चहाच्या अनवट वाटा 

माधव गोखले
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

टी बुक
 

माणसाच्या खाद्ययात्रेच्या धारोपधारांविषयी लिहीत होतो. ती ‘सु-रस यात्रा’ वाचणाऱ्या एका मैत्रिणीचा एक दिवस फोन आला. ‘वर्ल्ड ॲटलास ऑफ टी पाहिलंय का... घेऊ का तुमच्यासाठी एक? माझ्याकडून भेट तुम्हाला.’ माझ्या पुस्तकप्रेमी मैत्रिणीमुळे ‘द वर्ल्ड ॲटलास ऑफ टी ः फ्रॉम द लीफ टू द कप वर्ल्डस टीज्‌ एक्‍सप्लोर्ड ॲण्ड एंजॉईड’ अशा लांबलचक नावाचे इंटरेस्टिंग पुस्तक माझ्या संग्रहात दाखल झाले. माणसाच्या खाद्यसंस्कृतीचे वेगवेगळे पदर उलगडणारी अक्षरशः हजारोंनी पुस्तके आहेत, सगळ्या भाषांमध्ये आहेत. आपल्या वेदवाङ्‌मयापासून अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये, रामायण - महाभारतासारख्या काव्यांमध्ये, कौटिल्याच्या अर्थशास्त्रात, मराठीतला आद्यग्रंथ असणाऱ्या लीळाचरित्रात त्या त्या काळातल्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडतेच; पण अगदी गेल्या दोन-अडीचशे वर्षांत तंजावरच्या राजघराण्याने, राजस्थानातल्या काही संस्थानिकांनीही त्यांच्या मुदपाकखान्यात शिजणाऱ्या पदार्थांच्या कृती ग्रंथबद्ध केल्याची उदाहरणे आहेत. केवळ पाककृतीच नव्हेत, तर खाद्यपदार्थ आणि त्यासाठी वापरले जाणारे विविध जिन्नस, त्यांचा इतिहास, भूगोल, त्यांचा सांस्कृतिक वारसा, जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत झालेला त्यांचा प्रवास, या प्रवासात त्या त्या पदार्थांनी ल्यायलेली स्थानिक चवींची, रस-रंग-गंधाची लेणी या सगळ्याविषयी विपुल लिखाण झाले आहे. खाद्यसंस्कृतीचा प्रवास हेच एक अजब रसायन आहे. मग पूर्वेकडच्या तलम रेशमाइतकेच पाश्‍चिमात्यांना भुरळ घालणारे मसाल्याचे पदार्थ असोत किंवा जगात जिथे जिथे पोचले तिथल्या तिथल्या चवी स्वीकारणारे आइस्क्रीम असो किंवा चायनीज खाद्यसंस्कृतीशी (अनेकदा केवळ नामसाधर्म्याच्या जोरावर) नाते सांगणारे प्रांतोप्रांतीचे ‘चायनीज’ अवतार असोत, या प्रत्येकाचा प्रवास रंजक आहे... आणि त्यावर खूप लिहिलेही गेले आहे. 

खाद्यपेयांच्या या जगातले काही रहिवासी इतके अतिपरिचित असतात, की अशा पदार्थांवर पुस्तकेच्या पुस्तके असू शकतात ही कल्पनाच येत नाही. मीठ घ्या उदाहरण म्हणून! खाद्ययात्रेतला हा खरे तर अफलातून घटक. पण फक्त मीठ या विषयावर आख्खे पुस्तकच्या पुस्तक असते याचे बऱ्याचजणांना आश्‍चर्य वाटते. ‘इश्‍श... मीठावर काय एवढे लिहिणारे हा....’ असा प्रश्‍न माझ्या एका आत्याला पडला होता. मिठाचा सत्याग्रह, महात्मा गांधींनी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर उचललेले मूठभर मीठ, त्यातून स्वातंत्र्यलढ्याला मिळालेले बळ या माहितीनिशी आपल्यापैकी बहुतेकांच्या बॅकअपमधला मिठाचा इतिहास आटपतो. पण मार्क कुर्लान्स्कीच्या ‘सॉल्ट - अ वर्ल्ड हिस्टरी’मध्ये मांडलेला मिठाचा आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहास वाचताना किंवा रॉय मॉक्‍झॅमनी लिहिलेले ‘द ग्रेट हेज ऑफ इंडिया’ वाचल्यावर साम्राज्ये उभी करणाऱ्या आणि ती धुळीलाही मिळवणाऱ्या मिठाची गोष्ट वेगळ्याच वाटेनी उलगडत जाते. 

ख्रिस्तिना, क्रीस, स्मिथचे ‘वर्ल्ड ॲटलास ऑफ टी’ वाचकाला चहाच्या अशाच अनवट वाटेवर घेऊन जाते. ख्रिस्तिना स्मिथ ब्रायगनमधल्या ‘ब्ल्यूबर्ड टी कंपनी’ची अर्धी मालकीण. ती स्वतः मिक्‍सॉलॉजिस्ट म्हणजे मिश्रणतज्ज्ञ आहे. चहाच्या व्यवसायात काही वर्षे घालवल्यानंतर ख्रिस्तिना आणि तिचा भागीदार मार्टिन यांनी चहाविषयीच्या त्यांच्या स्वतःच्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी स्वतःचीच कंपनी काढली. 

