कारवाँ गुजर गया...

विजय तरवडे
शुक्रवार, 27 जुलै 2018

स्मरण
 

बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहापासून स्वयेंचि दूर झालेल्या ‘नीरज’ ऊर्फ गोपालदास सक्‍सेना यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. नीरज बॉलिवूड सोडून गेले असले तरी एका सबंध पिढीच्या मनात घर करून होते आणि ती पिढी त्यांना अजूनही विसरली नाही याची सुखद प्रचिती आली. या पिढीने नीरजवर प्रेम करण्याला कारणे देखील तशीच उत्कट आहेत. समकालीन चित्रपटगीतकारांच्या लेखनाभोवती कठीणतम उर्दू शब्दांचे वलय किंवा सामाजिक बांधीलकी वगैरेचा दबदबा असे. नीरजच्या कविता आणि गीतलेखनात एक साधे देखणेपण आणि वैयक्तिकपण होते. नीरजच्या नावासोबत कॉलेजच्या आठवणी हटकून येतात. देव आनंद उतरणीला लागणार होता. बऱ्याच तपश्‍चर्येनंतर राजेश खन्ना आणि किशोरकुमारना लोकप्रियतेचा फॉर्म गवसला होता. अनेक वर्षे सुंदर कविता आणि गीते लिहिणाऱ्या नीरजना देखील १९७० नंतर यशाचा खराखुरा स्पर्श झाला. राज कपूरच्या ‘नाम जोकर’ साठी त्यांनी ‘ए भाय, जरा देखते चलो’ ही मुक्तछंद कविता लिहिली आणि शंकर-जयकिशन जोडीने तिचे हीट गाण्यात रूपांतर केले. देव आनंदने ‘प्रेमपुजारी’ मध्ये संधी दिली. सिनेमा पडला. पण नीरजनी लिहिलेल्या प्रत्येक गाण्याचे एस. डी. बर्मन यांनी सोने केले.
‘जोकर’ चित्रपटातमधल्या एका गाण्यात नीरज म्हणतात,

‘धक्के पे धक्का, रेले पे रेला, 
है भीड इतनी पर दिल अकेला’.

हळव्या मनाला गर्दीतही जाणवणारं एकाकीपण ! हे एकाकीपण ‘प्रेमपुजारी’ मधल्या शृंगारगीतात वेगळ्या गुलाबी रंगात अवतरतं -

‘छोटा सफर हो, लंबा सफर हो, 
सूनी डगर हो या मेला,
याद तू आए, 
मन हो जाए भीड के बीच अकेला’

त्याच सिनेमातल्या एका गाण्यात मात्र ते म्हणतात,

‘याद अगर वो आए, ऐसे कटे तनहाई
सूने शहर में जैसे बजने लगे शहनाई’

या हलक्‍या पुनरुक्तीतला नीरज यांचा वैयक्तिक स्पर्श (पर्सनल टच) चाहत्यांना स्वतःशी जोडून घेतो.  ‘प्रेमपुजारी’ चित्रपटातल्या सगळ्याच गाण्यांमधल्या अनोख्या शब्दकळेने आमच्या पिढीचे लक्ष वेधून घेतले. ती गाणी हीट झाल्यावर प्रकाशकांनी मोठ्या त्वरेने नीरजचा ‘तुम्हारे लिए’ हा कवितासंग्रह बाजारात आणला. त्यावेळी आठ कप चहा किंवा सिनेमाच्या बाल्कनीच्या तिकिटाच्या किमतीत म्हणजे अवघ्या दोन रुपयात ‘तुम्हारे लिए’ उपलब्ध होता. नंतरच्या काळात चंद्रशेखर गोखले वगैरेंची पुस्तके जशी तरुणांनी खरेदी केली तसा तो संग्रह आम्ही बाळगला. ‘तुम्हारे लिए’ लोकप्रिय झाल्यावर पाठोपाठ ‘कारवाँ गुजर गया’ हा कवितासंग्रह बाजारात आला. त्याची किंमत अवघी एक रुपया होती. ही दोन्ही पुस्तके वाचल्यावर लक्षात आले, की नीरज कोणी नवोदित कवी नसून जुने कवी आहेत. अनेक वर्षांपासून ते लेखन करीत आहेत. मधुबालासारखी नटी भारतभूषणची नायिका म्हणून झळकते आणि महंमद रफींनी गायलेली रोशनची अनेक सुंदर गाणी भारतभूषण-प्रदीपकुमारच्या मुखातून पडद्यावर साकार होतात. तद्वत नीरजची अनेक सुंदर गीते अशाच नायक-नायिकांच्या सिनेमांसाठी वापरली गेली.

