परिहार सेवा
आरोग्याचा मूलमंत्र
नवी आयुष्य क्षणभंगुर मानले जाते. जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही केंव्हातरी मृत्युमुखी पडणारच. या प्रवासाची सांगता स्मितहास्याने आणि समाधानी मनाने व्हावी या दृष्टीने केल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवेला ’परिहार सेवा’ (पॅलिएटिव्ह केअर) म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१४ या वर्षी झालेल्या विश्वपरिषदेत याबद्दल एक ठराव संमत करण्यात आला होता. कर्करोगाच्या उपचारांमध्ये आणि नियंत्रणामध्ये परिहार सेवा हा एक अत्यावश्यक घटक आहे.
परिहार सेवेची संकल्पना
परिहार सेवेमध्ये रुग्णाची वेदना दूर करून त्याच्या जगण्यात थोडा अर्थ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्या जगण्याच्या गुणवत्तेत सकारात्मक सुधारणा करण्यासाठी काही गोष्टी केल्या जातात. रुग्णाच्या आजारांनी चिंतित आप्तेष्टांना त्याच्या या अंतिम प्रवासात त्याला कशी साथ द्यायची आणि घरातले वातावरण कसे सकारात्मकरित्या आनंदी ठेवायचे याबद्दल काही ’युक्तीच्या चार गोष्टी’ सांगितल्या जातात.
परिहार सेवा ही जरी प्रामुख्याने कर्करोगासाठी वापरली जात असली, तरी जागतिक पातळीवर या सेवेचा वापर सर्व असंसार्गिक रोगांच्या (नॉन कम्युनिकेबल डिसिजेस) अंतिम उपचारासाठी वापरावी असा संकेत रूढ आहे.
परिहार सेवेमध्ये रुग्णाच्या आजाराच्या अवस्थेचे आणि त्याला होणाऱ्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आत्मिक त्रासाचे बारकाव्याने निदान केले जाते आणि त्यावरील उपचार घरातील प्रिय व्यक्तींच्या प्रत्यक्ष सहभागाने केले जातात.
थोडक्यात, एखाद्या गंभीर आजारामुळे रुग्णाचा मृत्यू होणे अटळ असेल, तर त्याच्यावर अतिदक्षता विभागात, त्याला वेदनादायी होणारे उपचार करत राहण्यापेक्षा, वेदनांपासून त्याला आराम कसा मिळेल याकडे या सेवेत अधिकाधिक लक्ष दिले जाते.
आजच्या जीवनात दीर्घकाळ उपचार घ्याव्या लागणाऱ्या आणि तरीही मृत्यू अटळ असणारे कर्करोग आणि तत्सम आजार खूपच जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. साहजिकच परिहार सेवा आणि तिचे महत्त्व प्रत्येक कुटुंबाने जाणून घेणे गरजेचे बनले आहे.
ठळक गोष्टी
जागतिक आरोग्य संघटनेने परिहार सेवेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने तिच्यात काही आवश्यक गोष्टींचा समावेश असावा असे अधोरेखित केले आहे. यामध्ये -
- प्राणांतिक वेदना आणि तत्सम जीवघेण्या वाटणारी लक्षणे शमवणे.
- जीवन आणि मृत्यू ही मानवी जीवनातील टाळता न येणाऱ्या गोष्टी आहेत हे रुग्णाला आणि त्याच्या प्रिय जनांना समजावून सांगणे.
- मृत्यू लवकर येणे किंवा तो लांबवणे या दोन्ही गोष्टी टाळून तो नैसर्गिकरीत्या आनंदी वातावरणात व्हावा यासाठी प्रयत्न करणे.
- प्रत्येक रुग्ण म्हणजे एक जिवंत माणूस असतो.त्यामुळे त्याची आत्मप्रतिष्ठा जपून त्याला मानाने आणि मायेने वागवून, उपचार करणे तसेच त्याच्या वेदनेचे परिमार्जन करत त्याचे मन शांत करणे.