वास्तविक, चहा नसेल तर अनेकांना अंमळ ‘जड’च जाते; पण साक्षात अमृताशीच स्पर्धा करणाऱ्या या कषायपेयाबद्दलच्या आपल्या माहितीला ‘चहाचा शोध चीनमध्ये लागला आणि मग तिथून तो जगभर गेला,’ एवढ्यावरच पूर्णविराम मिळतो. आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्या काही मंडळींना चहात टॅनिन नावाचे विष असते अशी थोडी जादा माहिती असते आणि ते चहा पिणे आरोग्यास बरे की घातक या विषयावर चर्चाही करू शकतात (पक्षी - वादही घालू शकतात.) 

‘वर्ल्ड ॲटलास ऑफ टी’ नंतर काही काळ मी चहाविषयक पुस्तकांच्या मागेच लागलो. इंग्रजीत लोकांनी चहावर उदंड लिहिले आहे. पुस्तके आहेत, ब्लॉग आहेत. अशाच एका ब्लॉगवर मला चहा, चहाचा इतिहास, चहा पिकवणारे प्रांत, चहाची पाने खुडणे, ती वाळवणे, त्यापासून चहा नावाची ती अजब वस्तू - ज्याची संभावना साधारणतः ‘चहा पावडर’ किंवा ‘चाय पत्ती’ अशी होते - तयार होण्याच्या तऱ्हा, चहाची प्रतवारी, चवी, त्यांचे मिश्रण, चहा करण्याच्या, पिण्याच्या, पाहुण्यांना देण्याच्या पद्धती या विषयांवर एक-दोन नव्हे तर तब्बल एक्केचाळीस पुस्तकांची यादी मिळाली. या आणि चहावरच्या पुस्तकांच्या अन्य एक-दोन याद्यांमध्ये ‘द स्टोरी ऑफ टी ः अ कल्चरल हिस्टरी ॲण्ड ड्रिंकींग गाइड’ या मेरी आणि रॉबर्ट हेस यांच्या पुस्तकाला पहिला क्रमांक दिलेला आढळतो. ‘एम्पायर ऑफ टी - द एशियन लीफ दॅट कॉन्कर्ड द वर्ल्ड’ हे माझ्या संग्रहातले चहावरचे आणखी एक पुस्तक. मार्कमन इलिस, रिचर्ड काऊल्टन आणि मॅथ्यू मॉगर या लेखक त्रयीचे हे पुस्तकही चहाच्या मूळांचा शोध घेत ब्रिटिश साम्राज्याच्या राजकारणातल्या चहाच्या भूमिकेपासून चहाच्या जागतिकीकरणापर्यंतचा प्रवास मांडत जाते. व्यावसायिकीकरणाच्या दृष्टिकोनातून चहाचे सहज लक्षात न येणारे किंवा सहजी लक्षात न घेतले जाणारे पैलू लेखक त्रयी मांडते. सर्वव्यापी असणारा चहा हा अगदी सुरवातीच्या काळात जागतिकीकरण आणि कॉर्पोरेटायझेशन झालेल्या उत्पादनांपैकी एक आहे, हा एक भाग. बहुराष्ट्रीय कंपन्या, मल्टिनॅशनल्स, हा शब्दही भाषेत नव्हता तेव्हा स्थापन झालेल्या मल्टिनॅशनल कंपन्यांपैकी एक म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी असे म्हटले जाते. एखाद्या उत्पादनाचे कमॉडिटीकरण करून, ते उत्पादन म्हणजे लोकांची दैनंदिन गरज होईल याकडे विशेष लक्ष द्यायचे या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या व्यापारनीतीने आता जग व्यापून टाकले असले तरी अठराव्या शतकाच्या मध्यावर केव्हातरी याच नीतीने ब्रिटिशांना व्यापणाऱ्या उत्पादनाचे नाव होते - चहा. प्रथमपासूनच चहाचे जागतिकीकरण झाल्याचा संदर्भ भानू काळे यांच्या ‘बदलता भारत’ या लेखसंग्रहातल्या ‘चहाच्या कपातले जग’ या लेखातही वाचायला मिळतो. 

चहाविषयी अलीकडचे अहवाल वाचताना आणखी एक संदर्भ सापडला. चार वर्षांपूर्वी, २०१४ मध्ये, जगातला चहाचा व्यापार होता ३६ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या घरात; २०१७ मध्ये तो पोचला होता ३९.३ अब्ज अमेरिकी डॉलर्सवर.

