चहाचा वाफाळता इतिहास

डॉ. मंदार नि. दातार, आघारकर संशोधन संस्था 
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

चहा-पुराण
 

‘चहा’ नुसते ऐकले किंवा वाचले तरी तरतरीत वाटतं आपल्याला. आपलं एका अर्थाने सुदैवच म्हणायचं, की आपण अशा काळात जन्मलेले आहोत, की ज्या काळात जगाच्या कानाकोपऱ्यातल्या वनस्पती आपल्या शेतात वाढत आहेत, ताटामध्ये नांदत आहेत, कपात विरघळत आहेत. कल्पना करून बघा दोन-अडीचशे वर्षांपूर्वी आपण असतो आणि एखाद्या रम्य संध्याकाळी आपल्याला सपाटून भूक लागली असती तर खायला वडापावही नसता कारण वडापाव मधले मिरची, बटाटा हे घटक त्यावेळी आपल्या अन्नात नव्हते, पाव तर लांबचीच गोष्ट आणि त्यानंतर प्यायला एक कटिंग चहासुद्धा मिळाला नसता. कारण चहा आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होणे हे भविष्यात होते. तर मग हा चहा आपल्याला इतका आपलासा कसा झाला आणि त्याचा जंगलातून आपल्या कपापर्यंत प्रवास कसा झाला याची ही एक फक्कड झलक.

चहाचा मूळ प्रदेश चीन. चहाचे वनस्पती शास्त्रीय नाव आहे ‘कॅमेलीया सायनेंसिस’. यातल्या सायनेंसिसचा अर्थच मुळी चीन. जगभर चहाला जी नावे वापरली जातात ती ‘चा’ आणि ‘टी’ या दोन चीनी शब्दांपासूनच तयार झालेली आहेत. अगदी दोन हजार वर्षांपूर्वीही चीनमध्ये चहा लावला जात असे असे लिखित उल्लेख आहेत. अर्थात त्यावेळी आजच्यासारखे कृतींमधले आणि चवींमधले वैविध्य नव्हते. पूर्वी म्हणे चहा पिण्यासोबतच चीनमध्ये चहाच्या पानाची भाजीसुद्धा केली जात असे तर कधीकधी तो भाताबरोबर उकडून खाल्ला जात असे. आता आपल्याला कदाचित याची कल्पनाही करणार नाही. भारतातही पूर्वी चहाचे झुडूप उपयुक्त आहे हे ज्ञान लोकांमध्ये होते. चहाच्या झुडपाची पाने औषधी म्हणून मानली जात असत. मात्र भारतातला चहाच्या झाडाचा उपयोग हा बौद्ध भिक्षु करत असत. मात्र चीनमध्ये त्याला जे पेयाचे स्वरूप मिळाले ते भारतात नव्हते. चहा कसा प्यायला सुरुवात झाली त्याची एक गमतीदार कथा आहे. अनेक शतकांपूर्वी चीनमध्ये सत्तेत असलेल्या शेंनोंग नावाच्या सम्राटाला नेहमी पिण्यासाठी उकळलेले पाणी लागत असे. एकदा त्याचा मुक्काम सैन्यासोबत जंगलात असताना त्यांच्यासाठीच्या उकळत्या पाण्यात चुकून चहाच्या झाडाची वाळलेली पाने पडली अन ते पाणी त्याला खूप आवडले. तेव्हापासून चहा हे पेय सर्वत्र आवडीने प्यायले जाऊ लागले. नंतर आलेल्या हान, टेंग आणि सोंग वंशातील राजांच्या काळात चहाला अफाट लोकमान्यता मिळाली. नुसते पेय म्हणून चहा लोकप्रिय झालाच पण त्याही पलीकडे त्याला अनेक अर्थाने महत्त्व प्राप्त झाले. त्या काळात तर वाळवलेल्या चहाच्या वड्या पाडून त्या चलन म्हणूनही वापरल्या जात असत. चिन्यांना चहाचे इतके प्रेम, की पुस्तक छपाईचा शोध लागल्यानंतर थेट चहावर तिथे एक पुस्तक लिहिले गेले. ‘ली यु’ या लेखकाचे ‘द क्‍लासिक ऑफ टी’ हे पुस्तक आणि ते सर्वमान्य युगानंतर सातव्या शतकात टेंग राजवंशाच्या दरम्यान लिहिलेले. म्हणजे आपल्याकडे कालिदासाच्या थोडा नंतरचा काळ. पुढे या वड्यांऐवजी वाळलेली चहाची पूड वापरात आली आणि मग चहाची निर्यात सोपी झाली. चीनमधूनच नवव्या शतकात एका धर्मगुरूने चहाचे झाड जपानमध्ये नेले आणि मग जपान्यांनी चहाला आपलेसे केले. इतके आपलेसे, की चहा त्यांच्या संस्कृतीचा एक भागच बनला आणि सर्वत्र ‘टी सेरेमनी’ लोकप्रिय झाले.

