प्रोबायोटिक्‍स

डॉ. अविनाश भोंडवे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

आरोग्याचा मूलमंत्र
 

‘जंतू’ आणि त्यांच्यामुळे होणारे आजार म्हणजे आरोग्याला लागणारे अनिष्ट ग्रहणच असते. मात्र सारेच जंतू रोग निर्माण करणारे ’रोगजंतू’ नसतात. उलट काही प्रकारचे जंतू आपल्या शरीरात कायम स्वरूपी गुण्यागोविंदाने नांदणारे रहिवासी असतात. आपली त्वचा, तोंड, अन्नमार्ग आणि आतड्यात शांततेने सहनिवास करणाऱ्या या जंतूसमूहाला ’कॉमेन्साल ऑर्गनिझम’ म्हणतात. 

आतड्यातल्या सहजंतूंचे तंत्र थोडे वेगळे असते. लॅक्‍टोबॅसिलस आणि बिफिडोबॅक्‍टेरियम हे आतड्यातले सूक्ष्म जंतू आपल्या शरीराला अन्नपचनाच्या कार्यात मदत करत असतात. हे उपकारक जंतू दही, शाकाहारी लोणचे आणि योगर्टसारख्या आंबवलेल्या अन्नपदार्थात सापडतात. त्यांचे कार्य शरीराला इतके उपयुक्त असते, की ते कमी पडल्यास काही पूरक औषधांच्या, तसेच फूड सप्लिमेंट्‌सच्या स्वरूपात बाहेरून घेतले जातात. या उपकारक जंतूंना आणि त्यांनी युक्त अशा औषधांना आणि अन्नपदार्थांना ’प्रोबायोटिक्‍स’ म्हणतात. 

वैद्यकीय संशोधकांच्या मते मानवी शरीरात साधारणतः १००० पेक्षा जास्त प्रजातींचे अब्जावधी सूक्ष्मजंतू असतात आणि असंख्य आजारांपासून शरीराचे संरक्षण करत आरोग्य अबाधित राखतात. विविध प्रकारचे रोगजंतू आतड्याच्या आवरणात असतात. या जंतूंचे प्रमाण आहारशैलीनुसार आणि व्यक्ती वैशिष्टयानुसार बदलू शकते. 

उपलब्ध प्रोबायोटिक्‍स
’प्रोबायोटिक्‍सयुक्त’ असे लेबल आजकाल प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थाना लावले जाते. याची सुरवात १९९० मध्ये झाली. जपानच्या याकुल्ट कंपनीने एक प्रोबायोटिकयुक्त पेय बनवले आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये निर्यात केले. युरोपियन जनतेला ते भलतेच आवडले आणि ’प्रोबायोटिक्‍स’बाबत कुतूहल निर्माण झाले. लोकांना सूक्ष्मजंतूंचा संसर्ग हटविणारी अँटिबायोटिक्‍स माहिती होती. पण रोगजंतूंचा खातमा करणारे उपकारक जंतूसुद्धा अस्तित्वात असतात हे या निमित्ताने जगाला समजले. आणि योगर्ट आणि प्रोबायोटिक्‍स हे समीकरण जगभरात रूढ झाले. त्या पाठोपाठ हे उपकारक जंतू गोळ्या आणि औषधांच्या स्वरूपात उदयाला आले. डॉक्‍टरांनी लिहून द्यायच्या प्रोबायोटिक औषधांमध्ये गोळ्या, कॅप्स्युल्स, पावडरची पुडी (सॅशे), पातळ औषधे या स्वरूपात असंख्य ब्रॅण्ड्‌स आजमितीला उपलब्ध आहेत. मात्र खाण्याच्या प्रोसेस्ड फूड्‌स आणि पेये या स्वरूपातदेखील प्रोबायोटिक्‍स आज सर्रास उपलब्ध असल्याचे नजरेत येते. 

