गरमागरम चहा...

सुजाता नेरुरकर
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

टी टाईम
सकाळच्या चहाने आपल्या दिवसाची सुरुवात होते. चहा घेतल्यावर आपल्याला अगदी ताजेतवाने वाटते कारण चहाचा गुणधर्म तसा आहे. पण आजकाल आपली जीवनशैली बदललेली आहे. बदललेल्या जीवनशैलीनुसार अनेक वेगवेगळ्या प्रकारे चहा करता येतो. चहा करण्याचे काही नावीन्यपूर्ण वेगळे प्रकार देत आहोत; जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत. पुदिना, लिंबू, आले, मध, हळद, मसाले वापरून ते केले आहेत.

अमृततुल्य चहा
अमृततुल्य चहा हा पुण्यात खूप लोकप्रिय आहे. हा चहा थोडा दाट म्हणजेच घट्ट असून थोडा गोड असतो. यामध्ये दूध, सोसायटी टी, चहाचा मसाला, साखरसुद्धा नेहमीपेक्षा जास्त असते. अशा प्रकारचा एक कप चहा घेतला तरी छान फ्रेश वाटते.
साहित्य : एक कप दूध, एक कप पाणी, ५ टीस्पून साखर, १ टीस्पून चहा मसाला, ३ टीस्पून सोसायटी चहा पावडर
कृती : प्रथम एका भांड्यात दूध व पाणी मिक्‍स करून विस्तवावर गरम करायला ठेवावे. मग त्यामध्ये चहा मसाला, साखर, चहा पावडर घालून चांगला उकळून घ्यावे. गरमागरम अमृततुल्य चहा बिस्कीटांबरोबर किंवा बनबरोबर सर्व्ह करावा.

आईस लेमन टी 
आपल्याकडे चहाचे शौकीन बरेच आढळतात. ज्यांना चहा खूप आवडतो त्यांना हा आईस लेमन टी खूप आवडतो, हा चहा एकदम ताजेतवाने करतो कारण यामध्ये लिंबूरस घातल्यामुळे थोडा आंबट लागतो त्यामुळे आपल्या नेहमीच्या चहापेक्षा खूप चवीस्ट लागतो. नाश्‍त्याबरोबर हा चहा मस्त लागतो. पण हा चहा थंड आहे त्यामुळे आपण जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा बनवतात पण काही जणांना हा चहा कधी पण घेतला तरी चालतो.
साहित्य : चार कप पाणी, चार टीस्पून चहा पावडर, चार टीस्पून लिंबूरस, आठ टीस्पून साखर, १०-१२ बर्फाचे तुकडे, १०-१२ पुदिना पाने, छोटे लिंबू (उभे पातळ चकतीसारखे कापून)
कृती : एका भांड्यात ४ कप पाणी गरम करून घ्यावे. त्यामध्ये चहा पावडर, पुदिना पाने, साखर घालून २ मिनिटे चहा उकळून घेऊन; दुसऱ्या भांड्यात गाळून थंड करायला ठेवावे. चहा थंड झाल्यावर त्यामध्ये लिंबूरस व अजून साखर पाहिजे असेल तर घालून मिक्‍स करून घ्यावे. सर्व्ह करताना चहा काचेच्या ग्लासमध्ये ओतून त्यामध्ये बर्फ, पुदिना पाने व लिंबाची एक चकती घालून सजवून सर्व्ह करावे.

आयुर्वेदिक टी 
अशा प्रकारचा चहा बनवताना जिरे, धने, व बडीशेप वापरले आहे. ‘आयुर्वेदिक टी’ हा आपण रोज सकाळी घेण्याची सवय केली, तर आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते.त्यामुळे शरीरातील विषारी घटक निघून जातील व आपले शरीर निरोगी बनेल व आपली रोग प्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल. धने-जिरे व बडीशेप यामध्ये असे गुणधर्म आहेत, की आपल्या शरीरातील नको असलेले घटक निघून आपले पोट साफ होईल. तसेच आपल्याला वजन कमी करण्यास मदत मिळेल. अजून याचा एक फायदा म्हणजे धने-जिरे वापरून बनवलेले पाणी आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होते.
साहित्य : दोन कप पाणी, पाव टीस्पून - जिरे, धने, बडीशेप
कृती : एका भांड्यात दोन कप पाणी गरम करायला ठेवावे. पाणी गरम झाले, की त्यामध्ये धने-जिरे व बडीशेप घालून ५ मिनिटे गरम करायला ठेवावे. मग विस्तव बंद करून चहा गाळून मग सर्व्ह करावे.

रॉयल काश्‍मिरी कावा- कहवा टी 
काश्‍मीर म्हटले, की तेथील सृष्टिसौंदर्य व काश्‍मीरमधील थंडीसुद्धा आठवते. काश्‍मीरमध्ये खूप थंडी असते त्यामुळे तेथील रहिवासी थंडी कमी करायला कावा/ कहवा म्हणजेच आपल्या भाषेत मसाला चहा बनवतात. या मसाला चहाची चव अगदीच निराळी लागते. तसेच त्यामध्ये दालचिनी, केसर, हिरवे वेलदोडे, मीठ, खायचा सोडा व साखर वापरली आहे त्यामुळे या चहाचा एक घोटसुद्धा आपल्या शरीरातील थंडी कमी करण्यास मदत करतो. आम्ही काश्‍मीरमध्ये कावा टेस्ट केला आम्हाला खूप आवडला. काश्‍मिरी चहाची पावडर मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते.
साहित्य : दोन कप पाणी, दोन टीस्पून साखर, एक टीस्पून काश्‍मिरी चहा पावडर, ४ हिरवे वेलदोडे, अर्धा तुकडा दालचिनी तुकडा, एक चिमूट खायचा सोडा, एक चिमूट मीठ, ५-६ काड्या केशर, बदाम (पावडर)
कृती : पाणी, साखर, वेलदोडे, दालचिनी, काश्‍मिरी चहा, मिक्‍स करून पाच ते सात मिनिटे मध्यम आचेवर उकळून घ्यावे. मग त्यामध्ये मीठ व सोडा घालून मिक्‍स करून एक मिनीट गरम करून गाळून घ्यावा. गरम गरम सर्व्ह करावे. सर्व्ह करताना चहाच्या वर केसर व बदाम पावडरने सजवा मग सर्व्ह करावे.

