पुण्याची शतकी चव

आशिष तागडे
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

अमृततुल्य
पुण्याच्या इतिहासात मानाचे पान म्हणून विशेष उल्लेख करता येईल अशी बाब म्हणजे ‘अमृततुल्य.’ केवळ नाव उच्चारताच वाफाळणारा आणि मसालेदार चव असलेला चहा पिण्याची इच्छा होती. पुण्याच्या ‘अमृततुल्य’ची परंपरा शतकात पदार्पण करत आहे. या ‘आद्य’ अमृततुल्याचा घेतलेला आढावा....

सकाळी सकाळी वाफाळणारा चहा समोर आला आणि त्याला नकार देणारी व्यक्ती दुर्मिळच. चहाचे कट्टे ओसंडून वाहत गप्पांचा फड अनेक ठिकाणी रंगलेला दिसतो. पुण्यातील ‘अमृततुल्य’ही त्याला अपवाद नाही. या ‘अमृततुल्य’ला शतकी परंपरा लाभली आहे. आता गल्लोगल्ली दर दहा-पंधरा फुटांवर चहाच्या टपऱ्या दिसत आहेत. परंतु अमृततुल्यची सर या चहात नाही. आजही अनेक पुणेकरांची सकाळ अमृततुल्य चहाने होते. भले घरी चहा पिणे बंद केले असेल, मात्र अमृततुल्यचा वाफाळता चहा समोर आला, की भल्याभल्यांना मोह आवरत नाही.

व्यवसायाचा प्रारंभ
पुण्यात व्यवसायाच्या निमित्ताने राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातून श्री माळी ब्राह्मण समाजातील लोक पुण्यात आले. पौरोहित्य आणि काही प्रमाणात आचारी काम असे त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप होते. पौरोहित्यच्या जोडीला काळाची गरज म्हणून पुण्यामध्ये २७ जुलै १९२४ मध्ये लक्ष्मी रस्त्यावर आताच्या सोन्या मारुती चौकात पहिले अमृततुल्य सुरू झाले. या अमृततुल्यची भवानीशंकर आणि विश्‍वनाथ नर्तेकर यांनी सुरू केली. विशिष्ट पद्धतीची मांडणी, आपल्या समोर उकळत असलेला चहा सारे काही अवर्णनीय होते. सकाळी साडे चारला पहिला चहा उकळायचा. खास विकसित केलेला मसाला, उच्च प्रतीचे दूध आणि स्वच्छ पितळी भांड्यात उकळत असलेल्या चहाने अक्षरक्ष: वेड लावले. आद्य अमृततुल्यमध्ये २०-२२ कामगारांची फौज असायची. ग्राहकांना अत्यंत आपुलकीने चहा मिळायचा. केवळ एका कटिंग चहावर या अमृततुल्यमध्ये तासन्‌तास बैठका चालत. ‘अमृततुल्य’च्या इतिहासाचा वेध घेताना अमृततुल्य संघटनेचे निमंत्रक आनंद दवे सांगतात, ‘‘काळाची गरज म्हणून आमच्या समाजाने अमृततुल्यचा व्यवसाय सुरू केला. उच्च प्रतीचा कच्चा माल वापरून तयार होणाऱ्या चहाची तल्लफ पुणेकरांना लागली आणि पुणेकरांनीही आम्हाला आपलेसे केले. व्यवसायाची सुरवात अगदी छोट्या जागेतून झाली. या चहाची चव आवडल्याने मग एक-एक अमृततुल्य सुरू झाले. अमृततुल्य आणि गर्दी हे समीकरण झाले. संपूर्ण पुण्यात साधारणत: ४५० ‘अमृततुल्य’ची दुकाने सुरू झाली. चहाला आपल्याकडे पृथ्वीवरचे अमृत असे म्हटले जाते. त्यावरून आमच्या पूर्वीच्या पिढीने चहाच्या दुकानाला ‘अमृततुल्य’ हे नाव दिले. हे नाव एक ब्रॅंड म्हणून विकसित झाले. पहाटे-पहाटे उच्च प्रतीचा चहा उपलब्ध झाल्याने पुण्यात नोकरीनिमित्ताने आलेल्या अनेकांची चांगली सोय झाली. मी अभिमानाने सांगतो , की असाही एकही पुणेकर नाही, की ज्याने अमृततुल्य चहाची चव चाखली नाही. व्यवसायातील सचोटी आणि कष्टाने आमच्या ब्रॅंडला एक प्रतिष्ठा निर्माण झाली. केवळ पुरूषवर्गच नव्हे तर महिलाही सहजतेने अमृततुल्यमधील  चहा पिताना दिसतात. तुम्ही कोणत्याही अमृततुल्यच्या दुकानात जा, या ठिकाणी कमालीची स्वच्छता, चहा उकळण्याचे स्वच्छ भांडे दिसेल. स्वच्छता, दर्जा आणि चवीबाबत सर्वांचाच कटाक्ष असतो. त्यामध्ये कोणतीच तडजोड केली जात नाही.’’

