शुद्ध देशी ‘तंदूर चहा’

रोहित हरीप
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

चहा स्टार्टअप
 

चहा आणि आपलं नातं घट्ट आहे. सकाळच्या पहिल्या चहापासून उजाडणारा आपला दिवस, मध्यरात्रीपर्यंत रेंगाळला तरी चहाचा कप आपल्या सोबतीला असतोच. चहाचे असंख्य प्रकार, चवी, प्रत्येकाच्या आवडीनिवडी, चहामध्ये घालायचे घटक यानुसार चहा बनवण्याच्या पद्धती बदलत असतात. 

कोणाला आटीव दुधाचा गोड चहा आवडतो, तर कोणाला दूध कम पानी ज्यादा, कोणाला आलं घातलेला तिखट चहा तर कोणाला कडक मसालेदार चहा... असे चहाचे नानाविध प्रकार..

असं म्हणतात, की पाण्यानंतर जगात सर्वांत जास्त प्यायले जाणारे पेय हे चहा आहे. त्यातही आपण भारतीय पक्के ‘चहा’बाज...चहाशिवाय आपले पान हलत नाही. 

चहाचे आपल्या आयुष्यातल्या अढळस्थानामुळे चहाच्या बाबतीत निरनिराळे प्रयोग सातत्याने होत असतात. वेगवेगळे मसाले, चहाचे प्रकार, चहा बनवण्याच्या पद्धती यामुळे चहाचे नवनवे ट्रेंड आजकाल दिसू लागले आहेत. असाच एक तंदूर चहाचा नवीन स्टार्टअप पुण्यामधील खराडी येथे सुरू झाला आहे.

खवय्येगिरी करण्याऱ्यांसाठी तंदूर भट्टीतले पदार्थ नवीन नाहीत. तंदूर चिकन, तंदूर कबाब, तंदुरी टिक्का या पदार्थांचे नाव ऐकले, की आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय रहात नाही. पण तंदूर भट्टीत आता चहासुद्धा बनतो. पुणे तिथे काय उणे’ या उक्तीनुसार ‘जगातले पहिले तंदुरी चहाचे हॉटेल’ पुण्यात खराडी येथे सुरू झाले आहे. या हॉटेलची टॅग लाइन आहे ‘जगातला पहिला आणि एकमेव तंदूर चहा’...

नगर जिल्हातल्या शनिशिंगणापुरजवळील ब्राम्हणी गावाच्या असलेले अमोल राजदेव आणि प्रमोद बानकर या आते-मामेभावंडांनी तंदूर चहाचे हे भन्नाट हॉटेल सुरू केले आहे. अमोल आणि प्रमोद हे दोघेही उच्चशिक्षित तरुण सुरवातीपासून व्यवसाय क्षेत्रातच होते. पण काहीतरी वेगळा व्यवसाय करण्याची ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. प्रमोदचे स्वतःचे मेडिकलचे दुकान होते, तर अमोलचे हॉटेल होते. काहीतरी वेगळे करण्याची कल्पना त्यांच्या डोक्‍यात सुरवातीपासून होती पण या कल्पनेचे स्वरूप निश्‍चित नव्हते.

एकदा स्वतःच्या गावी कामानिमित्त गेले असताना प्रमोद आणि अमोलची आजी सर्दीने आजारी होती. या सर्दीवरचा घरगुती उपाय म्हणून आपण सगळेच हळद-दूध घेतो. पण हे हळद-दूध गरम करण्यासाठी आजीबाईंनी खास त्यांच्या बटव्यातली एक अागळीवेगळी कृती अमोल आणि प्रमोदला दाखवली. दूध मातीच्या मडक्‍यात घालून त्यांनी शेकोटीमध्ये गरम करायला ठेवले आणि मातीच्या गरम मडक्‍यात तापलेले दूध सगळ्यांना प्यायला दिले. या हळद-दुधाच्या देशी कल्पनेतून या दोघांना तंदूर चहाची कल्पना सुचली. 

