मेटाबोलिक सिंड्रोमची समस्या
आरोग्याचा मूलमंत्र
एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे. अधिकाधिक आधुनिक आणि ‘स्मार्ट जीवनशैली’ अंगीकारून आपल्या देशाला जगात उच्च स्थानावर पोचवण्याची जिद्द भारतीय नेतृत्व गेली दोन दशके मनात ठेवून आहे. पण या स्थानावर पोचताना आरोग्याबाबत एक मोठा झटका बसतो आहे. या आधुनिक जीवनशैलीतून निर्माण झालेला ‘मेटाबोलिक सिंड्रोम’ ही भारतीयांची सर्वांत मोठी आरोग्यसमस्या होऊन बसली आहे.
आज भारतातील कुठल्याही डॉक्टरांच्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांमध्ये ३५ टक्के रुग्णांचे आजार हे जीवनशैलीशी निगडित असलेल्या याच मेटाबोलिक सिंड्रोममधून उद्भवलेले असतात. रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांत तर हे प्रमाण ४० टक्क्यांहून जास्त भरू लागले आहे.
मेटाबोलिक सिंड्रोम म्हणजे काय?
आधुनिक जीवनशैलीत आरोग्याची मूलतत्त्वे पाळायला आज कुणालाही वेळ नाही. पण त्यातून अनेक शारीरिक दोष निर्माण होतात. यामध्ये काही दोष बहुसंख्य लोकांमध्ये आढळतात. मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या या दोषांच्या समुच्चयाला ‘मेटाबोलिक सिंड्रोम’ किंवा ‘सिंड्रोम एक्स’ म्हणतात. या दोषांत -
- उच्च रक्तदाब : या व्यक्तींमध्ये रक्तदाबाची पातळी १३५/९० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त असते.
- उच्च रक्तशर्करा : रक्तातील साखरेची पातळी उपाशीपोटी १०० मिलिग्रॅमपेक्षा जास्त असते.
- अधिक ट्रायग्लिसेराईड : रक्तातील ट्रायग्लिसेराईड या मेदाची पातळी १५० मिलिग्रॅमपेक्षा जास्त असते.
- कमी एच.डी.एल. : ‘गुड कोलेस्टेरॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाय डेन्सिटी लिपीड्सची पातळी पुरुषांमध्ये ४० मिलिग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी आणि स्त्रियांमध्ये ४५ मिलिग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी असते.
- कंबरेचा घेर : पुरुषांमध्ये ९० सेंमी आणि स्त्रियांत ८० सेंमी किंवा त्यापेक्षा जास्त असतो. या व्यक्तींमध्ये कंबरेच्या घेरापेक्षा बेंबीपाशी मोजलेला पोटाचा घेर जास्त भरतो. स्त्रियांमध्ये नितंबांचा घेर कंबरेपेक्षा अधिक भरतो.
- वजन : वजनाचा मुद्दा बी.एम.आय. मापून ठरवला जातो. बी.एम.आय. म्हणजे किलोग्रॅममधील वजनाच्या आकड्याला मीटरमधील उंचीच्या आकड्याचा वर्ग करून भागले की जो भागाकार येतो ती संख्या होय.
बी.एम.आय. = वजन (किलोग्रॅम) / उंचीचा वर्ग (मीटर)
या फॉर्म्युल्यानुसार बी.एम.आय. जर २५ असेल तर निरोगी, पण २५ ते ३० साधारण वजनवाढ समजली जाते. मात्र बीएमआय ३० पेक्षा जास्त असेल तर ते मेटाबोलिक सिंड्रोमचे एक लक्षण समजले जाते.