युरोपातला पहिला चहा चीनमधूनच आला. म्हणे पहिला चहा जेव्हा एका युरोपियन दाम्पत्याला पाठवला गेला तेव्हा ती पूड कशी वापरायची तेच त्यांना ठाऊक नव्हते. तेव्हा त्यांनी तो चहा पाण्यात घालून उकळला, वरचे काळे पाणी फेकून दिले आणी राहिलेला चोथा पावला लावून खाल्ला. नंतर मात्र युरोपात चहा पिण्याची प्रथा हळूहळू पाय पसरायला लागली. युरोपात सगळ्यात आधी डच ईस्ट इंडिया कंपनीने मोठ्या प्रमाणावर चहा आणला आणि त्याची भरपूर प्रसिद्धी केली. डचांचा पगडा चहाच्या व्यापारावर बराच काळ होता. किंबहुना ‘ऑरेंज पेको’ या चहाच्या दर्जानुसार वर्गीकरण करायच्या प्रणालीतला ऑरेंज शब्द डच लोकांचाच राष्ट्रीय रंग आहे. मात्र चहाचा व्यापार आपल्या ताब्यात राहण्यासाठी युरोपात केवळ डच पुढे होते असे नव्हे तर पोर्तुगीज लोकांनाही चहा हवा होता. चहा लागवडीसाठी पोर्तुगीजांनी चीनजवळचे मकाऊ बेट ताब्यात घेतले. या राष्ट्रांच्या व्यापारासाठी असलेल्या कडव्या स्पर्धेचा फायदा चहाचा जास्त प्रसार होण्यात झाला. 

इंग्लंडमध्ये चहा लोकप्रिय व्हायचे एक कारण होते पोर्तुगीज राजकन्या कॅथरिन ब्रीगांझाचे इंग्रज राजा दुसऱ्या चार्ल्ससोबत झालेले लग्न. चहाची अट्टल प्रेमी असलेल्या ब्रीगांझाने चहा राजघराण्यात आणून त्याला एक प्रकारे राजमान्यताच दिली. याच प्रसिद्ध लग्नात हुंडा म्हणून पोर्तुगीजांनी मुंबई बेट ब्रिटिशांना दिले होते. हा एक आपल्या इतिहासातील संदर्भ. पुढे भारतात चहा लागवड करून इंग्रज लोकांनी या स्पर्धेत आघाडी घेतली.

चौदाव्या शतकादरम्यान चीनमधून युरोपात निर्यात होत असलेल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी होत्या रेशीम, चीनी मातीची भांडी आणि चहा. चहामुळेच चीनने जागतिक व्यापारात दबदबा निर्माण केला होता. मात्र चीनी सत्ताधीश या वस्तूंच्या बदल्यात युरोपियन लोकांकडून चांदी घेत असत. या तीन गोष्टींच्या युरोपातील मोठ्या प्रमाणावरच्या मागणीमुळे युरोपातील विशेषतः इंग्लंडमधील चांदी कमी व्हायला लागली. याला पर्याय म्हणून इंग्लंडने चहाच्या बदल्यात अफू विकायला सुरवात केली. चीनी लोकांना अफूचे व्यसन लागल्यावर चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर अफूचा चोरटा व्यापार सुरू झाला. याचे पर्यवसान चीन आणि इंग्लंड यांच्यातील संबंध बिघडण्यावर आणि पुढे दोन मोठी युद्धे होण्यात झाले. ही दोन युद्धे ‘अफूची युद्धे’ म्हणून ओळखली जातात. या अफूच्या युद्धाचे बीज या चहाच्या व्यापारातच दडले होते. 

