फळांचे आरोग्यदायी रस

डॉ. अविनाश भोंडवे
गुरुवार, 5 जुलै 2018

आरोग्याचा मूलमंत्र
 

कांदा मुळा भाजी, 
अवघी विठाबाई माझी I
    लसूण मिरची कोथिंबीरी  
    अवघा झाला माझा हरी II

संत सावता माळी त्यांच्या मळ्यातल्या भाज्यांमध्ये पांडुरंगाला पाहत असत; पण एका दृष्टीने पाहिले तर खरोखरीच भाज्यांमध्ये तसेच फळांमध्ये निरामय आरोग्याचा विठ्ठल-हरी विसावत असतो. दवाखान्यात येणाऱ्या आजारी मुलांची आणि तरुणांची माहिती घेताना नेहमी लक्षात येते, की त्यांच्या आहारात भाज्या आणि फळांची कमतरता असते. जे भरपूर पालेभाज्या आणि मुबलक फळे खातात त्यांचे आरोग्य आणि प्रतिकारशक्ती नेहमीच उत्तम राहते. या दोन्ही गोष्टींमुळे अन्न रुचकर तर बनतेच पण त्यात दडलेल्या नैसर्गिक खनिजे आणि जीवनसत्त्वांचा खजिन्यामुळे आपल्या शरीराला अनेक पोषक गोष्टी मिळतात.

भाज्या नि फळांतून मिळणारे अन्नघटक - 
जीवनसत्त्वे - अ, ब, क जीवनसत्त्वे, फोलिक ॲसिड मोठ्या प्रमाणात मिळतात.
 अ जीवनसत्त्व - गाजरे, आंबा, लाल भोपळा, चुका अशांमध्ये असते. त्यामुळे डोळे आणि दृष्टी उत्तम राहते.

भाज्याफळांमधून ’ब’ गटाची अनेक जीवनसत्त्वं आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात महत्त्वाचे घटकही मिळत असतात. उदा. ’बी’ मुळे यकृताकरवी तयार होणाऱ्या कोलेस्टेरॉलमध्ये घट होते. विशेषत: आनुवंशिकतेतच ज्यांची कोलेस्टेरॉलची पातळी जास्त असते अशांमध्ये बी१ , बी२, बी६, कोलिन, इनॉसिटॉल, फोलिक ॲसिड हे ब गटाचे घटकही कोलेस्टेरॉल नियंत्रणात मदत करतात.
फळांमधून मिळणारा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे जीवनसत्त्व क. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचं रूपांतर यकृताद्वारे बाईल ॲसिड्‌समध्ये होण्याची प्रक्रिया वेगानं होऊन रक्तातली कोलेस्टेरॉलची पातळी सुनियंत्रित राहाते. तसेच लोह शोषणाचे प्रमाण वाढते. ही प्रक्रिया क जीवनसत्वामुळे संथ गतीनं होऊनही रक्तातलं कोलेस्टेरॉल कमी होतं. क जीवनसत्त्वाच्या प्रभावी अँटिऑक्‍सिडंट गुणधर्मामुळे कोलेस्टेरॉलचे थर जमायला प्रतिबंध होतो. मानसिक ताणातणाव हे रक्तातलं कोलेस्टेरॉल वाढण्याचं एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. क हे ताणनिवारक जीवनसत्त्व असल्यामुळे ही वाढ रोखायला मदत होते. आजच्या वाढत्या ताणतणावाच्या काळात हे खूप महत्त्वाचं. 

 जीवनसत्त्व ’के’-  जखमांमधून रक्त वाहणं थांबत नाही अशा वेळी रक्ततपासणी केल्यावर ’के’ जीवनसत्त्वांची कमतरता आढळून येते.’के’ जीवनसत्त्व सर्वप्रकारच्या पालेभाज्या, बटाटा, गाजर, आळंबी, कोबी, टोमॅटो, मटार यांसारख्या फळभाज्या, फुलभाज्या, शेंगभाज्या, सफरचंद, संत्री, स्ट्रॉबेरी अशी फळे यामध्ये असते.

