वंध्यत्व-शाप आणि उ:शाप

डॉ. अविनाश भोंडवे
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

आरोग्याचा मूलमंत्र
 

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भौगोलिक बाबतीत ही गोष्ट प्रसिद्ध आहेच, पण वैद्यकीय आणि सामाजिक बाबतीतही हेच लक्षात येते आहे. एका बाजूला जगातील सर्वात जास्त कुपोषित बालके भारतात आहेत, तर दुसऱ्या बाजूला लहानांपासून थोरांमधील स्थूलत्वाचे प्रमाण वाढत चालले आहे. एका बाजूला लोकसंख्येची वाढ रोखण्यासाठी ‘एक या दोन बच्चे बस!’ अशा मोहिमा राबवाव्या लागत होत्या, पण आज मात्र वंध्यत्व म्हणजे मूल न होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू लागली आहे.

मूल होणे हा तसा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा आणि आनंदाचाही क्षण असतो, पण आजच्या गतिमान युगात अनेक वैद्यकीय सुविधा असूनही या आनंदाच्या क्षणावर नवीन-नवीन अडचणींचे सावट येत आहे. वंध्यत्वाचे रुग्ण समाजामध्ये अधिक संख्येने दिसत आहेत. सध्या फर्टिलिटीपेक्षा ‘इन्फर्टिलिटी’ हाच शब्द लोकांच्या नजरेत भरतो आहे, एवढे याचे प्रमाण खूपच वाढले आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार दोन वर्षांच्या नैसर्गिक संबंधांनंतरसुद्धा जर गर्भधारणा होत नसेल तर अशा जोडप्यांना  वंध्यत्व (इन्फर्टिलिटी) आहे, असे म्हणतात. गेल्या दोन दशकांमध्ये भारतातील वंध्यत्वाची टक्केवारी लक्षणीय वाढली आहे. आजकाल जोडप्याला लग्नानंतर दोन नव्हे, तर एक ते दीड वर्षानंतरच जर कोणतेही गर्भनिरोधक साधन न वापरता शरीरसंबंध होऊनदेखील गर्भधारणा होत नसेल, तर त्या जोडप्यास वंध्यत्व आहे असे मानले जाते. आजमितीला १० पैकी १ जोडप्याला गर्भधारणेत अडचणी येत आहेत. हे प्रमाण शहरात अधिक आहे. आजची प्रगत जीवनशैली मूल होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत काय अडचणी निर्माण करते आहे.