नीरजची सर्वतोमुखी पोचलेली कविता-गाणे म्हणजे ‘कारवाँ गुजर गया’. यातल्या सर्वच ओळी अप्रतिम आहेत. एक कडवे उदाहरणादाखल देतो,

‘नींद भी खुली न थी, कि हाय धूप ढल गयी,
पांव जबतलक उठे, कि जिंदगी फिसल गयी,
पात पात झर गए, कि शाख शाख जल गयी,
चाह तो निकल सकी, न पर उमर निकल गयी.
गीत अश्‍क बन गए, छंद हो दफन गए,
और हम रुके रुके मोड पर झुके झुके,
उम्र के चढाव का उतार देखते रहे,
कारवाँ गुजर गया गुबार देखते रहे.

तेव्हा सर्रास प्रचलित असलेल्या पुणे-लोणावळा सहलीत मुलामुलींनी आपापल्या पुस्तकात बघून कोरसमध्ये हे गाणे गायले होते. मात्र हे इतके सुंदर गाणे ‘नयी उमर की नयी फसल’ या सिनेमात कोणा राजीव या नटासाठी लिहिलेले होते. याच सिनेमातले नीरजचे दुसरे गीत मात्र किंचित भाग्यवान. कारण ते तनुजाच्या प्रियाराधनार्थ आहे.

‘सांस की तो बहुत तेज रफ्तार है,
और छोटी बहुत है मीलन की घडी,
गुंथते गुंथते यह घटा सावरी,
बुझ न जाये कहीं रूप की फुलझडी
चूडियाँ ही न तुम खनखनाती रहो, 
यह शर्मसार मौसम बदल जायेगा.

‘चा चा चा’ सिनेमासाठी नीरजनी लिहिलेले ‘सुबह न आयी, शाम न आयी, जिस दिन तेरी याद न आयी...’ हे गाणे कोणी चंद्रशेखर नायक हेलनसाठी गातो.

‘तुम मिल जाते तो हो 
जाती पुरी अपनी रामकहानी,
खंडहर ताजमहल बन जाता, 
गंगाजल आँख का पानी,
सांसों ने हथकडी लगायी, याद न आयी,
सुबह न आयी, शाम न आयी, 
जिस दिन तेरी याद न आयी,’

त्याच सिनेमातलं ‘वो हम न थे वो तुम न थे, वह रहगुजर थी प्यार की लुटी जहाँ पे बेवजह पालकी बहार की’ हे गाणं असंच आवडलेलं. चाल गुणगुणायला कठीण असली तरी शब्द अतिसुंदर.

‘यह कौनसा मुकाम है,
फलक नहीं जमीं नहीं
दि शब नहीं सहर नहीं
कि गम नहीं खुशी नहीं
कहाँ यह लेके आ गयी शमा तेरे दयार की
लुटी जहाँ पे बेवजह पालकी बहार की

‘प्रेमपुजारी’नंतर आलेला ‘तेरे मेरे सपने’ नीरजच्या पदरात यशाचे पूर्ण माप टाकून गेला. ‘तेरे मेरे सपने’ सर्वच गाणी वाचकांना ठाऊक असतील. त्यांची यादी देत नाही. एकाच गाण्यातील ओळींची आठवण देतो. नायिकेला दिवस गेले आहेत. बाळाच्या प्रतीक्षेचे हळवे क्षण नीरजनी गाण्यात अतिशय टोकदारपणे आणि त्याच वेळी हळुवारपणे पकडले आहेत -

‘वह तेरा होगा, वह सपना मेरा होगा
मिलजुलके मांगा वो तेरा मेरा होगा
जब जब वो मुस्कराएंगा, सवेरा होगा
थोडा हमारा, थोडा तुम्हारा, आएगा फिरसे बचपन हमारा...

