पाणवठा ते वृक्ष पुनर्जन्म मोहीम 

चित्कला कुलकर्णी 
सोमवार, 4 मार्च 2019

उपक्रम
 

कोल्हापूर जिल्ह्यातलं कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरील आंबा हे छोटं गाव. कोल्हापूरपासून साधारण साठ किलोमीटर अंतरावर वसलेलं. आंबा गाव संपताच पुढं रत्नागिरीकडं जाताना आंबा घाट सुरू होतो. निसर्गातील बदलामुळं, मानवी हस्तक्षेपामुळं येथील पश्‍चिम घाटातील काही भागात, तेथील जंगल परिसरात उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन दरडी कोसळून वृक्ष उन्मळून पडतात. अशावेळी तिथं काम करणं गरजेचं आहे, हे जाणून प्रमोद माळी यांनी २०१२ पासून काही सहकाऱ्यांच्या मदतीनं निसर्ग संवर्धनासाठी आंबा पंचक्रोशीत विविध मोहिमा सुरू केल्या. त्यातील एक मोहीम म्हणजे पाणवठा मोहीम. जंगलात पाणवठे, लोळण निर्माण केल्यामुळं ऐंशी टक्के जंगली प्राणी गावात घुसण्याचं प्रमाण कमी झालं आणि प्राणीही सुरक्षित राहू लागले. पावसाळ्यात दरडी कोसळतात त्यात कितीतरी वृक्ष उन्मळून पडतात. हे लक्षात आल्यावर पडलेले वृक्ष आणून देवराईत लावले जातात. तीच वृक्ष पुनर्जन्म मोहीम. आज याच मोहिमा महाराष्ट्राचं मॉडेल ठरू पाहात आहेत. या दोन्ही मोहिमेत मी २०१६ पासून सहभागी होते आहे. तिथं काम करताना विलक्षण समाधान मिळतं. अशाच एका मोहिमेबद्दल... 

एप्रिल वाढतं ऊन घेऊन येतो. पाण्यासाठी होणारी धावाधाव, वणवण या साऱ्या गोष्टी सुरू होतात. माणसांना पाणी मिळालं, न मिळालं की त्याची चर्चा सुरू होते. पण प्राण्यांचं, वनस्पतींचं काय? ते मूक जीव बोलू शकत नाहीत. वनस्पती पाण्याविना सुकून जातात. जिथं पाणी असतं तिथं प्राणी जातातच. मनुष्य वस्तीत ते आले की एकच गोंधळ उडतो. हा त्रास होऊ नये म्हणून आंबा पंचक्रोशीत प्राण्यांसाठी पाणवठे, लोळण आणि पक्ष्यांसाठी नैसर्गिक बाथटब निर्माण केले जातात. गेली सहा वर्षं हे काम सातत्यानं सुरू आहे. या कामाचं पद्धतशीर नियोजन प्रमोद माळी करतात. या वर्षी आंबा व मानोली जंगलात २४, २५, २६ एप्रिलमध्ये प्रमोदनं वन्यजीव पाणवठा निर्माण मोहीम आयोजित केली होती. प्रमोदनं सर्वांना कामाचं स्वरूप समजावून सांगितलं. या मोहिमेत मीही मोठ्या उत्साहानं सहभागी झाले. 