कारणे
मेटाबोलिक सिंड्रोमचे मूलभूत कारण म्हणजे आजची स्वैर जीवनशैली होय. यामध्ये -
- आहार : आजच्या जीवनशैलीत खाण्यापिण्यात येणारी अतिरिक्त साखर आणि तैलयुक्त पदार्थांची रेलचेल यामुळे वजनवाढ होते. नियमितपणे घेतली जाणारी कोला ड्रिंक्स, शीतपेये, मिठाई, केक्स, बिस्किटे, प्रक्रिया केलेले फळांचे रस यात साखरेचे प्रमाण भरपूर असते. पिझा, बर्गर, वडे, सामोसे, चिवडा, फरसाण, चिप्स, वेफर्स आणि अनेक शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांमध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमालीचे जास्त असते. यामुळे कंबरेभोवती आणि पोटावर चरबीचे थर निर्माण होतात. वजन खूप वाढते. त्यामुळे शरीरातील इन्सुलिनला प्रतिरोध निर्माण होऊन रक्तातील शर्करा वाढते. त्याचबरोबर ट्राय-ग्लिसेराईड वाढतात. धावपळीच्या जीवनात जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीत. त्यामुळे सकाळी नाश्ता न करता, फक्त चहा-बिस्किटे घेतली जातात. दुपारी वेळेवर जेवण होत नाही आणि रात्री मात्र पोटाला तडस लागेपर्यंत मनसोक्त तैलयुक्त आणि गोडाचे जेवण केले जाते. यामुळे पुन्हा पोटावरची चरबी आणि वजन वाढून रक्तशर्करा आणि ट्राय-ग्लिसेराईड वाढत जातात.
- बैठी जीवनशैली : सर्व कामे दिवसभर खुर्चीवर बसून करायची, जिन्यांऐवजी लिफ्ट, यायला - जायला दुचाकी किंवा चारचाकी गाड्या यामुळे शरीराची हालचाल एकंदरीत कमी होऊन मेद वाढू लागतो.
- व्यायाम : सकाळपासून रात्रीपर्यंत काम करणाऱ्या आजच्या पिढीला नियमितपणे कुठलाही व्यायाम करण्याची सवय उरलेली नाही. त्यामुळे पोट सुटणे, वजन वाढणे आणि इतर दोष निर्माण होतात. याच कारणामुळे एच.डी.एल. कमी राहते आणि मेटाबोलिक सिंड्रोमची लक्षणे निर्माण होतात.
- व्यसने : धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, अतिरिक्त मद्यपान यामुळे एच.डी.एल. कमी राहते.
आरोग्याबाबत धोके
मेटाबोलिक सिंड्रोमची लक्षणे असलेल्या व्यक्तींमध्ये आरोग्याबाबत अत्यंत गंभीर आणि चिंताजनक धोके उद्भवतात. यामध्ये -
- उच्च रक्तदाब होणे.
- रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉलचे थर निर्माण होणे.
- रक्तातील साखर वाढत जाऊन टाइप-२ चा मधुमेह होणे.
- हृदयविकाराचा झटका येणे.
- लकवा किंवा अर्धांगवायू होणे.
- सततचा खोकला किंवा सीओपीडी सारखे फुफ्फुसाचे आजार होणे.
- मूत्रपिंडे निकामी होणे.
- नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा यकृताचा गंभीर आजार होणे.
- स्त्रियांमध्ये पी.सी.ओ.डी. सारखे आजार होऊन पाळी नियमित न येणे, वंध्यत्व निर्माण होणे.
- स्त्रियांमध्ये स्तनाचा तर पुरुषांमध्ये मोठ्या आतड्याचा कर्करोग होणे; तसेच मुखाचा किंवा जिभेचा कर्करोग उद्भवणे.
- गर्भवती स्त्रियांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब उद्भवणे हे त्रास होतात. या आजारांमुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते आणि गर्भवती मातेचे मृत्यू आणि नवजात अर्भकांचे गंभीर आजार उद्भवतात.
- पुरुषांमध्ये लैंगिक उद्दिपन नष्ट होण्याचा विकार उद्भवतो.
- नैराश्य, चिंता, कामात लक्ष न लागणे, अस्वस्थ वाटत राहणे, सतत थकवा जाणवणे अशासारखे मानसिक आणि मनोशारीरिक व्याधी उत्पन्न होतात.
