वेळेला चहा हवाच...

संकलन : रोहित हरीप, रोशन मोरे
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

चाय पे चर्चा
चहाचे हॉटेल असो किंवा साधी टपरी; प्रत्येकाची चहाची जागा आणि वेळ ठरलेली असते. घरचा चहा उत्तम हे मान्य; पण नोकरीसाठी, शिक्षणासाठी घरदार सोडून आलेल्यांना आणि इतरांनाही चहाचे अड्डेच हक्काचे वाटतात. पुण्यातल्या अशाच काही अड्ड्यांविषयी...

तिलक चहा, टिळक रोड
पुण्यातला सर्वोत्तम चहा मिळण्याऱ्या ठिकाणांची जर यादी काढली तर त्यात ‘तिलक हॉटेल’ नाव नक्कीच पहिल्या तिनात येईल. टिळक रस्त्यावर चिमण बागेत कायम असलेली गर्दी हीच तिलकची खरी ओळख आहे. गेल्या सात- आठ वर्षात चहाचे अनेक नवीन ब्रॅंड बाजारात आले, नवनवीन दुकाने सुरू झाली पण ‘तिलक’ हॉटेल त्याचा आब राखून आहे. तिथली गर्दीही अजूनही तशीच आहे.
‘तिलक’ प्रसिद्ध आहे तिथल्या वेलचीयुक्त चहासाठी !. सकाळी साडेसहापासून ते रात्री नऊपर्यंत हे हॉटेल सुरू असते. इथल्या चहाचे वैशिष्ट्य म्हणाल तर या हॉटेलमध्ये कुठल्याही वेळेला गेलात तरी इथल्या चहाची चव कधीच बदलत नाही.
या हॉटेलचे मालक-भागीदार असलेले जगदीश नर्तेकर माहिती देताना सांगतात ‘१९८९ मध्ये सुरू झालेल्या या हॉटेलला आज तीस वर्षे झाली. गेल्या तीस वर्षात जगात एवढे बदल झाले, पण आमच्या तिलकच्या चहाची चव बदललेली नाही. आम्ही आमच्या चहामध्ये आल्याचा बिलकूल वापर करत नाही तर वेलचीचा वापर करतो. ज्यामुळे आमचा चहा पिऊन ॲसिडिटीचा त्रास बिलकूल होत नाही. दुकान सुरू केले तेव्हा १ रुपयाने चहा विकला. आज तीस वर्षानंतरही चहाच्या किमतीत फारशी वाढ केलेली नाही. आज रोज शंभर- सव्वाशे लिटर दुधाचा चहा आम्ही बनवतो पण चहाच्या चवीत तुम्हाला कधीच फरक जाणवणार नाही’
पुणेकरांसाठी तिलक माहिती नाही असा माणूस सापडणे अवघड आहे पण तुम्ही पुणेकर नसाल तर पुण्यात आल्यानंतर तिलकचा चहा नक्की ट्राय करावा. 

बालाजी टी हाउस, ओंकारेश्‍वर
प्रत्येक शहरात चहाची अनेक दुकाने असतात पण प्रत्येक दुकानात, प्रत्येक टपरीवर मिळणारा चहा हा उत्तम असेलच असे नाही. चमकोगिरीच्या दुनियेत काही दुकाने मात्र स्वतःची गुणवत्ता आणि गिऱ्हाइकं सांभाळून असतात. त्यांना कुठल्याच जाहिरातबाजीची आवश्‍यकताही वाटत नाही. त्यांच्या चहाची चव पुरेशी असते लोक जमवायला... असाच एक चहाचा अड्डा म्हणजे ओंकारेश्‍वर मंदिराजवळील बालाजी टी हाउस.
नदीकाठच्या रस्त्यावरून ओंकारेश्‍वर मंदिराकडे वळताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी गर्दी तुमचे लक्ष हमखास वेधून घेते. ही गर्दी असतो बालाजीच्या चहाबाजांची... कोकणातल्या चिपळूणच्या रूपेश जवरत आणि दीपक जवरत बंधूनी सुरू केलेले हे चहाचे हॉटेल त्यांच्या वाफाळत्या चहासाठी प्रसिद्ध आहे. त्यांना हॉटेल सुरू करून बारा वर्षे झाली. बाकी सगळीकडे महागाई गगनाला भिडलेली असताना इथे मात्र अजूनही माफक दरातच चहा मिळतो. बर किंमत कमी असली तरी चहाचा दर्जा मात्र उत्तमच आहे. त्यात कुठेच तडजोड नाही. इथल्या चहाचे वैशिष्ट म्हणजे हा चहा कडक वगैरे नसतो, प्रमाणात घातलेले दूध आणि साखर, बेताची गोडी आणि वेलचीचा स्वाद यामुळे चहाची रंगत अजूनच वाढते. या हॉटेलला कुठली नावाची पाटी नाही, ना त्यांचे फेसबुकवर कुठले पेज आहे पण चांगला चहा प्यायचा म्हटलं, की अस्सल चहाबाजांची पावले हमखास बालाजी टी हाऊसकडे वळतात. 