कॉफीप्रेमी असणाऱ्या ब्रिटिशांच्या आयुष्यात चहा आला आणि कॉफीपेक्षा शिरजोर होऊन बसला. इंग्रजांच्या ‘चहांबाज’पणामुळेच भारतात चहाचे मळे रुजले. ईस्ट इंडिया कंपनीकडे चीनमधून चहा खरेदी करण्याची मक्तेदारी होती. ही मक्तेदारी संपत आली तशी चीनशिवाय चहा आणखी कुठे कुठे पिकू शकेल हे शोधण्याची नड इंग्रजांना भासायला लागली. त्यातून आसाममधल्या चहाच्या स्थानिक जातीचा शोध लागला. या सगळ्या घडामोडी एकोणिसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकाच्या सुरवातीच्या. 

‘वर्ल्ड ॲटलास ऑफ टी’ हातात येईपर्यंत चहाच्या झुडपाला फुले येत असतील का, हा प्रश्‍नही मला कधी पडला नव्हता. कारण केवळ पानांसाठी लागवड केली जाते, अशा काही गिन्याचुन्या वनस्पतींमध्ये चहाचा समावेश होतो. त्यातही चहाची कोवळी पानेच खुडली जातात. कॅमेलिया कुळातल्या या वनस्पतीची फुले बटन गुलाबासारखी किंवा कवठी चाफ्याच्या फुलांसारखी दिसतात. ‘वर्ल्ड ॲटलास..’ मधली सगळीच छायाचित्रे लक्ष वेधून घेणारी आहेत. किंबहुना हा ॲटलास एकंदरच देखणा आहे. 

चहाचे बी पेरून, कलम करून किंवा थोडी वाढ झालेली रोपे लावून घरामागच्या बागेतही चहा पिकवता येण्याच्या शक्‍यता, तुमच्या आवडीच्या चहाच्या चवीची रेसिपी, चहाचे रसायनशास्त्र, चहाच्या बागा आणि त्या बागांमध्ये तयार झालेल्या चहावर प्रक्रिया करण्याच्या पद्धती, इंग्लिश ब्रेकफास्ट, बर्गमाँटच्या तेलात चहाच्या पानांचे मिश्रण करून तयार होणारा अर्ल ग्रे चहा अशा अनेक मुद्‌द्‌यांबरोबर ‘वर्ल्ड ॲटलास’ प्रत्येक प्रकारच्या चहाची कहाणी या सगळ्या गोष्टी खूप खुबीने उलगडत नेतो. 

चीनी चहाचा पितामह लू यू याने लिहिलेले ‘द क्‍लासिक ऑफ टी’ हे चहावरचे सगळ्यात जुने पुस्तक. आठव्या शतकातले. चहावरच्या पुस्तकांचा हा सिलसिला आज एकविसाव्या शतकातही सुरू आहे. चहाचे गुणवर्णन करणाऱ्या पुस्तकांबद्दल चहापानाचे धोके सांगणारीही पुस्तके आहेत. रॉय मॉक्‍झॅमने चहातून निर्माण झालेल्या शोषणाची कहाणी सांगणारे ‘टी - ॲडिक्‍शन, एक्‍स्प्लॉयटेशन ॲण्ड एम्पायर’ असे पुस्तक लिहिले आहे. मॉक्‍झॅमच्या या पुस्तकाचे ‘चहा ः व्यसन, पिळवणूक आणि साम्राज्य’ अशा नावाने मराठीत भाषांतरही झाले आहे. नॅशनल बुक ट्रस्टनी चहाची कहाणी सांगणारे एक छोटेखानी पुस्तक प्रसिद्ध केले आहे.

माझ्या ऐकण्या-पाहण्यात असलेली चहा पुस्तकांची ही गोष्ट एका उल्लेखाशिवाय अपुरी राहील. ‘नाइंटीन एटीफोर’ आणि ‘ॲनिमल फार्म’ या विख्यात साहित्यकृतींबरोबरच संस्कृती, भाषा आणि राजकारणावर अनेक गाजलेले निबंध लिहिणाऱ्या जॉर्ज ऑर्वेलनी उत्तम चहा करण्याचे अकरा नियम सांगितले आहेत. ‘अ नाईस कप ऑफ टी’ हा १९४६ चा निबंध. ‘चहा कसा करायचा यावर तुंबळ वादावादी होऊ शकते,’ असे सांगताना ऑर्वेलसाहेब पुढे लिहितात, ‘अकरापैकी कदाचित दोन नियम सगळ्यांना मान्य होतील, पण अन्य चारांवर प्रचंड मतभेद असू शकतात. पण माझ्या मते माझ्या अकरा नियमांपैकी प्रत्येकच नियम गोल्डन रूल आहे.’ चहा करायला भारतातली किंवा सिलोन (आता श्रीलंका) मधलीच चहाची पाने वापरावीत, चहा चिनी मातीच्या किंवा मातीच्या भांड्यातच करावा असे सांगताना चहा नेहमीच बिनसाखरेचा घ्यावा असाही एक नियम ते सांगतात. कारण चहात साखर घालून चहाची चव बिघडवण्यात काय हशील!

फोटो फीचर

संबंधित बातम्या