मरावे परी देहरूपी उरावे

डॉ. अविनाश भोंडवे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

आरोग्याचा मूलमंत्र
 

‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे‘ असा उपदेश संत-महात्म्यांनी केला आहे; पण आधुनिक वैद्यकशास्त्राने केलेल्या देदीप्यमान प्रगतीमुळे, एका व्यक्तीच्या अंगप्रत्यंगाचा वापर त्याच्या मृत्यूनंतरही ’अवयव प्रत्यारोपण’ शस्त्रक्रियेद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात करणे शक्‍य झाले आहे. या आधुनिक शास्त्रीय उपलब्धीमुळे ’मरावे परी देहरूपे उरावे’  असा एक माणुसकीचा मार्ग साकार झाला आहे. अंगदान किंवा अवयवदानाद्वारे मृतावस्थेपर्यंत पोचलेल्या व्यक्तीचे अवयव दुसऱ्याला दिले जाऊन दुसऱ्या मरणासन्न व्यक्तीचा पुनर्जन्म साधला जातो.

अवयवदान
मृत्यूनंतर आपले वेगवेगळे अवयव इतर गरजू रुग्णांकरिता वापरण्याची इच्छा दर्शवणे, म्हणजे अवयवदान. हे मुख्यत्वे तीन प्रकारे केले जाते. 
१) मृत्युपश्‍चात अवयवदान ः  कुठल्याही कारणाने किंवा आजाराने एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर त्या व्यक्तीचे नेत्रदान, त्वचादान, हृदयातील झडपा, हाडे दान करता येतात. फक्त मृत व्यक्ती एच.आय.व्ही., काही प्रकारचे कर्करोग किंवा हिपॅटायटिस-बी अगर हिपॅटायटिस-सी सारख्या अतिसंसर्गजन्य आजाराने पीडित नसावी. 
२) ब्रेन डेथ ः एखादी व्यक्ती रस्त्यावर होणाऱ्या अपघातामुळे, किंवा अन्य अपघातामुळे मेंदूला इजा होऊन इस्पितळात दाखल झालेली असते. अतिशय गंभीर अवस्थेतील हा रुग्ण रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल झालेला असतो. डॉक्‍टरांच्या तपासणीत लक्षात येते, की या रुग्णाचा मेंदू पूर्ण निकामी झाला आहे. त्याला ’व्हेंटिलेटर’सारख्या कृत्रिम यंत्रणेच्या मदतीशिवाय श्वास घेता येत नाही. पण त्याचे हृदय, मूत्रपिंडे, यकृत, फुफ्फुसे असे इतर अवयव व्यवस्थित अवस्थेत असून रक्ताभिसरणही यथोचित चालले आहे. अशा अवस्थेला ’ब्रेन डेथ’ म्हणतात. अपघाताप्रमाणे काही विशिष्ट आजारांमध्येही असा मेंदू निकामी पण इतर अवयव  व्यवस्थित अशी अवस्था आढळते. अशा रुग्णांमध्येदेखील त्यांचा मेंदू मृत असल्याने ’ब्रेन डेथ’चे निदान केले जाते. याचवेळी हृदय, मूत्रपिंडे, यकृत, आतडी, फुफ्फुसे, स्वादुपिंड अशा महत्त्वाच्या अवयवांचे आजार कमालीचे बळावल्याने ही इंद्रिये निकामी झालेले लाखो रुग्ण  मरणासन्न अवस्थेत असतात. मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचे हेच महत्त्वाचे अवयव त्या दुसऱ्या गंभीर रुग्णाला देऊन त्याचे प्राण वाचवले जाऊ शकतात.
३) जिवंतपणी अवयवदान ः  दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपण करण्याजोगे निरोगी अवयव आणि उती यांचे दान दाता जिवंत असतानाही करणं शक्‍य असते. यकृताचा काही भाग किंवा एक मूत्रपिंड यांचे दान जिवंतपणीही करता येते. मात्र यासाठी अवयवदान करणाऱ्याचे रुग्णाशी जवळचे नाते असावे लागते. कोणत्याही निरोगी व्यक्तीला जिवंतपणी त्याचे आई-वडील, भाऊ-बहीण, मुलगा-मुलगी, पती/पत्नी, आजी-आजोबा, नातवंडे यांनाच आपले मूत्रपिंड किंवा इतर अवयव देता येतात.
दाता-प्राप्तकर्ता : ज्या रुग्णाचे अवयव दुसऱ्यांना दिले जातात, त्याला ’दाता’ किंवा डोनर म्हणतात. तर हे अवयव ज्या रुग्णासाठी वापरले जातात त्याला ’प्राप्तकर्ता’ किंवा रेसिपियंट म्हणतात.  