वंध्यत्व वाढीची कारणे
भारतात आज लग्न झालेल्या जोडप्यांमधील १० ते १५ टक्‍क्‍यांना वंध्यत्वाची समस्या भेडसावते आहे आणि यात दरवर्षी २० टक्‍क्‍यांची भर पडते आहे. २०१७ च्या आकडेवारीनुसार २२ लाख जोडपी आज वंध्यत्वासाठी उपचार घेत आहेत. काही वर्षांपूर्वी भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनलाही मागे टाकेल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण आज या वंध्यत्व समस्येमुळे आपण जर्मनी आणि जपान यासारख्या घटत्या लोकसंख्येच्या देशांच्या रांगेत उभे राहतोय, की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या आमूलाग्र बदलाची कारणे भारतातील बदललेल्या जीवनशैलीत आणि सामाजिक रुढीत सापडतात. 
    उशीरा लग्न : आज उच्चशिक्षण घेण्याच्या आणि करिअर सुस्थापित करण्याच्या भरात बऱ्याच तरुण मुले आणि मुली लग्न उशीरा करतायत. मागील पिढीत मुलींची लग्ने १८ ते २० वयात होत होती, आज ते २८ ते ३५ पर्यंत वर सरकले आहे. वय वर्षं ३५ नंतर स्त्रीबीजांची गुणवत्ता कमी होते आणि गर्भधारणेस अडचणी येतात. मुलांमध्येही हे वय पूर्वी २१ ते २७ होते ते आज ३० ते ३८ पर्यंत गेले आहे.
    लग्नानंतर मूल : आज ज्या जोडप्यांचे विवाह योग्य वयात होतात ते बहुधा अपत्यप्राप्तीचा निर्णय काही वर्षे पुढे ढकलतात. त्यामुळे मुलीचे वय अनेकदा ३० च्या पुढे गेल्यावर अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न केला जातो.
    ताण तणाव : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत व्यवसाय, धंदा, नोकरी यामध्ये एकमेकांना देण्याच्या वेळेबाबत खूप प्रश्न निर्माण होतात. जोडप्यांना निवांत वेळ काढणे कठीण होतं आहे. धावपळ, महत्त्वाकांक्षा आणि पैशांची गरज यामुळे मानसिक ताणतणाव निर्माण होत आहेत. याचा परिणाम स्त्रीपुरुषांच्या कामजीवनावर होत आहे. त्यामुळे वंध्यत्व वाढते आहे. 
    व्यसनाधीनता : ताणतणाव आणि पाश्‍चात्त्य जीवनाचे अनुकरण यामुळे पुरुषांच्या पाठोपाठ स्त्रियासुद्धा व्यसनाधीन होऊ लागल्यात. स्त्रियांमध्ये धूम्रपान आणि अतिमद्यसेवन यामुळे वंध्यत्व येते, अकाली प्रसूती आणि गर्भपात होण्याचे धोके वाढतात. तसेच गर्भाच्या नैसर्गिक वाढीवर विपरीत परिणाम होतो.
    स्थूलत्व : चौरस आहार घेण्याऐवजी जंकफूड, स्नॅक्‍स किंवा फास्ट फूड यांचे रोजच्या आहारातील प्रमाण खूप वाढले आहे. फास्टफूड तसेच इंस्टंट फूडमध्ये साखर, तेल आणि मिठाचे प्रमाण अधिक असते. त्यामध्ये आवश्‍यक जीवनसत्त्वाचा आणि प्रथिनांचा अभाव असतो. यामुळे अनेक गुंतागुंतीचे परिणाम शरीरावर होतात. 

वंध्यत्वाची वैद्यकीय कारणे
वंधत्वाची कारणे शोधताना भारतीय समाजात सर्वसाधारणपणे स्त्रियांना जबाबदार धरले जाते, पण अशा जोडप्यांपैकी ४० टक्के जोडप्यांत पुरुषाचीच जननक्षमता कमी असल्याचे आढळते. १० टक्के जोडप्यांत वंधत्वाचे प्रमुख कारण पुरुषास सापडते आणि सर्वसाधारणपणे 
१ टक्का पुरुष वंध्य असतात. काळजीपूर्वक वैद्यकीय तपासण्या केल्यास बहुतेकदा वंधत्वाचे कारण सापडू शकते; परंतु बहुतेक वेळा एका जोडप्यातील दोन्ही जोडीदारांत अनेक मोठी कारणे एकत्र आढळत असल्याने गुंतागुंत वाढते आणि कारणांचा शोध आणि उपचार करणे अवघड बनते.

