चहा माझ्या आवडीचा 

शब्दांकन : रोहित हरीप, रोशन मोरे, प्राजक्ता ढेकळे
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

चहा बाज...
 

आठवणींच्या गावचा सोबती ‘चहा’
चहा... या शब्दातच मुळात एक ऊब साठली आहे असं मला वाटतं. लहानपणी जेव्हा चहा प्यायला दिला जायचा, तेव्हा उगाच आपण मोठे झाल्यासारखं वाटत असे. नंतर चहाची ही चैन, गरज कधी बनली ते समजलेच नाही. सकाळी ताजेतवाने वाटण्यासाठी चहा, कंटाळा आला म्हणून चहा, खूप झोप येते म्हणून चहा, खूप प्रसन्न वाटतंय म्हणून चहा, खूप थंडी वाटतेय म्हणून चहा, एवढंच काय पण खूप उकाडा आहे आणि कोणत्याही पाण्याचं सरबत पिण्यापेक्षा चहा चांगला!!! मात्र चहाची खरी लज्जत येते ती बाहेर पाऊस बरसत असताना आपण खिडकीत उभे राहून वाफाळणारा कप हातात घेऊन प्यायलेला एक एक घोट. तो चहा नुसते एक पेय न राहता आठवणींच्या गावाला जाताना असणारा सोबती बनतो. एक कप चहासोबत जोडलेल्या असंख्य आठवणी...कॉलेजच्या कॅंटीनमध्ये मित्रांसोबत दंगा करत घेतलेला चहा, रात्री अभ्यास करताना आईनं करून दिलेला चहा, नाटकांच्या तालमी करताना प्यायलेला असंख्य कप चहा, तावातावाने एखाद्या विषयावर चर्चा करताना विषय न संपता संपलेला चहा, पावसाळी सहलीत पायपीट करून पोटात कावळे कोकलताना, झोपडीवजा टपरीवर घेतलेला तो घोट!
चहा म्हणजे फक्त चहा असावा. त्यात उगाच मसाले, वेलची, आलं वगैरे भेसळ करणं म्हणजे चहाचा अपमान आहे हे माझं वैयक्तिक मत आहे. जितक्‍या मोठ्या हॉटेलात तुम्ही चहा प्याल तितका तो बकवास असण्याची खात्री! टपरीवरचा चहा किंवा घरचा चहा म्हणजे खरा चहा. 
पुण्यातल्या लोकांनी खूप छान नाव दिलंय - अमृततुल्य! 
अमृतातेही पैजा जिंके अशी आमची भाषा आणि आमचा चहा!
- राहुल दिकोंडा, आकुर्डी

मध्यरात्रीची टी पार्टी
मी लहान असताना आमच्या घरात लहान मुलांना ‘चहाबंदी’ होती. त्यामुळे चहाची तहान दुधावर भागवावी लागायची. चहाचे आकर्षण तेव्हापासून होते. घरातली मोठी माणसं चहा प्यायची, त्यामुळे चहा प्यायला लागल्यानंतर उगाचच मोठं झाल्यासारखं वाटायचं. पुढे शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर इंजिनिअरगिंच्या दिवसात चहाची खरी गट्टी जमली. सबमिशन्स करताना, परीक्षांच्या काळात रात्री अपरात्री चहाच्या शोधात कित्येकदा आख्खं पुणे पालथे घातल्याचे आठवतंय. तेव्हा पुण्यात रात्रभर चहा मिळण्याच्या मोजक्‍याच जागा होत्या. सेनापती बापट रस्त्यावर रत्ना मेमोWरिअल हॉस्पिटलच्या गेटजवळ बसणाऱ्या मावशी असो किंवा पहाटे तीन वाजता उघडणारे नळस्टॉपचे अमृततुल्य... अगदी मध्यरात्रीसुद्धा या जागा चहासाठी येणाऱ्या लोकांनी भरलेल्या असायच्या. याच चहा-बिस्कीटच्या जोरावर कित्येक ट्रेक केल्याचं आठवतंय. पुण्याबद्दल आवडणारी गोष्ट म्हणजे या शहराला स्वतःची अशी चहाची संस्कृती आहे. अमृततुल्यपासून इराणी चहापर्यंत अनेक ‘चहासंस्कृती’ इथे गुण्यागोविंदाने नांदतात. ‘पुण्यातला चहा’ एक हे वेगळंच प्रकरण आहे.
- प्रतीक देशपांडे, सोलापूर