- रुग्णसेवेमध्ये शारीरिक वैद्यकीय उपचारांसोबत मनोवैज्ञानिक, भावनिक आणि आध्यात्मिक विचारांची तसेच उपचारांची सांगड घालणे.
- जीवित असलेल्या रुग्णाच्या मृत्युपर्यंत परिणामकारक अशी एक समर्थक प्रणाली (सपोर्ट सिस्टिम) तयार करणे.
- नातेवाइकांच्या दृष्टीने रुग्णाचे आजारपण आणि त्याच्या मृत्यूनंतरही त्यांना खंबीर ठेवणारी समर्थक प्रणाली निर्माण करणे.
- औषधोपचार करणाऱ्या विविध डॉक्टरांसोबत, रुग्णाचे आणि नातेवाइकांचे समुपदेशन करणारी टीम तयार करणे. या टीमने त्यांच्यावर संघभावनेने उपचार करणे.
- रुग्णाच्या जगण्यातील गुणवत्ता (क्वालिटी ऑफ लाइफ) अशा पद्धतीने वाढवणे, की ज्यायोगे रुग्णाच्या आजारांच्या लक्षणात अपेक्षेपेक्षा दीर्घकाळ सुधारणा होऊ शकेल.
परिहार कोणत्या आजारात
१. दीर्घकालीन गंभीर आजार ः
- दैनंदिन जीवनातील अंघोळ, कपडे, प्रातर्विधी, दात घासणे, वैयक्तिक स्वच्छता अशी वैयक्तिक कार्ये होत नसतील
- वजन वेगाने घटू लागल्यास
- मल्टी ऑर्गन फेल्युअर म्हणजेच रुग्णाचे एकापेक्षा जास्त महत्त्वाच्या अवयवांचे कार्य कमालीचे मंदावले असेल किंवा बंद पडले असेल
- रुग्ण अतिदीर्घकाळ बेशुद्ध असेल
- रुग्णाच्या नातेवाइकांनी किंवा रुग्णाने स्वतः कोणतीही तातडीची प्रक्रिया करून प्राण वाचवायचे नाहीत (डू नॉट रीससिटेट) अशी संमती किंवा कायदेशीर इच्छा प्रदर्शित केली असेल.
- आजाराची शारीरिक आणि मानसिक लक्षणे रुग्णाला असह्य होत असतील.
- रुग्णाला अन्न घेणे अशक्य असेल आणि त्यासाठी नाकातून नळी टाकावी लागत असेल किंवा पोटावर शस्त्रक्रिया करून विशिष्ट नळी बसवावी लागणार असेल.
- रुग्णाला कोणीही जवळचे नातेवाईक नसतील किंवा त्याला तीव्र स्वरूपाचा वेडाचा आजार असेल.
- रुग्णाच्या गंभीर आजारामुळे त्याच्या जगण्याविषयी नातेवाईक साशंक असतील.
- रुग्णावर यापुढे कुठलेही औषधोपचार केले, तरी रुग्णाचे प्राण वाचणार नाहीत अशी डॉक्टरांची खात्री झाली असेल.
२. कर्करोगाच्या रुग्णात ः
- रुग्णाच्या कर्करोगामुळे त्याच्या शारीरिक कार्यात किती दोष निर्माण झाला आहे आणि उपचारांनी त्यात किती फरक पडला आहे, हे कार्नोफ्स्की आणि इसीओजी या मानकांनी मोजले जाते. जर -कोर्नोफ्स्की स्कोअर ५० पेक्षा कमी आणि इसीओजी स्कोर ३ पेक्षा जास्त असेल तर रुग्णाला परिहार सेवा घेण्याचा सल्ला दिला जातो.