सद्‌गुरुकृपा टी सेंटर, कर्वेनगर
कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजच्या शेजारील ऋतुजा पार्कमध्ये परिसरात एक चहाची टपरी आहे. चहाच्या टपरीचे नाव सद्‌गुरुकृपा टी सेंटर असले तरी या टपरीच्या नावाचा फलक तुम्हाला तेथे दिसणार नाही. या ठिकाणी कधीही गेला तरी तुम्हाला गर्दी दिसून येईल. अद्रकवाली चहा ही सद्‌गुरुकृपा सेंटरची स्पेशालिटी असल्याचे टी सेंटरचे मालक प्रवीण पाटील सांगतात. सकाळी ६.३० ते रात्री १० पर्यंत हा टी स्टॉल चालू असतो. कडक चहा न बनवता दुध आणि साखरेचे योग्य प्रमाण वापरून चहा बनवला जातो. एकदा चहा घेतला तर त्याची चव दिवसभर जिभेवर रंगाळते, असे येथे चहा घेण्यासाठी आलेल्या कमिन्स कॉलेजच्या विद्यार्थिनी सांगतात. शेजारी चहाच्या अनेक टपऱ्या आहेत. मात्र सर्वाधिक गर्दी आणि पसंती ही सद्‌गुरुकृपा टी सेंटरला देतो असेही त्या आवर्जून सांगतात. प्रवीण पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार चहासाठी ते चितळे दुधाचा वापर करतात. त्यांना चहा टी सेंटर सुरू करुन केवळ तीनच वर्ष झाली आहेत. मात्र या तीन वर्षामध्ये चहाची उत्तम चव व देण्यात येणारी सेवा यामुळे ग्राहक येथे वारंवार येताना दिसून येतात.

हरगणे चहा, मुळशी
पुण्यावरून मुळशीकडे जाताना शेरे गावाच्या पुढे हरगणे चहा सेंटर आहे. चहासोबत येथे वडापाव, भजी देखील मिळतात. मात्र येथील खास ओळख आहे ती गोड बासुंदी चहा. तुम्हाला गोड चहा आवडत असेल तर हरगणे टी सेंटर वरील चहाचे तुम्ही फॅनच होता. पर्यटन करण्यासाठी अनेक जण मुळशी परिसरात येत असतात. त्यांच्या चहाचे हक्काचे ठिकाण हरगणे चहा सेंटर बनले आहे. छोट्याशा जागेत चालणाऱ्या या टी सेंटरवर प्रवासी चहा पिण्यासाठी आवर्जून थांबतात. चहाची किंमत देखील येथे जास्त नाही. केवळ ५ रुपयामध्ये येथे फूल चहा मिळतो.