छंद चहाचा जडला... 
मला चहाची सवय पुण्यात आल्यावरच लागली. मित्रमैत्रिणी भेटले, की चहाच्या कपाबरोबर गप्पा रंगायच्या. गप्पांसाठी चहा चांगला ऑप्शन झाला. त्याच गप्पांमध्ये कुठला चहा चांगला, हाही विषय यायचा आणि जो तो आपल्या एरियातील प्रसिद्ध असलेला-नसलेला; पण आवडलेला चहा सुचवायचा. अन्‌ मित्रमैत्रिणींबरोबर तो सुचवलेला चहा आम्ही ट्राय करायचो. आता चहा पिण्याची सवय माझा एक छंदच झालाय. 
- धनश्री बाबासो वीरकर

चहा व स्वातंत्र्य
लहानपणापासून माझ्या दिवसाची सुरुवात दुधापासून व्हायची. चहासाठी मी किती तरी वेळा रुसून बसलेलो असायचो. जेव्हा घरातून शिक्षणासाठी बाहेर पडलो तेव्हा ‘चहा’ आणि ‘स्वातंत्र्य’ या दोन्ही गोष्टी बरोबरच उपभोगल्या. अभ्यास व कामाच्या निमित्ताने दिवसातून किमान ४-५ वेळा चहा होतो. ‘ब्रेक’मध्ये अभ्यासावर, अडलेल्या मुद्द्यांवर, झालेल्या चुकांवर, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या विविध विषयांवर मित्रमैत्रिणींबरोबर ‘चाय पे चर्चा’ हा माझा आवडता कार्यक्रम असतो. 
- प्रवीण कविता गुलाबराव काळे, दहिवडी, सातारा

फुललेले चहाप्रेम
चहावर अगदी अलीकडे कॉलेजला गेल्यावर प्रेम जडले. पण ते आत्ता खूप घट्ट झाले आहे. चहा घ्यायचा म्हणून घ्यायचा, या पठडीत बसणारी मी नाही. प्रत्येक चहाचे खास असे स्थान माझ्या आयुष्यात आहे. ते वेगवेगळ्या रूपात साथ देते. जसे, साखरझोपेतून उठताच आईने दिलेला वाफाळलेला चहा, कधी आईला शेजारी बसवून गप्पा मारत घेतलेला चहा, कधी काहीतरी नवीन आयुर्वेदिक टच देऊन केलेला चहा, कधी गुलाबी थंडीत कुडकुडताना घेतलेला - नाहीतर पाऊस कोसळताना घेतलेला चहा, कधी झोप घालवण्यासाठी; तर कधी भूक मारण्यासाठी, तर कधी निवांत संध्याकाळी एकटीने गजल ऐकत घेतलेला चहा विशेष आवडीचा वाटतो. अशा अनेक रूप-रंगांनी चहाप्रेम बहरले आहे. हे प्रेम तब्येतीची काळजी घेऊन तेवढ्याच प्रमाणात जोपासले जातेय. त्यामुळे सुखी-समाधानी आहे. ते चहा-प्रेम असेच उत्तरोत्तर फुलत जावो असे नेहमी वाटते.
- अनुराधा पाटील, कराड

चहा पिण्याची कारणे
दिवसातून कमीत कमी चार वेळा तरी मी चहा पितो. पूर्वीपेक्षा हे प्रमाण फारच कमी झाले आहे. चहा पिण्याचा मुख्य उद्देश म्हणजे कंटाळा घालवणे हाच असतो. पण काही चहाची चव ही जिभेवर रेंगाळत असते. आणि हा चहा पिल्याशिवाय चहा पिल्याचे फिलच येत नाही. त्यामुळे दिवसभरातून चहा पिण्याची मी वेगवेगळी कारणं शोधत असतो. सदाशिवपेठेत मिळणारा कडक आणि गोड असं हटके मिश्रण असणारा चहा मला  प्रिय आहे. त्यामुळे बाहेर कुठे गेलो तर या चहाची चव मी मिस करत असतो. त्यामुळे असा चहा कोठे मिळेल याच्या शोधात नव नवीन चहाच्या टपरीवरील चहाची चव चाखत असतो.
 - पंकज कांबळे, बारामती

