गर्भवती स्त्रियांचे लसीकरण

डॉ. अविनाश भोंडवे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

आरोग्याचा मूलमंत्र
 

माणसाच्या आयुष्यात कुठलाही आजार म्हणजे एक वेदनादायी प्रसंग असतो.. आणि मृत्यूच्या दाढेत नेणारे प्राणघातक आजार ही तर कमालीची दुःखकारक घटना असते. जिवंत माणसाला होत्याचे नव्हते करणारे हे आजार एका माणसाकडून दुसऱ्याकडे वेगाने पसरतात आणि बघता बघता गावेच्या गावे उद्‌ध्वस्त होतात. पूर्वीच्या काळातल्या प्लेगसारख्या आणि आजच्या युगातले इबोलासारख्या आजारांनी आजवर लाखो कुटुंबे रस्त्यावर आली, अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली. शतकानुशतके असे आजार पाहणाऱ्या आणि त्यावर इलाज शोधणाऱ्या वैद्यकीय शास्त्रज्ञांनी हे आजार रोखण्यासाठी, त्यांच्यावर मात करण्यासाठी आणि प्रसंगी हे आजार पृथ्वीतलावरून नष्ट करण्यासाठी शास्त्रोक्त प्रयत्नांची पराकाष्ठा चालूच ठेवली. 

इ.स. १८०२ मध्ये डॉ. एडवर्ड जेन्नर या ब्रिटिश वैद्यकीय शास्त्रज्ञाने देवीच्या लसीचा शोध लावला आणि तब्बल १०८ वर्षांच्या अथक लसीकरण मोहिमेनंतर १९८० मध्ये देवी (स्मॉल पॉक्‍स) या प्राणघातक आजाराचे जगभरातून समूळ उच्चाटन झाले. 

जोनास साल्कने १९५५ मध्ये पोलिओची लस शोधली आणि १९६१ मध्ये अल्बर्ट सबिननी मुखाद्वारे देण्याची थेंबाच्या स्वरूपातली लस विकसित केली. लाखो बालकांना पांगळे करून सोडणाऱ्या या आजारापासून २०१४ मध्ये भारत ‘पोलिओ मुक्त’ देश झाला. आज २०१८ मध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, नायजेरिया असे मोजके देश सोडले तर जगभरात पोलिओचे नामोनिशाण शिल्लक राहिलेले नाही. 

लसीकरणाचे महत्त्व 
कुठल्याही संसर्गजन्य आजाराशी सामना करण्यासाठी आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती असते. यातील काही भाग जन्मजात असतो, तर काही भाग आपण जन्मल्यावर आईच्या पहिल्या स्तनपानातून मिळतो. मात्र असे अनेक संसर्गजन्य आजार असतात, की ज्यांच्या जंतूंशी लढून त्यांच्यावर मात करण्याचा अनुभव आपल्या शरीरातील प्रतिकार शक्तीच्या सैन्याला नसतो. हा अनुभव देण्याची किमया लसी करतात. 

लस म्हणजे काय असते? 
कोणतीही रोगप्रतिबंधक लस म्हणजे त्या रोगाचे मृत अथवा जंतूचा विखार नष्ट केलेले अर्धमेले जंतू किंवा जंतूंच्या विषारी भागाचा अंश असते. ही लस शरीरात गेली तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीची त्या रोगजंतूंशी लढण्याची रंगीत तालीमच होते. लसींत सबळ जंतू नसल्याने शरीराला तो रोग होत नाही, मात्र त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या लसीचे शरीरात प्रशिक्षण देणे म्हणजे प्रतिबंधक लसीकरण होय. लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी केली जाते किंवा काही आजार टाळले जातात. 

