येवले अमृततुल्य...चव न्यारी!

रोशन मोरे
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

चहा स्टार्टअप
 

’येवले चहा एकदा पिऊन तर पहा’ असे आवाहन करणारे येवले अमृततुल्य एकदा घेतल्यानंतर चहा प्रेमी येथे वारंवार येत असतात. येवले अमृततुल्य सुरू झाले आणि त्याला एवढी पसंती मिळाली, की पाहता पाहता येवले अमृततुल्यच्या ११ शाखा पुणे शहर आणि परिसरात सुरू झाल्या. या प्रत्येक ठिकाणी चहाप्रेमींची गर्दी ही येवले कुटुंबीयांचे कष्ट आणि उद्यमशीलतेला मिळालेली पोहच पावती असल्याचे येवले अमृततुल्यचे डायरेक्टर नवनाथ येवले सांगतात.     

शिल्लक दुधातून चहाचा व्यवसाय
 पुरंदर तालुक्‍यातील आस्करवाडी येथील येवले कुटुंब. या कुटुंबाचा मूळचा व्यवसाय दुधाचा. व्यवसाय फार मोठा नव्हता, तरी दूध शिल्लक राहत असे. त्यातून चहाच्या हॉटेलची कल्पना दशरथ येवले यांच्या मनात आली आणि त्यांनी भाडयाने जागा घेऊन लष्कर भागात चहा विक्रीचा व्यवसाय भागीदारीत सुरू केला. पुढे सॅलिसबरी पार्क भागात १९८३ मध्ये ’गणेश अमृततुल्य’ या नावाने त्यांनी स्वत:चं हॉटेल सुरू केले. घरातील अन्य मंडळीही हा व्यवसाय पाहात होती आणि तो पाहत असतानाच पुण्यात आपल्या स्वत:च्या नावाचे काही तरी उत्पादन असावे, अशी सर्वांची इच्छा होती. त्यातून नवनवीन कल्पनांवर काम करत चहाच्या हॉटेलची कल्पना पुढे आली.

चवीसाठी संशोधन
२००१ मध्ये येवले अमृततुल्यचे  संस्थापक दशरथ भैरू येवले यांचे निधन झाले. दशरथ येवले यांच्या मृत्यू नंतर येवले कुटुंबीयांच्या नावाचे मार्केटमध्ये एखादे प्रॉडक्‍ट असावे ज्यामुळे येवले कुटुंबीयांची मार्केटमध्ये वेगळी ओळख निर्माण होईल. असा विचार येवले कुटुंबीय करत होते. त्यामुळे चहाची उत्तम चव कशी तयार होईल? याचा त्यांनी अभ्यास केला. दोन वर्ष फक्त येवले अमृततुल्यच्या चवीवर काम करुन चव फायनल केली. आणि १ जून २०१७ रोजी भारती विद्यापीठ येथे येवले अमृततुल्य या नावाने दर्जेदार चहाच्या विक्रीस सुरवात झाली.  पहिल्या हॉटेलला मिळालेल्या प्रतिसादानंतर येवले चहाची दुसरी शाखा बुधवार चौकात फरासखान्यासमोर सुरू झाली आणि येवले चहाची प्रसिद्धी आणि चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. चहाप्रेमींना या चहाची चव आवडल्याचे लक्षात आल्यानंतर सदाशिव पेठेत तसेच शिवाजीनगरला शाखा उघडण्यात आल्या. त्यानंतर हत्ती गणपती चौक, पिंपरीतील शगुन चौक इथेही येवले चहा सुरू झाला आणि डेक्कन जिमखाना येथे नवी शाखा सुरू झाली.

एकदा येणारे परत परत येतात 
जाड काचेच्या कपामध्ये दिला जाणारा चहा हे येवले चहाचे वैशिष्टये. दूध गरम करण्यासाठी इथे यंत्राचा वापर केला जातो.  इथे गेल्यानंतर तुम्हाला कधी थांबावे लागले किंवा चहा तयार नाही, असे कधीच होत नाही. त्यामुळे इथली तत्परता आणि स्वच्छताही नजरेत भरते. त्यामुळेच येवले अमृततुल्यची चव एकदा चाखणारा ग्राहक येथे वारंवार येताना दिसून येतात.

परदेशात मागणी
येवले चहाच्या चवीला मिळालेला प्रतिसाद पाहता सप्टेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत ४० नव्या शाखा सुरू होणार आहेत. त्यातच येवले चहाची किर्ती परदेशात देखील पोचली असून यूएस, बॅंकाँक आणि दुबई येथे येवले अमृततुल्यच्या शाखा सुरू करण्याची  मागणी होते आहे. परदेशात लवकरच येवले अमृततुल्यची शाखा आपणास दिसून येईल. असा विश्‍वास नवनाथ येवले व्यक्त करतात.

चहा हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पण चहाची चव जशी हवी तशी मिळत नाही. जर आपण चहाला एक दर्जेदार चव दिली. तर चहा प्रेमी नक्कीच येवले अमृततुल्यकडे आकर्षित होतील. याची खात्री होती. या व्यवसायामागचा उद्देश  हा केवळ पैसे मिळवणे हा नसून लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, हा आहे. 
 - नवनाथ येवले,   डायरेक्टर, येवले अमृततुल्य

फोटो फीचर

संबंधित बातम्या