मातृभाषेसाठी भारतभ्रमण

राजेश्वरी किशोर पाटील
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

उपक्रम
 

एका ध्येयवेड्या तरूणाशी नुकतीच माझी गाठ पडली. अलीकडच्या काळात झटपट कमाई कशी करता येईल अशी विचारधारा बाळगणाऱ्या पिढीमध्ये, हा तरुण वेगळ्याच ध्येयाने प्रेरित झालेला दिसून आला. ते म्हणजे, ‘मातृभाषेचा प्रसार आणि शिक्षण.’

डोंबिवलीत राहणारा चोवीस वर्षीय मध्यमवर्गीय तरुण ‘गंधार विलास कुलकर्णी’!  संस्कृत विषय घेऊन त्याने पुणे विद्यापीठातून एमए केल्यानंतर, काही दिवस मुलांना संस्कृत आणि मातृभाषेचे शिक्षण देणे सुरू केले. शिकत आणि शिकवत असताना गंधारला वारंवार जाणवले, की सद्यकालीन शिक्षण पद्धतीत प्रयोगशीलतेचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या चाकोरीबद्ध शिक्षणामुळे केवळ नोकरदार वर्ग निर्माण होत आहे. भाषा शिकताना आपण भाषेकडे साहित्यापलिकडे जाऊन वैज्ञानिक दृष्टीने बघण्याची गरज निर्माण करणे आवश्‍यक आहे. मातृभाषेविषयीच्या अभिमानाची जाणीव नवीन पिढीमध्ये कमी होत चाललेली दिसून येत होती. त्यासाठी काहीतरी आपल्यापरीने प्रयत्न केले पाहिजेत हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता.

इयत्ता दहावीमध्ये शिकत असताना त्याला संस्कृत विषयाची आवड निर्माण झाली. त्यातच मेघदूतामधील काही भाग अभ्यासाला होता. तो वाचून त्याने पूर्ण मेघदूताचा अभ्यास केला. दिवसामागे दिवस जात होते. शिक्षण सुरू होते. जसजसे पुढचे शिक्षण चालू होते, तसतसा त्याचा विचार पक्का होत गेला. नित्यनियमाने व्यवहार सुरू असले, तरी शिक्षणातील कमतरता आणि मातृभाषेचा कमी होत चाललेला वापर त्याला व्यथित करत असे. शिकत असल्यापासून एक आवड आणि सामाजिक बांधिलकी वाटून तो ज्ञानप्रबोधिनी विस्तार केंद्र, डोंबिवली येथे स्वयंसेवक म्हणून काम करू लागला.

कळायला लागल्यापासून आपल्या सायकलवर जिवापाड प्रेम करणारा गंधार, नेमाने पहाटे उठून मनसोक्त सायकल चालवून मगच दिवसाची सुरुवात करतो. वाढत्या वयानुसार बहुतेक मुलांना दुचाकी आणि मग चारचाकी गाड्यांचे आकर्षण वाढत जाते. पण गंधारचा जास्त ओढा सायकलकडेच असतो हे विशेष.

मेघदूत काव्याचा इतका पगडा त्याच्या मनावर बसला होता, की मेघदूतच्या मार्गाने आपणही का जाऊ नये असा विचार त्याच्या मनाला शिवून गेला. मातृभाषेचा प्रसार करण्याची जिद्द आणि सायकलवरून फिरण्याची आवड यांची योग्य प्रकारे सांगड घालून आपले स्वप्न साकार करायचे ठरवले.

अखेर त्याने मनाची तयारी करून गेल्या एक वर्षापासून भ्रमंतीची आखणी करायला सुरुवात केली आणि आता एक जुलै २०१८ ला तो एकटाच सायकलवरून भारतभ्रमण करायला निघाला आहे. घरातल्यांचा भक्कम पाठिंबा, मित्रमंडळींचे प्रोत्साहन, मान्यवर मंडळींचे अनुभवाचे बोल आणि काही मंडळींनी त्याच्या या जिद्दीला सलाम करून आपणहून केलेली आर्थिक मदत त्याला त्याचा हा उपक्रम तडीस नेण्यास उपयुक्त ठरेल.