यापाठोपाठ देव आनंदचे ‘छुपा रुस्तुम’ आणि ‘गॅम्बलर’ हे दोन सामान्य सिनेमे आले आणि गेले. पण ‘गॅम्बलर’साठी लिहिलेले ‘दिल आज शायर है’ हे गाणे अनेक दिवस स्मरणात आणि हॉटेल्सच्या ज्यूट बॉक्‍सेसमध्ये राहिले. त्यातल्या दोन ओळीतील उपमा अगदी वेगळ्या आहेत...

‘आके जरा देख तो, 
तेरी खातिर हम किस तरह से जिए
आँसू के धागे से सीते रहे हम, 
जो जख्म तूने दिए.

शशी कपूर आणि राखीचा ‘शर्मिली’ चित्रपट मिळाला तेव्हा त्याही संधीचे नीरजनी सोने केले. चित्रपटांसाठी आवश्‍यक असलेली सोपी भाषा वापरूनदेखील कवितेच्या जवळ जाणारे गाणे रचता येते हे सिद्ध केले.

कल रहे न रहे मौसम यह प्यार का,
कल रुके न रुके डोला बहार का
चार पल मिले जो आज, प्यार में गुजार दे

नीरजची अशी अनेक चित्रपटगीते सर्वश्रुत आहेत. ती लोकप्रियतेच्या लाटेवर असताना त्यांच्या गीतांचे आणि कवितांचे संकलन असलेली पुस्तके पुन्हा पुन्हा बाजारात येत होती. त्यातून नीरजच्या कविता, मुक्तके, दोहे, गझलादेखील वाचकांपर्यंत पोचत होत्या. त्यातल्या काहींची फक्त चुणूक दाखवतो.

इसलिये तो नगरनगर बदनाम 
हो गए मेरे आँसू मैं उनका हो गया, 
कि जिनका कोई पहरेदार न था
नीरजचे काही शेर - खास आणि शुद्ध हिंदी
अब के सावन में ये शरारत मेरे साथ हुई,
मेरा घर छोड़ के कुल शहर में बरसात हुई.
आप मत पूछिए क्‍या हम पे सफ़र में गुजरी?
था लुटेरों का जहाँ गाँव, वहीं रात हुई.
जब चले जाएंगे हम लौट के सावन की तरह
याद आयेंगे प्रथम प्यार के चुंबन की तरह. 
ज़िक्र जिस दम भी छिडा उनकी गली
जाने शरमाए वो क्‍यूं गाँव की दुल्हन की तरह.

जवळचे संगीतकार मित्र जयकिशन आणि सचिनदा यांच्या निधनानंतर एकाकीपणाच्या भावनेपोटी नीरज बॉलिवूड सोडून ते उत्तर प्रदेशमध्ये परतले. पण ते बॉलिवूडच्या निमित्ताने असंख्य अहिंदी वाचकांपर्यंत पोचले होते आणि त्यांच्या ह्रदयात वसले होते. रसिकांनी यांचे चीज केले आणि सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण किताब देऊन गौरविले. आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्या कविता, गाणी आपल्यासाठी जपून ठेवणार असले तरी त्यांच्या निधनानंतर जे तीव्रतेने वाटले ते त्यांचाच शब्दात सांगायचे तर...

और उसके बाद...
रहता है जो कुछ वो
खाली खाली कुर्सिया हैं
खाली खाली तंबू हैं
खाली खाली डेरा है
वीरान चिडियाका बसेरा है
न तेरा है न मेरा है.

संबंधित बातम्या