अस्तित्वाचा झगडा 

डॉ. श्रीकांत कार्लेकर 
मंगळवार, 29 जानेवारी 2019

विशेष
समुद्रकिनाऱ्यावरची खारफुटी ही एक अतिसंवेदनशील अशी पाणथळी आहे. किनाऱ्यांवरील खाड्या, नदीमुखे आणि लहान-मोठ्या आखातात इतकी वर्षे अतिशय दिमाखात वाढणाऱ्या या पाणथळी आज स्वतःच्या अस्तित्वासाठी अक्षरशः झगडत आहेत. किनारी प्रदेशात पर्यटन आणि विकासाच्या नावाखाली जो अनिर्बंध आणि बेलगाम हस्तक्षेप वाढतो आहे त्याला तोंड देणे या पाणथळींना दिवसेंदिवस फारच कठीण होत आहे...

भूजल किंवा पृष्ठजलामुळे, कायमस्वरूपी किंवा ठराविक कालांतराने संपृक्त होणाऱ्या भूभागास पाणथळ प्रदेश (Wetland) असे म्हटले जाते. समुद्रकिनारी असलेल्या खाड्या, खाडीमुखे, भरती - ओहोटी दरम्यान आढळणारे दलदलयुक्त प्रदेश, त्रिभुज प्रदेश, नदीकाठची पूर मैदाने अशा सर्व भूभागास पाणथळ प्रदेश म्हणतात. जलसंपृक्त प्रदेशांत वाढू शकतील अशा वनस्पती पाणथळ भागात प्रकर्षाने आढळतात. पाणथळ प्रदेश जगातल्या सर्वाधिक उत्पादक अशा परिसंस्था आहेत. आजूबाजूच्या पर्यावरणाशी जुळवून घेणाऱ्या  अतिसंवेदनशील अशा या परिसंस्था अनेक जिवांचे उत्तम अधिवास आहेत. भारतातील सर्वच पाणथळ प्रदेशांनी संपन्न अशी जैवविविधता जोपासली आणि जपली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत मानवी हस्तक्षेपामुळे त्यांची अतोनात हानी झाली आहे. 

समुद्रकिनाऱ्यावरची खारफुटी (Mangroves) ही एक अतिसंवेदनशील अशी पाणथळी आहे. वन आणि पर्यावरण मंत्रालयाने  प्रसिद्ध केलेल्या अहवालात, देशाच्या किनारपट्टीच्या प्रदेशातील खारफुटी वनांच्या (Mangrove Forests) प्रमाणात मोठी घट झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. भारताच्या संपूर्ण किनाऱ्यावर अनेक ठिकाणी खारफुटीचे पाणथळ प्रदेश आढळतात. किनाऱ्यावरील खाड्या, नदीमुखे आणि लहान-मोठ्या आखातात इतकी वर्षे अतिशय दिमाखात वाढणाऱ्या या पाणथळी आज स्वतःच्या अस्तित्वासाठी अक्षरशः झगडत आहेत. किनारी प्रदेशात पर्यटन आणि विकासाच्या नावाखाली जो अनिर्बंध आणि बेलगाम हस्तक्षेप वाढतो आहे त्याला तोंड देणे या पाणथळींना दिवसेंदिवस फारच कठीण होत आहे. 

या वनांच्या संधारणाच्या आणि रक्षणाच्या अनेक योजना सरकार दरबारी कागदांच्या ढिगाऱ्यात बंदिस्त आहेत. प्रत्यक्षात खारफुटींची अवस्था अगदी दयनीय झाली आहे. स्थानिक लोकांनाही बहुधा या निसर्गदत्त संपत्तीचे आता फारसे महत्त्व वाटेनासे झाले आहे. सगळ्या किनाऱ्यावर, ‘लाकूडफाटा देणारी झाडे’ यापलीकडे स्थानिकांच्या लेखी या वनस्पतींचे काहीही महत्त्व उरलेले नाही. या वनांच्या ऱ्हासाला आपणच जबाबदार आहोत हे मान्य करण्याच्या मनःस्थितीत कोणीही नाही अशी आजची अवस्था आहे. 