अवयवदानाची गरज
भारतात दरवर्षी पाच लाख रुग्ण अवयव न मिळाल्याने मृत्युमुखी पडतात. 

 • पंच्याऐंशी हजार लोक यकृताच्या आजाराने मरण पावतात, पण यकृताचे प्रत्यारोपण फक्त ३ टक्के (अडीच हजार) रुग्णात होते. 
 • दरवर्षी दोन लक्ष मूत्रपिंडाच्या रुग्णांना मूत्रपिंडदानाची गरज असते, पण त्यातील फक्त ४ टक्के रुग्णांनाच (आठ हजार) ती मिळतात. 
 • दरवर्षी पन्नास हजार रुग्ण हृदय निकामी होऊन मरण पावतात, पण गेल्या पंचवीस वर्षात एकूण फक्त ३५० हृदयरोपण शस्त्रक्रिया झाल्या.  
 • आज दहा लाख अंध रुग्ण नेत्रदानाच्या प्रतीक्षेत आहेत. 
 • सव्वा अब्ज लोकसंख्या असलेल्या या देशात, आज वर्षाकाठी फक्त जास्तीत जास्त एक हजार मृतांचे अवयवदान होते. यातही बहुसंख्येने असलेले नेत्रदाते वगळता इतर बाबतीत ही संख्या अगदीच तोकडी आहे.

अवयदानात भारतीयांच्या अनास्थेची कारणे
     व्यक्ती मयत झाल्यानंतर, त्याचे शोकाकूल नातेवाईक अवयवदानाचे महत्त्व समजून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात. त्यामुळे त्यावेळच्या अवयवदानाच्या सूचनांना ते विरोध करतात. मनुष्य मृत झाल्यानंतर त्याचे अवयव काढणे म्हणजे त्यांच्या शरीराची विटंबना करणे असा बहुसंख्य लोकांचा समज असतो. 
     मृत व्यक्तीच्या अवयवदानाबद्दल आपल्या देशातील १९९४चा कायदा कडक आहे. त्यात २०१४ मध्ये काही बदल करून तो थोडा शिथिल करण्यात आला. 
     अवैध अवयवदान आणि ’मूत्रपिंड तस्करी’च्या अनेक घटना घडल्यामुळे नागरिकांच्या मनात अवयवदानाबद्दल अनेक गैरसमज प्रचलित आहेत.
     अवयवदानाबद्दल जनजागृतीच्या मोहिमा आजवर मोठ्या प्रमाणावर हाती घेतल्या गेलेल्या नाहीत.
     अवयवदाते आणि लाभार्थी यांची एक देशव्यापी सूची असते. त्यातील नावांची संख्या अद्ययावत व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात कार्य घडून आले पाहिजे.  

’ब्रेनडेथ’ व्यक्तीचे अवयवदान
ब्रेन डेथचे निदान फक्त इस्पितळातील आयसीयुमध्येच करता येते. प्रत्यारोपणाशी संबंधित नसलेल्या चार डॉक्‍टर्सच्या पथकाने हे निदान करायचे असते. ब्रेनडेथ झाली आहे, असे निदान करण्यासाठी या पथकाने सहा तासांच्या आत ठराविक तपासण्या दोन वेळा करायच्या असतात. हे निदान झाल्यावर रुग्णाच्या नातेवाइकांना ते त्वरित कळवायचे असते.  त्यानंतर यासाठी असलेल्या एका विशिष्ट फॉर्मवर विहित नमुन्याप्रमाणे रुग्णाच्या नातेवाइकांची संमती घ्यायची असते. नातेवाइकांची अशी लेखी परवानगी मिळाल्यावर रुग्णाची स्थिती व्हेंटिलेटर, सलाईन, औषधे यांच्याद्वारे स्थिर ठेवायची असते. याकाळात रुग्णाच्या अत्यावश्‍यक असलेल्या असंख्य रक्त तपासण्या करत राहाव्या लागतात. यानंतर रुग्णाचे कोणते अवयव शाबूत आहेत त्याप्रमाणे प्रत्यारोपणाबाबत असलेल्या शासकीय समितीला कळवले जाते. नंतर-

