कृष्णा सोबतींचा ज़िन्दगीनामा 

नंदिनी आत्मसिद्ध 
गुरुवार, 31 जानेवारी 2019

स्मरण
हिंदीसह एकूणच भारतीय साहित्यजगतावर आपला लक्षणीय ठसा उमटवणाऱ्या लेखिका म्हणजे कृष्णा सोबती होय. आयुष्याच्या प्रदीर्घ कालखंडात काही विशिष्ट भूमिका घेऊन त्या लिहीत आल्या. स्वतःच्या लिखाणाबद्दल, ‘जो मैंने देखा जो मैंने जिया वही मैंने लिखा’ अशी साधी-सरळ भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. या लेखिकेचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या लेखनाविषयी.

हिंदीसह एकूणच भारतीय साहित्यजगतावर आपला लक्षणीय ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ लेखिका कृष्णा सोबती यांनी दिल्ली इथे २५ जानेवारी रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी शेवटचा श्‍वास घेतला. नव्वदी पार केली असली, तरी कृष्णाजी आणि त्यांची लेखणी अजिबात थकली नव्हती. अगदी अलीकडेपर्यंत त्यांचा हात लिहिता होता. त्यांनी लिहिलेली ‘छन्ना’ ही कादंबरी काही आठवड्यांपूर्वीच प्रकाशित झाली. ही खरे तर त्यांची पहिली कादंबरी. पण साठएक वर्षांपूर्वी ती प्रसिद्ध झाली, त्यावेळी प्रकाशकाने काही ठिकाणी तिच्या भाषेत बदल करून, वाक्‍यांची मोडतोड केली होती. हे लक्षात आल्यावर कृष्णाजींनी प्रकाशकाकडून ती काढून घेतली आणि कुलूपबंद करून ठेवली. पुढील काळात त्यांच्या इतर कादंबऱ्या येत गेल्या. पण ही कादंबरी प्रकाशित व्हावी, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यांनी तिच्यावर नव्याने हात फिरवला आणि ती मध्यंतरी प्रकाशितही झाली. स्वतःच्या लिखाणाबद्दलची त्यांची आग्रही जागरूकता यावरून दिसून येते. 

आयुष्याच्या प्रदीर्घ कालखंडात काही विशिष्ट भूमिका घेऊन त्या लिहीत आल्या. स्वतःच्या लिखाणाबद्दल, ‘जो मैंने देखा जो मैंने जिया वही मैंने लिखा’ अशी साधी-सरळ भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. ‘हशमत’ या पुरुषी नावानेही त्यांनी सुरुवातीला लेखन केले होते. व्यक्तिरेखा व निबंधपर स्वरूपाचे, स्त्रीपुरुषभेद मोडून काढणारे, ‘हम हशमत’ हे त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. ‘स्त्रीलेखक’ असा शिक्का त्यांना आवडत नसे. स्त्रीवादी मंडळींनाही त्यांनी अनेक बाबतीत काही मुद्द्यांवरून विरोध दर्शवला. पण त्या स्वतः विचाराने आणि कृतीनेही प्रभावी अशा स्त्रीवादी होत्या. 

फाळणीपूर्व काळातल्या पंजाब प्रांताच्या जवळ असलेल्या गुजरात भागात त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२५ रोजी झाला. तशी त्यांची मातृभाषा पंजाबी, पण त्यांनी लिखाण हिंदीतच केले. त्यांच्या भाषेला पंजाबी ढंगाचा आणि ग्रामीण संस्कृतीचा अनोखा असा स्पर्श आहे. त्यामुळे त्यांची भाषाशैली एक निराळाच गोडवा घेऊन येणारी ठरली. पंजाबी व उर्दू या भाषांमधील शब्द त्यांच्या लिखाणात अधूनमधून आढळत. विविध हिंदी बोलींचा गोडवा आणि ठसकाही या लेखनात उतरला. तेव्हाच्या प्रचलित पंडिती आणि तथाकथित ‘शुद्ध’ हिंदीपेक्षा ही शैली वेगळी होती. ‘बुनियाद’ या हिंदी दूरदर्शन मालिकेतल्या पात्रांच्या भाषेचा पंजाबी-हिंदी लहेजा कृष्णाजींच्या लिखाणावरूनच प्रेरित होता. स्त्रियांनी मर्यादेत राहूनच लिहायला हवे, या समजुतीला छेद देत त्यांनी लिहिले आणि पुढच्या पिढ्यांच्या लेखिकांना एक मार्ग मोकळा करून दिला, धैर्य दिले. 