असे काही कोणी अलौकिक करत असेल, तर साहजिकच काही प्रश्न मनात येतात. मग मला पडलेले प्रश्न त्याला विचारले असता त्याच्यातील प्रगल्भता दिसून आली. त्याच्या सायकलवरून भारतभ्रमणाचा मार्ग त्याने मेघदूत काव्याला अनुसरून ठरवला. 

जसे मेघदूतात, ‘आषाढस्य प्रथमदिवसे’ पासून सुरुवात केली तसे या वर्षीच्या आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १३ जुलैला नागपूरपासून त्याने भारत भ्रमणाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी डोंबिवलीतून १ जुलैला निघून १२ जुलैला गंधार नागपुरात दाखल झाला.

दिवसाला सरासरी ८०-१२० किलोमीटर सायकल चालवायची म्हणजे शरीराला सांभाळून झेपेल तितकीच सायकल चालवायची हा त्याचा मानस आहे. त्यानंतर पोचलेल्या गावात असलेल्या शाळेत दीड ते दोन तास जायचे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी भाषेचे अध्ययन आणि अध्यापन या विषयावर संवाद साधायचा. मातृभाषेचा अभ्यास मुलांनी करावा यासाठी एका कृती सत्राच्या माध्यमातून मुलांना स्वतःच्या भाषेविषयी जाणीव करून द्यायची.

भाषा शिकताना स्थानिक बोलीची ओळख व्हावी म्हणून शब्दांची एक यादी त्या त्या बोलीत अनुवादित करून घ्यायची आणि मातृभाषेची महती मुलांना सांगायची अशी काही उद्दिष्ट्ये बाळगून तो भारत भ्रमण करणार आहे. एकट्यानेच जायचा विचार डोक्‍यात का आला असे विचारले असता, ‘माझ्या उद्देशाला न्याय देणारा वेळ या मोहिमेसाठी देणार आहे. तितका वेळ माझ्या उद्देशासाठी किंवा स्वतःचा वेगळा काही उद्देश घेऊन माझ्याबरोबर फिरू शकणारा इतर कोणी भेटलेला नाही असे गंधारचे उत्तर असते. मोहीम पूर्ण झाल्यावर भाषा अध्ययन आणि अध्यापनाचे सगळ्यांपेक्षा वेगळे नावीन्यपूर्ण मॉड्युल तयार करता यायला हवे अशी इच्छा त्याने बाळगली आहे.

‘अतिथी देवो भव।’ ही उक्ती रुजलेल्या भारतात प्रत्येक गावात घरगुती निवासाची सोय व्हावी अशी त्याची मनीषा आहे. त्यातच सामानाची आणि त्याची स्वतःची सुरक्षितता आहे असे गंधारला वाटते. आत्तापर्यंत त्याने महाराष्ट्रातील, मध्यप्रदेशातील काही शाळांना भेट दिली आहे. आता तो राजस्थान-हरियाना-उत्तर प्रदेश-उत्तराखंड- चंडीगड- हिमाचल प्रदेश-जम्मू काश्‍मीर - पंजाब - उर्वरित राजस्थान- गुजरात- महाराष्ट्र- गोवा- कर्नाटक- केरळ- तमिळनाडू- आंध्र प्रदेश- तेलंगाणा- ओरिसा- पश्‍चिम बंगाल- सिक्कीम- आसाम- अरुणाचल प्रदेश- नागालॅंड - मणिपूर- मिझोराम-त्रिपुरा- मेघालय- बिहार- उत्तरप्रदेश- छत्तीसगड आणि उर्वरित महाराष्ट्र करून पुन्हा डोंबिवलीमध्ये असा मार्गक्रमण करीत आहे. गंधारचा पुणे येथे १२ ते १५ नोव्हेंबरच्या दरम्यान दोन दिवस मुक्काम होता.