लॅक्‍टोबॅसिलस, बिफिडोबॅक्‍टेरियम, यीस्ट आणि काही बॅसिलाय एकत्रित करून प्रोबायोटिक खाद्यपदार्थ बनवले जातात. यामध्ये दूध, दही, लस्सी, ताक, आइस्क्रीम, योगर्ट आणि तत्सम पदार्थ आज बाजारात मिळतात. दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायात असलेल्या अनेक नामवंत देशी-विदेशी कंपन्यांनी या प्रकारचे खाद्यपदार्थ आणि पेये आज बाजारात आणलेले दिसतात. टेलीव्हिजनवरील जाहिरातींमुळे हे पदार्थ भारतभर लोकप्रिय झाले आहेत. या आकर्षक पदार्थात, याकुल्ट हे सायविरहित दुधापासून बनलेले, नैसर्गिक रंग, साखर आणि पाणी असलेले आंतरराष्ट्रीय पेय आहे. यात ६५० अब्ज प्रोबायोटिक जंतू असतात. गुडबेली हे दूध किंवा सोयाबीनचा किंचितही अंश नसलेले, संपूर्णत: व्हेगन असलेले, फळांच्या रसाच्या चवीचे पेय आहे. यात आंबा, स्ट्रॉबेरी, संत्रे, लिंबू, शहाळे, डाळिंब, अननस अशा विविध चवी उपलब्ध असतात. त्यात लॅक्‍टोबॅसिलस प्लॅन्टॅरम हा प्रोबायोटिकचा अर्क प्रमाणबद्ध रूपात मिसळलेला असतो. याशिवाय बियॉण्ड बेरी स्टुडन्ट फॉर्म्युला, डॉक्‍स फ्रेंडली फ्लोरा आणि क्‍यो डोफिलास ही ड्रिंक्‍स, डॅन ॲक्‍टिव्ह, गो लाइव्ह, कोको बायोटिक आणि प्री झीरो ही पेयेसुद्धा लोकप्रिय झाली आहेत.      

उपयुक्तता
आपल्या रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित ७० टक्के पेशी आपल्या आतड्यात असतात. या जंतूंमुळे या पेशींची उत्तम निगा राखली जाते आणि रोगप्रतिकारक शक्ती बलशाली होते. 

प्रोबायोटिक्‍समुळे रोगजंतूमुळे निर्माण होणारी विषारी द्रव्ये नष्ट केली जातात. परिणामत: पोटात गुबारा धरणे, पोट गच्च होणे, गॅसेस हे त्रास कमी होतात. याच कारणांमुळे लहान मुलांच्या पोटदुखीसाठीसुद्धा प्रोबायोटिक्‍स वापरली जातात. काही प्रतिजैविक औषधांनी पोटातील लॅक्‍टोबॅसिलस आणि इतर उपकारक जंतू नष्ट होऊन जुलाब होतात. अशावेळेस प्रोबायोटिक औषधे त्याबरोबर घेतल्यास हे जुलाब रोखता येतात. अल्सरेटीव्ह कोलायटीस, क्रॉह्न्स डिसीज या आजारांच्या उपचारात प्रोबायोटिक्‍सचे महत्त्वाचे स्थान आहे. जन्मतः कमी वजन असलेल्या नवजात अर्भकांमध्ये आढळणाऱ्या नेक्रोटायझिंग एंटेरोकोलायटिस या आजाराच्या प्रतिबंधासाठी ही औषधे वापरली जातात. हेलिकोबॅक्‍टर पायलोरी या जंतूंमुळे होणारा पोटातल्या आम्लपित्ताचा त्रास या औषधांनी आटोक्‍यात येतो. या जंतूंमुळे स्थूलत्व आणि पर्यायाने टाइप २ मधुमेह आणि काही प्रकारचे कर्करोग टळू शकतात, असे एका संशोधनात आढळून आले आहे. जर एखाद्या व्यक्तीने आहारात दीर्घकाळासाठी बदल केले, तर मोठया आतड्यातील या उपकारक जंतूंचा प्रकारही बदलतो. हे जंतू त्यांनी विघटित केलेल्या स्निग्ध पदार्थांचे शरीरामध्ये अभिशोषण व्हावे म्हणून काही हार्मोन्स निर्माण करतात. त्यामुळे स्थूलत्व वाढते. मात्र प्रोबायोटिक्‍सचा योग्य वापर केल्यास ही स्थूलता टाळता येते. हाडांचा ठिसूळपणा (ऑस्टिओपोरोसिस) आणि एटोपिक अस्थमा आणि ॲलर्जी यांच्याकरिता प्रोबायोटिक्‍सचा वापर उपयुक्त ठरू शकतो. पोटातील या जंतूंचा मेंदूच्या क्रियांशीदेखील संबंध असतो. आपले आचार-विचार आणि मानसिकता यांच्याशीसुद्धा त्यांचा संबंध सिद्ध झालेला आहे.