सद्य परिस्थिती 
सहज उपलब्ध असलेल्या रोगप्रतिकारक लसींचा वापर न केल्यामुळे दरवर्षी वीस लाख मुले विविध रोगांना बळी पडतात. लसीकरण केलेल्या मुलामुलींचा अशा प्राणघातक रोगांपासून किंवा त्यांच्यामुळे उद्‌भवणाऱ्या विकृतींपासून बचाव होतो. लसीकरण मिळणे हा प्रत्येक बाळाचा हक्क आहे. प्रत्येक मुलामुलीचे लसीकरण करणे गरजेचे असते. 
आज परिस्थिती अशी आहे, की जे संसर्गजन्य आजार प्रतिबंधक लस दिल्यावर टळू शकतात, अशा आजारांनीच जगभरातल्या लाखो गर्भवती स्त्रिया, त्यांची नवजात अर्भके आणि पाच वर्षांखालील मुले मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहेत. शिवाय यातील काही आजारांनी असंख्य लहान मुलामुलींना जन्मजात विकृती निर्माण होते आहे.
 
गर्भधारणेपूर्वी आणि गर्भवती झाल्यावर स्त्रियांना संसर्गजन्य आजार झाले तर  
     त्यांच्या बाळाची रोगप्रतिकारशक्ती खालावते. 
     यातील काही आजारांमुळे मृत किंवा जन्मजात विकृती असलेली बालके जन्माला येतात. 
     काही बालकांना जन्मानंतर काही गंभीर संसर्गजन्य आजार उद्‌भवतात. 

गर्भवती महिलांचे लसीकरण केले तर  
     त्या मातांचे आणि त्यांच्या बाळांचे त्या आजारांपासून संरक्षण होते. 
     त्या बाळांना त्या आजारांबाबत जन्मजात प्रतिकारशक्ती प्राप्त होते. 
     आजमितीला बालकांचे लसीकरण जन्मापासून केले जाते. साधारणतः 
 

६ महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत 
अनेक आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती त्यांच्यात तयार होते. मात्र हे लसीकरण पूर्ण होण्याआधीच त्या आजारांनी बालकांना ग्रासले तर...? त्या बाळांवर गंभीर परिस्थिती ओढवते. गर्भवती मातांचेच लसीकरण केले तर ही गोष्ट टळू शकते. 

गर्भवती मातांचे लसीकरण 
गर्भवती महिलांनी लसीकरण करून घेणे फार महत्त्वाचे असते. मातांना दिलेल्या लसींचा फायदा हा गर्भातील बाळांना होत असतो. गर्भवती स्त्रीने अगोदरच लस घेतली तर तिला गर्भारपणाच्या आणि प्रसूतीच्यावेळी होणाऱ्या गंभीर त्रासातून सुटका मिळते. 
गर्भारपणात स्त्रीच्या संप्रेरकांमध्ये बदल होत असतात. याकरिता पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम करणे तर गरजेचे असतेच. मात्र याबरोबरच तिचे लसीकरणदेखील तिच्या आणि तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. विविध आजारांच्या प्रतिबंधक लसी गर्भवती महिलांमध्ये विविध रोगांपासून प्रतिकारशक्ती निर्माण करतात. 
उदाहरणार्थ : 
     रुबेला हा गंभीर संसर्गजन्य आजार असतो. तो रूबेला विषाणूमुळे होतो. यामुळे गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यात अकाली प्रसूतीची शक्‍यता वाढते. 
     एखाद्या महिलेला गर्भावस्थेदरम्यान हिपॅटायटिसचा संसर्ग झाला तर जन्माच्या दरम्यान तो आजार बाळालाही होऊ शकतो. 

गर्भवती महिलांना दिल्या जाणाऱ्या लसी 
 धनुर्वात प्रतिबंधक (टिटॅनस टॉक्‍साईड) : गर्भारपणाच्या २४ आठवड्यांनंतर ही लस द्यायची असते. म्हणजे सहा महिने ते ९ महिने याकाळात, चार आठवड्याच्या अंतराने एकूण दोनदा ही लस दिली जाते. यामुळे प्रसूतीनंतर होणाऱ्या धनुर्वातापासून तिचे रक्षण होते. गेल्या अनेक वर्षांपासून ही लस महिलांना दिली जाते आहे. साहजिकच आज प्रसूतिपश्‍चात होणाऱ्या धनुर्वाताची संख्या अगदी नगण्य झाली आहे. 

