क केलेले फ्लॅट चप्पलही चांगल्या दिसतात. अगदीच फ्लॅट हिल्स नको असतील, तर त्याऐवजी किटन हिल्ससुद्धा ट्राय करता येतील.

पैठणी चप्प्लसुद्धा ...
लग्नातील विविध विधींपैकी कोणत्या तरी एका विधीला मुली पैठणी नेसतातच. या पैठणीवर पैठणी चप्पलसुद्धा घालता येऊ शकते. पैठणी चप्पल म्हणजे पैठणीच्या कापडापासून ज्याप्रमाणे कूर्ती, ड्रेस, दुपट्टे, पर्स तयार केले त्याप्रमाणे हे कापड वापरून चप्पल बनवण्यात आली आहे. तुमच्या साडीच्या रंगानुसार मिळतीजुळती किंवा त्याच्या विरूद्ध रंगांची असे कॉम्बिनेशनही करता येऊ शकेल. हल्ली अनेकजणी लग्नाचा पोशाख डिझाइनरकडून बनवून घेतात. घागरा, साडी किंवा अगदी वेस्टर्न ड्रेस तयार करून घेतला तरी त्यावर शोभतील असे पादत्राणे आवश्‍यक असतातच. अशा वेळी डिझायनरकडून जादाचे फॅब्रिक घेता येईल आणि ते फॅब्रिक वापरून हवी तशी डिझायनर चप्पल, सॅंडल बनवून घेता येईल. काही ड्रेस डिझायनर अधिक पैसे आकारून असे मॅचिंग सॅंडल, चप्पल बनवून देतात. 

नवरदेवाचे जोडे 
लग्नात वेगवेगळ्या विधींना वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव केले जातात. अनेकदा नवरा-नवरी एखादी थीम ठरवून पारंपरिक, आधुनिक, भारतीय, वेस्टर्न अशा प्रकारचे कपडे घालणे पसंत करतात. कोणत्या पेहरावावर कोणत्या प्रकारची पादत्राणे असावीत, त्यांचा रंग कोणता असावा, वर्क कसं असावं, हील्स कशा असाव्यात अशा सगळ्या बाबींचा विचार पादत्राणांच्या खरेदीवेळी करावा लागतो. आपल्याकडे साधारणपणे नवरदेवासाठी सूट, इंडो-वेस्टर्न किंवा शेरवानी, जोधपूरी सूट, कूर्ता-पायजमा असे कपडे निवडले जातात. हे कपडे  खुलून दिसण्यासाठी त्यावर साजेशी पादत्राणं घालणंही महत्त्वाचं आहे. साधारणपणे सूटसोबत फॉर्मल शूज घातले जातात. फॉर्मल शूजमध्ये ब्लॅक, ब्राऊन, मरून, ऑलिव्ह ग्रीन असे ठराविक रंग येतात. त्याशिवाय शूजमध्ये आणखी दोन मुख्य प्रकार येतात. लेस असलेले आणि लेसशिवायचे. लेस नसलेले बूटांमध्ये नुसते पाय सरकवून नीट बसवले की झाले!  लेस असलेल्या बूटांना लेस बांधावी लागते. तुमच्या आवडीनुसार आणि कन्फर्टनुसार यातील सोयीचा प्रकार निवडू शकता. सध्या पेटन्ट लेदरचे ग्लॉसी बूट लग्नासाठी खरेदी  करण्याकडे तरूणाईचा कल दिसतो. या बूटांच्या किमती साधारणपणे १५०० पासून सुरू होतात.   

जर तुम्ही शेरवानी, अचकन, कूर्ता पायजमा, घालणार असाल तर त्यावर मोजडी किंवा जूती शोभून दिसेल. जूतीच्या भरपूर व्हरायटी सध्या बाजारात पाहायला मिळतात. विविध आकार व प्रकार यात उपलब्ध आहेत. खास लग्नासाठी, लग्नातील एकूण पेहरावाला साजेसा असा जूतींचा वेगळा सेक्‍शनही दुकानांमध्ये असतो. या जूतींमध्येही सोनेरी, चंदेरी, मरून  या रंगांसोबतच आता लाल, हिरवा, निळा, जांभळा, गुलाबी, पिवळा अशा रंगांतील फॅन्सी जूती पाहायला मिळतात. प्लेन जूती किंवा गोंडा असलेल्या, कुंदन वर्क, स्टोन वर्क, जरदोसी, एम्ब्रॉडयरी किंवा लेस लावलेल्या जूती तुम्ही तुमच्या कपड्यांच्या प्रकारानुसार व रंगानुसार घेऊ शकता. जूट, सिल्क अशा कापडांमधूनही जूती उपलब्ध आहेत. साधारणपणे सहाशे रूपयांपासून ते तीन हजार रूपयांपर्यंत या मोजडी मिळतात. 