याच अफूच्या युद्धानंतरच्या तहाचा भाग म्हणून हाँगकाँग इंग्रजांकडे गेले. १८३०च्या अफूच्या पहिल्या युद्धामुळे इंग्लंडला होणारी चहाची निर्यात थांबली आणि त्यांना आपल्या देशातील चहाची मागणी पूर्ण कशी करावी असा प्रश्न पडला. पण त्या काळात त्यांच्या आधिपत्याखाली असलेल्या भारतात त्यांना चहाच्या लागवडीसाठी योग्य जागा सापडली. तो प्रदेश म्हणजे आसाम. आणि मग इंग्रजांनी भारतात चहाची मोठ्या प्रमाणावर लागवड करायला सुरवात केली. अर्थात आसाममध्ये त्या आधीच चहाची एक रानटी जात जंगलात वाढत असे. ‘कॅमेलीया सायनेंसिस व्हरायटी असामीका’ असे या जातीचे नाव. आजही या जातीचा चहा भारतात आसामात लावला जातो. मात्र बऱ्याच ठिकाणी चीनी आणि भारतीय चहांचा संकर असलेली एक जात आपली चहाची गरज पुरवत आहे. आसाममधल्या चहाच्या मळ्यानंतर इंग्रजांनी चीनमधून चहाच्या चीनी जातीच्या बिया मागवून, खरे तर चोरून त्याची लागवड दार्जिलिंग भागात केली. चहाचे मळे आपल्याकडे वाढायला लागल्यावर भारतीयांनीही चहाचे गुळपाणी देऊन स्वागत केले.

जगभरात चहा आणि कॉफी या दोन पेयात पहिले कोण यासाठी स्पर्धा होतीच. श्रीलंकेत कॉफीची मोठ्या प्रमाणात लागवड होत असे. इंग्रजांना हवी असलेली कॉफी दक्षिण भारतातून आणि श्रीलंकेतून मिळे. मात्र अठराशे सत्तरच्या दरम्यान याच कॉफी पिकावर पडलेल्या आलेल्या एका बुरशीजन्य रोगामुळे कॉफीची सारी लागवड संकटात सापडली आणि मग ओस पडलेल्या कॉफीच्या मळ्यांमध्ये चहाने आपले बस्तान बसवले आणि इंग्लंडमध्ये पोहोचणाऱ्या चहाच्या खोक्‍यांमध्ये अजून वाढ झाली. चहा युरोपात आपले बस्तान बसवून सर्वमान्य झाला होता तेव्हा ‘इंडस्ट्रिअल रेव्होलुशन’ किंवा औद्योगिक क्रांतीचे पडघम वाजत होते. ज्या भांडवलदारांना न झोपता काम करणारे कर्मचारी हवे होते, त्यांना तर चहा म्हणजे एक वरदानच वाटले. कर्मचाऱ्यांना पाण्याऐवजी चहा दिल्यावर ते जास्त काम करतच, पण नुसत्या न उकळलेल्या पाण्यातून होणारे विषाणूजन्य आजार कुठल्या कुठे पळत होते. या चहानेच कमी आजारी पडणारे आणि जास्त काम करणारे कामगार या उद्योगांना दिले आणि औद्योगिक क्रांतीचा गाडा पुढे भरधाव सुटला. मात्र यामुळे इंग्लंडमध्ये चहा गरीबवर्गात लोकप्रिय झाला तो कायमचाच.