 कावीळ प्रतिबंधक (हिपॅटायटिस ए) लस : गर्भवती महिलेला हिपॅटायटिसचा संसर्ग झाल्यास तिला होणाऱ्या बाळालाही हा आजार होण्याची दाट शक्‍यता असते. त्यामुळे हे टाळण्यासाठी ही लस टोचली जाते. याचे दोन डोस सहा महिन्यांच्या अंतराने घ्यावेत.  गर्भवतीच्या दृष्टीने ही लस पूर्णपणे निर्धोक असते. 

 हिपॅटायटिस बी लस : गर्भधारणेच्या काळात हिपॅटायटिस बी या लसीचे तीन डोस मातांना द्यावेत. यात ०, १, ६व्या महिन्यात ही लस घ्यावी लागते. हा एक गंभीर आणि पूर्ण बरा न होणारा आजार असतो. त्यामुळे बालकांना भावी आयुष्यात यकृताच्या मोठ्या विकारांपासून त्यांना संरक्षण मिळते. ही लसदेखील गर्भवती मातेला पूर्णपणे निर्धोक असते. 

 एन्फ्ल्युएन्झा लस : या लसीचे दोन प्रकार असतात. त्यातील एन्फ्ल्युएन्झा इनॲक्‍टिव्हेटेड ही लस दिली जाते. मात्र जिवंत विषाणू असलेली लस दिली जात नाही. एन्फ्ल्युएन्झा इनॲक्‍टिव्हेटेड ही लस दिल्यास मातेचे आणि पर्यायाने बालकांचे विविध संसर्गापासून संरक्षण होते. यामध्ये फ्लू, स्वाइन फ्लू, न्यूमोनिया यांसारख्या आजारांपासून गर्भवतीचे आणि बाळाचे संरक्षण होते. ही लस जून आणि ऑक्‍टोबर दरम्यान दिली जाते. पण ती गर्भावस्थेच्या कोणत्याही काळात घेतली तरी हरकत नसते. शक्‍य असल्यास गर्भवती महिलेच्या घरातील संपर्कात असणाऱ्या सर्व व्यक्तींनी ही लस जरूर घ्यावी. 

 टीडॅपलस : ही लस नवीन असून या लसीसंदर्भात अद्याप जागरूकता दिसत नाही. धनुर्वात (टिटॅनस), घटसर्प (डिफ्थेरिया) आणि डांग्या खोकला (पर्टुसिस) असे तीन आजार टाळण्यासाठी ही लस दिली जाते. म्हणून तिला टीडीएपी किंवा टीडॅप म्हणतात. 

 अ. धनुर्वात (टिटॅनस) हा आजार गर्भावस्थेदरम्यान झाल्यास महिलेचा जीव धोक्‍यात येतो. 

 आ. डिफ्थेरिया (घटसर्प) हा श्‍वसनाचा संसर्गजन्य आजार असून तो श्‍वसनाच्या समस्या, पॅरालिसीस आणि कोमा यांना कारणीभूत ठरू शकतो. 

 इ. पर्टुसिस (डांग्या खोकला) हा एक संसर्गजन्य जिवाणूंचा आजार असून तो नवजात बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतो. 
त्यामुळे धनुर्वात, घटसर्प आणि डांग्या खोकला प्रतिबंधक लस गरोदरपणातच्या २७ ते ३६ व्या आठवड्यात म्हणजे सातव्या महिन्यापासून नवव्या महिन्याच्या काळात घ्यावी लागते. 

 टायफॉईड : स्त्रियांना प्रसूतीनंतर टायफॉईड (विषमज्वर) होऊ नये म्हणून ही लस दिली जाते. ही लस घेतल्यानंतर गर्भवती स्त्रियांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. तसेच बाहेरून आल्यावर, जेवणापूर्वी आणि नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, जेणेकरून बाळाला संसर्ग होणार नाही. 