संख्येवर परिणाम
पुण्यात ४५०च्या आसपास अमृततुल्यची संख्या काळागणिक कमी होत गेली. पदपथावर दर दहा-पंधरा फुटांवर चहाच्या टपऱ्या निर्माण झाल्याने सहाजिकच त्याचा अमृततुल्यवरही परिणाम झाला. आता पुण्यात केवळ ८०च्या आसपास पारंपरिक अमृततुल्य आहे. काळानुसार कमी होत गेलेल्या अमृततुल्यबाबत खंत व्यक्त करताना दवे म्हणतात, ‘‘आमचा हा व्यवसाय अत्यंत कष्टाचा आहे. दिवसभरात १४ ते १६ तास काम करावे लागते. अमृततुल्यसाठी विविध परवाने, कर यामुळे पुढील पिढीने व्यवसाय बदलला. आम्हाला दरमहा ९०० रुपये पाणीपट्टी भरावी लागते. त्याशिवाय अन्य परवाने लागतात. त्यामुळे सहाजिकच या व्यवसायावर गदा आली. आम्हाला तुलना करायची नाही, परंतु रस्त्यारस्त्यांवर लागणाऱ्या टपऱ्यांना कोणताच कर नाही, त्यांच्या दर्जाबाबत कोणीही तपासणी करत नाही, त्यामुळे त्यांना आमच्यापेक्षा स्वस्तात चहा देणे सहज परवडते. आमचा दर्जा आणि चव कायम असल्याने तसेच आमचे दुकान असल्याने सर्व खर्चाचा विचार करावा लागतो. अमृततुल्य हे नाव केवळ चहासाठी आहे. आम्ही चहाच देतो. अर्थात तो चवदार असल्याने आमचे पारंपरिक ग्राहक आमच्यापासून दूर गेलेले नाहीत. काळाची पावले ओळखून आम्हीही आमच्या व्यवसायात वृद्धीसाठी बदल केले, परंतु त्यामध्ये पूर्वी इतका मिळत नाही. त्यामुळेच पुढच्या पिढीने व्यवसायात बदल केला. शतकी परंपरेकडे वाटचाल करणाऱ्या या व्यवसायातील दुकानांची संख्या कमी होत असल्याची आम्हाला जरूर खंत आहे. आहे ती दुकाने चांगल्या पद्धतीने कशी चालतील याकडे आमच्या संघटनेचा कटाक्ष आहे. पुण्यात १९२४ मध्ये सुरू झालेले पहिले अमृततुल्य आणि आमच्या दृष्टीने शेवटचे अमृततुल्य २००४ मधील.’’

मांडणीला महत्त्व
प्रत्येक व्यवसायाची काही गृहीतके असतात. तसेच अमृततुल्यचेही आहे. अमृततुल्य कसे ओळखायचे ते मांडणीवरूच. दुकानाच्या सुरवातीलाच खास लाकडी आणि अल्युमिलियमचा वापर करून केलेली बैठक असते. त्यावर चहा उकळण्याचे सर्व साधने असतात. चहा तयार करण्याच्या हाताशीच चहासाठीची सर्व जिन्नस तयार असतात. आपण चहाची ऑर्डर दिली, की  आपल्या समोर चहा उकळायला ठेवला जातो आणि ताजा, मसालेदार चहा समोर येतो. ताजा चहा हीच अमृततुल्यची आणखी एक खासियत आहे. प्रत्येक अमृततुल्यने आपला विशिष्ट मसाला विकसित केला आहे. परंतु चवीत मात्र फार फरक नसतो. चहा कधीही तयार करून ठेवला जात नाही. ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळत असल्याने त्याची लज्जत काही औरच असते.