आपल्या कोकण किनाऱ्यावर वैतरणा, उल्हास, कुंडलिका, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, काजळी, मुचकुंदी, गड आणि कार्ली या सर्व मोठ्या नद्यांच्या खाडीमुखात कमीअधिक प्रमाणात खारफुटीची झाडे आणि जंगले आढळतात. याशिवाय केळशीजवळील भारजा किंवा आंजर्ले येथील जोग अशा अनेक लहान नद्यांच्या मुखाच्या प्रदेशात आणि श्रीवर्धन, म्हसळा, जैतापूर यासारख्या खाड्यातील बेटांवर भरपूर खारफुटीचे पाणथळ प्रदेश दिसून येतात. 

भारतात दिसणारी खारफुटी, त्रिभुज प्रदेश, खाड्या, उपसागरांचे किनारे अशा विविध प्रदेशात आढळते. पूर्व किनाऱ्यावर गंगा, ब्रम्हपुत्रा, महानदी, गोदावरी, कृष्णा या नद्यांच्या मुखात ही वने आढळतात. पश्‍चिम किनाऱ्यावर नर्मदा तापीची मुखे, कच्छ सौराष्ट्राचा किनारा, डहाणू, पालघर, रेवस इथल्या खाडी प्रदेशात या वनांची चांगली वाढ दिसून येते. 

पाणथळीतील खारफुटीची सर्व वने लाटांना विरोध करून, त्यांचा जोर कमी करून किनाऱ्याची झीज होऊ न देण्याचे काम अगदी समर्थपणे करीत असतात. वादळे, त्सुनामी, भरतीच्या लाटा यापासून या पाणथळी किनाऱ्याचे नेहमीच रक्षण करतात. शिवाय फ्लेमिंगो व इतर पक्षी, जलचर, मासे यांच्यासाठीही ती फार महत्त्वाची वसतिस्थाने आहेत. अनेक जलचरांसाठी आणि मत्स्य प्रकारांसाठी ही वने अन्नसाठ्याची व पोषणाची ठिकाणे म्हणून काम करतात. स्थलांतर करून येणाऱ्या अनेक पक्ष्यांचे, ही वने म्हणजे माहेरघरच असते. खाडीत जमिनीकडून येणारे प्रवाह, त्यातील गाळ आणि त्यातून वाहत येणारी पोषकद्रव्ये यांचा अतिशय उत्तम समतोल ही झाडे राखतात. किनाऱ्यावरील पारंपरिक घरबांधणी, होड्या व जहाजांची बांधणी यासारख्या उद्योगात या झाडांच्या खोडाचा उपयोग करता येतो. उत्तम जळाऊ लाकूड म्हणूनही त्यांचा उपयोग होतो. 

इतर ठिकाणांप्रमाणेच कोकणातही खारफुटीच्या बऱ्याच जातींचा वापर अनेकविध प्रकारे केला जातो. त्यांची फळे, पाने व पाला खाण्याजोगी असली, तरी ती केवळ अन्नतुटवड्यासारख्या परिस्थितीतच खाल्ली जातात. काहीतून तेल तर काही फळातून मध घेतला जातो. गुरांसाठी चारा म्हणूनही काही ठिकाणी खारफुटी वनस्पती वापरली जाते. 

किनाऱ्यावरील भरती-ओहोटी प्रदेशात असलेल्या चिखलयुक्त मातीत या पाणथळी विकसित होतात. चिखलयुक्त ओलसर जमीन, लाटांच्या माऱ्यापासून दूर सुरक्षित खाडीमुखांचा भाग, निमखारट पाणी अशी परिस्थिती यांच्या वाढीस आदर्श असते. चार मीटरपेक्षा जास्त भरती-ओहोटी तफावत असलेल्या किनारी भागात ती अधिक सहजतेने व घनदाट वाढतात. खारफुटी झाडांची मुळे खूप खोलवर नसतात. जमिनीच्या खारटपणामुळे ती निमुळतीही असतात. ही मुळे खोडाच्या खालच्या भागापासून बाहेर पडून जमिनीत घुसणारी (Stilt roots) किंवा खोडाच्या वरच्या भागापासून अथवा फांद्यांतून खाली येणारी (Drop roots) या प्रकारची असतात. काही वेळा जमिनीत आडव्या पसरलेल्या शाखांतून मुळे वर येताना दिसतात. त्यांना श्‍वसन मुळे (Breathing roots) म्हटले जाते. नवीन झाडांचे अंकुरण झाडावरच होते. इथेच नवीन बीजके वाढतात व खाली पडल्यावर वाढीस योग्य जमिनीत वाढू लागतात. 