 हिब : हिमोफिलस एन्फ्ल्युएन्झा टाइप बी - गर्भवती महिलेच्या प्लीहेच्या कार्यामध्ये जर दोष असेल, तिला सिकल सेल डिसीज असेल किंवा हाडाच्या मगजाचे प्रत्यारोपण झाले असेल तर ही लस देणे अत्यावश्‍यक असते. हिमोफिलस एन्फ्ल्युएन्झा टाइप बी आजार बाळांना झाल्यास त्यांच्या मेंदूच्या आवरणांना सूज येणे, रक्तामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव होणे, घशातील श्‍वासनलिका आणि अन्ननलिकेला विभागणाऱ्या एपिग्लॉटीसला (अघीस्वरदार) सूज येणे असे गंभीर आणि प्राणघातक आजार होऊ शकतात. मातेने ही लस घेतल्यास बाळाचे त्यापासून पूर्ण संरक्षण होते. 

 मेनिंगोकॉकल लस : ज्यांची प्लीहा काढलेली आहे किंवा ज्या माता एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत अशांना ही लस घ्यावीच लागते. होस्टेलमध्ये राहणाऱ्या कॉलेजच्या मुली, नर्सेस, मेडिकल लॅबमध्ये तसेच लष्कारात काम करणाऱ्या स्त्रियांनी गर्भधारणा झाल्यावर ही लस घ्यावी असे सांगितले जाते. 

 न्युमोकॉकल लस : ज्या स्त्रियांना गर्भधारणा होण्याआधी मधुमेह असेल अशांनी ही लस घेणे गरजेचे आहे. 

 रेबीज लस : गर्भवती महिलेस कुत्रा किंवा इतर प्राणी चावला, तर रेबीज इम्युनोग्लोबिन किंवा चिकसेल एम्ब्रियो लस देण्याबाबत अनेक उलटसुलट मतप्रवाह आहेत. पण कुत्रा जर रेबीज आजाराने ग्रस्त असेल, तर रेबीज होण्यापेक्षा तिला ही लस देण्यास हरकत नसते. 

 पीतज्वर : आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका खंडातील देशात प्रवास करताना पीतज्वराची (यलो फीवर) लस घेणे आवश्‍यक असते. गर्भवती स्त्रियांनी ही लस घेतल्यास ती निर्धोक असते. मात्र असा प्रवास आधीपासूनच ठरला असेल तर गर्भधारणा होण्यापूर्वी ती घेतल्यास उत्तम असते. 

या लसी नकोत 
गर्भवती स्त्रियांना एचपीव्ही, गोवर, गालगुंड, रुबेला, कांजिण्या या लसी देता येत नाहीत. या आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी स्त्रियांनी गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी किमान दीड महिना आधी घ्याव्यात. 

गर्भारपणात घेतलेल्या लसींमुळे नवजात अर्भकांना काही काळ संरक्षण मिळते, पण त्यांना लसीकरणाच्या वेळापत्रकानुसार सर्व लसी नियमितपणे द्याव्यात. या विविध प्रकारच्या लसी सर्वच गर्भवती महिलांना खासगी तसेच सरकारी आणि पालिका रुग्णालयात दिल्या जातात. गरजू महिलांसाठी या सरकारी दवाखान्यात त्या मोफतही उपलब्ध असतात. 

असंख्य संक्रमक आजारांनी जगभरात आज धुमाकूळ घातला आहे. त्याला सर्वांत जास्त प्रमाणात बळी पडतात ती अर्भके आणि बालके. गर्भवती मातांचे या आजारांसाठी लसीकरण केल्यास या आजारांचे प्रमाण, त्यामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व नक्की कमी होईल. यातून देवी आणि पोलिओसारख्या अनेक महाभयानक आजारांना कदाचित जगातून हद्दपारही करता येईल.
 

संबंधित बातम्या