 आतड्यातील काही उपकारक जंतू जीवनसत्त्व ’के’ तयार करायला उपयुक्त ठरतात. के जीवनसत्वामुळे रक्त गोठण्याची क्रिया नियंत्रित होते. खाद्य उद्योगात खूप मोठ्या प्रमाणात प्रोबायोटिक्‍स वापरले जात असल्याने, लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याच्या नियंत्रणाबाबत साहजिकच काही पावले उचलणे आवश्‍यक ठरले. भारतीय खाद्यसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (फूड सेफ्टी ॲण्ड स्टॅण्डर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया) १ जानेवारी २०१८ रोजी यासाठी नियमावली जाहीर केली. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आय.सी.एम.आर.) आणि जैविक तंत्रविज्ञान खाते (डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्‍नॉलॉजी) यांच्या संयुक्त विद्यमाने ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली. या तत्त्वांनुसार ज्या अन्नपदार्थात मानवी शरीराला आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असे जीवित जंतू मिसळलेले आहेत, अशा खाद्यांना ’प्रोबायोटिक्‍स’ म्हटले जाते. हे जंतू एक किंवा अनेक असू शकतात, पण त्यांची त्या खाद्यपेयातील प्रमाण ठराविक आणि त्यांची उपयुक्तता सप्रमाण सिद्ध व्हायला लागते. 

दही आणि प्रोबायोटिक्‍स
उकळून गार केलेल्या दुधात चमचाभर दही विरजण म्हणून टाकले, की ते आंबून काही तासांनी त्याचे दही बनते. या दह्यात लॅक्‍टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्‍टोबॅसिलस लॅक्‍टिक, लॅक्‍टोबॅसिलस बल्गारीकस अशाप्रकारचे उपकारक जंतू असतात. मात्र या जंतूंची संख्या प्रत्येक घरातल्या दह्यात कमी-अधिक असू शकते. त्यांच्या एकूण संख्येवर प्रोबायोटिक्‍सचे आरोग्यवर्धक फायदे अवलंबून असतात. जर या जंतूंची संख्या वैद्यकशास्त्राच्या प्रमाणापेक्षा जास्त नसेल, तर जठर, लहान आतडे आणि पोटातील इतर इंद्रियांपासून निर्माण होणाऱ्या पाचकरसात ते नष्ट होतात. साहजिकच असे दही खाल्ल्यावर आरोग्याला अपेक्षित असलेले ते फायदे मिळू शकत नाहीत. यामुळे घरगुती दह्याला प्रमाणित प्रोबायोटिक्‍सचा दर्जा वैद्यकशास्त्रानुसार दिला जात नाही. बाजारात प्रोबायोटिकचे लेबल लावलेल्या दह्यात आणि इतर आंबवलेल्या पेयांत अन्न आणि औषध प्रशासनाने प्रमाणित केलेल्या संख्येपेक्षा जास्त उपकारक जंतू असतात. त्यांचा आरोग्याला अधिक लाभ होतो. 

आवश्‍यक डोस 
प्रोबायोटिक्‍समधील जंतूंची संख्या साधारणतः एका डोसमध्ये १ ते १० अब्ज जीवित जंतू इतकी असेल तरच ते आरोग्यदृष्ट्या उपयुक्त ठरतात. मात्र बायफिडोबॅक्‍टेरियम सारख्या जंतूंचे प्रमाण एका डोसमध्ये १००  दशलक्ष एवढेच असले, तरी त्याचा पोटाच्या काही आजारात उत्तम उपयोग होतो. पण व्हीएसएल#३ या नावाने मिळणाऱ्या औषधात प्रोबायोटिक्‍सचे प्रमाण३५०  ते ४०० अब्ज इतके जास्त असेल, तरच ते प्रभावी ठरू शकते. प्रत्येक प्रकारच्या जंतूंची संख्या किती असावी हे वैद्यकशास्त्राने संशोधनपूर्वक प्रमाणित केले आहे. तेवढे प्रमाण असल्यासच ते प्रोबायोटिक उपयुक्त आणि शास्त्रीय मानले जाते. प्रोबायोटिक जंतूंचे असंख्य प्रकार आहेत. मात्र त्यातल्या नक्की कुठल्या प्रकाराचा शरीराला कोणत्या आजारासाठी  नक्की उपयोग होतो, याबद्दल अजूनही खूप संदिग्धता आहे. त्यामुळे प्रमाणित प्रोबायोटिक औषधांमध्ये विविध प्रकारच्या जंतूंचे एकत्र मिश्रण वापरले जाते. या साऱ्यांचा मिळून शरीराला फायदाच होतो, असे शास्त्रीय निरीक्षण आहे. 