स्त्रीच्या अंतरातली खदखद त्यांनी संयमित शब्दात मांडली; तरीही त्यातली तीक्ष्ण बोच विलक्षण बोलकी होती. त्यांचे सधन जमीनदार कुटुंबच होते.. फाळणी आणि त्यानंतर झालेल्या दंगली व उद्रेकाच्या वातावरणात या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. दिल्ली, सिमला अशा ठिकाणी त्यांचे वास्तव्य झाले. कृष्णा या पहिल्यापासून धीट आणि धाडसी स्वभावाच्या. त्यांच्या लिखाणातही हा गुण उतरला. त्यांना साहित्याची गोडी बालपणातच लागली. पुढे लेखनाकडे त्या स्वाभाविकपणे वळल्या, १९५० मध्ये त्यांची ‘लामा’ ही पहिली कथा छापून आली. 

त्यांची विशेष गाजलेली महत्त्वाची कादंबरी म्हणजे ‘मित्रो मरजानी’ ही होय. पाशो एक अल्लड, अस्थिर मनाची तरुणी आहे. तर मित्रो स्वतंत्र बाण्याची संसारी स्त्री आहे. आपल्या लैंगिक जाणिवा, शारीरिक गरजा याबद्दल तिच्या अपेक्षा अपूर्ण आहेत. विवाहित स्त्रीच्या लैंगिक संवेदनांबद्दल बोलणारी ही कादंबरी १९६६ मध्ये लिहिली गेली. मित्रो स्वतःच्या शारीरिक-मानसिक सुखाबद्दल जागरूक आहे. आपण या गोष्टीला वंचित आहोत, हे तिला डाचत राहते. ती त्याबद्दल आपली सासू व जाऊ यांच्यापाशी उघडपणे बोलते. नवऱ्यापासून मूल झाले तरच त्याला औरस का समजायचे, असा प्रश्‍नही ती विचारते. ती मर्यादेबाहेर जाऊन वागते, ती कुलटा आहे अशी तिच्यावर टीका होते. स्त्रीचे हे रूप त्यावेळी साहित्यात नवीन होते. पण अखेरीस मित्रो कुटुंबाची निवड करते, या मुद्द्याला धरून पुढच्या काळात स्त्रीवाद्यांनी तिच्यावर टीका केली. स्त्रीवादाची जाणीव रुजायच्या पूर्वीच्या काळातली ही कादंबरी आहे, हेही इथे लक्षात घ्यायला हवे. कृष्णाजींनी या टीकेवर एवढेच म्हटले आहे, ‘ही कादंबरी म्हणजे लेखिकेची गोष्ट नव्हती. ती मित्रोची गोष्ट होती.’ 