पाणथळीतील ही वने परिसर संवेदनशील असल्यामुळे व विशिष्ट परिस्थितीतच वाढत असल्यामुळे या वनांचा समावेश CRZ (कोस्टल रेग्युलेशन झोन) मध्ये करून खारफुटीच्या वापरावर निर्बंध घातले गेले आहेत. त्यांच्या विनाश व ऱ्हासास आळा बसावा हा यामागचा मुख्य उद्देश होता. पण या निर्बंधाचा कुठेही फारसा उपयोग झालेला दिसत नाही. अनिर्बंध वापर, संधारण व रक्षणाचे अपुरे व काही अंशी चुकीचे व्यवस्थापन, राजकीय हस्तक्षेप, CRZ चे नियम धाब्यावर बसवून खारफुटी तोडून केलेली बांधकामे यामुळे या वनांचे प्रमाण सतत कमीच होते आहे.  किनाऱ्यावरील अनेक शहरांसाठी खारफुटीचे प्रदेश म्हणजे सांडपाणी सोडण्याच्या सोईस्कर जागा झाल्या आहेत. खारभूमी विकास योजनांमुळेही रेक्‍लमेशन करण्याच्या प्रयोगात ही वने मोठ्या प्रमाणावर नाहीशी झाली आहेत. संथ गतीने होणाऱ्या समुद्र पातळीतील वाढीमुळे नैसर्गिकपणे हे पाणथळ प्रदेश अस्तित्वासाठी जमिनीच्या दिशेने सरकत असतात. यासाठी सध्याच्या खारफुटी वनांच्यामागचा म्हणजे जमिनीकडील भाग पूर्णपणे मोकळा ठेवणे आवश्‍यक आहे असे आम्ही केलेल्या अभ्यासातून लक्षात आले आहे. मात्र अनेक राज्यांच्या किनाऱ्यावर अशा जागा आता उरलेल्याच नाहीत. जिथे खारफुटी वने तोडून तथाकथित विकासकामे बिनबोभाट चालू आहेत, तिथे वनांच्या मागे मोकळ्या जागा ठेवाव्यात ही  अपेक्षा करणेच व्यर्थ आहे. 

पाणथळीतील खारफुटीच्या उंच व दाट वाढीचा, भरपूर जैवविविधता असलेला, मध्यवर्ती गाभा विभाग (Core Area) निव्वळ संवर्धन व संधारणाकरता आरक्षित करणे शक्‍य आहे. गाभा प्रदेशाच्या आजूबाजूचा, झाडांची थोडी कमी घनता असलेला भाग, संक्रमण विभाग (Buffer Zone) म्हणून मर्यादित करून इथल्या झाडांचा बांधकामासाठी, जळाऊ लाकूड म्हणून आणि औषधी वनस्पती म्हणून स्थानिकांना वापर करता येईल. खारफुटीच्या नवीन जातींच्या रोपणाचे प्रयोगही याच विभागात करता येतील. खारफुटीसंबंधी संशोधन केंद्रही याच विभागात उभारता येईल. संक्रमण विभागाच्या बाहेरचे क्षेत्र बहुउद्देशीय उपयोगाचे म्हणून वापरता येईल. हे क्षेत्र वस्त्यांच्या जवळ असेल. खारफुटीवर आधारित काही उद्योगांना इथे चालना देता येईल. 

आजही या पाणथळींचा गाभा प्रदेश अनेक ठिकाणी त्याच्या दुर्गमतेमुळे अस्पर्शित व माणसाच्या हस्तक्षेपापासून दूर आहे. भविष्यातही तो तसाच ठेवणे गरजेचे आहे. अशा तऱ्हेचे प्रारूप प्रभावीपणे वापरून अनेक खारफुटी पाणथळींचे रक्षण करणे शक्‍य होईल. 

खारफुटी पाणथळींची ही संपन्न नैसर्गिक संपदा वाचविण्यासाठी कठोर नियमाचे पालन होणे गरजेचे आहे. अनेक खाडीमुखात जी खारफुटीची बने आहेत, त्यांच्या रक्षणासाठी व माणसांकरता मर्यादित उपयोगासाठी त्यांना बायोस्फिअर रिझर्व्हचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणेही आवश्‍यक आहे. मात्र त्यासाठी खारफुटी पाणथळींतून खारफुटी वनांची जी हकालपट्टी चालू आहे ती तातडीने थांबविणे आवश्‍यक आहे. असे केले तरच या अमूल्य पाणथळींचे किनाऱ्यावरील अस्तित्व टिकून राहील यात शंका नाही.  

संबंधित बातम्या