 • ऑपरेशन थियेटरमध्ये रुग्णाला आणून त्याचे अवयव मान्यताप्राप्त शल्यतज्ज्ञांकडून शरीराबाहेर काढले जातात.
 • विशिष्ट रासायनिक पदार्थांमध्ये हे अवयव ठेवून ते त्वरित आवश्‍यक त्या गावी, आणि त्या इस्पितळात पाठवले जातात.
 • अवयव पाठवताना उशीर होऊ नये म्हणून सर्व रहदारी थांबवून ते विमानतळावर पोचवले जातात. तिथे जय्यत तयारी असलेल्या विमानातून आवश्‍यक त्या गावी पाठवले जातात. याला ’ग्रीन कॉरिडॉर’ असे म्हणतात.
 • त्या गावी, त्या इस्पितळात ज्या प्राप्तकर्त्याला हे अवयव द्यायचे असतात, त्याच्या शस्त्रक्रियेची तयारी करून ठेवलेली असते. 
 • दात्याकडून अवयव आले, की क्षणाचाही विलंब न करता त्या रुग्णावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून ते अवयव बसविले जातात.
 • त्याचा व्हेंटिलेटर आणि इतर जीवसहाय्यक औषधे बंद करून त्याला मृत म्हणून घोषित केले जाते. आणि अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात दात्याचा देह दिला जातो. 
 • कायद्यानुसार दाता आणि प्राप्तकर्ता यांची माहिती एकमेकांना दिली जात नाही.
 • या साऱ्या प्रक्रियेसाठी दात्याला कोणताही खर्च करावा लागत नाही. संपूर्ण खर्चाची जबाबदारी फक्त प्राप्तकर्त्यावर असते.  

अवयवदानाबाबत काम करणाऱ्या संस्था
झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर, मुंबई अवयवदानाच्याबाबतीत अवयवदाता आणि अवयवांचा  लाभार्थी यांचा समन्वय करणारी, विभागीय अवयवदान समन्वय केंद्र, ही महाराष्ट्र सरकारच्या २००१ मधील एका कायद्यायोगे बनलेली पंजीकृत संस्था आहे. या संस्थेमार्फत ज्यांना अवयवदानाची आवश्‍यकता आहे अशा रुग्णांची पूर्ण खातरजमा करून एक यादी बनवली जाते. तसेच ज्यांचे नातेवाईक आपल्या ब्रेनडेथ झालेल्या मृत व्यक्तीचे अवयवदान करू इच्छितात, अशा वेगवेगळ्या इस्पितळातील मृतांची  यादीदेखील त्या इस्पितळाच्या सहकार्याने तयार ठेवते. जेंव्हा आवश्‍यक असेल त्यावेळेस त्या अवयवरोपणाची शस्त्रक्रिया, या समितीच्या देखरेखीखाली मान्यताप्राप्त इस्पितळामध्ये कायदेशीरपणे केली जाते. जेंव्हा एखादी जिवंत व्यक्ती आपले मूत्रपिंड अगर एखादा अवयव रुग्णाला देऊ इच्छिते, तेव्हा त्याबाबतसुद्धा पूर्ण शहानिशा करून ती शस्त्रक्रिया करण्यासाठी ही समिती पुढाकार घेते. या संस्थेचा पत्ता, एल.टी.एम्‌.जी.हॉस्पिटल, नवी कॉलेज बिल्डिंग, पहिला मजला, मेडिकल स्टोअर शेजारी, सायन पश्‍चिम, मुंबई असा आहे. आणि वेबसाइट www.ztccmumbai.org अशी आहे.  याचप्रमाणे मोहन फौंडेशन, चेन्नई; शतायू फौंडेशन अहमदाबाद आणि बडोदा या संस्थादेखील अवयवदानाबाबत सामाजिक प्रबोधन, ते करणाऱ्या व्यक्तींची नोंदणी अशा गोष्टी करतात. 

