‘मिस्टर परफेक्‍शनिस्ट’

डॉ. अविनाश भोंडवे
शनिवार, 8 डिसेंबर 2018

आरोग्याचा मूलमंत्र
 

जीवनात सर्वार्थाने सर्वोत्कृष्ट बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणे हा एक उच्च गुण समजला जातो. सर्वोत्कृष्टतेचा आणि परिपूर्णतेचा परीसस्पर्श लाभण्यासाठी क्षणोक्षणी धडपडणाऱ्या देदीप्यमान व्यक्तींचे आयुष्य साऱ्या जनसमुदायाकरिता एक तेजस्वी पाऊलवाट असते. या परिपूर्णतेने प्रेरित होऊन अनेकांना त्या वाटेवर प्रवास करण्याची आकांक्षा निर्माण होत असते. 

तसे पहिले तर आयुष्यात जगण्याच्या अनेकांच्या अनेक तऱ्हा असतात. कुणी आला दिवस पुढे ढकलत असतो, कुणी समोर आलेल्या प्रसंगांना जमेल तसे तोंड देत पोट भरण्याचे प्रयत्न करत असतो. पण जगातील अनेकांच्या मनात, आपण जे करू ते प्रत्येक बाबतीत निखालसपणे अगदी परिपूर्ण हवेच असा ध्यास असतो. परिपूर्णतेचा अखंड ध्यास कलावंतांना, खेळाडूंना, शास्त्रज्ञांना आवश्‍यकच असतो. पण दैनंदिन जीवनात केली जाणारी प्रत्येक कृती आदर्शच हवी, ती अशीच पाहिजे, तशीच पाहिजे, त्यात मुळीसुद्धा फेरफार कधीही होता कामा नये, असा आग्रह धरणारे काही लोक असतात. आपण जे काही करणार ते ‘परफेक्‍ट’च हवे असा आग्रह धरणाऱ्या या लोकांना ‘परफेक्‍शनिस्ट’ किंवा परिपूर्णतावादी समजले जाते. 

असे ‘मिस्टर परफेक्‍शनिस्ट’ लोक इतरांच्या बारीक सारिक गोष्टीही उच्च दर्जानेच व्हायला पाहिजेत, यासाठी कमालीच्या आग्रही असतातच; पण स्वतःच्या छोट्या छोट्या वर्तनाचेसुद्धा काटेकोरपणे मूल्यमापन करत असतात. 

ऑन्टारियो कॅनडामधील यॉर्क युनिव्हर्सिटीतील डॉ. गॉर्डन फ्लेट हे आरोग्य विषयातील प्राध्यापक आणि ब्रिटिश कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील मानसशास्त्राचे प्राध्यापक डॉ. पॉल ह्युइट या द्वयीने नव्वदीच्या दशकात हजारो व्यक्तींवर दहापेक्षा जास्त काळ संशोधन केले. त्यांनी ‘परफेक्‍शनिझम’ म्हणजेच परिपूर्णवाद या विषयाबाबत प्रसिद्ध केलेला प्रबंध हा दिशादर्शक समजला जातो. त्यांच्या मते परिपूर्णतेचे तीन प्रकार असतात. 

  •  स्वतःशी संबंधित असलेला परिपूर्णतेचा ध्यास. 
  •  इतरांच्या वर्तनाबाबतची परिपूर्णतेचा आग्रह. 
  •  समाजाने आखून दिलेली परिपूर्णता. 

या तिन्ही प्रकारच्या वर्तनाचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा ‘परफेक्‍ट’ बनण्याचा सोस हा एक स्वभावदोष बनतो. हळूहळू ती एक मानसिक विकृती बनते. परिपूर्णतेचा अवाजवी ध्यास बाळगणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर हमखास विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. 

थॉमस करन आणि अँड्रयू हिल या ब्रिटिश शास्त्रज्ञाने ‘परफेक्‍शनिझम’चा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचे सखोल संशोधन केले आहे. त्यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या प्रबंधात तिन्ही प्रकारांमुळे होणाऱ्या परिणामांचे सखोल परिशीलन केले आहे. त्यांच्या मते वर उल्लेखलेल्या प्रकारातला तिसरा प्रकार सर्वांत दुःखदायक असतो. म्हणजे सामाजिक दृष्टीने परिपूर्णतेची जी व्याख्या असते, त्याचे पालन करणे हे सर्वांत त्रासदायक आणि वेदनामय असते. समाजात अमुक व्यक्तीने असेच वागावे, अमुक करावे, तमुक करू नये, याचे दंडक अत्यंत पक्के असतात. या रुढींप्रमाणे न वागल्यास त्यावर होणारी टीका आणि चर्चा अत्यंत बोचरी असते. या नियमांप्रमाणे वागताना जास्तीत जास्त लोकांची त्रेधातिरपीट उडते. 