 तंतुमय पदार्थ (फायबर्स) भरपूर प्रमाणात शरीरात जातात. पदार्थांमध्ये पचन न होणाऱ्या या कार्बोहायड्रेड्‌सला फायबर असे म्हटले जाते. कॉम्प्लेक्‍स फायबरचे एंजाइम्सद्वारे पचन होत नाही आणि मलपृष्ठाद्वारे बाहेर पडतात. त्यांच्यात सारक गुणधर्म असल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ राहते. कॉम्प्लेक्‍स फायबर मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा, रक्तदाब आणि कर्करोगासारख्या आजाराला कमी करण्यास मदत करतो. परंतु यासाठी फळे नैसर्गिक स्वरूपात चावून खाल्ली पाहिजेत, फळांचे रस घेऊन हा फायदा मुळीच होत नाही.

 कोलेस्टेरॉल नियंत्रणात तसेच हृदयविकाराच्या प्रतिबंधात आणि उपचारात अत्यंत महत्त्वाचे अन्नपदार्थ म्हणजे भाज्या आणि फळं असतात. भाज्या-फळांत चोथा भरपूर असतो. 

 चोथायुक्त आहार हा शरीरात अजिबात शोषला जात नसल्याने, पोटभर खाऊनसुद्धा वजन आटोक्‍यात राहायला मदत होते. वजन आवश्‍यकतेपेक्षा जास्त असेल तर रक्तातलं कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसेराइडस वाढत राहतात. चोथ्यामुळे ते कमी होते. 

चोथ्यामुळे बाईल ॲसिड्‌सचे रूपांतर परत कोलेस्टेरॉलमध्ये होण्याची प्रक्रिया मंदावल्यामुळे रक्तातले कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहाते. आनुवंशिकतेनेच रक्तातले कोलेस्टेरॉल खूप जास्त असणाऱ्यांना चोथ्याचा विशेष उपयोग आढळून आला आहे. 

 पेक्‍टिन - पेरू, सीताफळ, सफरचंद, केळं यामधील पेक्‍टिनच्या स्वरूपातील विद्राव्य चोथ्याचा फायदा हृदयविकाराच्या प्रतिबंधात आणि उपचारात मोठा होतो. शेंगवर्गाच्या भाज्यांमधील चोथा विशेष परिणामकारक असतो.

 लोह, कॅल्शिअम अशा खनिज तत्त्वांचा लाभ होतो. लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते, ॲनिमिया होत नाही. शरीर सुदृढ होते.

कॅल्शियममुळे हाडे बळकट होण्यास आणि त्यांची झीज भरून येण्यास मदत होते.

 हिरव्या पालेभाज्यांमुळे रक्ताला लोहाचा पुरवठा होत असतो. या पाले-भाज्यांच्या हिरव्या रंगामुळे त्यात भरपूर लोह सामावलेले असते. मेथीच्या हिरव्या पाल्यामध्ये कॅल्शिअम विपुल प्रमाणात असते. त्यांच्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर असतेच पण सोडिअम आणि फॅट्‌स कमी असतात. त्यामुळे या हिरव्या पालेभाज्या हृदयविकाराला प्रतिबंध करत असतात. 

 स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी, सफरचंद, द्राक्ष, कांदा या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये त्यांच्या विशिष्ट रंगांमुळे अशी द्रव्ये असतात, की त्यामुळे माणसाचा वृद्धत्वाकडे होणारा प्रवास थोडा कमी होतो आणि वार्धक्‍याची लक्षणे दिसण्याची प्रक्रिया मंदावते. 

 टॅनिन हे बहुतेक हिरव्या भाज्या, मसाले आणि बाजरीत सापडते. टॅनिनचा संयोग लोहाशी झाल्यामुळे लोहाचे शरीरात पचन होत नाही. वरील खाद्यपदार्थांबरोबर लिंबू, चिंच किंवा दह्याचा उपयोग केल्यास टॅनिनचे प्रमाण कमी होते. याच कारणामुळे आहारात पालक, मेथी व अन्य हिरव्या भाज्यांचा उपयोग अधिक प्रमाणात केल्यामुळे शरीराला लोह मिळू शकत नाही. परंतु, हिरव्या भाज्यांबरोबर कोणताही आंबट खाद्यपदार्थ जसे टोमॅटो, लिंबूसेवन केल्यास शरीरात सहजपणे लोह शोषले जाते. आणि रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढते.