कसे कराल अवयवदान  
नेत्रदान ः आपल्याला मृत्यूपश्‍चात जर नेत्रदान करायचे असेल तर मान्यताप्राप्त नेत्रपेढीमध्ये आपण विहित नमुन्यात अर्ज भरावा. डोळे तसेच इतर अवयवदानाकरिता वर दिलेल्या संस्थांशी संपर्क साधून, त्यांचा  विनाशुल्क अर्ज भरून तुम्ही स्वतःच्या नावाची नोंदणी करावी. या संस्था एक डोनर कार्ड देतात. ते जपून ठेवून, आपल्या वारसांना त्याची कल्पना देऊन आपली अंतिम इच्छा म्हणून त्या गोष्टीला मान देण्याची सूचना करून ठेवावी. 
देहदान ः सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील शरीरशास्त्र (ॲनॅटॉमी) विभागाच्या प्रमुखांकडे देहदानाची नोंदणी करावी लागते.
अवयवदानाची नोंदणी ः  १८ वर्षावरील कोणताही भारतीय नागरिक अवयवदान करू शकतो. अवयवदानासाठी भारत सरकारच्या www.notto.gov.in या वेबसाइटवर जाऊन अवयवदानाची प्रतिज्ञापूर्वक नोंदणी करता येते. इतर काही संस्थांच्या वेबसाइटवर उदा. donatelifeindia.org, www.organindia.com येथेसुद्धा अशी नोंदणी करता येते. रोटरी डिस्ट्रिक्‍ट  ३१३१ ने जाहीर केलेल्या www.giftlife.co.in या वेबसाईटवरदेखील ही नोंदणी सुलभरीत्या करता येईल. ही नोंदणी झाल्यावर एक डोनर कार्ड मिळते, ते भरून जपून ठेवावे लागते. आपल्या नातेवाइकांना त्याची पूर्वकल्पना देऊन ठेवावी. ही नोंदणी करताना सर्वच अवयव दान करता येतात, पण एखाद्याला फक्त १-२ अवयवांचे दान करायचे असेल, तर  तशीही सोय या नोंदणी नमुन्यात असते. मृत्युपश्‍चात फक्त त्याच अवयवांचा वापर केला जाईल. एखाद्याने असा डोनेशन फॉर्म भरला तरी तो नंतर नाकारण्याचा अधिकारही त्याला असतो. मृत्यूनंतर नातेवाइकांची तयारी नसल्यास अवयवदानाची शस्त्रक्रिया केली जात नाही.आपली प्रिय व्यक्ती जर अपघाताने किंवा इतर कुठल्याही कारणाने अकाली मृत्यू पावल्यास या संस्थांशी संपर्क साधल्यास, वेळ न दवडता कार्यवाही केली जाते आणि ते अवयव योग्य रीतीने शरीरापासून विलग करून सुरक्षितरीत्या जतन केले जातात. योग्य वेळेत ते अवयव गरजू व्यक्तींच्या प्रत्यारोपणासाठी वापरले जातात.  भारतातील नागरिकांचा अवयवदानाकडे पाहण्याचा रोख निश्‍चितच बदलत आहे, तो अजूनही आश्वासकरित्या बदलायला हवा.  पुणे आणि रायगड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या रोटरी डिस्ट्रिक्‍ट ३१३१ ने दि.९ ऑगस्ट रोजी १ लाख लोकांची नोंदणी त्या एकाच दिवशी करण्याचा महत्त्वाकांक्षी आणि स्तुत्य कार्यक्रम जाहीर केला आहे.

संबंधित बातम्या