- रेडीएशन देऊनसुद्धा मेंदूमध्ये कर्करोग पसरत जात असेल, मज्जासंस्थेच्या आवरणाना जर कर्करोगामुळे सूज येत असेल, मज्जारज्जू अपरिमितरित्या दबला जात असेल,
- रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण अतिरेकी वाढत असेल
- रक्तातील सर्व प्रकारच्या पेशी सातत्याने खूप कमी होत चालल्या आहेत असे लक्षात आल्यास
- केमोथेरपी, रेडीएशन देऊनसुद्धा रुग्णाच्या आजारात विशेष फरक पडत नसेल
परिहार सेवेचे फायदे
१. रुग्णाला आणि त्यांच्या नातेवाइकांना रुग्णाच्या उपचाराचे नियंत्रण करता येते.
२. डॉक्टरांसोबतचा रुग्णाचा आणि नातेवाइकांचा वार्तालाप सुधारतो. रुग्णावर नक्की काय उपचार केले जात आहे आणि का केले जाता आहेत याबाबत कोणीही अंधारात राहत नाही.
३. रुग्ण आणि त्याचे नातेवाईक रुग्णाचा आजार, त्याची एकुणातली परिस्थिती, त्याच्या तब्येतीतील उतार-चढाव याबद्दल सर्व शंका विचारून त्यांचे निरसन करून घेऊ शकतात. कित्येक गोष्टीत आता काय करावे? याची योग्य उत्तरे त्यांना वेळोवेळी मिळतात आणि गोंधळाचे वातावरण निवळते.
४. रुग्णाची तब्येत, त्याची मनस्थिती आणि आजाराच्या सावटाखाली असलेले कौटुंबिक वातावरण कसे सुधारावे याबद्दल तज्ज्ञ डॉक्टर आणि समुपदेशक यांच्याकडून शास्त्रीय मार्गदर्शन मिळू शकते.
५.परिहार सेवेदरम्यान रुग्णाच्या घरातील संभाव्य मृत्यू आणि त्यातून निर्माण होणाऱ्या चिंतेचे वातावरण निवळते. याचा उपयोग घरातील व्यक्तींमध्ये दीर्घकाळ रेंगाळत राहणाऱ्या तणावामुळे निर्माण होणारे नैराश्यासारखे मानसिक विकार टळू शकतात. त्याचप्रमाणे कुटुंबीयांमध्ये अतितणावग्रस्त वातावरणाचा परिणाम म्हणून होणारे मधुमेहातील साखर वाढणे, रक्तदाब वाढणे असे शारीरिक त्रास नियंत्रणात राहू शकतात.
६. अनेक रुग्णांना आणि नातेवाइकांना इस्पितळाची दहशत असते. त्यामुळे अनेकदा आवश्यक उपाय टाळले जातात. मात्र परिहार सेवा घरी देण्यात येणे शक्य असल्याने, ही भीती आणि त्यातून निर्माण होणारी..... टंगळमंगळ उरत नाही.
बालकांची परिहार सेवा
लहान बाळांची परिहार सेवा मोठ्या वयाच्या रुग्णांपेक्षा फारशी वेगळी नसली तरी त्यात बालकांची आणि त्यांच्या पालकांची नाजूक मनःस्थिती यांचा विशेष विचार करावा लागतो. ’मुले ही देवाघरची फुले’ असतात असे मानणाऱ्या आपल्या समाजात ’हे मूल अल्पकाळातच देवाघरी जाणार’ या क्लेशदायक विचारांनी त्या लहानग्याचे कुटुंबीय संवेदनाशील आणि भावनाप्रधान होतात. त्यामुळेच दीर्घकाळ चालणारे दुर्धर आजार आणि कर्करोग यांनी त्रस्त झालेली बालके आणि त्यांचे पालक हा परिहार सेवेतील एक वेगळा अध्याय ठरतो. ज्यांनी अजून जीवन पुरेसे पाहिलेलेही नाही, अशा बालकांच्या शारीरिक व्याधीसोबत त्यांच्या मानसिक आणि आत्मिक गोष्टींची खूप काळजीपूर्वक निगा या परिहारात घ्यावी लागते. एवढेच नव्हे, तर साऱ्या कुटुंबालाच पूर्ण सावरून घ्यावे लागते. यासाठी बालकांमधल्या या परिहार उपचारांची सुरवात त्याच्या आजाराचे निदान झाल्यावरच सुरू करावी लागते.