काय पाहावे 

  • औषधे म्हणून प्रोबायोटिक्‍स घेताना डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. मात्र अन्नपदार्थांवर जर ’प्रोबायोटिक्‍स’चे वेष्टण असेल, तर त्यात खालील गोष्टी नक्की पाहून खात्री करावी- 
  • कोणते प्रोबायोटिक जंतू आहेत? त्यांची प्रजाती, उपप्रजाती कुठली आहे? 
  • त्या पदार्थात हे जंतू किती प्रमाणात आहेत? आणि त्याची मुदत संपताना ते आतड्यामध्ये किती प्रमाणात उपलब्ध असतात.
  • या प्रोबायोटिक्‍समुळे होणारे आरोग्यविषयक लाभ कोणते आहेत. त्याचे काही पुरावे किंवा तत्सम माहिती दिली आहे का?
  • या पदार्थाची अंतिम मुदत - (एक्‍सपायरी) केंव्हा आहे?
  • या पदार्थाचा अपेक्षित लाभ होण्यासाठी ते किती प्रमाणात, किती वेळा आणि किती दिवस घेतले पाहिजे. 

प्रीबायोटिक्‍स 
प्रोबायोटिक्‍स प्रमाणेच आधुनिक आहारशास्त्रज्ञांनी ’प्रीबायोटिक्‍स’ नावाची संज्ञा वापरत आणली आहे. प्रोबायोटिक्‍स हे शरीरातील उपकारक जंतू असतात, जे बाह्य पदार्थातून आणि औषधातूनसुद्धा वापरले जातात. मात्र प्रीबायोटिक्‍स म्हणजे मानवी शरीर पचवू न शकणारी कार्बोहायड्रेट्‌स असतात. त्यात मुख्यत्वे चोथायुक्त म्हणजेच फायबरयुक्त पदार्थ येतात. प्रीबायोटिक्‍समुळे प्रोबायोटिक जंतूंची चांगली जोपासना होते. नैसर्गिकरीत्या मिळणाऱ्या प्रीबायोटिक्‍समुळे शेंगा, द्विदल धान्ये, वाटाणा,केळी, पालेभाज्या, शतावरी, कांदा, लसूण हे पदार्थ येतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि अन्य आजारांचा मुकाबला करण्यास या प्रीबायोटिक्‍सचा चांगला उपयोग होतो.

सिनबायोटिक 
ज्या पदार्थात प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक एकत्रित असतात आणि ते सहयोगाने कार्य करतात, अशा पदार्थांना सिनबायोटिक म्हटले जाते. बहुधा यात बिफिडोबॅक्‍टेरिया आणि ओलिगोफ्रक्‍टोज एकत्रित असतात.

प्रोबायोटिक्‍स, प्रीबायोटिक्‍स आणि सिनबायोटिक्‍स हे मुख्यत्वे आहार विशेष आहेत, आजारांवरील उपचारपद्धती निश्‍चितच नाहीत. भावी काळात कदाचित प्रोबायोटिक्‍सवर पूर्णपणे आधारलेली औषधे येतीलही, पण आज तरी ही औषधे आरोग्याची सहचरी आहेत. पण आजमितीला यांचा वापर रोगप्रतिबंधासाठी करणे जास्त उपयुक्त ठरते. काही महत्त्वाच्या आजारात जरी यांचा उपयोग मुख्य औषधप्रणाली म्हणून केला जात असला, तरी बहुसंख्य आजारात ही मुख्य औषधांसोबत द्यावयाची ’सपोर्ट थेरपी’ आहे. बाजारात मिळणारी प्रोबायोटिक पेये, पावडर्स, दूध यांचा वापर मर्यादित स्वरुपात करायला हरकत नाही, पण जाहिरातींवर भाळून मुख्य आहाराला पर्याय म्हणून हे पदार्थ घेणे आरोग्याला नक्कीच हितकारक नाही.

संबंधित बातम्या