याप्रमाणेच दुसरा प्रकार म्हणजे इतरांची तुमच्याकडून असलेली अपेक्षा शंभर टक्के पूर्ण करण्याची मनीषा बाळगणे आणि त्यासाठी जीव तोडून प्रयत्न करणे ही बाबसुद्धा महत्त्वाची ठरते. यामध्ये किशोर आणि तरुण वयातील मुलेमुली येतात. शालेय अभ्यासात ‘परफेक्‍ट’ समजण्यासाठी असलेली गुणांची आणि टक्‍क्‍यांची अपेक्षा पूर्ण करायलाच पाहिजे असा घोर या युवकांच्या मनात लागलेला असतो. यशापयशाबाबत त्यांची अपेक्षा अत्यंत हळवी असते. त्यामुळे अपेक्षित यश न मिळाल्यास काय होईल या विचाराने त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. 

आपण प्रत्येक गोष्टीत ‘परफेक्‍ट’ असलेच पाहिजे अशी तीव्र इच्छा बाळगणारे लोक घरातील वस्तू कशा असाव्यात, पोशाख कसा असावा, चालीरीती कशा असाव्यात, काय केले म्हणजे आपल्याला चांगले समजले जाईल याचा सखोल विचार करतात. त्यांचे याबाबतचे मानक कमालीच्या उच्च पातळीचे असतात आणि ते प्रत्येक वेळी पूर्ण व्हावेत अशी त्यांची कळकळ असते. या सर्व गोष्टी म्हणजे आपली प्रतिमा असे ते समजतात. ती उंचावण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड होत असते. त्यातली एक गोष्ट जरी त्यांच्या स्वतःच्या निकषांवर उतरली नाही तर त्यांचे मन त्यांना खाऊ लागते. ते स्वतःलाच दोष देत राहतात. त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर याचे परिणाम दिसू लागतात. 

मानसिक परिणाम : परिपूर्णतेचा अवाजवी अट्टहास बाळगण्यामुळे मानसिक निरामयता झाकोळून जाते आणि अनेक मानसिक विकार निर्माण होतात. उदा. 

चिंता : आपले कसे होणार? ही चिंता ९० टक्के परफेक्‍शनिस्ट व्यक्तींना सतत ग्रासून ठेवते. त्यांच्या बोलण्यावागण्यात ती दिसू लागते. त्यांच्या आयुष्यातील मनमोकळेपणा आणि आनंद हरवू लागतो. 

नैराश्‍य : अनंत काळ जतन करून ठेवलेली मनीषा आणि ती पूर्ण होण्यासाठी केलेले प्रयत्न असफल होऊन आपल्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण होते आणि त्यातून चिंता, नैराश्‍य आणि वैफल्याचा मानसिक विकार ओढवतो. एका जागतिक सर्वेक्षणानुसार पदवीपूर्व अभ्यासक्रमातल्या ३० टक्के विद्यार्थ्यांमध्ये नैराश्‍य आढळून येते. वैद्यकीय विद्यार्थ्यांत ते ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे, तर अभियांत्रिकी, मॅनेजमेंट आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांत ते ४० टक्के आढळते.

स्वभावदोष : काही तीव्र मानसिक विकारांमुळे व्यक्तिमत्त्वात बदल होतात, तसेच व्यक्तिमत्त्वाच्या यंत्रणेमध्ये म्हणजे निरनिराळ्या व्यक्तिमत्त्वगुणांचे संघटन तसेच व्यक्तीचे वैयक्तिक समायोजन यांत बिघाड होतात. व्यक्तिमत्त्व ऱ्हास हे तीव्र स्वरूपाचे लक्षण, बुद्धिभ्रंश या इंद्रिय विकारात दिसून येते. मूळ व्यक्तिमत्त्वात समाविष्ट असलेले स्वभावाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू हळूहळू नष्ट होतात.
‘बहुविध व्यक्तिमत्त्व’ हे लक्षण नसून उन्मादी बोधविच्छेदनाचा एक दुर्मिळ प्रकार बनतो. त्यात काही काळ अबोध मनातील सुप्त भावना, आकांक्षा, कल्पना यांची जटिल यंत्रणा मनाचा आणि शरीराचा पूर्ण ताबा घेऊन मूळ व्यक्तिमत्त्वापेक्षा निराळ्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू दाखवते. या काळात मूळ व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण विसर पडतो. 
एकटेपणा, स्वप्नाळू वागणे, चिडचिड करणे, अकारण भांडणे, गप्प बसणे, खोटे बोलणे, एखाद्याची अकारण निंदा करत राहणे, अतर्क्‍य वागणे, इतरांचे लक्ष वेधून घेण्याचे प्रयत्न करणे असेही दोष निर्माण होतात आणि सातत्याने त्याचा प्रत्यय येत राहतो. 

ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह बिहेवियर : एखादी अनावश्‍यक गोष्ट सातत्याने करत राहणे, उदा. सतत हात धुणे, सारखे खिसे चाचपणे वगैरे
मानसिक आजार : डिमेंशिया (बुद्धिभ्रंश), कन्फ्युजन (संभ्रमावस्था, गोंधळून जाणे), काही विशेष भयगंड निर्माण होणे, निद्रानाश अशा मानसिक विकृती निष्पन्न होतात. 
आत्महत्या करणे किंवा तसे विचार येणे - आत्महत्या केलेल्या व्यक्तींची त्यांच्या मृत्युपश्‍चात चौकशीमध्ये ५० टक्‍क्‍यांहून अधिक व्यक्ती ‘परफेक्‍शनिस्ट’ असल्याचे त्यांच्या जिवलग साथीदार आणि कुटुंबीयांकडून स्पष्ट होते. 

पंधरा ते तीस वर्षे वयोगटातील युवकांच्या एका सर्वेक्षणात, ७० टक्के आत्महत्या आणि आत्महत्येचे प्रयत्न, परिवाराच्या त्यांच्याबाबत असलेल्या उच्च अपेक्षांची पूर्तता न झाल्याने घडल्याचे अधोरेखित झाले आहे. 

डॉ. करन आणि डॉ. हिल यांनी १९८९ ते २०१६ या काळात अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडामधील ४० हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे संशोधनात्मक सर्वेक्षण केले. या पाहणीनुसार परफेक्‍शनिझम ही एक विकृती बनते आहे आणि गेल्या २५ - ३० वर्षांत अशा मिस्टर परफेक्‍टसच्या संख्येत ३३ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. संशोधनाच्या निष्कर्षानुसार या व्यक्तींनी स्वतःच ही परिपूर्णतेचे भूत मानगुटीवर बसवून घेतले आहे. त्यांच्या मते आजकालच्या युवकांत - 
१. प्रत्येक गोष्ट प्रत्येक बाबतीत परिपूर्ण असली पाहिजे या गोष्टीला अवाजवी महत्त्व दिले जाते आहे. 
२. हे लोक स्वतःबाबत अवाजवी आणि अतर्क्‍य महत्त्वाकांक्षा बाळगतात. 
३. स्वतःचे मूल्यमापन ते अत्यंत कठोरपणे करतात. कित्येक किरकोळ दोषांना ते घोडचूक समजतात. या बाबतीत त्यांचे घडोघडी परिशीलन करणारा त्यांचा ‘आतला आवाज’ खूप निष्ठुर असतो. तो त्यांना सतत दोष देत हेटाळणी करत राहतो. अंतर्मनाची ही बोचरी टीका या व्यक्तींच्या चुका दाखवत त्यांच्या यशाला कमी लेखत राहते. याचाच परिणाम होऊन नैराश्‍य, वैफल्य आणि इतर मानसिक विकार निर्माण होतात. 

उपाय
परिपूर्णतेच्या अवास्तव ध्यासामुळे ज्या व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आजारी पडतात, त्यांच्या बाबतीत त्यांचा निष्ठुर आतला आवाज या साऱ्याला कारणीभूत असतो. त्यामुळे या रुग्णांवर इलाज करण्यासाठी त्यांच्या आतल्या आवाजाला सांभाळावे लागते. या विकारांवर उपचार करताना मानसिक विकारांवरील नेहमीची मानसोपचारपद्धती, औषधे वापरावी लागतातच. पण आतला आवाज नरम करण्यासाठी ‘स्वतःवर प्रेम करणे’, स्वतःची करुणा येणे अशा गोष्टी रुग्णांना शिकवाव्या लागतात. यासाठी योगाभ्यास, मेडिटेशन यांचा तर उपयोग होतोच. पण आतला आवाज शांत करण्यासाठी विशेष वैयक्तिक समुपदेशन आणि समूहोपचारदेखील उपयुक्त ठरतात.
आपल्या आतल्या ‘स्व’ला प्रसन्न करणे, त्याची चिंता कमी करणे, त्याला आंजारून गोंजारून आनंदी करणे यासाठी या समुपदेशनाचा वापर केल्याने  महिन्यात रुग्णांचे मानसिक संतुलन ४३ टक्‍क्‍यांनी उंचावते.