वांग्यामुळे आहारातले जास्तीचे कोलेस्टेरॉल शरीराबाहेर टाकले जायला मदत होते, तर कांद्यामुळे एच.डी.एल. परिणामकारकरीत्या वाढते. विशेषत: चमचमीत जेवणासोबत भरपूर कांदा खाणे फायद्याचे ठरते. 

फळांचे रस
   ताज्या फळांचे किंवा भाज्यांचे रस प्यावयास दिल्याने त्यांच्यामधील पोषक द्रव्ये शरीरामध्ये इतर अन्नाच्या मानाने लवकर शोषली जातात. फळांचे किंवा भाज्यांचे रस काढल्याने त्यामधील पचण्यास अवघड असलेले फायबर काढून टाकले जाते. त्यामुळे रस लवकर पचतो. अशक्तपणा आल्यास किंवा आजारी व्यक्तीस भाज्या किंवा फळे खावयास देण्यापेक्षा त्यांचे ताजे तयार केलेले रस प्यावयास द्यावेत. मात्र प्रक्रियाकृत डबाबंद रस (प्रोसेस्ड ज्यूस) शक्‍यतो पिऊ नयेत.
आवळा हे फळ अत्यंत गुणकारी असून त्रिफळांमधील एक महत्त्वाचा घटक आहे. आवळ्याच्या सेवनाने आम्लपित्त, मधुमेह, त्वचाविकार, नेत्रविकार अशा बऱ्याच व्याधीत उपयोग होतो. त्याशिवाय आवळा हे एक उत्तम रसायनदेखील आहे. अशा आवळ्याचा उपयोग नियमित व योग्य मात्रेत करायचा झाल्यास त्याचा रसाच्या माध्यमातून होऊ शकतो. नुसता आवळा नियमित खाणे व योग्य मात्रेत खाणे बऱ्याच वेळा शक्‍य होत नाही. त्याचा रस, साधारण ५० ते ६० मिली, आपणास बऱ्याच विकारांमध्ये लाभदायक ठरतो. ५० ते ६० मिली रस मिळण्याइतके आवळे खाणे शक्‍य नसल्याने त्याचा रस काढून घेणे सोपे जाते. मात्र आवळ्यासारखे इतर फळांचे नाही. इतर फळे आपण नैसर्गिक स्वरूपात खाणेच जास्त योग्य ठरते. फळांचे रस करताना त्यात होणारे जैवरासायनिक बदल शरीरास अपायकारक ठरू शकतात. 

फळांच्या रसाचे फॅड
 काही निसर्गोपचार तज्ज्ञ, गुरू, बाबा रक्तातील साखर कमी करण्यासाठी दुधी भोपळा, भोपळा, काकडी, कलिंगड, टरबूज, कारले, जांभळे यांचा रस घ्यायला सांगतात. यामध्ये दुधी भोपळ्याचा रस पिण्याची शिफारस अनेक निसर्गोपचार तज्ज्ञ करतात. त्यांचा सल्ला शिरोधार्य मानून कित्येक लोक घरीच रस तयार करतात, तर काही वेळेस तो सार्वजनिक बागांच्या बाहेर पहाटे फिरून आलेल्या लोकांना सर्रास विकला जातो. दुधी भोपळा, भोपळा, काकडी, कलिंगड, टरबूज यामध्ये ’टेट्रासायक्‍लिक ट्रिटरपिनॉईड क्‍युकरबिटॅसिन’ नावाचे रासायनिक मूलद्रव्य असते. त्यामुळे हे सारे पदार्थ काहीसे तुरट, कडवट लागतात. या रासायनिक मूलद्रव्यांचे विषात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे घसा, अन्ननलिका, जठर यांच्या आतील नाजूक आवरणामध्ये मोठ्या प्रमाणात इजा होऊन रक्तस्त्राव होऊ शकतो, आणि माणसे मृत्युमुखी पडू शकतात. विशेषत: या पदार्थांचा रस मोठ्या प्रमाणावर प्यायल्यास हा धोका अधिक असतो.

