कडक स्पेशल भारतीय जलपान 

प्राजक्ता ढेकळे 
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

चहा स्टार्टअप
 

‘कडक स्पेशल भारतीय जलपान’ या नावाची पाटी, ‘माझ्या इंजिनिअरिंगच्या डिग्रीचा उपयोग केवळ लग्न जमविण्यासाठी झाला, जेव्हा मी जॉब शोधायला गेलो तेव्हा डिग्रीने जीव सोडला होता’, ‘पुणेरी पाट्या’, ‘इंजिनिअरचे विद्यार्थ्यांना (युवकांना) पत्र’ यासारख्या पाट्यांनी मागच्या दोन महिन्यात ‘व्हॉट्‌स ॲप’वर धुमाकूळ घातला होता. हे नेमके काय आहे? जाणून घेण्यासाठी सदाशिव पेठेतील कडक स्पेशल ‘भारतीय जलपान’ या चहाच्या स्टॉलवर जाऊन पोचले. अन उलगडली उच्चशिक्षित तरुणाच्या ‘चहामधील स्टार्ट अपची गोष्ट’... 

सदाशिव पेठेतील या स्टॉलच्या समोर बरीच गर्दी होती. गर्दीतून वाट काढत जेव्हा काऊंटरजवळ पोचले, स्टॉल मालकाची चौकशी सुरू केली. तेव्हा अकांऊटरवरील माणसाने समोरच्या गर्दीत बोलत असलेल्या एका तरुणाच्या दिशेने हात करत ‘त्यांना भेटा’ म्हणून सांगितले. तिथे जाऊन त्या तरुणाला विचारताच त्याने बोलायला सुरवात केली... ‘मी अजित केरूरे. मीच या चहाचा स्टॉल सुरू केला आहे...’ 

हा वयाची तिशी पार केलेला तरुण. इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली, मन मात्र नोकरीत न रमता काही तरी वेगळे करण्यासाठी धडपडत होते. पण नेमके काय करायचे? याविषयी कन्फ्युजन होते. ‘पिढ्यान पिढ्या आमच्या घरात नोकरी करणारे उच्च शिक्षित लोक, त्यामुळे  व्यवसायाशी दूरदूरपर्यंत कुणाचाही संबंध नाही. मला मात्र नेहमी काही तरी व्यवसाय करावासा वाटायचा. पण करायचे काय? इतर मुलांप्रमाणे मीही शाळेत हुशार होतो. त्यामुळे चांगले शिक्षण घेऊन मीही नोकरी करावी असे घरच्यांना वाटत होते. बारावीनंतर मी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. केवळ घरच्या लोकांसाठी आणि प्रामुख्याने माझे प्रेम असलेल्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी मी इंजिनिअरिंगची पदवी घेतली. इंजिनिअरिंगची पदवी घेऊन दहा ते पंधरा हजारापर्यंत जॉब मिळत होते. मला तेव्हा वाटले, की कंपनीत काम करून मिळणाऱ्या पगारापेक्षा माझी पात्रता नक्की जास्त आहे. मग ‘नोकरी करायची नाही, काहीतरी बिझनेस करायचा’ असे मी ठरवले. इंजिनिअरिंगच्या शिक्षणाने नोकरी नाही, पण छोकरी मात्र हवी होती तीच मिळाली.’ 

आई, पत्नी, भावाची साथ 
‘माझी बायको सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मला नोकरी न करता काही तरी बिझनेस करायचा आहे, या माझ्या विचाराला तिने नेहमी साथ दिली. चहाचा बिझनेस सुरू करण्याआधी दुसरे एक-दोन बिझनेस सुरू केले, पण ते बंद पडले. मात्र बायकोने मला कायम सपोर्ट केला. आता बिझनेस करण्याचा शेवटचा पर्याय म्हणून मी ‘चहा बिझनेस’ सुरू करायचा विचार सुरू केला. मात्र घरची सगळी पार्श्‍वभूमी बघता, घरात नुसता चहाचा व्यवसाय करायचा म्हटले, तरी ‘हे काय भिकेचे डोहाळे लागलेत’, ‘आता चहाची टपरी टाकणार का?’ असे अनेक टोमणे ऐकावे लागले असते.. अन्‌ वडिलांना कळले असते, मी चहाचा व्यवसाय करायचे म्हणतोय, तर ते त्यांना अजिबात आवडले नसते. म्हणून घरात इतर कुणालाच सांगितले नाही. पूर्वीपासूनच चहाची  आवड होती, पण आता आवडीचे व्यवसायात रूपांतर करण्याचे मी निश्‍चित केले होते. ही चहाच्या बिझनेसची कल्पना पहिल्यांदा बायकोला सांगितली. तिला ती आवडली अन्‌ तिने मला पाठिंबा दिला. इतर लोक करतात तसा मला तात्पुरता ‘चहाचा बिझनेस’ करायचा नव्हताच. दूरदृष्टी ठेवून मला तो करायचा होता. चहाचा बिझनेस उभा  करताना मला आर्थिक स्वरूपात बायकोने मदत केली. कारण ती सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. तिच्याबरोबर आईने तिच्याकडील काही पैसे मला दिले. पैसे देताना तिला एवढे माहीत होते, की मी काहीतरी नवीन बिझनेस करायचे म्हणतोय. याबरोबरच भावानेही मला पैशांची मदत केली. अन्‌ बिझनेससाठी आवश्‍यक आणि सगळ्यात महत्त्वाचा असणारा आर्थिक प्रश्‍न सुटला.’ 