आद्य अमृततुल्य...!
पुण्याचा इतिहास लिहिताना अमृततुल्यसाठी एक खास पान असणारच. कारण त्याची लज्जतच तशी आहे. पुण्यात २७ जुलै १९२४ मध्ये लक्ष्मी रोडवरील आताच्या सोन्या मारुती चौकात पहिले अमृततुल्य सुरू झाले. हेच ते ‘आद्य अमृततुल्य’. चहा म्हणजे अमृततुल्य असे समीकरण नर्तेकर बंधूंनी रूढ केले. नर्तेकर बंधू राजस्थानमधून रोजीरोटीच्या निमित्ताने १८८५मध्ये पुण्यात आले. एकत्र कुटुंब पद्धतीने वाढलेले हे कुटुंब. ‘अमृततुल्य’च्या जन्माबद्दल सांगताना नर्तेकर बंधू म्हणतात, ‘‘आमचे पूर्वज रोजीरोटीच्या निमित्ताने पुण्यात आले. आमच्या आजोबांचा म्हणजे नर्तेकर बंधूंचा रामेश्‍वर चौकात थंडाईचा व्यवसाय होता. काजू, बदाम आदी पौष्टिक पदार्थ वापरून खास थंडाई तयार होत. एकावेळी २०-१५ कामगार थंडाई घोटत असायचे, इतकी त्यावेळी मागणी होती. इंग्रजांनी १९२३ मध्ये भांगेवर बंदी आणली आणि आम्हाच्या पूर्वजांना हा व्यवसाय बंद करावा लागला. तो बंद होत असताना पूरक व्यवसाय म्हणून चहाचा व्यवसाय सुरू केला. आमचे आजोबा भवानीशंकर आणि विश्‍वनाथ या भावांनी मिळून चहाचा पहिल्या अमृततुल्यची स्थापना केली. आता हा परिसर सोन्यामारूती चौक म्हणून ओळखला जात असला तरी पूर्वी याठिकाणी दूधभट्टी होती. पुण्याच्या आसपासच्या छोट्या-छोट्या गावातून अनेक जण दूध विकायला येथे येत. त्यांच्याकडूनच दूध घेऊन आमच्या आजोबांनी चहाचे दुकान सुरू केले. त्याचेच नामकरण अमृततुल्य केले. आमच्या आजोबांनीच चहाला ‘अमृततुल्य’ हा समानार्थी शब्द दिला. त्याकाळात हॉटेलमध्ये जाऊन चहा पिणे फारसे प्रतिष्ठेचे मानले जात नव्हते. तरीही आमच्या आजोबांनी हे धाडस केले. उच्च प्रतीची चहाची पत्ती, दूध आणि इलायची, वेलदोडा यापासून तयार केलेला खास मसाला यामुळे चहाला वेगळीच चव यायची. हळूहळू लोकांना चहाची गोडी लागली. आजची आमच्याकडे उच्च प्रतीचा कच्चा मालाला प्राधान्य दिले जाते. शतकाकडे आम्ही वाटचाल करत असून चहाच्या चवीत कोणताच फरक पडलेला नाही.’’