चाेवीस एप्रिलला सकाळीच चाळणवाडीकडं निघालो. जांभूळ, करवंदाचा आस्वाद घेत जंगलातील ‘बाध्याचं पाणी’ या ठिकाणी पोचलो. मागच्या वर्षी तयार केलेला पाणवठा, लोळण, गाळ व दगडधोंड्यांनी भरून गेला होता. पक्ष्यांच्या बाथटबचा तर पत्ताच नव्हता. डोंगरातून आलेली अगदी बारीकशी पाण्याची धार जिथं झिरपत होती, तिथं थोडा ओलावा होता. त्याठिकाणचा गाळ, दगडधोंडे बाजूला काढताच तिथं एक छान पसरट उथळ खड्डा तयार झाला. पुढं थोड्या अंतरावर पक्ष्यांना पंख पसरून अंघोळ करता यावी, त्यातलं पाणी पिता यावं अशी पाणथळ जागा तयार केली होती. त्यात छोटेछोटे खडे, दगड घालून उथळ बनवलं होतं. हाच तो पक्ष्यांचा बाथटब! या बाथटबच्या थोडं  पुढं मोठ्या प्राण्यांना पाणी पिता यावं म्हणून आणखी एक थोडा मोठा खड्डा काढण्यात आला होता आणि त्यापुढं गवे, रानडुक्कर, सांबर यांच्यासाठी ‘लोळण’ होतं. गवे, सांबर, रानडुक्कर असे प्राणी अंगावरील गोचीड घालवण्यासाठी आणि थंडावा मिळावा म्हणून चिखलात लोळतात. मागच्या वर्षी तयार केलेली लोळण ही गाळ, दगडधोड्यांनी बुजून गेली होती. साधारण एक ट्रॉलीभर गाळ, दगडधोंडे बाजूला करून तो खड्डा ऐसपैस करून त्यात चिखल करण्यात आला. लोळण तयार! पाहता पाहता झिरप्याजवळचा पहिला खड्डा स्वच्छ पाण्यानं भरलादेखील! झुळझुळत वाहणाऱ्या या पाण्यानं पक्ष्यांचा बाथटब, त्यापुढचा मोठा खड्डा भरून लोळणमध्ये झिरपायला सुरुवात केली. सकाळी आठच्या सुमारास सुरू केलेलं काम दुपारी बाराच्या सुमारास संपलं. काम संपताच आम्हाला भुकेची जाणीव झाली. घरून आणलेल्या शिदोरीवर सर्वांनी ताव मारला. हात धुण्यासाठी पहिल्या खड्ड्याजवळ पोचताच एक विलक्षण दृश्‍य नजरेस पडलं... चांगली सात-आठ फुटी धामण त्या पसरट पाणथळ जागेत आनंदानं पहुडली होती. आमची चाहूल लागताच क्षणभर थांबली आणि एखाद्या पुरंध्रीनं आपल्या साम्राज्यात डौलानं फेरफटका मारावा तशी फिरून सळसळत दृष्टीआडही झाली. तिच्या जाण्याच्या मार्गावर बारीकबारीक कीटकांचं मोहोळ उठलं आणि आम्ही भानावर आलो. वाहत्या पाण्यामुळं आता ओलावा पसरला होता. त्यावर फुलपाखरं भिरभिरत होती. इतक्‍यात तुरेवाला सर्पगरुडही पाण्यावर उतरला. हे सारं पाहून काम केल्याचं विलक्षण समाधान वाटलं. थोडी विश्रांती घेऊन पुढच्या कामाला लागलो. तिथल्याच डोंगरउतारावर दहा चर खणून या भागातलं काम पूर्ण केलं. दुपारच्या सत्रात चाळणवाडीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या ‘जखिणीचं पाणी’ याठिकाणी वरील पद्धतीनंच लोळण व पाणवठ्याचं काम पूर्ण करून संध्याकाळी गावातल्या मारुती मंदिरात मुक्काम ठोकला. दिवस मावळला. जवळच्याच विहिरीवरून पाणी आणून तीन दगडांच्या चुलीवर पिठलंभात शिजवून पोटपूजा केली. रातवे, रातकिडे अशा निशाचरांचं अंगाईगीत ऐकत असताना निद्रादेवीनं कधी गोधडी पांघरली ते कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे पाखरांच्या मंजुळ स्वरांनी जाग आली. भराभर आवरून, चुलीवरचा चहा घेऊन निघालो ते मानोली जंगलात कामासाठी! 

