राईनपाडा : अमानुष वास्तव 

संतोष धायबर
गुरुवार, 12 जुलै 2018

वेध
 

राईनपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील ग्रामपंचायत कार्यालयात १ जुलै रोजी नाथपंथीय डवरी समाजातील पाच भिक्षुकांची ठेचून हत्या करण्यात आली. या हत्येचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून अनेकांचे मन सुन्न झाले. हत्येपूर्वी परिसरामध्ये मुले पळविणारी टोळी आल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला. पण, तो व्हिडिओ मुळात पाकिस्तानमधील होता. भारतात त्या व्हिडिओची तोडफोड करून चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आला अन्‌ पाच जणांना जीव गमवावा लागला. खरे तर माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणून व्हॉट्‌स ॲपकडे, सोशल मीडियाकडे पाहिले जाते. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात खरोखरच हे माध्यम प्रभावी आहे. परंतु, या माध्यमाचा दुरुपयोग होऊ लागला असून, याचाच फटका धुळे येथील पाच जणांना बसला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही... 

भिंतीवर महापुरुषांची छायाचित्रे, रक्ताच्या चिळकांड्या, फरशीवर गोठलेले रक्त अन्‌ त्याचा कुबट वास. मारहाण करून तुटलेल्या काठ्या, टेबल, कपाटं, पत्रे अन्‌ बरेच काही... हे चित्र आहे राईनपाडा (ता. साक्री) येथील ग्रामपंचायत कार्यालयामधील. दारूची झिंग चढलेले गावकरी अन्‌ मारहाण करून रक्तातळलेल्या पाच जिवांचा तडफडीचा व्हिडिओ पाहून मन सुन्न होऊन जाते. राईनपाडा आणि परिसर हा आदिवासी पाड्यांचा भाग. राईनपाडा या गावची लोकसंख्या हजारच्या आसपास. गावात अवघी १६९ घरे. शेती हेच परिसरातील नागरिकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन. परिसर अगदी हिरवागार. शेतीचा इंच ना इंच भाग हा कसला जातोय. शेतीमध्ये रात्रं-दिवस मेहनत करून शेती कसलेली दिसते. टेकड्यांवरसुद्धा शेतीची मशागत दिसते. परिसरातील शेतीचे दृश्‍य पाहताना रांगोळी काढल्याप्रमाणे चित्र दिसते. यावरूनच शेतीची किती मशागत केली असावी, याचा अंदाज येतो.

राईनपाडा हे गाव काकरदा या ग्रुप ग्रामपंचायतीत येते. ग्रुप ग्रामपंचायतीत निळीघोटी, हनुमंतपाडा, झोईपाडा, खर्टीपाडा, राईनपाडा व काकरदा या पाड्यांचा समावेश आहे. छोट्या-छोट्या पाड्या मिळून राईनपाडा गावची ग्रामपंचायत आहे. गाव अगदी छोटेसे. गावातील आदिवासी नागरिक सदैव त्यांच्या कामात व्यग्र दिसतात. समाजापासून दूर राहून ते गुजराण करतात. जुन्या पिढीतील वृद्धांचा जगाशी कधी संपर्कही आला नसेल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. थोडक्‍यात सांगायचे, तर हे लोक त्यांचे काम अन्‌ संसार यामध्येच रमून गेलेले दिसतात. कोणी त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला तर ते दूर निघून जातात. 

पिंपळनेरपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या राईनपाडा येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यातील एक रोहोडकडील मार्ग फारसा चांगला नाही. त्यामुळे दहिवेलकडून रस्त्याचा मोठा वापर होतो. दहिवेलकडून राईनपाड्याकडे जायला सुरुवात केली. तेव्हा हा पाडा किती दुर्गम भागात आहे, याची जाणीव व्हायला लागली. दहिवेलपासून १५ ते १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या राईनपाड्यात जाण्यापूर्वी शिरसाले व इतर पाडे लागतात. काही अंतर पार करून गेले की वेगवेगळे फाटे लागतात. दुर्गम भाग असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला कोणी दिसत नाही शिवाय कोठे पाटीही दिसत नाही. कोणी दिसले तर गावाचे नाव विचारल्यानंतर काही न बोलता निघून जातात. यावरून या घटनेची भयावहता दिसून येते. 