चहा केवळ निमित्त...
‘चहा’ म्हटलं, की मला माझं दहावीच वर्ष सगळ्यात आधी आठवतं... दहावीच्या वर्षात पहाटे उठून अभ्यास वगैरे करण्याची सवय मला होती. पहाटे उठली, की आई हळूच गरमागरम चहाचा कप माझ्यासमोर सरकवायची. पहाटेच्या वाफाळत्या चहाची चव अजून माझ्या जिभेवर रेंगाळते. पुढे कॉलेजला गेल्यानंतर मात्र चहाचे संदर्भ आपसूक बदलत गेले. चहा ही एक जीवनावश्‍यक गरज बनली. चहा आयुष्याचा अविभाज्य भागच बनला. कोणालाही भेटायला, गप्पा मारायला आम्हाला चहाचे निमित्त पुरायचे. तेव्हा दिवसाला दहा-बारा कप चहा सहज प्यायचो. आता लग्नानंतर बायकोच्या धाकामुळे चहाचे प्रमाण कमी झालंय, पण चहाचे वेड मात्र कायम आहे. 
 - अनुप हंडे, शिरूर

‘ती’ आणि ‘टी’
पुणे विद्येचे माहेरघर, तसेच चहाचेही माहेरघर म्हणता येईल. सर्व प्रकारचा चहा पुण्यात उपलब्ध आहे. मी पुण्यात येण्याअगोदरपासूनच चहाची तलफ मला सारखी लागायची; परंतु त्याचे व्यसनात रूपांतर पुण्यात आल्यावर झाले. पुण्यातल्या चहाच्या टपऱ्यांनी मला खूप मित्र दिले. चहाला खरे तर ‘राष्ट्रीय पेय’ म्हणायला हवे. मी आणि माझा मित्र प्रवीण दोघे चहाचे शौकीन आहोत. आमच्याकडून पुण्यातला कोणता चहा ट्राय करायचा राहिलाय असे वाटत नाही. २०१४ पासून देशात ‘चाय पे चर्चा’ व्हायला लागल्या, पण आमच्या चर्चा अगोदरपासूनच सुरू आहेत. चहाबरोबर आठवणी जोडल्या गेल्या आहेत. दुःखात सुखातही... (ती आणि टी) यांचेही नाते असेच काहीतरी... म्हणून मला वाटते चहाला वेळ नसते; पण वेळेला चहा लागतोच. 
- सुशांत डोईफोडे, वडूज, सातारा

‘चहा’ म्हणजे उत्साह
’चहा’ म्हणजे उत्साह. त्यामुळे उत्साही राहण्यासाठी पाच कपांपेक्षा जास्त चहा मी दिवसभरात पितो. कमी पैशात आणि कोठे ही उपलब्ध होणारे पेय म्हणून मला चहा जरा जास्तच प्रिय आहे. नवीन ओळखी आणि झालेली मैत्री टिकवण्याचे काम चहा करतो. चहाला कधीच नाही म्हणायचे नाही. याच सवयीमुळे मला चहा पितानाच अनेक नवे मित्र भेटले.
 - नीतेश पाटील, मुंबई

ताजेतवाने राहण्यासाठी
मूड फ्रेश होण्याचे औषध म्हणजे चहा. मला पूर्वी चहा बिलकूल आवडतं नव्हता. मात्र बारामती सोडून मी पुण्यात नोकरीसाठी आलो आणि चहासोबत माझी गट्टी जमली. नाईट शिफ्टला असल्यानंतर झोप येऊ नये म्हणून मी चहाचे अनेक कप रिचवायचो. तरी देखील सकाळी नाईट शिफ्टवरुन घरी जाताना नळ स्टॉपवर थांबून मी आवर्जून चहा पीत होतो. मला प्रत्येक चहाची चव वेगळी वाटायची. एकाच चवीचा चहा मला कधीच आवडला नाही. त्यामुळेच पुण्यात कुठे चांगला चहा मिळतो याचा शोध मी घेत असायचो. मग मला चहाच्या नव नवीन अड्यांची माहिती मिळाली ही तेथे एक तरी भेट नक्की देयाचो. पहाटे मिळणारे नळ स्टॉपचा चहा, मध्यरात्री बारानंतरही पुणे विद्यापीठाच्या जवळ मिळणारा चहा किंवा नवले ब्रिजच्या पुढे गेल्यानंतर डाव्याबाजूला टी स्टॉलवर मिळणारा चहा. प्रत्येक ठिकाणी मी जाऊन आलो आहे. प्रत्येक चहाचे  वैशिष्ट आणि चव वेगळी. अनेकांना चहा पिण्यासाठी मित्र सोबत हवे असतात. मला मात्र तसे कधी वाटले नाही. 
  - अमोल अंबुरे, बारामती