जंगलात दरवळणारा गंध आणि दाट सावली गात्रांना सुखावत होती. डोक्‍यावर बुट्ट्या, हातात कुदळ, फावडी, पाठीवर सॅक अशा थाटात आम्ही डुक्करखाना या ठिकाणी पोचलो. या ठिकाणी रानडुकरांचा वावर अधिक आहे. इथल्या जुन्या लोळणीची डागडुजी करून पाथर झरा गाठला. मोठाल्या दगडांच्या कपारीत थोडं पाणी साचलं होतं. पण ते वाहतं नव्हतं. त्यासाठी मोठे दगड हलवावे लागणार होते. तिथला गाळ काढला. मोठ्या कष्टानं मोठे दगड हलवले तरीही झरा वाहता झाला नाही. पाणीच कमी होतं. मन थोडं खट्टू झालं. पण करणार काय? पुढचा टप्पा गाठणं आवश्‍यक होतं. शक्‍य तितकं काम करून ‘माकडिणीच्या तळ्यावर’ आलो. इथं मात्र मागील वर्षीच्या कष्टाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. कारण, झरा वाहता होता. पाणथळ जागा पाण्यानं भरलेल्या होत्या. एकूणच सारं चित्र सुखद होतं. तरीही, खड्ड्यात साचलेला गाळ काढून स्वच्छता केली. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे, तिथं सिसिलियनचं प्रमाणही वाढलेलं दिसलं. काम संपल्यावर तीन दगडांची चूल मांडून बटाट्याचा रस्सा - भात करून त्यावर ताव मारला. थोडी विश्रांती घेऊन पुढच्या टप्प्याकडं निघालो. दाट जंगलात शिकाऱ्यांनी शिकारीसाठी लपण तयार केलं होतं, ते उद्‌ध्वस्त करत कडवी नदीच्या उगमापाशी सिंगिंग व्हॅलीत संध्याकाळी पोचलो. जागेची साफसफाई करून तंबू उभारले, पाणी आणलं, चूल मांडली. खमंग खिचडी शिजवून त्यावर आडवा हात मारला. रात्रभर शेकोटीभोवती गप्पागोष्टी छानच रंगल्या. पहाटझोपेत असतानाच पक्ष्यांच्या मंजूळ स्वरांनी जाग आली. सिंगिंग व्हॅली! अगदी नावाप्रमाणंच! सगळ्यांनी भराभर आवरलं आणि तीन पाणवठे, लोळण, पक्ष्यांसाठी बाथटब तयार केले. तोपर्यंत एका गटानं झक्कास पोहे केले. भरपेट न्याहारी करून आत्यंतिक समाधानातच संध्याकाळी पाचपर्यंत जंगलाबाहेर आलो. 

उन्हाळा संपत आला. आंबा पंचक्रोशी काजव्यांनी झगमगली. आठवड्याभरातच वळवाचा पाऊस बरसला. बेडकांचं खर्जातलं गाणं सुरू झालं. बघताबघता आकाशात ढगांची दाटी झाली आणि खऱ्या अर्थानं पावसाळा सुरू झाला. रिमझिम.. रिपरिप.. मुसळधार.. धुवांधार.. बरसणं.. कोसळणं.. झोडपणं.. झड लागणं... सगळे प्रकार सुरू झाले. आंबा पंचक्रोशी न्हाऊन निघाली. हिरवाईनं सजली. लाल लाल माती मऊमऊ झाली. पांढरी, निळी, जांभळी, पिवळी, लाल, गुलाबी अशी नाना रंगांची, नाना आकाराची विविध फुलं मुक्तपणं निसर्गगान गाऊ लागली. बोचरा वारा, वाजणारी थंडी, सहस्रधारांचा पडदा आणि हिरव्यागार गालिच्यावरून फिरणारे शेकडो प्रकारचे जीव! निसर्गपुत्र प्रमोद आणि त्याच्या साथीदारांची ‘रात्रमोहीम’ सुरू झाली. रात्री मांजऱ्या आणि इतर सर्प विणीसाठी बाहेर पडतात, चुकून रस्त्यावर येऊन भरधाव गाड्यांखाली चिरडले जातात. असं घडू नये म्हणून प्रमोदची टीम रात्रीची गस्त घालून सर्पांचे प्राण वाचवते. या मोहिमेत काम करताना अतिशय थरार वाटतो. 