गांभीर्य - मेटाबोलिक सिंड्रोममधून उद्भवणाऱ्या आजारांमुळे आज जगातल्या एकूण मृत्यूंपैकी ६३ टक्के मृत्यू होतात. हा भारतीय वंशामध्ये जगात सर्वांत जास्त प्रमाणात आढळतो. आजमितीला भारतामध्ये संसर्गजन्य आजारांच्या साथींमध्ये दगावणाऱ्या रुग्णांपेक्षा या असंसर्गजन्य आजारांनी जास्त रुग्ण मृत्युमुखी पडतात. हे प्रमाण आज ५३ टक्क्यांच्या वर झेपावले आहे.
भारतात एकुणात होणाऱ्या दरवर्षीच्या मृत्युंमध्ये हृदयविकारांनी २४ टक्के, फुफ्फुसाच्या आणि श्वसनाच्या आजारांनी ११ टक्के, कर्करोगाने ८ टक्के आणि मधुमेहाच्या गुंतागुंतीमुळे ४ टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्ती दगावतात. भारतीयांच्या जीवनशैलीतील प्रगती आणि आरोग्य सतर्कतेमधील अधोगती पाहता, हे प्रमाण दरवर्षी भौमितीय श्रेणीच्या गतीने विस्तारत जाणार यात शंकाच नाही.
निदान - मेटाबोलिक सिंड्रोमच्या निदानासाठी रुग्णाचे वजन, रक्तदाब, कमरेचा घेर, उपाशीपोटी रक्तातील कोलेस्टेरॉल आणि साखरेचे प्रमाण या तपासण्या कराव्या लागतात. यापैकी तीन तपासण्यांमध्ये जर दोष आढळला तर मेटाबोलिक सिंड्रोमचे निदान केले जाते.
आधुनिक जीवनशैलीतून उत्पन्न होणाऱ्या समस्या जगभरात वाढत आहेत. त्यात लहान मुलांमध्येदेखील लठ्ठपणाचे प्रमाण हाताबाहेर जाताना दिसत आहे. अवेळी जेवण, अयोग्य आहार, शरीराला योग्य प्रमाणात आवश्यक त्या प्रथिनांचा आणि जीवनसत्त्वांचा पुरवठा न होणे, खाण्यात सतत जंकफूड्स येणे, व्यायामाचा पूर्ण अभाव असणे, सातत्याने एकाजागी बसून टीव्ही पाहणे, संगणक आणि मोबाईलवर खेळ खेळणे. मैदानी खेळांकडे दुर्लक्ष करणे या गोष्टींमुळे मेटाबोलिक सिंड्रोम मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. लहानपणी अधिक वजन वाढल्यास मोठेपणी टाइप-२ प्रकारचा मधुमेह होण्याचा धोका वाढतो आहे. यासाठी लहान मुले, त्यांचे पालक, तसेच समाजातील सर्व घटकांमधील आरोग्य साक्षरता आणि सजगता वाढवणे नितांत आवश्यक होऊन बसले आहे.
प्रतिबंधक उपाय
‘मेटाबोलिक सिंड्रोम’ची लक्षणे निर्माण झाल्यावर त्यातून निष्पन्न होणारे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार नियंत्रित ठेवण्यासाठी कायमस्वरूपी आणि आयुष्यभर औषधे घ्यावीच लागतात. पण त्यापासून आपले आरोग्य सांभाळण्यासाठी, मुळात आपण या सिंड्रोमपासून दूर कसे राहता येईल याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. या उपायांमध्ये जीवनशैलीत आमूलाग्र बदल करावेच लागतात.