यानंतरचे सहा ते आठ महिने अमोल आणि प्रमोदने तंदूर चहाची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले.

चहाचे मसाले आणि चहातील घटकांचे प्रमाण बदलून वेगवेगळ्या चवीचा चहा कसा तयार करता येईल याच्या चाचण्या केल्या. चहा तंदूर भट्टीत गरम करण्यासाठी लागणारी मातीची मडकी त्यांनी खास गावाकडून तयार करून घेतली. तसेच यासाठी आवश्‍यक असणारी तंदूर भट्टीसुद्धा ऑर्डर देऊन विशिष्ट प्रकारे तयार करून घेतली. हे सगळे प्रयोग झाल्यानंतर त्यांना हव्या असलेल्या चवीच्या चहाची पाककृती हाती लागल्यानंतरच त्यांनी तंदूर चहाचा स्टार्ट अप सुरू केला. त्यांचा हा 'तंदूर चहा' अल्पावधीतच कमालीचा लोकप्रिय झाला. 

हा चहा तयार करण्याची रेसिपीसुद्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशिष्ट आणि खास तयार केलेले आयुर्वेदिक मसाले वापरून चहा केला जातो. दुसरीकडे तंदूर भट्टीमध्ये मातीची मडकी तापवली जातात. नंतर हा तयार चहा तंदूर भट्टीतल्या तापलेल्या मडक्‍यामध्ये ओतला जातो. गरमागरम फेसाळलेला चहा जेव्हा तापलेल्या मातीच्या मडक्‍यात ओतला जातो तेव्हा चहाचा आणि मातीचा एकत्रित असा सुगंध हॉटेलभर दरवळतो. चहा बनवण्याची ही आगळीवेगळी पद्धत बघण्यासाठी आलेले गिऱ्हाईक गर्दी करतात.

तंदूर चहाची नेमकी खासियत काय याविषयी प्रमोद आणि अमोल यांना विचारले असता त्यांनी सांगितले ‘आमच्या इथे मिळणारा चहा हा आर्युवेदिक पद्धतीने बनवला जातो. या चहासाठी लागणारा मसाला आम्ही स्वतः तयार करतो. तो बाहेर बाजारात मिळत नाही. तसेच तयार केलेला चहा मातीच्या मडक्‍यात ठेवून तंदूर भट्टीत गरम केला जातो. ही चहा बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत आहे. गरम मातीच्या मडक्‍यात चहा ठेवल्यामुळे चहाला एक धुरकट सुगंध व मातीची चव मिळते’

लोकल ते ग्लोबल तंदूर चहा
मार्च महिन्यात सुरू झालेला तंदूर चहाचा हा स्टार्ट अप अवघ्या सहा महिन्यात जगभर पसरला आहे. आत्ता पुण्यात तंदूर चहाच्या आठ ठिकाणी फ्रान्चायसी दिल्या गेल्या आहेत. तसेच मुंबईतसुद्धा वीस ठिकाणी तंदूर चहाची शाखा सुरू होणार आहे. याशिवाय दुबई येथून तंदूर चहाच्या फ्रान्चायसीसाठी मागणी आली आहे. थोडक्‍यात अवघ्या सहा महिन्यापूर्वी सुरू झालेले हे चहाचे दुकान जगभरात पोचले आहे.

संकल्पनेचे पेटंट
‘तंदूर चहा’ हा कल्पना सर्वेसर्वा अमोल आणि प्रमोद यांची ! पण जशी ही कल्पना लोकप्रिय होत आहे,  तसतशी अनेक ठिकाणी तंदूर चहाची दुकाने उघडली आहेत. आपली संकल्पना चोरी होऊ नये म्हणून अमोल आणि प्रमोद यांनी या तंदूर चहाचे पेटंटही मिळवले आहे. ज्यामुळे आता इतर कोठेही अशा पद्धतीचे दुकान उघडायचे असेल तर आता परवानगी घ्यावी लागणार आहे. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या