पुणेकरांची भक्कम साथ...
अमृततुल्य म्हणजे फक्कड आणि अस्सल चहा, हे आता प्रत्येकाच्या मनात बिंबले आहे, असे स्पष्ट करत नर्तेकर बंधूंनी सांगितले, ‘‘चहाच्या चवीत आणि दर्जात आम्ही कधीच तडजोड केली नाही आणि भविष्यातही करणार नाही. आम्ही चहासाठीचा मसाला घरी तयार करतो. त्यासाठीही चांगल्या दर्जाचे साहित्य वापरतो. शेवटी ग्राहक हीच आपली देवता आहे, त्यांना अधिकाधिक चांगले  देण्याचा आमचा विशेष कटाक्ष असतो. चहाच्या व्यवसायात अनेक जण येतात, जातात, अनेक प्रयोग होत आहेत, परंतु आमच्या चवीत आणि दर्जात काहीही फरक पडणार नाही. सुरवातीच्या काळात आमच्या दुकानात २०-२२ कामगार काम करायचे. अगदी हडपसर पासून सायकलीवर आमच्याकडे चहा पिण्यासाठी लोक येत होते आजही येतात. लक्ष्मी रोडसह आसपासचे अनेक दुकानदार आधी आमच्याकडे चहा घेतात नंतरच दुकान उघडतात. अमृततुल्यचा चहा पिल्याशिवाय दिवसच सुरू होत नसल्याची कित्येकांची भावना आहे. पुणेकरांनी आमच्यावर सुरवातीपासून भरभरून प्रेम केले. त्या प्रेमाला उतराई राहणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. असे अनेक जण आहेत, की घरी चहा पीत नाहीत, परंतु आमच्या दुकानाचा दिवसभरात चार ते पाच चहा जरूर पितात. पुणेकरांनी आम्हाला आपलेसे केले याचे आम्हाला मनस्वी अप्रूप आहे. दिवसागणिक अमृततुल्यची संख्या कमी होत आहे, ही गोष्ट खरी आहे. सुरवातीच्या काळात ४५० च्या आसपास अमृततुल्य होते, आता ती संख्या ८०-९०च्या घरात आली आहे, हे मान्य आहे. या व्यवसायात अडचणीही खूप येतात. त्या बाजूला सारून आम्ही आजही ठामपणे उभे आहोत. काळानुरूप आता काही बदल करत आहोत. अमृततुल्य आणि मांडणी याची विशिष्ट सांगड आहे. आम्ही आमच्या दुकानाचे नूतनीकरण करत असलो तरी त्यामध्ये कोणताही बदल करणार नाहीत. मांडणी कायम ठेवून बाकी दुकानाचे काळानुरूप करत आहोत.

कष्टाचा व्यवसाय...!
या व्यवसायात कष्ट खूप आहेत. मेहनत केल्याशिवाय फळही मिळत नाही, हे या व्यवसायातून दिसते. आम्ही दिवसभरात १६ ते १८ तास काम करतो. गणेशोत्सवाच्या काळात शेवटचे चार-पाच दिवस दुकान २४ तास सुरू असते. कोणत्याही अमृततुल्यमध्ये गेल्यावर तुम्हाला या ठिकाणची स्वच्छता नक्कीच नजरेत भरेल. स्वच्छतेबाबत आमचा विशेष आग्रह असतो. खास पितळी भांड्यातच चहा उकळतो. आताही आम्ही नूतनीकरण करत असलो तरी त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. खास ताब्यांच्या किटल्या बनवून घेतल्या असून पूर्वापार पद्धतीने पितळी कपात चहा दिला जाणार आहे. दुकान जरी नवीन असले तरी चहाची लज्जत मात्र तीच राहणार, असे नर्तेकर बंधूंनी स्पष्ट केले.

दिग्गजांची भेट...!
अमृततुल्यचा चहा पिल्याशिवाय समाधान वाटत नाही, असे समस्त पुणेकरांना वाटते त्यामध्ये मान्यवरांचाही अपवाद नाही. ‘अमृततुल्य’च्या समोरच ‘मेलडी मेकर्स’ असून याठिकाणी पूर्वी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, महंमद रफी अशी दिग्गज मंडळी येत. महंमद रफी तर आमचा चहा पिल्याशिवाय रेकॉर्डिंगला सुरवातच करायचे नाही, अशी आठवण सांगत नर्तेकर बंधू म्हणाले, ‘‘लता मंगेशकर आमच्या चहाच्या कमालीच्या चाहत्या आहेत. याच बरोबर जॉनी लिव्हर, सुदेश भोसले, दादा कोंडके या शिवाय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आमच्या चहाची लज्जत घेतली आहे. शम्मी कपूर यांचा १९६४ मध्ये ’तुमसा नही देखा’ चित्रपट आला होता. त्याच्या प्रिमियरसाठी ते अल्पना थिएटर जात होते. जाताना आमच्या दुकानासमोर गर्दी दिसली. गर्दी पाहून ते सहाजिकच थांबले. चहाच्या दुकानासमोर एवढी गर्दी पाहून त्यांना आश्‍चर्य वाटले. त्या आश्‍चर्यापोटीच त्यांनी चहाची चव घेतली. पहिला घोट घेताच त्यांना तो इतका आवडला, की आणखी एक कप चहा त्यांनी मागून घेतला. आजही अनेक जण सकाळी आमच्या चहाचा घोट घेऊनच दिवसाचे काम सुरू करतात. पुणेकरांच्या प्रेमात असेच राहण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्नशील राहणार आहोत.’’

फोटो फीचर

संबंधित बातम्या