पुरुषांमधील वंध्यत्व
पुरुषांमधील वंध्यत्वाच्या कारणात शारीरिक आणि इतर वैद्यकीय दोष आढळतात.
वीर्यदोष - गर्भधारणा होण्यासाठी पुरुषांच्या वीर्यात शुक्राणूंचे प्रमाण योग्य असावे लागते. शुक्राणूंची संख्या आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे असाव्या लागतात.
    एका वीर्यस्खलनामध्ये शुक्राणूंची संख्या  : ३.९ कोटी ते ९२ कोटी
    एका स्खलनाचे मोजमाप : १.५ ते ७.६ मिलिलिटर
    शुक्राणूंचे प्रमाण : १.५ ते ६.४ कोटी/ मिलिलिटर
    शुक्राणूंच्या हालचालीचे प्रमाण : एकुणात ४० ते ८१ टक्के
    सरकत्या शुक्राणूंचे प्रमाण : ३२ ते ३५ टक्के 
    योग्य आकारमानाचे शुक्राणू : ४ ते ४८ टक्के
    शुक्राणूंचे पुरेशा प्रमाणात निर्मिती न होणे, वीर्यात शुक्राणूंचा पूर्ण अभाव असणे, शुक्राणूंची हालचाल पुरेशी नसणे हे दोष प्रामुख्याने आढळतात. 
    यामध्ये जन्मजात दोष, वृषणामधील जनन ग्रंथींची वाढ न होणे, वृषणात शुक्राणू तयार न होणे, जन्मतः वृषणे वृषणकोषात न उतरणे, वृषणे अकार्यक्षम असणे अशी कारणे आढळतात. 
    गालगुंड तत्सम विषाणूजन्य आजारांमुळे, अपघात, शस्त्रक्रिया, क्ष-किरणांचा परिणाम,  वृषणाला किंवा त्याच्या रक्तपुरवठ्याला धक्का पोचणे, भट्टीजवळील काम, गरम पाण्याने वारंवार स्नान, घट्ट व कृत्रिम तंतूंची अंतर्वस्त्रे, यामुळेही वृषणावर परिणाम होतो आणि शुक्राणूचे उत्पादन घटते.  
    क्षय, वृषणाचे रोग; हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्रंथींचे आजार, सर्वसाधारण अनारोग्य, कुपोषण, बी१२ आणि फॉलिक ॲसिड या जीवनसत्त्वांची कमतरता, काही औषधे तसेच विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम यामुळे वृषणाचे कार्य मंदावते. रक्तदाब कमी करणारी, झोपेची, चिंता व ताण यांसारखे मानसिक बिघाड कमी करणारी औषधे. काही कीटकनाशके व रासायनिक विषारी पदार्थ यांच्या प्रदीर्घ संपर्कामुळे तसेच अतिमद्यपानामुळेही ही तक्रार संभवते.
    वाढते वय आणि वृषण व शुक्राणू याबाबतच्या ॲण्टिबॉडीज, अपघाताने इजा होणे, काही शस्त्रक्रिया, गुप्तरोग यामुळे शुक्राणू तयार होण्यात अडथळा येतो.
    खूप जास्त किंवा खूप कमी प्रमाणातील वीर्यद्रव असणे, त्यात घनता कमी असणे, फ्रुक्‍टोज कमी प्रमाणात असणे ही कारणे महत्त्वाची ठरतात.
    पुरुषांच्या लिंगातील जन्मजात दोष, शारीरिक संबंधाबाबतची असमर्थता, अकाली वीर्यस्खलन, उलटे वीर्यस्खलन, समागमातील वेदना या विकारांचे प्रमाण खूपवेळा आढळते.
    काही विशेष व्यक्तींमध्ये समागमाबाबतचे अज्ञानदेखील वंध्यत्वाचे कारण आढळते.  