आवश्यक उपाय
परिहार सेवा परिणामकारक व्हायला त्यात एकापेक्षा जास्त विशेषज्ञांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. रुग्णांना ही सेवा फक्त मोठ्या इस्पितळातच नव्हे, तर छोट्या दवाखान्यातदेखील मिळायला हवी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णाला आणि त्याच्या नातेवाइकांना सोयीचे व्हावे म्हणून ती जास्तकरून घरीच मिळावी लागते.
भारतीय आकडेवारीनुसार आपल्या देशात प्रत्येक वर्षी सुमारे २५ लाख कर्करोगाने पीडित रुग्ण आढळतात. दर वर्षी त्यात सुमारे १० लाख नवीन कर्करुग्णांची भर पडते आहे.
एवढ्या मोठ्या आणि सतत वाढत जाणाऱ्या या आजारासाठी एका राष्ट्रीय धोरणाची आवश्यकता भासते आहे. आता परिहार सेवादेखील राष्ट्रीय आरोग्य योजनेत अंतर्भूत करणे गरजेचे आहे. २०१८ च्या राष्ट्रीय अर्थसंकल्पात भारतभरातील प्राथमिक आरोग्यकेंद्रात ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे सूतोवाच केलेले आहे.
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने परिहार सेवेला वैद्यकीय सेवा म्हणून २०१० मध्ये मान्यता दिली. २०१२ मध्ये मुंबईच्या टाटा मेमोरिअल इस्पितळात आणि २०१७ मध्ये दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) याविषयातील अधिकृत पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले. परंतु आजतागायत एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात याचा समावेश झालेला नाही.
- परिहार सेवा सर्वत्र आणि सर्व स्तरांवर उपलब्ध होण्यासाठी डॉक्टरांना, नर्सेसना आणि पॅरामेडीक्सना याचे विशेष प्रशिक्षण देण्याची सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण झाली पाहिजे.
- या सेवेत रुग्णाच्या प्राणांतिक वेदना कमी करण्यासाठी त्याला मॉर्फिनसारख्या तीव्र वेदनाशामकाची गरज असते. मात्र ही औषधे ओपिएट्स या गटामध्ये मोडतात. त्यावरील कडक निर्बंधांमुळे सर्वत्र सहजासहजी मिळत नाहीत. या दृष्टीने ’नार्कोटिक ड्रग्ज ॲण्ड सायकोट्रॉपिक सब्स्टन्सेस’ या औषध नियंत्रण कायद्यात फेब्रुवारी २०१४ मध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार काही मान्यताप्राप्त वैद्यकीय संस्थांना आणि या क्षेत्रात कार्य करणाऱ्या काही ’एनजीओ’जना कर्करोग रुग्णांसाठी मॉर्फिन उपलब्ध करून देण्याची सवलत देण्यात आली. मात्र अजूनही या औषधांच्या वितरणासाठी काही वेगळी पण सोपी पद्धत अमलात आणण्याची गरज आहे.
- परिहार शुश्रूषेसाठी राष्ट्रीय पातळीवर अद्ययावत आणि पायाभूत सोयी निर्माण करण्यासाठी आणि निधी निर्माण करण्यासाठी स्थानिक खाजगी उद्योगधंद्यांना प्रवृत्त करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले पाहिजे.
- जगभरात फोफावत चाललेले कर्करोगाच्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारी परिहार सेवा ही एक चळवळ आहे. मानवतेच्या उदात्त दृष्टिकोनातून दिल्या जाणाऱ्या या सेवेचा नजीकच्या भविष्यकाळात अधिकाधिक वापर होत राहील यात शंका नाही.