सेलिब्रेशनसाठी चहा हवाच
चहाला खरेच वेळ नसते, पण वेळेला चहा नाही मिळाला तर काही खरे नाही... आता कुठली वेळ चहाची हे ज्याचे त्याचे गणित असते;  ज्याचे त्याने सोडवायचे. आनंदात चहा, दुःख झाले तर चहा, मित्र भेटले तर चहा, एकटाच आहे म्हणून चहा, खूप काम आहे म्हणून चहा, वेळ जात नाही म्हणून चहा, वेळ खूप छान जातोय म्हणूनही चहाच, अभ्यासाचा ताण आलाय म्हणून चहा, छान थंडी पडलीये म्हणून चहा, जोराचा पाऊस झालाय - चिंब झालोय म्हणून चहा, उकाडा वाढलाय फ्रेश वाटावे म्हणूनही चहाच! हा चहा कारणाशिवाय किंवा कारणासाठी हवाच असतो. प्रत्येकच गोष्ट साजरी करायला चहा हवाच असतो... 
- अक्षय जाधव, अकलूज

अमृताहून जास्त प्रिय...
दुधाचा वाफळलेला चहा मला विशेष प्रिय आहे. मागील पाच वर्षापासून मी पुण्यात आहे. पुण्यात येण्याआधी चहा पिण्याचे प्रमाण कमी होते. मात्र स्पर्धा परीक्षा करण्याच्या निमित्ताने पुण्यात आलो आणि चहा माझा सोबती कधी बनला हे कळले  देखील नाही. त्यामुळे एक वेळा जेवण नसले तरी चालेल पण चहा हवाच! असे मला वाटते. चहा पिल्यानंतर येणारी तरतरी अभ्यास करण्यासाठी नवा उत्साह देवून जाते. त्यामुळे  स्पर्धा परीक्षा करण्याऱ्या माझ्या सारख्या विद्यार्थ्यांना चहा हा अमृतापेक्षा जास्त प्रिय आहे.
 - अमित शिंदे, पारवडी

गावाकडचा चविष्ट चहा
शहरातला चहा आणि गावाकडचा ‘चहा’ याच्यात खूपच फरक आहे. आमच्या घरी शहरात होणारा चहा हा फक्त सकाळ-संध्याकाळी होतो आणि कोणी पाहूणे आले तरच. पण गावाला होणारा चहा म्हणजे सकाळी जे चहाचं पातेलं गॅसवर असते ते संध्याकाळपर्यंत, कारण तिकडे काेण ना कोण तरी येतचं असतं आणि घोटभर चहा होतच असतो. गावकडच्या चहाची आणि शहरातल्या चाहाची चव यात बराच फरक आहे. तिकडचे दूध आणि पाणी यामूळे चहा हा कडक आणि घट्ट असतो. त्यामुळे इथल्यापेक्षा गावाकडचा चहाच आवडतो आणि खपू वेळा घेतला जातो.
 - मेघना काकडे, वाई

एनर्जी ड्रिंक - चहा
आम्हा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चहा म्हणजे ’एनर्जी ड्रिंक’. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास  रोज १० ते १२ तासा पेक्षा जास्त करावा लागतो. त्यामुळे या अभ्यास करताना कंटाळा आणि थकवा जाणवतो. त्यामुळे चहा ब्रेक प्रत्येक तीन चार तासातून एकदा होतोच असतो. त्यामुळे न कळत दिवसभरातून चार ते पाच वेळा चहा होतच असतो. पुर्वी गावी चहा पिणे म्हणजे केवळ औपचारिकता होती. पण पुण्यात आल्यानंतर चहा ऊर्जास्रोत बनला आहे. 
- गणेश लोंढे, बारामती

फोटो फीचर

संबंधित बातम्या