कोलंबस अमेरिकेला पोचल्यानंतर या शोध लागलेल्या नव्या जगात माणसाने जुन्या जगातल्या अनेक वनस्पती नेल्या, चहा त्यापैकीच एक. अमेरिकेच्या काही भागात विषुववृत्तीय हवामान असल्याने चहाला तो प्रदेशही बराच मानवला आणि चहा तेथे विस्तारला. चहा जगभरात जसजसा स्वीकारला गेला तसतसे त्याच्या इतिहासाला नवनवे पैलू जोडले गेले. पण चहा नाकारला आणि एक इतिहास घडला असंही एकदा झाले आहे. याचेच उदाहरण आहे ‘बोस्टन टी पार्टी’. इंग्रजांप्रमाणेच त्यांची वसाहत असलेल्या अमेरिकेतही चहा लोकप्रिय झाला होता. मात्र या चहावर लावलेल्या अतिरिक्त करांमुळे आणि इंग्रज सरकारने ईस्ट इंडिया कंपनीला कुठलाही कर न भरता अमेरिकन वसाहतींमध्ये चहा विकण्याची परवानगी दिल्यामुळे वसाहतीमधील राष्ट्रप्रेमी नाराज होते. या धोरणांचा निषेध करण्यासाठी बोस्टन इथे १६ डिसेंबर १७७३ च्या संध्याकाळी सॅम्युएल ॲडम्सच्या नेतृत्वाखाली क्रांतीकारक एकत्र आले. त्यांनी या बैठकीनंतर बोस्टनच्या बंदरात घुसून इंग्लंडमधून आलेल्या तीन जहाजांवरचा जवळपास तीनशे टन चहा चक्क समुद्रात फेकून दिला. पुढे ही घटनाच इतिहासात ‘बोस्टन टी पार्टी’ म्हणून प्रसिद्ध झाली आणि अमेरिकन स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणादायी ठरली. मात्र चहा पिणे हे देशविरोधी मानले गेल्यामुळे अमेरिकेत पेयांमध्ये अजूनही कॉफी नंबर वन ला आहे.

इंग्लंडमध्ये चहात साखर घालून प्यायला सुरवात झाली आणि चहाने आपल्या सोबत साखरेचीही मागणी वाढवली. मग ही मागणी पूर्ण करण्यासाठी इंग्रजांना आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करावी लागली. आणि त्यामुळे कित्येक राष्ट्रांच्या नशिबात गुलामगिरी आली. पुढे विसाव्या शतकाच्या सुरवातीला चहाच्या पिशव्या किंवा टी बॅगचा शोध लागला आणि मग चहा सोबत घेऊन जाणे जास्ती सुकर झाले. चहा सर्वत्र पोचल्यावर प्रत्येक प्रदेशाने आपापल्या संस्कृतीनुसार त्याच्या कृतीत बदल केले. आपल्याकडे दूध, साखर, वेलदोडा घालून चहा करतात तर तिबेटमध्ये लोणी, लिंबाचा रस, मीठ घालून. काही ठिकाणी नुसताच पाण्यात उकळून चहा प्यायला जातो. चहाची वरची दोन पाने आणि त्यामध्ये असलेला एक कोंब म्हणजे चहाचा कच्चामाल. ही पाने तोडून, त्यावर अनेक प्रक्रिया करून मग चहा आपल्यापर्यंत पोहोचतो. सध्या चीन व भारताबरोबर श्रीलंका,जपान, इंडोनेशिया या देशांमध्ये चहाचे मळे आहेत. 

गेल्या काही दशकांमध्ये दक्षिण भारतात चहाची मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली आहे आणि या बागांमधून चहा आपल्या पेल्यांपर्यंत पोचत असतो. चहाने आता जगाचा भूगोल व्यापला. त्याचा इतिहासही अफाट आहे. लग्नापासून ते युद्धापर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, चहावरच्या राजकारणापासून ते चहाच्या पेल्यातील वादळापर्यंत. चहा आता जगात सर्वत्र इतका स्थिरावला, की चहा विरहित जगाची कल्पनाच आपण करू शकत नाही. पण हे असले तरी चहापेक्षा जगात एकच गोष्ट मात्र जास्ती प्यायली जाते. ती आहे पाणी. इतका चहा प्यायला जातो हे खरे वाटत नाही? लावताय पैज? एक कप चहाची?
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या