गावामध्ये प्रवेश केल्यानंतर पोलिसांचे वाहन उभे असलेले दिसले. पाड्यांमध्ये शुकशुकाट होता. घरांना कुलपे होती. काही घरांच्या बाहेर, हालचाल न करता येणारे वृद्ध नागरिक दिसत होते. एका दुकानासमोर दुचाकी पडलेली होती. ट्रॅक्‍टर व जीप ही वाहने आढळली. मात्र ही वाहने लावून गावातील मंडळी पसार झालेली होती. गावात सिमेंट काँक्रिटचे सात रस्ते आहेत. पाण्यासाठी उंच जलकुंभ आहे. बहुतांश घरे कौलारू आहेत. मात्र पत्र्याची व स्लॅबची घरेही अधूनमधून दिसतात. ग्रामपंचायत कार्यालयाचा दरवाजा व खिडकी तुटलेल्या अवस्थेत होती. कार्यालय तर रक्ताने माखलेले आहे. स्मशानशांतता असलेल्या गावात चिटपाखरू दिसत नाही. एका घराच्या बाहेर फक्त पोलिसांचा ताफा होता. पाचही पाड्यांमधील जवळपास सर्वच घरांना कुलपे होती. 

गाव छोटे असले तरी प्रगतीच्या वाटेवर आहे. गावात अंगणवाडी, प्राथमिक शाळा, आश्रमशाळा छोटी दुकाने पाहायला मिळतात. जुन्या पिढीतील नागरिक हे शेतात कष्ट करून गुजराण करतात; तर थोडेफार शिक्षण झालेले युवक हे मोबाईलच्या जाळ्यात अडकलेले दिसतात. परिसरातील युवकही व्हॉट्‌स ॲप, सोशल नेटवर्किंगचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. आदिवासी नागरिकांची भाषा वेगळी. दिवसभर काबाडकष्ट करायचे अन्‌ शेती पिकवायची. गावातील काहीजण संध्याकाळी व्यसनाच्या आहारी जाताना दिसतात. आदिवासी पद्धतीच्या दारूचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. युवक सोशल मीडिया व दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे चित्र पाहायला मिळते. सोशल मीडिया अन्‌ दारूच्या व्यसनात अडकलेल्या युवकांमुळे १ जुलै रोजी हत्याकांडाची घटना घडली, अशी चर्चा आहे. कोणताही दोष नसताना पाच निष्पाप जीव तडफडून गेले. 

एक जुलै रोजी राईनपाडा गावाचा बाजार होता. बाजारानिमित्त नाथपंथीय डवरी समाजातील सात भिक्षेकरी गावात उतरले होते. त्यांच्या हातामध्ये पिशव्या होत्या. दरम्यान गावात मुले चोरणारी टोळी आली असल्याची अफवा पसरली. दारूच्या नशेत तर्रर्र काही युवकांनी सातपैकी पाच जणांना पकडले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवाय, परिसरातील एका कथित यू ट्यूब चॅनेलने घटनेपूर्वी मुले पळवणाऱ्यांबद्दल वृत्त दिले होते. यामुळे ग्रामस्थांनी या भिक्षेकऱ्यांना मुले चोरणारी टोळी समजून अक्षरशः ठेचून काढले. मारहाण होत असताना ते हात जोडून आम्ही चांगली माणसे असल्याचे सांगत होते. परंतु, त्यांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नव्हते. या मारहाणीमध्येच त्यांना जीव गमवावा लागला. 