स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे
यामध्ये दोन प्रकार असतात.
    प्राथमिक वंध्यत्व : यात लग्न होऊन एक वर्षांपेक्षा जास्त काळ असुरक्षित संबंध करून देखील जेव्हा त्या स्त्रीला गर्भधारणा होत नाही.
    दुय्यम वंध्यत्व : यात त्या दांपत्याला पहिले अपत्य होते पण नंतर मात्र त्या स्त्रीला गर्भधारणा होत नाही.
स्त्रियांमधील वंध्यत्वाची करणे पाहताना खालील कारणे लक्षात घ्यावी लागतात.
    अनियमित मासिक पाळी : स्त्रियांमध्ये बीजांडकोशातून स्त्रीबीज बाहेर पडले तरच पाळी येते. मासिक पाळी अनियमित असणे हे स्त्रीबीज निर्माण होण्याचे लक्षण असते. मासिक पाळीचे चक्र आणि जननक्षमतेचं चक्र एकमेकात गुंतलेलं असतं. पाळीचा पहिला दिवस ते पुढची पाळी सुरू होण्याच्या आधीचा दिवस म्हणजे एक पाळी चक्र. या पाळी चक्रातील सर्वात मोठी घटना म्हणजे स्त्री बीज पक्व होऊन बीजकोषाच्या बाहेर येऊन बीजनलिकांमध्ये पोचणे. यालाच अंडोत्सर्जन (ओव्ह्युलेशन) म्हणतात. हे बीज बीजनलिकांमध्ये असताना जर त्याचा पुरुष बीजाशी संयोग झाला तर त्यातून फलित बीज तयार होते आणि ते गर्भाशयाच्या आतील भागात रुजते. या फलित बीजाच्या पोषणासाठी गर्भाशयाचं अस्तर जाड होतं. मात्र स्त्री बीजाचा पुरुष बीजाशी संयोग झाला नाही, फलित बीज तयारच झालं नाही किंवा गर्भाशयाच्या भिंतीवर रुजलं नाही तर गर्भाशयाचं अस्तर ठराविक दिवसांनी गळून पडतं. यालाच आपण पाळी येणे असं म्हणतो. साहजिकच अनियमित पाळी असेल तर वंध्यत्वाचे ते मुख्य कारण बनते. 
    संप्रेरके (हार्मोन्स) : पाळीच्या पूर्ण चक्रामध्ये चार प्रकारची संप्रेरके काम करत असतात. पिट्युटरी ग्रंथीतून पाझरणारी एलएच, एफएसएच आणि बीजांडकोषांमध्ये तयार होणारी इस्ट्रोजन, प्रोजेस्टरॉन ही चार संप्रेरके पाळीचे आणि जननक्षमतेचं पूर्ण चक्र नियंत्रित करतात. या संप्रेरकामधील असमतोल, कमतरता किंवा अधिक स्राव गर्भधारणेस प्रतिबंध करतो.
    पीसीओएस : शरीरातील संप्रेरकांमध्ये बदल होतो आणि अंडाशयावरती सूज येते, त्यामुळे अंडकोषातून स्त्रीबीज बाहेर पडत नाहीत. या आजाराला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम (पीसीओएस) असे म्हणतात. हे सध्याच्या काळात वंध्यत्वाचे प्रमुख कारण बनले आहे. 

 • गर्भनलिका बंद किंवा अकार्यक्षम असणे 
 • गर्भाशय परिपक्व नसणे किंवा त्यात गाठी असणे (फायब्रॉइड) 
 • थायरॉईड ग्रंथी व्यवस्थित काम न करणे 
 • फलित स्त्रीबीज अथवा गर्भ हा गर्भाशय भिंतीला चिकटून राहात नाही आणि चिकटला तरी तो जिवंत राहू शकत नाही.
 • अनेकदा पक्व स्त्रीबीज हे बीजांडकोशातून गर्भाशयापर्यंत पोचत नाही.
 • काही स्त्रियात बीजांडकोशातून बीज बाहेर पडत नाही.
 • मधुमेह
 • एंडोंमेट्रियोसिस
 • गर्भाशयातील विकृती, ट्युमर, कर्करोग इ.
 • बीजांडकोषाचे गंभीर आजार. उदा. ओव्हॅरियन सिस्ट किंवा ट्युमर
 • पीआयडी
 • हॉर्मोनल इम्बॅलन्स
 • कर्करोगावर घेतलेले उपचार
 • रुबेला जातीच्या विषाणूंचे किंवा टॉर्च इन्फेक्‍शन

वंध्यत्वाला कारणीभूत ठरणारे असे अनेक आजार आजमितीला आढळून येतात.मातृत्व ही स्त्रीला मिळालेली दैवी देणगी आहे. पण तिला मूल न होणे हा एक अभिशाप आहे. या शापाला वैद्यकीय संशोधनाने अनेक उ:शाप शोधले आहेत. त्याची माहिती पुढील लेखात घेऊ.

संबंधित बातम्या