पावसाळ्यातली आणखी एक महत्त्वाची मोहीम म्हणजे ‘वृक्ष पुनर्जन्म मोहीम’ होय. पावसाळ्यात आंबा घाटात, त्या परिसरात हमखास दरडी कोसळतात. त्याबरोबर छोटीमोठी झाडंही उन्मळून पडतात. दरडी कोसळून माणसं जखमी झाली, की त्यांची काळजी घेतली जाते. ते योग्यही आहे. पण, झाडांचं काय? उन्मळून पडलेल्या झाडांनाही जगवायलाच हवं, या भावनेनं प्रमोदची टीम काम करते. मागच्या वर्षी आंबा घाटात कोसळलेल्या बावीस फुटी आपट्याच्या झाडासह काही झाडं त्यांनी घाटातून मोठ्या प्रयत्नपूर्वक वर आणली. जीपमध्ये झाडाचा बुंधा आणि मोटारसायकलवर पाठीमागं बसलेल्या तरुणाच्या खांद्यावर झाडाचा शेंडा ठेवून! ही झाडं आंबेश्‍वराच्या देवराईतील विरळ जागेत लावली आणि त्यांची वर्षभर काळजी घेतली. पुनर्जन्म मिळालेली, बहरलेली ती झाडं बघताना आत्यंतिक समाधान मिळतं. यावर्षीही हा उपक्रम घेण्यात आला. पावनखिंडीत भोकराचं एक झाड उन्मळून पडलं. याशिवाय नाना, भोमा, अंजनी अशी काही झाडं दरडींबरोबर कोसळली. जीप, ट्रॅक्‍टरच्या तीन-चार फेऱ्या करून ही सगळी झाडं देवराईत आणून लावण्यात आली. आंबेश्‍वराची ही देवराई अतिशय जुनी आहे. जुन्या औषधी वृक्षांची सीड बॅंकच! पण, कालौघात काही वृक्षलतांचं, झुडुपांचं आयुष्य संपल्यामुळं काही ठिकाणी ती विरळ झाली. शिवाय मानवी हस्तक्षेपही सुरू झाला. पूर्वी ही देवांची राई मानलेली असल्यामुळं तिथली बारीकशी काडीही उचलली जात नसे. आता मात्र वाळलेल्या काटक्‍या, फांद्या उचलल्या जातात. त्याबरोबर बियाही जातात. गुरंही आत शिरतात.. अशीही काही कारणं आहेत. आता पुन्हा ही देवराई भरगच्च होणं गरजेचं असल्यामुळं वृक्ष पुनर्जन्म मोहीम तिथं राबवली जाते. यावर्षी घडलेली एक आनंदाची गोष्ट म्हणजे, यावर्षी पुनर्जन्म मोहिमेत लावलेल्या नाण्याच्या झाडावर ‘ब्लू रॉक थ्रश’नं घरटं केलं. त्या घरट्यातल्या पिलांनी भरारीही घेतली! 

या सर्व मोहिमेत श्रमदान आणि आर्थिक गोष्टींची आत्यंतिक गरज भासते. तो सहभाग जर वाढला तर भटकंतीचा आणि मोहिमेचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल. एप्रिल ते सप्टेंबर या दरम्यान आंबा पंचक्रोशीत भटकणं, प्रमोद माळी यांच्यासारख्या निसर्गपुत्राबरोबर काम करणं, त्यांच्याबरोबर निसर्गाचं महाकाव्य समजावून घेणं यातच खूप खूप आनंद दडलेला आहे असं मला वाटतं. 
(संपर्क ः प्रमोद माळी ७९७२६४६२६०)

फोटो फीचर

संबंधित बातम्या