त्यांची ‘डार से बिछुड़ी’ ही कादंबरी १९५६ मध्ये प्रकाशित झाली. इंग्रजी आक्रमणाच्या काळाची (१८४९) पार्श्‍वभूमी लाभलेली ही कादंबरी आहे. तत्कालीन नीतिनियमांच्या आणि पुरुषवर्चस्वाच्या वातावरणात पाशो या तरुणीची जीवनकहाणी निरनिराळ्या वळणांनी जात राहते त्याचे वर्णन यात आहे. वडील गेल्यानंतर आईने शेख घराण्यातल्या मनुष्याशी विवाह केल्याने यातली पाशो आपल्या आजोळी राहत असते. वयात येणाऱ्या पाशोवर हळूहळू बंधने लादली जातात. आईने पाप केल्याबद्दलचे टोमणे तिला सतत ऐकावे लागतात. आईला भेटावे असे तिला फार वाटते, पण तिला ते धाडस होत नाही. मामी आपल्याला विष घालेल याचा संशय पाशोच्या मनात येतो आणि ती एके रात्री आईच्या घराचे दार ठोठावते. ती तिला घरात घेते, आईचा नवरा पाशोला चांगले वागवतो. आईचा मुलगा तिला सख्ख्या भावाप्रमाणेच वाटतो. पण दुसऱ्या दिवशी मामा येऊन तिला घेऊन जाण्याच्या आत शेख तिला दुसरीकडे हलवतात. तिचे दिवानांच्या घराण्यात लग्न लावून दिले जाते. नवरा वयाने मोठा असूनही पाशो आनंदात राहते. तिला मुलगाही होतो. पण नवऱ्याच्या मृत्यूमुळे तिच्या आयुष्याला पुन्हा वेगळे वळण मिळते. तशात दीर तिच्यावर वाईट नजर ठेवतो वगैरे... अखेरीस पाशो आपल्या आईपाशी येऊन पोचते. तिच्या मुलालाही दिवानांकडून आणण्यात येते आणि पाशो एका दीर्घ ताटातुटीनंतर आईच्या जवळ येते, फांदीपासून विलग झालेले फूल पुन्हा फांदीच्या आधाराला येते. 

‘ज़िन्दगीनामा’ला महाकादंबरीचा पट आहे. लेखिकेने लहानपणी पाहिलेले पंजाबी गावातले जीवन आणि संमिश्र संस्कृती असलेल्या समाजाचे दर्शन त्यातून घडते. विभिन्न तऱ्हेच्या कैक व्यक्तिरेखा यात आहेत, पण त्यांचे नाते आतून घट्ट आहे. त्यांच्यात भांडणे होतात, मतभेद होतात, मात्र तरीही नाते तुटत नाही. फाळणीपूर्व पंजाब-गुजरातच्या सीमेवरचे ग्रामीण जीवन, शेतमजूर, जमीनदार यांच्या जीवनाचे चित्रण यात आहे. प्रेमचंद यांच्यानंतर ग्रामीण भारताचे इतके अस्सल, सरस व उत्कट वर्णन याच कादंबरीत वाचायला मिळते. एकदा पहाटेच्या वेळी आपल्या कानावर आलेल्या अज़ानच्या स्वरांनी मनात बालपणी पाहिलेला तो माहौल जागा झाला आणि या कादंबरीचा विषय सुचला, असे कृष्णाजींनी एके ठिकाणी म्हटले आहे. या कादंबरीला १९८० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. कादंबरीच्या शीर्षकावरून अमृता प्रीतम आणि कृष्णा सोबती यांच्यातला वाद कोर्टात गेला. मात्र त्यात सोबती यांची हार झाली. 

त्यांच्या कादंबऱ्यांचे विषय विभिन्न आहेत. ‘यारों के यार’ ही कादंबरी दिल्लीतल्या सरकारी कार्यालयातल्या कारकुनांची कहाणी सांगते, तर ‘तीन पहर’मध्ये दार्जिलिंगच्या परिसरातली रोमॅंटिक कथा आहे. ‘सूरजमुखी अंधेरे के’ ही बाल लैंगिक अत्याचारावर आहे, तर ‘ऐ लड़की’ ही कथा म्हणजे मृत्युपंथाला लागलेली आई व मुलगी यांच्यातील संवाद आहे. ‘दिल ओ दानिश’ हीसुद्धा त्यांची बहुचर्चित कादंबरी आहे. विसाव्या शतकातील दिल्लीत घडणारी दोन स्त्रिया व एक पुरुष यांच्यातल्या संबंधांची ही कहाणी आहे. या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद The Heart Has Its Reasons नावाने प्रसिद्ध झाला असून, त्याला २००५ मध्ये ‘कथा बुक्‍स’तर्फे अनुवादासाठीचा क्रॉसवर्ड पुरस्कार मिळाला होता. तर ‘समय सरगम’ कादंबरीत वृद्धत्वाचा विषय आहे. 

