’फक्त चहा’चा आधार

रोशन मोरे
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

चहा स्टार्टअप
 

सतरा महिने एक ही रुपया न मिळता केलेली प्राध्यापकी आणि अचानक तुम्हाला कामावरून कमी करण्यात येतं आहे. हे हाती आलेलं पत्र...कोणतीही व्यक्ती या प्रसंगानंतर कोलमडून पडली असती, मात्र पुन्हा नव्याने सुरवात करत चहाला आपला आधार बनवणाऱ्या महेश तनपुरे या तरुणावर सोशल माध्यमातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.   

सिंहगड टेक्‍निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून महेश तनपुरे हे काम करत होते. सिंहगडने प्राध्यापकांचे वेतन थकविल्याने सर्व प्राध्यापकांनी संप केला होता. त्यात सिंहगडने अनेक प्राध्यापकांना सेवेवरुन कमी केले. त्यामुळे या प्राध्यापकांना इतरत्र काम शोधण्याची वेळ आली. तरपुरेंनी यातून मार्ग काढत स्वतःचा चहाचा व्यवसाय सुरू केला.  इंजिनिअर असणाऱ्या महेशने १५ऑगस्टपासून आपल्या स्वतःच्या मालकीचे ‘फक्त चहा’नावाचे चहाचे दुकान सुरू केले. 

इंजिनिअरिंगच्या अनुभवचा फायदा
सिंहगड टेक्‍निकल इन्सिट्यूटमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा नोकरी, की व्यवसाय हा प्रश्न महेश समोर होता. मात्र नोकरीतील अनुभव पाठीशी होता. त्यामुळे व्यवसाय करण्याचे त्याने नक्की केले. चहाचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरल्यानंतर चहाची गुणवत्ता आणि दुकानाची रचना करण्यासाठी त्याच्या इंजिनिअरींगच्या अनुभवाचा उपयोग झाला. ब्लॅक टी, लेमन टी, चॉकलेट टी, ग्रीन टी असे विविध प्रकरचे नऊ चहा येथे त्याने उपलब्ध करू दिले. त्यामुळे ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद त्याला सुरवातीपासूनच मिळाला. 

पित्त होणार नाही
चहा कितीही आवडीचा असला तरी पित्त होण्याच्या भीतीने तो टाळला जातो.  हेच ओळखून पित्त होणार नाही आणि चहाची चव ही चांगली राहिली याची खबरदारी महेशने घेतली आहे. आपल्या चहापासून पित्त होवू नये म्हणून त्याने चहा बनवण्याची विशिष्ट रेसिपीच तयार केली आहे. महेश सांगतो. चहामध्ये वापरण्या येणाऱ्या साखरेमध्ये सल्फर असते. साखर बनवत असताना साखरेच्या दाण्यापासून अशुद्धता वेगळी करण्यासाठी सल्फर वापरतात. पण चहाच्या माध्यमातून तसेच रोजच्या आहारातून साखर आपण नियमितपणे घेत असल्याने सल्फर पोटात जाऊन त्याचे ’ऑक्‍सआईड्‌स’ तयार होते. ते शरीराला घातक ठरु शकते. त्यामुळे चहा तयार करताना आम्ही सल्फर विरहित साखर वापरतो. पण फक्त याचमुळे पित्त टाळता येत नाही. त्यासाठी आम्ही चहा तयार करताना त्यात विशिष्ट प्रकारच्या पाच पदार्थांपासून बनवलेली आमची चहाची रेसिपी वापरतो.

सुरवातीला घरांच्याकडून विरोध
चहा विक्रीचा व्यवसाय करणे, याला आपल्याकडे अजूनही म्हणावी तशी प्रतिष्ठा नाही. इंजिनिअरिंग सारखे उच्च शिक्षण घेणाऱ्या महेशकडून घरच्यांची हीच अपेक्षा होती की त्याने केवळ नोकरी करावी. त्यामुळे चहाचा व्यवसाय सुरू करे पर्यंत त्याने आपण चहा विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे घरी सांगितलेच नाही. चहा विक्रीचा व्यवसाय सुरू झाल्यानंतर चार दिवसांनी घरी कळवले, की आपण आता आपण पूर्णवेळ चहाचा व्यवसाय करत आहोत.   

नव्या तंत्राचा उपयोग करणार
व्यवसायात नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग हा झाला पाहिजे. हेच ओळखून भविष्याच्या दृष्टीने महेशने चहा उकळण्यासाठी सौरऊर्जा व पवन ऊर्जा यांचा वापर करता येईल का? याचा अभ्यास सुरू केला आहे. तसेच भविष्यात यात सखोल संशोधन करता यावे यासाठी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची तयारी ही त्याने दाखवली आहे.     

कमी पैशात सुरू होणारा हा व्यवसाय असला तरी यात सातत्याने तुम्हाला गुणवत्ता टिकवून ठेवावी लागते. अचानक आलेल्या संकटामुळे मला चहाच्या व्यवसायाकडे वळावे लागले. सध्या ३० लिटरपेक्षा जास्त दूध चहासाठी मला लागत आहे. चहाच्या दर्जाशी कोणतीही तडजोड न करता दर्जेदार चहा देणे हेच माझे मुख्य लक्ष आहे.
 - महेश तनपुरे,  ’फक्त चहा’

फोटो फीचर

संबंधित बातम्या