आयुर्वेदावर विश्वास असल्याने ऋतुनुसार आहार व तीन दोषांचे योग्य निरीक्षण यातून स्वतःला वैद्यकीय अडचण येणार नाही याची काळजी घेऊन, तरीही काही त्रास उद्भवलाच तर एक-दोन दिवस आराम करून पुढचा प्रवास सुरू ठेवीन ही जिद्द त्याने मनात धरली आहे.

ज्ञान प्रबोधिनी डोंबिवली विस्तार केंद्राचे काम करतांना कृतीशीलतेचे बीज त्याच्या मनात रोवले गेले. त्यामुळेच ही मोहीम साकार होत आहे. प्रबोधिनीने विणलेले संपर्काचे जाळे खूप मदत करणार आहे. भारत परिक्रमा करून आलेले सचिन गावकर यांचे मार्गदर्शनही त्याला लाभले आहे. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री माननीय विनोद तावडे यांना गंधारच्या या उपक्रमाची माहिती मिळताच तातडीने त्याला भेटण्यासाठी वेळ देवून शिक्षण खात्यातर्फे सर्वतोपरी मदतीचे लेखी आश्वासन दिले. तसेच पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभाग प्रमुखांनी लेखी पत्र देऊन अडचणीच्या वेळी त्याला साहाय्य करण्यासाठी आवाहन केले. स्कॉट-बर्गमाँट या जर्मन कंपनीने प्रायोजकत्वाच्या स्वरूपात ३५ हजार रुपयांची ‘हेलिक्‍स ३.५ I’ ही सायकल गंधारला देऊ केली आहे. बाईक पोर्ट या सायकल दुकानाने प्रायोजकता मिळवण्यात अमूल्य सहकार्य केले. असीम फाउंडेशन, विवेकानंद केंद्र यांची मदतही प्रवासादरम्यान होणार आहे. डॉ. सायली वैद्य यांनी आयुर्वेदानुसार आहार कसा असावा यावर मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर केईएम इस्पितळात कार्यरत असलेल्या आहार तज्ज्ञ डॉ. महाडीक यांनी आहाराची दैनंदिनी बनवून दिली.

या मोहिमेअंतर्गत गंधार भारतातील अंदाजे दोनशे शाळांना भेट देणार आहे. ५०० दिवसांच्या मोहिमेत अंदाजे २० हजार किलोमीटर अंतर पार करणार आहे. प्रत्येक प्रांतातील/राज्यातील विविध स्थानिक भाषांबद्दल माहिती घेऊन तिथल्या मातृभाषेचा प्रसार व्हावा असा प्रयत्न करणार आहे. निघाल्यापासून  वेगवेगळे अनुभव गाठीशी बांधत गंधारचे मार्गक्रमण सुरू आहे. आत्तापर्यंत तरी त्याच्या उपक्रमाला गावागावातून प्रोत्साहन मिळत आहेच. त्याच्या या सामाजिक जागृतीच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल माहिती वाचून अजूनही काही तरुणांना प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. ‘सायकलोपासना’ या नावाने फेसबूक पेज तयार करून त्यात रोजचे अनुभव सर्वांसाठी खुले करण्याचा त्याचा प्रयत्न राहणार आहे. वातावरण आणि सायकल त्याला योग्य साथ देवो आणि जवळपास पाचशे दिवस चालणारा त्याचा हा आव्हानात्मक उपक्रम यशस्वीरीत्या तडीस जावो हीच सदिच्छा!

गंधारला सायकलवरून भारत भ्रमण व मातृभाषा प्रसार कार्यासाठी आपण खूप खूप शुभेच्छा देऊ या!

फोटो फीचर

संबंधित बातम्या