कृष्णाजींनी फाळणीचा काळ पाहिला आणि त्यानंतरचा कोलाहलही. फाळणीने एका देशाचे दोन देश झाले आणि भारत-पाकिस्तान हे द्वंद्व जन्माला आले. या द्वंद्वाचे पडसाद अजूनही उमटताहेत, वेगवेगळे पेचप्रसंग अन्‌ संघर्षाचे दुवे त्यातून रुजताहेत. फाळणी आणि त्यानंतरचा अनुभव चित्रित करणारी आत्मचरित्रात्मक कादंबरी कृष्णा सोबती यांनी मध्यंतरी लिहिली. ‘गुजरात पाकिस्तान से, गुजरात हिंदुस्तान’ हे तिचे शीर्षक आहे. आपली जन्मभूमी सोडून येतानाच्या प्रवासात आधी दिल्लीपर्यंत आणि त्यानंतर नोकरीसाठी म्हणून इथल्या गुजरातपर्यंत पोचल्या. या सगळ्या उलथापालथीच्या काळाची ही कहाणी. फाळणीच्या काळातील आपल्या मुळांपासून उखडले गेलेले निर्वासितजन, त्यांच्या डोळ्यांतली वेदना आणि त्यांच्या डोक्‍यावर असलेले निरनिराळ्या ओझ्यांचे गाठोडे हे सारे त्यांनी यात चित्रित केले आहे. स्वतःचे जन्मस्थान असलेले पाकिस्तानातील गुजरात आणि नंतरचे लाहौरमधले घर सोडताना आता पुन्हा कधी इथे यायला मिळेल का, अशीच वेदना मनात घेऊन लेखिकेने त्या भूमीचा निरोप घेतला. त्याबद्दल त्या लिहितात... ‘बहती हवाओं, याद रखना हम यहाँ रह चुके हैं...’ या पुस्तकाचे शीर्षक ‘गुजरात’ या नावातले साम्य दाखवणारे असले, तरी अलीकडच्या काळात भारत आपल्या निधर्मी वैशिष्ट्यापासून दूर जाऊन, पाकिस्तानचे अनुकरण करत आहे, असेही त्यातून कृष्णाजींना सुचवायचे होते. फाळणीच्या आपण एक बळी आहोत, अशी भावना मात्र त्यांनी कधी बाळगली नाही आणि ती त्यांच्या लिखाणातही दिसत नाही. 

स्वतःची ठाम मते बाळगणाऱ्या कृष्णाजींनी २०१५ मध्ये पुरस्कार वापसीच्या मोहिमेत उडी घेतली होती आणि देशातील बुद्धिवंतांच्या हत्यांच्या निषेधार्थ आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत केला होता. सरकारी सन्मान लेखकाच्या विवेकबुद्धीवर परिणाम करतात अशी धारणा असल्यामुळे, २०१० मध्ये त्यांनी ‘पद्मभूषण’ स्वीकारण्यास नकार दिला होता. प्रादेशिक अस्मितेच्या नावाखाली चालणाऱ्या गुंडशाहीच्याही त्या विरोधात होत्या. चारेक पिढ्यांची साक्षीदार असलेली ही संघर्षशील लेखिका आता काळाच्या पडद्याआड गेली आहे. कृष्णाजी म्हणत, ‘हजार सूर्यास्त पहिले आहेत.’ लेखनकृतींमधून पसरलेले त्यांचे जीवनाचे आकलन आणि त्यातून प्रतीत होणारी त्यांची जीवनदृष्टी नेहमीच वाचकांना खुणावत राहणार आहे. सूर्यासारख्याच प्रखर आणि इंद्रधनुषी भाषाशैलीच्या या लेखिकेचा अस्त झाला आहे, पण तिच्या लेखणीचा प्रकाश यापुढेही वचकांची मने उजळत राहील...

संबंधित बातम्या