- वजन कमी करणे : याकरिता रोज तीस ते पंचेचाळीस मिनिटे एरोबिक व्यायाम आठवड्यातून निदान पाच ते सात वेळा करायला हवा. यात सपाटीवर भरभर चालणे, जॉगिंग, धावणे, पोहणे, सायकल चालवणे, ट्रेडमिलवर पळणे असे व्यायाम येतात. वयाच्या विशीपासूनच कमरेचा आणि पोटाचा घेर योग्य राखावा. व्यायामाबरोबरच रोज शारीरिक हालचाली आणि शारीरिक श्रम करायलाच हवेत. वरच्या मजल्यांवर जायला लिफ्ट न वापरता शक्यतो नेहमी जिना वापरावा. घरातली कामे, बागकाम, व्यवसायातली छोटी - मोठी कामे स्वतः करावीत. बॉडी मास इंडेक्स २३ च्या खाली आणि शक्यतो १८ ते २० च्या दरम्यान राखावा. त्यासाठी वजन दर महिन्याला तपासले पाहिजे.
- आहार : पिष्टमय पदार्थ आणि स्निग्ध पदार्थ मर्यादित स्वरूपात असलेला, पण प्रथिनांचे प्रमाण जास्त असलेला चौरस आहार घ्यावा. आहारात पालेभाज्या, मोड आलेली धान्ये किंवा स्प्राऊट्स, कडधान्ये यांचे प्रमाण यथोचित असावे. आहारामध्ये भाकरी, पोळी, भात जास्त खाण्याऐवजी पालेभाज्या, फळे, प्रथिने यांचा जास्त समावेश करावा. जाहिराती करून सांगितले जाणारे, ऐकीव माहितीवरून समजलेले ‘फॅड डाएट’ वजन कमी करण्याची औषधे, टाळावीत. फास्ट फूड, चमचमीत पदार्थ, अतिगोड पदार्थ, वडे-भजी, सामोसे असे तळलेले पदार्थ टाळावेत. कोला ड्रिंक्स, शीतपेये, गोड सरबते, बिस्किट्स, केक्स, आइस्क्रीम खाणे टाळावे. सकाळी उत्तम न्याहारी करावी, दुपारी मोजकेच खावे मात्र रात्री अगदी कमी जेवावे. स्त्रियांमध्ये प्रसूतिपश्चात वजनवाढ हमखासपणे खूप होते. त्यासाठी प्रसूतिपश्चात सहा आठवडे आवश्यक तेवढेच पौष्टिक अन्न घ्यावे. सारखे झोपून राहणे टाळून दीड महिन्यानंतर व्यायाम सुरू करावेत.
- धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थ वर्ज्य करावेत.
- अतिरक्तदाब असल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य तो औषधोपचार करावा.
- रक्तातील साखर जास्त असल्यास मधुमेहासाठी आहार-विहार नियंत्रण, व्यायाम आणि औषधोपचार करावेत.
- रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करायला तेल कमी असलेला आहार, व्यायाम याबरोबरच डॉक्टरांच्या सल्ल्याने स्टॅटिन प्रकारची औषधे घ्यावीत. वर्षातून किमान दोनवेळा लिपिड प्रोफाईलही तपासणी करून रक्तातील कोलेस्टेरॉल, एचडीएल, ट्राय-ग्लिसेराईड्स नियंत्रित आहेत ना याची खातरजमा करत राहावी.
- रक्तदाब वर्ष-सहा महिन्यांनी तपासून त्यावर नियंत्रण ठेवावे.
- दरवर्षी किमान एकदा सर्वसाधारण तपासणी करून घ्यावी. यात रक्तशर्करा, कोलेस्टेरॉल, ईसीजी, छातीचा एक्सरे, यकृताच्या आणि मूत्रपिंडाच्या तपासण्या यासमवेत वयाच्या चाळिशीनंतर कर्करोगाच्या तपासण्या करणे गरजेचे आहे. स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाची, स्तनांची तपासणी, तर पुरुषांमध्ये प्रोस्टेट, आतड्याच्या कर्करोगांच्या तपासणीकडे लक्ष द्यावे. या तपासण्यांत एखादा विकार आढळल्यास त्याकरता डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार तपासण्या आणि इलाज करावेत.