रंगीलो म्हारो गरबो दांडिया

राजश्री बिनायकिया
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

आश्‍विन हा पावसाळ्यातील शेवटचा महिना. हस्ताच्या सरी कोसळतात. परंतु त्यातील तीव्रता कमी झालेली असते. आजूबाजूच्या निसर्गाची उधळण पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. अशा वेळी शरद ऋतूचे आगमन होते. या प्रसन्न महिन्यात अनेक उत्सवांबरोबर नवरात्रीचा सण असतो. 

आश्‍विन हा पावसाळ्यातील शेवटचा महिना. हस्ताच्या सरी कोसळतात. परंतु त्यातील तीव्रता कमी झालेली असते. आजूबाजूच्या निसर्गाची उधळण पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. अशा वेळी शरद ऋतूचे आगमन होते. या प्रसन्न महिन्यात अनेक उत्सवांबरोबर नवरात्रीचा सण असतो. 

भारतात विविधतेतून एकतेचे प्रत्यंतर ठायी ठायी येते. भिन्न प्रदेश, भिन्न पेहराव, भिन्न भाषा अशा विविधतेतूनही एकात्म संस्कृतीचे दर्शन इथे घडते. नवरात्रोत्सवही याला अपवाद नाही. महाराष्ट्रात हा जगदंबेचा उत्सव, म्हैसूर कर्नाटकात हा चामुंडेचा उत्सव, हिमाचल, काश्‍मीरमध्ये वैष्णोदेवीचा, पश्‍चिम बंगालमध्ये दुर्गामातेचा, तर गुजरातमध्ये अंबामातेचा उत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो. ही सर्व आदिमाया, आदिशक्तीची रूपे. नवरात्राच्या निमित्ताने देशभरात पूजन होते. जागर होतो तो या आदिशक्ती, आदिमायेचा. आश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत दुर्गापूजेचा उत्सव भारतात सर्वत्र कोणत्या ना कोणत्या प्रकारे साजरा केला जातो. यालाच नवरात्र असे म्हटले जाते. 

गुजरातमध्ये नवरात्राच्या काळात रास गरबा, दांडिया नृत्यांची परंपरा आहे. ही परंपरा अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही रुजली आहे. वास्तविक रास गरबा नृत्यशैली ही कृष्णलीलेतून आली आहे. मथुरा, वृंदावनमधील नृत्याची ही परंपरा आहे. नवरात्रोत्सवाशी ती चपखलपणे जोडली गेली आहे.