ग्रीन टी विथ टर्मरिक 
ग्रीन टी विथ टर्मरिक यामध्ये ग्रीन टी पावडर बरोबर हळद व दालचिनी वापरली आहे. आपण रोज सकाळी अशा प्रकारचा चहा घेतला तर आपल्या शरीराला यापासून बरेच फायदे मिळतात. आपले आरोग्य निरोगी राहून आपली त्वचा निरोगी राहून तजेलदार दिसते. तसेच आपल्या शरीरातील विषारी घटक निघून जातात व आपले शरीर निरोगी होते. तसेच यामुळे आपली रोग प्रतिकारशक्तीपण वाढते.
साहित्य : दोन कप पाणी, एक ग्रीन टी बॅंग, पाव टीस्पून हळद, अर्धा दालचिनी तुकडा
कृती : एका स्टीलच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे. पाणी गरम झाले, की त्यामध्ये हळद व दालचिनी घालून चांगली उकळी येऊ द्यावी. उकळी आली, की एका ग्लासमध्ये किंवा कपामध्ये हे पाणी गाळून घेऊन त्यामध्ये ग्रीन टी बॅंग घालून पाच ते सात मिनिटे तसेच ठेवावे. पाण्याचा रंग बदलला की सर्व्ह करावे.

लेमन-जिंजर-हनी टी 
लेमन-जिंजर-हनी टी अशा प्रकारचा चहा बनवताना आले किसून, लिंबूरस, व साखरेऐवजी मध वापरला आहे यामुळे आपले शरीर निरोगी राहते व रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच आपली त्वचा निरोगी राहून त्याला एक प्रकारची चकाकी येते. आल्यामुळे आपल्या पोटातील गॅंस निघून आपले पोट साफ होते. सकाळी उठल्यावर अशा प्रकारचा चहा घेतला तर त्याचा फायदा होतो. चहा कोमट झाल्यावर मग त्यामध्ये मध मिक्‍स करून घ्यावा.
साहित्य : दोन कप पाणी, १ टीस्पून ग्रीन टी चहा पावडर, अर्धे लिंबू (रस काढून) एक मध्यम आल्याचा तुकडा (किसून), अर्धा टेबल स्पून मध
कृती : दोन कप पाणी गरम करायला ठेवावे. मग त्यामध्ये चहा पावडर, आले घालून ५-७ मिनिटे मंद विस्तवावर उकळून घ्यावे. मग एका मगमध्ये गाळून थोडे कोमट झाल्यावर त्यामध्ये लिंबूरस व मध घालून मिक्‍स करून सर्व्ह करावे.

मिंट टी 
पुदिन्याची आपण चटणी बनवतो. तसेच त्याचा चहापण चविष्ट लागतो. हा चहा बनवताना पुदिना पाने, मिरे व काळे मीठ वापरले आहे. पुदिन्यामध्ये विटामिन ‘ए’ ‘बी’ व ‘सी’ तसेच आयर्न, कॅल्शिअम हे अधिक प्रमाणात असते. पुदिना, मिरे व काळे मीठ वापरून बनवलेल्या चहाच्या सेवनाने पोट साफ होऊन, पोटातील रोग दूर होण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारते. चेहऱ्यावरील पिंपल ठीक होतात, आपली त्वचा थंड राहते व उजळून येते. ॲलर्जी कमी होते. पचनशक्ती सुधारून वजन कमी होते. हा चहा खूप गुणकारी आहे, आपण पाहिजेतर यामध्ये साखर व दूध वापरू शकतो पण मग तो नेहमीसारखा चहा होईल.
साहित्य : दोन कप पाणी, अर्धा टी स्पून मिरे (जाडसर कुटून), अर्धा टीस्पून काळे मीठ, १०-१२ पुदिना पाने
कृती : प्रथम पुदिना पाने स्वच्छ धुवून घ्यावी. एका भांड्यात दोन कप पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये पुदिना पाने, मिरे, काळे मीठ घालून ५-७ मिनिटे मंद विस्तवावर चहाला उकळी येऊ द्यावी. मग एका काचेच्या ग्लासमध्ये चहा गाळून सर्व्ह करावे.

होममेड चहाचा मसाला 
चहाचा मसाला चहामध्ये घालून चहा छान कडक व टेस्टी करता होतो. चहाचा मसाला हा चहा बनवत असताना दोन कप चहा साठी पाव टीस्पून टाकायचा म्हणजे चहा छान लागतो. हा चहा थंडीत किंवा पावसाळ्यात बनवतात तसेच सर्दी किंवा खोकला झाला असल्यास घ्यावा म्हणजे घशाला छान शेक बसतो.
साहित्य : पंचवीस ग्रॅम सुंठ पावडर, १ टीस्पून काळे मिरे पावडर, १ टीस्पून पांढरी मिरे पावडर, दहा ग्रॅम हिरवे वेलदोडे, अर्धे जायफळ (पावडर करून)
कृती : प्रथम तवा गरम करून वरील सर्व साहित्य अगदी कमी विस्तवावर गरम करून घेऊन मिक्‍सरमध्ये बारीक पावडर करून घ्यावी.

फोटो फीचर

संबंधित बातम्या