लग्नात हौसेने मोजडी घेतली जाते पण तिचा नंतर फारसा वापर होतं नाही. त्यामुळे काही पारंपरिक पेहरावासाठी मोजडीऐवजी कोल्हापूरी चप्पलदेखील ट्राय करता येईल. ही चप्पल नंतर नेहमीच्या समारंभात, किंवा बाहेर जातानाही घातला येऊ शकते. कोल्हापूरी चप्पलांनी आपला पारंपरिक बाज कायम ठेवत त्यात मॉडर्न स्टाईल आणल्या आहेत. मुलांसाठी शाहू, धनगरी, कापशी, पेशावरी, गांधी, कुरूदवाड, अग्निपथ, माडी असे वेगवेगळे प्रकार या कोल्हापूरी चपलांमध्ये उपलब्ध आहेत. या चपला साधारणपणे सहाशे ते सात हजारापर्यंत मिळू शकतात. लग्नसमारंभात नववधू-वर हे त्या दिवसाचे ‘सेलिब्रिटी’ असतात. त्या दिवशी हे ‘वलय’ सांभाळत नखशिखांन्त सुंदर दिसणं हे क्रमप्राप्तच आहे. त्यामुळे विवाहस्थळ निश्‍चित झाल्यावर लग्नपद्धती विचारात घेऊन कपड्यांच्या खरेदीपाठोपाठ पादत्राणांचीही खरेदी प्राधान्याने व्हायलाच हवी. 

हे करा 

  • लग्नातील पेहराव आधी खरेदी करा ः लग्नासाठी कोणत्या प्रकारची पादत्राणे घ्यायची हे तुम्ही आधीच ठरवले असले तरी घाई करू नका. आधी कपड्यांची खरेदी करा. आणि मगच  त्यावर जातील, असे सॅंडल, चप्पल किंवा शूज निवडा. 
  • एकसारखी स्टाइल ठेवा ः लग्नातला पेहराव आणि त्यावर साजेसे असे चप्पल वा सॅंडल असतील तर ते अधिक चांगले दिसते. ड्रेससोबत पादत्राणे निवडताना एकच स्टाईल ठेवली पाहिजे. म्हणजे जर नववारी  नेसणार असाल तर त्यावर हाय हील्स सॅंडलपेक्षा कोल्हापूरी चप्पल अधिक उठून दिसेल. विंन्टेज किंवा रेट्रो लूक निवडला असेल तर त्यावर तशीच साजेशी पादत्राणे घ्यायला हवीत. 
  • खरेदीनंतर पादत्राणे वापरून पाहा ः अनेकदा खरेदीच्या वेळी घालून पाहिल्यानंतर लग्नातले जोडे हे थेट लग्नादिवशीच पायात घातले जातात. कधी कधी दिवसभर ती चप्पल घालून उभे राहणे, चालणे अवघड जाते. असे ऐनवेळी उद्भवणारे प्रसंग टाळण्यासाठी खरेदी केल्यानंतर ती चप्पल एखाद-दोन दिवस घरात घालून पाहायला हवी. ती चप्पल वा सॅंडल घालून तुम्ही तासभर आरामात उभे राहू  शकलात, तर लग्नादिवशी दिवसभर ती चप्पल वा सॅंडल घालायला काहीच अडचण येणार नाही. 
  • लग्नाचे स्थळ ः तुमचे लग्न कुठे आहे, त्या ठिकाणाचाही विचार करायला हवा. त्या दिवशी तेथील हवामान कसे असेल, याचा अंदाज घ्या. पावसाळ्याचे दिवस असतील तर त्यानुसार पादत्राणांची खरेदी करावी लागेल. तुमचे लग्न बंदिस्त हॉलमध्ये आहे की मोकळ्या गार्डनमध्ये, बीचवर आहे, हेही विचारात घ्यावे लागेल. बीचसारख्या ठिकाणी हाय हील्स घालून चालणे शक्‍य होत नाही.

हे टाळा

  • शेवटच्या क्षणी खरेदी नको ः अनेकदा लग्नकार्यातील इतर कामांच्या धांदलीत नवरदेव तसेच नवरीच्या पादत्राणांची खरेदी अगदी ऐनवेळी केली जाते. अशा ऐनवेळीच्या खरेदीत सिलेक्‍शनलाही फारशी संधी मिळत नाही किंवा हवी तशी कम्फर्टेबल चप्पल मिळत नाही. 
  • तुमच्या कन्फर्टचा विचार करा ः स्टाईलचा विचार करताना तुम्हाला त्या पादत्राणांमध्ये किती आरामदायी वाटते, हेही लक्षात घ्यायला हवे. जर तुम्हाला त्या चपलांचा त्रास होत असेल आणि लग्न एन्जॉय करण्यासाठी ते जोड पायातून काढून टाकण्याची इच्छा होत असेल तर एवढ्या भारी चपला-बूटांचा काय उपयोग? त्यामुळे कोणत्याही प्रकारची पादत्राणे निवडताना तुम्हाला त्यात कन्फर्टेबल  वाटेल, याचा नक्की विचार केला पाहिजे. 
  • ऑनलाइन खरेदी ः लग्नाच्या धावपळीत हातात तसा कमी वेळ असतो त्यामुळे काही कामे ही ऑनलाईन केली जातात. यात शॉपींगचा काही भागही येतो. ऑनलाईन शॉपिंग घरबसल्या सहजसोपी असली  तर लग्नाची पादत्राणे घेण्यासाठी तितकीशी योग्य नाही. तुमच्या लग्नासारख्या महत्त्वाच्या दिवसासाठी तुम्ही पादत्राणांची खरेदी करत असल्यामुळे ती प्रत्यक्ष घालून, कशी दिसतायेत, ड्रेसवर मॅच होतात का, हे पाहून मगच कार्ड स्वाईप करायला हवे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप विविधता, स्टाईल्स पाहायला मिळतील. त्या तुमच्या लोकल मार्केटमध्ये शोधता येतील आणि प्रत्यक्ष पाहून ट्रायही करता येतील.

फोटो फीचर

संबंधित बातम्या