इंजिनिअरिंगमधील इनोव्हेशन 
‘चहा बिझनेस करण्यातला आर्थिक प्रश्‍न सुटला होता. मात्र बाजारात टिकून राहण्यासाठी मला सरधोपट मार्गाने जायचे नव्हते. आपला बाजारात स्वतंत्र ब्रॅंड तयार करायचा होता. मग त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न सुरू केले. रोटरी क्‍लबचे काम करताना फिरल्यामुळे मला विविध ठिकाणच्या चहाच्या चवी मला माहिती होत्या. त्यामुळे चहाचे वेगवेगळे प्रकार मला माहीत होते. सुरवातीला मी व्यवस्थित सर्व्हे केला. लोकांच्या अपेक्षा, त्यांची आवड, आवडीसाठी ते किती पैसे खर्च करू शकतात, आरोग्यविषयक जागरूक असणाऱ्या लोकांनादेखील आपला ग्राहक कशाप्रकारे बनवता येईल... या सगळ्याची माहिती मी सर्व्हेच्या माध्यमातून मिळवली. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मी चहाचे वेगवेगळे प्रकार बनवून ‘टेस्ट’ करायला सुरवात केली. त्यासाठी मी मित्रांना घरी बोलावायचो, नवीन प्रकारचा चहा त्यांना ट्राय करायला द्यायचो. त्यांच्या त्याविषयीच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचो. त्यांनी सुचवलेले बदल करायचो.  या सगळ्यातून माझ्या चहाच्या स्टॉलवर इराणी चहा, बासुंदी चहा, ग्रीन टी (दोन प्रकारची), काश्‍मिरी कावा ड्रायफ्रुट्‌स चहा, इलायची  चहा.. अशा एकापेक्षा अधिक प्रकारचे चहा उपलब्ध झाले. कुठलाही उद्योग करत असताना त्यात इनोव्हेशन खूप महत्त्वाचे असते, असे मला खूप वाटते. मग इंजिनिअरिंगमधील शिक्षणाचा वापर करायला सुरुवात केली. त्यात माझ्या पत्नीने मला खूप जास्त मदत केली. आम्ही दोघांनी विचार करून स्वतंत्र अशा ‘आम्ही बिनपाण्याची करतो - कॉफी’, ‘आमचा ड्रायफ्रूट चहा प्यायल्याने तब्येत सुधारते’, ‘चांगला चहा पिण्यासाठी मुलगी पाहायला जायची गरज 
नाही - आम्ही आहोत’... यासारख्या अनेक ‘पुणेरी पाट्या’ तयार केल्या.  अब्राहम लिंकनचे पत्र तर अनेकांनी वाचले असेल, पण स्वतःच्या मनात असलेल्या व्यवसायविषयक दृष्टिकोन दाबून न टाकता तो पुढे आणण्यासाठी मी विद्यार्थ्यांना/तरुणांना एक पत्र, फेसबुक पेज यासारख्या अनेक वेगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी करून माझ्या बिझनेसची सुरवात केली.’ 

ते हसले अन्‌ मी निर्धास्त झालो 
‘चहाचा बिझनेस सुरू केल्यानंतर अत्यंत अल्पावधीत लोकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. मात्र माझ्या घरी केवळ बायकोलाच मी सुरू केलेल्या या व्यवसायची माहिती होती. मला एक महिन्यात मिळालेल्या प्रतिसादानंतर मी घरच्या लोकांना घेऊन एका संध्याकाळी माझ्या स्टॉलवर आलो. अन्‌ त्यांना माहिती दिली. फेसबुक, व्हॉट्‌स ॲपमधून ‘कडक स्पेशल - भारतीय जलपान’विषयी माहिती घरी पोचली होती. पण ते मीच सुरू केले आहे, हे त्यांना माहिती नव्हते. त्यामुळे पत्नीवगळता इतरांना तो आश्‍चर्याचा सुखद धक्काच होता. या सगळ्यात मला वडिलांकडून येणाऱ्या प्रतिक्रियेची थोडीशी धास्ती होती. मात्र या सगळ्या गोष्टी बघून ते केवळ हसले, अन्‌ मी निर्धास्त झालो. नंतर माझ्या नातेवाइकांकडूनदेखील कौतुक होऊ लागले.’ 

व्यवसाय आनंददायी आहे 
‘चहाचा हा व्यवसाय सुरू होऊन अवघे दोन महिने झालेत. मात्र या दोन महिन्यांतही लोकांचा मला प्रचंड प्रतिसाद मिळला आहे. मला सांगायला आनंद वाटतो, की इंजिनिअरिंगमधील नोकरीच्या माध्यमातून वर्षभर मिळणाऱ्या पगाराइतके पैसे मी एका महिन्यात चहाच्या व्यवसायातून कमावले. आता मी या चहाच्या व्यवसायाचे २५ आऊटलेट पुढील महिनाभरात पूर्ण महाराष्ट्रात उघडणार आहे.’ 

मला नेहमी वाटते, कष्ट करताना लाजू नये. जे करायचे ते मनापासून करावे. स्वतःच्या हिमतीने उभारलेला उद्योग आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी केवळ आवड आणि चिकाटी अंगी असणे महत्त्वाचे आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या