शारीरिक आजार
परफेक्‍शनिस्ट व्यक्तींच्या आयुष्यात तणाव निर्माण होणे ही एक साहजिक घटना असते. त्यामुळे त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल वाढणे, हृदयविकार, अर्धांगवायू असे रक्तवाहिन्यांशी निगडित आजार निर्माण होतात. क्रॉन्ह्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटीस, पोटाचे अल्सर्स, आम्लपित्त असे पोटाचे विकारही प्रामुख्याने होत राहतात.
अतिरेकी पातळीवरील परिपूर्णतावादी व्यक्तींमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका येणे मोठ्या प्रमाणात आढळते. अशा व्यक्तींना या आजारातून बरे व्हायला सर्वसामान्य रुग्णांपेक्षा जास्त काळ लागतो. 

काही विचार 
कोणताही ध्यास हा खरा मानवी जीवन मुक्त करणारा, आनंद देणारा, उत्तम कलाकृतीची निर्मिती करणारा असायला हवा. असा ध्यास घेणाऱ्या कलावंतांमुळे, शास्त्रज्ञांमुळे मानवी जीवन सुखकर आणि आनंदी झाले आहे. पण परिपूर्णतेचा अवाजवी आणि अविरत ध्यास असला तरी आपल्यावर होणाऱ्या टीकेला, अपयशांना, चुकांना ‘स्व’करुणेने स्वीकारणे, ती पचवून पुढे जाणे आणि नव्याने मार्गक्रमण करणे हेच शेवटी महत्त्वाचे ठरते. परिपूर्णतेच्या नकारात्मक ध्यासात या गोष्टी प्रतिबिंबित होत नाहीत. 

शेवटी विचार केला तर परिपूर्णतेचा ध्यास ही वृत्ती नसते, तर स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. एखाद्या ध्येयाशी बांधिलकी असणे वाईट नसते. सकारात्मक ध्यास असल्यास आपल्या उच्च ध्येयांशी बांधिलकी ही एक अत्यावश्‍यक बाब असते. मात्र परफेक्‍ट होण्यासाठी काही वेळा आपल्याला आपल्याला उत्तुंग ध्येयाऐवजी अवास्तव ध्येये ठेवणे आणि ती प्राप्त न झाल्यास खिन्न होणे आणि स्वतःला ओरबाडत राहणे हे अप्रस्तुत असते. 
पूर्णमदः पूर्णमिदं, पूर्णात्‌ पूर्ण मुदच्यते, 
पूर्णस्य पूर्णमादाय, पूर्णमेवावशिष्यते। 
अशा शब्दांत परिपूर्णतेची व्याख्या उपनिषदांमध्ये केली आहे. या व्याख्येप्रमाणे विश्‍वाची रचना पूर्णातून पूर्ण वजा केल्यानंतर पुन्हा पूर्णच शिल्लक ठेवणारी असते. म्हणजेच परिपूर्णतेचा ध्यास घेतल्यावर, एखाद्या वेळी काही ना काही नवीन जमा होईल किंवा असलेले वजा होईल. या बेरीज-वजाबाकीतून जे उरते त्याला परिपूर्ण माना असे उपनिषदे सांगतात. म्हणजेच जे मिळवले किंवा जे वजा झाले त्याचा विचार न करता हाती जे शिल्लक आहे त्याला परिपूर्ण समजून समाधान मानावे. 

जीवनामध्ये आपण आतापर्यंत जे काही मिळवले ते परिपूर्ण मानावे. जे आपल्या हातातून गेले, जे जमले नाही, त्याचा विषाद न मानणे आणि आहे त्यात मन तृप्त ठेवणे यालाच मनाचा समृद्धपणा आणि विचारांची परिपक्वता म्हणतात.

संबंधित बातम्या