फ्रुट ज्युसेस का टाळावेत?
 सुपर मार्केटमध्ये अगदी १०० टक्के ’फ्रेश फ्रुटज्यूस’ लिहिले असेल तरी ते ताजे नसतात. एकदा कापल्यावर फळ काळे पडते. फळांचे रस ताजे ठेवण्यासाठी त्यात भरपूर प्रमाणात साखर आणि कृत्रिम रसायनांचा तसेच कृत्रिम फ्लेवर्सचा वापर केलेला असतो. या प्रक्रियेत फळांची मूळ चव नष्ट होते. 
 काही कमी दर्जाचे डबाबंद रस तर निव्वळ साखर, पाणी, फ्लेवर्स यांचे मिश्रण असतात.
 जेव्हा तुम्ही तयार ज्यूस घेता तेव्हा त्यातला वगळला जाणारा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे फायबर  किंवा तंतूमय पदार्थ. बहुतेक वेळेस रसातील चोथा गाळून त्यात भरपूर साखर घालून तो प्यायला जातो. आरोग्याच्या दृष्टीने हे अपायकारक असते.
 एक ग्लास फळांचा रस बनविण्यासाठी एकापेक्षा जास्त फळे वापरली जातात. त्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज जातात.
 ज्यूस घेतल्यानंतर पोट भरल्याची जाणीव ही जास्त वेळ टिकत नाही. त्यामुळे लगेच थोड्यावेळाने भूक लागते व कॅलरीज इंटेक वाढतो.
 एक ग्लास फळाचा रस प्यायल्यावर फळातली फ्रुक्‍टोज आणि त्यात घातलेल्या साखरेतील ग्लुकोज मोठ्या प्रमाणात रक्तात शोषली जाऊन ती यकृताकडे पाठवली जाते. जेव्हा यकृताकडे क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात साखर जाते तेव्हा त्याचे रूपांतर चरबीमध्ये होते.
 फळांचे रस घेतल्यामुळे पोटाभोवती अतिरिक्त चरबी वाढणे, ट्रायग्लिसराईड, कोलेस्टेरॉल वाढणे, वजन वाढणे, इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होणे अशा चयापचयाशी संबंधित व्याधी होऊ शकतात.
 लहान मुलांमधील स्थूलता हा आजचा गंभीर चिंतेचा विषय आहे. फळांचे ज्यूस व अतिरिक्त साखर मिश्रित पेयांच्या रोजच्या सेवनाने या स्थूलतेत जवळपास ६० टक्‍क्‍यांनी भर पडते.
 पूर्णपणे निरोगी व्यक्तींसाठी फळांचा रस अधूनमधून घेणे तितकेसे अपायकारक नसले, तरी लठ्ठ, मधुमेही, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी ते टाळणे आवश्‍यक असते.
 जेवणाच्या आधी तासभर किंवा नंतर तसेच जेवणासोबत फळे किंवा ज्यूस घेऊ नये.
 फळांचे किंवा वनस्पतींचे रस घेताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.

  • रस ताज्या फळांचेच करावेत.
  • फळांचे रस सेवन करताना त्यात साखरेचा वापर टाळावा.
  • फळांचे रस तयार केल्यावर त्यांचे सेवन लगेच करावे, म्हणजे ते ताजेच घ्यावे.
  • फळांच्या रसात दुधाचा वापर टाळावा.
  • आपणास भूक लागली असेल तरच ते सेवन करावे आणि योग्य प्रमाणात घ्यावे.
  • बैठी जीवनशैली असणारी व्यक्ती, मधुमेही व्यक्ती, स्थूल व्यक्ती यांनी सातत्याने फळांचे रस घेणे टाळावे.
  • डबाबंद फळांचे रस टाळावे.
  • औषधी वनस्पतींचे रस विनाकारण घेऊ नयेत.
  • दुधीभोपळा, टरबूज, कडुनिंब, शतावरी, जांभूळ, कारले, गव्हाचे तृण यांसारख्या वनस्पतींचे रस वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नयेत.

संबंधित बातम्या