मोदी चहा, पत्र्या मारुती
पत्र्या मारुती जवळ भटबोळीमध्ये असणारा व्दाराकधीश चहा ’मोदी चहा’नावाने प्रसिद्ध आहे. दुकानात लावलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रांसोबतच ’टॅक्‍स भरा आणि चहा घ्या’ ’व्यक्तिमत्त्वाप्रमाणे दमदार चहा’ ’स्वच्छ देश निरोगी जीवन’ ’अनुशासन यशाचे प्रतिक ’अशी वचने  ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. येथील चहाला उत्तम चव आहे. बासुंदी चहा ही येथील स्पेशालिटी असल्याचे द्वारकाधीश चहाचे मालक ललित ओझा सांगतात. येथे ग्राहकांची नेहमीच गर्दी असते. चहाच्या गुणवत्तेशी कोणतीच तडजोड केली जात नाही. तसेच १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला येथे दिला जाणारा मोफत चहा हे मोदी चहाचे वैशिष्ट आहे. मोदी नाव जोडल्यामुळे आपोआपच या चहाला प्रसिद्धी मिळाली मात्र जर गुणवत्ताच नसेल तर  ही प्रसिद्ध काय कामाची हे ओळखून आपण चहाची गुणवत्ता कायम ठेवली असल्याचेही ओझा सांगतात.  

वैजनाथ अमृततुल्य, मोतीबाग
काही लोकांना गोड चहा आवडतो तर काहींना कडक. मात्र गोड आणि कडकपणा यांचा सुरेख संगम असणारा चहा म्हणजे ’वैजनाथ अमृततुल्य’. शनिवार पेठेतील मोतीबागेसमोर असलेल्या वैजनाथ अमृततुल्य येथे २००१ पासून आहे. अठरा वर्षामध्ये चहाच्या चवीत कोणताही फरक पडला नसल्याचे येथील जुने ग्राहक सांगतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी येथे चहासाठी गर्दी करतातच सोबत व्यापारी वर्गामध्ये देखील हा चहा प्रसिद्ध आहे. पूर्वी पुण्यात राहणारे मात्र कामानिमित्ताने बाहेर असणारे कुटुंबासोबत खास चहा पिण्यासाठी येथे येत असतात. चहासाठी गोकूळ दुधाचा वापर केला जातो असे वैजनाथ अमृततुल्यचे मालक मनीष दवे सांगतात. चहा करताना दुध आणि साखरेचे योग्य प्रमाणात केलेला वापर यामुळे आपल्या चहाची टेस्ट टिकून असल्याचे ही ते सांगतात. गेली पाच वर्ष येथे चहा पिण्यासाठी येणारा विशाल जाधव म्हणतो, स्पर्धा परीक्षा करण्यासाठी मी पुण्यात आलो त्यानंतर चहा पिण्यासाठी मित्रांसोबत एकदा मी येथे आलो होतो. मात्र या चहाची चव इतकी अप्रितम आहे, की मी गेली पाच वर्ष फक्त चहा पिण्यासाठी वैजनाथ अमृततुल्यमध्ये येतो आहे.

हरीशचा चहा
बुधवार पेठेतील सकाळ कार्यालयातील कॅन्टीनमधील चहा विशेष प्रसिद्ध आहे. गेली ३२ वर्ष चहाचा दर्जा श्रेष्ठ राखल्याचे लोक आवर्जून येथे चहा पिण्यासाठी येतात. असे कॅन्टीन चालक हरीश शेट्टी सांगतात. अद्रकवाली आणि इलायची चहा ही येथील खास ओळख. मात्र आरोग्याच्या दृष्टीने लेमन टी, ग्रीन टी, ब्लॅक टी देखील येथे तयार करुन दिला जातो. या चहांना ग्राहकांकडून  अलीकडच्या काळात खूप मागणी वाढली असल्याचे हरीश सांगतात.नजरेत भरेल अशी स्वच्छता आणि  तत्पर सेवा यांच्यामुळे येथे चहा पिण्यासाठी ग्राहकांची नेहमीच गर्दी असते. दिवसातून एकदाच चहा करुन तो दिवसभर गरम करुन ग्राहकांना दिला जातो, अशी परिस्थिती सर्वसाधारणपणे सर्वत्र दिसते. मात्र ग्राहकांनी ऑर्डर दिल्यानंतरच कमी साखरेची, बिनसाखरेची, गोड, कडक चहा तयार करुन दिला जात असल्याचे हरीशच्या चहाचे वैशिष्ट आहे.   

फोटो फीचर

संबंधित बातम्या