रास गरबा, दांडिया हा गुजरातमधील लोकप्रिय लोकनृत्य आहे. गुजरातमध्ये अंबामाता ही शक्तीची देवता तसेच सृजनाचे प्रतीक मानली जाते. यावेळी नवरात्राच्या काळात अंबिकेची पूजा केली जाते. तसेच गरबी म्हणजे छिद्र असलेला मातीचा कलश सजविला जातो. त्यावर त्रिशूळ, माताजी, स्वस्तिक इत्यादी विविध चित्रे काढली जातात. त्या कलशामध्ये (गरबी) ज्वारी टाकून मंगलदीप प्रज्वलित करतात. त्या कलशाची पूजा करून ती गरबी किंवा घडा घरासमोर मधोमध ठेवतात किंवा देवी अंबेची प्रतिमा मध्यभागी ठेवून त्याभोवती गोलाकार फिरून गाण्याच्या ठेक्‍यावर एकमेकांना टाळ्या देऊन केलेले नृत्य म्हणजेच गरबा होय. रास गरबा, दांडिया नृत्य करताना महिला, मुली पारंपरिक घागरा चोली आणि पारंपरिक पद्धतीचे दागिने यांना प्राधान्य देतात. पारंपरिक पेहरावात महिला, मुली, राजस्थानी बांधणीचा मोठा घेरवाला घागरा व ओढणी त्यावर आरसे, घुंगरू किंवा कवड्याचे वर्क याला पसंती देतात. घागरा चोलीला साजेसे असे ऑक्‍सिडाईजचे दागिने असतात. त्यात मोठे गळ्यातले, कानात मोठे झुमके, हातात मोठ्या आकाराचे कडे किंवा हातभर बांगड्या, दंडावर पांढऱ्या रंगाच्या बांगड्या, कमरबंद कड्याप्रमाणेच पायल, माथ्यावर बिंदी किंवा बोर असे अनेक प्रकार असतात. पुरुष पारंपरिक घेर असलेला केडिया धोती, गरबा स्टाइल कुर्ता, कवड्या, आरसे लावलेली रेडिमेड पगडी, हातामधील जाड कडे, कानात बाली, अशा पोशाखाला प्राधान्य देतात. या पेहरावात केशरी, लाल, हिरवा रंग मोठ्या प्रमाणात वापरले जातात. लयबद्ध हालचाली करत टिपऱ्यांचा नाद करत साकार होणारे हे नृत्य गुजरातमधील नवरात्रोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. समाजातील सर्व लोक या नृत्यात सहभागी होतात. रास गरबा आणि दांडिया या नृत्यामध्ये विविध प्रकार आहेत. कच्छी, लहरीया, सुरती, हुडो, पोपट, रमझनियू, नवटाली या प्रकारांबरोबर बेसिक दांडिया, डिस्को दांडिया, बॉम्बेस्टाईल दांडिया, चौपाली, मुनर, गुजराती आणि राजस्थानी पद्धतीचा पारंपरिक गरबा तसेच बॉम्बे स्टाइल गरबा, हिंदी गीतांवर आधारित दांडिया, जिम्नॅस्टिक आणि ॲरोबिक्‍सच्या स्टेपवरील गरबा दांडिया म्हणजेच न्यू गरबा असे अनेक प्रकार आहेत.

गरबा आणि दांडिया या नृत्य प्रकाराला काही नियम आहेत. गरब्यामध्ये टाळीचा वापर केला जातो. तर दांडीयामध्ये दांड्याचा (टिपऱ्यांचा) वापर केला जातो. डोडीया, हिज तसेच ताली, गरबा, तीन ताली हे गरब्याचे पारंपरिक प्रकार आहेत. ताली गरबा म्हणजे यात एक टाळी वाजवून खेळले जाते. आणि तीन तालीमध्ये तीन टाळ्या वाजवून खेळले जाते. गरबा खेळताना त्यात फ्री हॅंड मूव्हमेंट असतात. म्युझिकशिवाय दांडीयाला शोभा नाही. वेगवेगळ्या म्युझिक बीट्‌समुळे नवरात्रीच्या सेलिब्रेशनला चार चाँद लागतात. गरबा हा काही ठिकाणी पारंपरिक गुजराती गाण्यांच्या सुरावर व वाद्यांच्या तालावर खेळला जातो. तरीही बदलत्या काळानुसार त्याला मॉडर्न टच मिळत आला आहे. कुठे डीजेच्या दणदणाटात दांडिया रंगतो तर कुठे गरबा प्लस असा दांडिया असे फ्युजनही पहायला मिळतो. फाल्गुनी पाठकपासून ते दलेर मेहंदीच्या पंजाबी ठेक्‍यापर्यंत ताल धरले जातात. 

नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात गरबा आणि दांडिया प्रशिक्षण वर्ग सुरू होतात. दांडिया खेळता आले पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे पुरुष, महिला, तरुणाई खूप आवडीने आणि उत्साहाने याचे प्रशिक्षण घेतात. आजकाल दांडियाचे मोठ्या मैदानावर आयोजन केले जाते. जेवण्या खाण्यापासून सर्व गोष्टी उपलब्ध असतात. ग्रुप दांडिया, रास गरबा, बेस्ट कपल, बेस्ट वेशभूषा, बेस्ट नृत्य कौशल्य अशा अनेक स्पर्धा घेतल्या जातात. नवरात्रीला सध्या सार्वजनिक स्वरूप आले आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात रोज गरबा, दांडिया खेळायला जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सामूहिक मनोरंजनाबरोबरच परस्पर प्रेमाची बांधिलकी या नृत्यातून जपली जाते.  

संबंधित बातम्या