सध्या देशभर मुले पळवण्याची अफवा सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामुळे या भिक्षुकांनी आधीच जेथे त्यांनी आपली गावाबाहेर पालाची घरे उभारली होती, त्या पिंपळनेर पोलिस ठाण्यात आणि सटाणा तालुक्‍यातील ताहराबाद पोलिस ठाण्यात आपल्या कुटुंबाची नोंद केली होती. नाथपंथीय समाजाची परंपरा आहे, की ते कधी बहुरूपी बनून तर कधी काही कार्यक्रम करून भिक्षा मागत असतात. पण राईनपाड्यात हे लोक एसटीने गेले. दिलेली भिक्षा तांदूळ, डाळीच्या स्वरूपात त्यांच्या पिशवीतही जमा झाली होती. मात्र, बहुरुप्याचे जीवन जगणाऱ्यांना माणूसरुपी सैतानांनी ठेचून मारले. 

संतापलेल्या दोन हजार लोकांच्या जमावापैकी बहुतांश जणांनी त्या पाचही भिक्षेकऱ्यांना मारहाण करीत फरफटत ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आणले. तिथे आणेपर्यंत मारहाण सुरूच ठेवली. त्यानंतर त्या वीस बाय वीसच्या खोलीत हाताला मिळेल त्या वस्तूने पाचही जणांवर निर्दयपणे वार होते होते. कोणी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करत होते तर कोणी मारहाण करायला प्रोत्साहन देत होते. अजून येणार का मुले पकडायला, असे म्हणत चवताळलेल्या जमावाने पाचही जणांना अक्षरशः ठेचले. 

आदिवासी दारूची झिंग... 
गावाचा बाजार असल्यामुळे परिसरातून विक्रेते व खरेदी करण्यासाठी नागरिक आले होते. वस्तूंची विक्री झाल्यानंतर व हातात पैसा आल्यानंतर काहींनी अति झिंग येणाऱ्या दारूचे सेवन केले होते. परिसरात अगोदरच अफवा अन्‌ दारूची झिंगेत टर्र झालेल्यांनी भिक्षा मागण्यासाठी आलेल्या सातपैकी पाच जणांना पकडले अन्‌ अक्षरशः ठेचून मारले. दोघे जण जिवाच्या आकांताने पळाल्यामुळे वाचले. 

पाकिस्तानमधील व्हिडिओ 
अफवेचा हा व्हिडिओ मुळात पाकिस्तानमधील आहे. मुलांच्या अपहरणाविषयी पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘रोशनी’ नावाच्या संस्थेने या व्हिडिओची निर्मिती केली होती. परंतु, त्याचा अर्धाच भाग भारतात व्हायरल होत आहे. शिवाय, परिसरातील एका कथित यू ट्यूब चॅनेलने घटनेपूर्वी मुले पळवणाऱ्यांबद्दल वृत्त दिले होते. व्हिडिओ खरा असल्याचे समजून नागरिकांमध्ये भीती पसरली. जमावाने केवळ संशयावरून भिक्षा मागून गुजराण करणाऱ्या पाच जणांची निर्घृण हत्या केली. 

आठवडा बाजार अन्‌ एसटी 
गावात एसटी येत असून त्या एसटीचा शेवटचा थांबा हा राईनपाडा आहे. या एसटीने नाथपंथीय डवरी समाजातील हे भिक्षेकरी सकाळी गावात उतरले होते. दुपारपर्यंत भिक्षा मागून दुपारच्या एसटीने ते परतणार होते. त्यांच्याकडे पोलिस परवानगी, आधार कार्ड व स्थानिक पोलिसांकडून परवानगी घेतल्याची कागदपत्रे होती. परंतु, यावर कोणीही विश्वास न ठेवता त्यांना ठेचून मारले. या हत्याकांडामध्ये भारत शंकर भोसले (रा. खावे, मंगळवेढा), दादाराव शंकर भोसले (रा. खावे, मंगळवेढा), भारत शंकर मालवे (रा. खावे, मंगळवेढा), अगनू इंगोले (रा. मानेवाडी, मंगळवेढा) व राजू भोसले (रा. गोंदवून, कर्नाटक) यांना जीव गमवावा लागला. 

आपुलकीचा ओलावा 
संपूर्ण गाव रिकामे असले तरी पोलिसांच्या ताफ्याजवळ गुलाब पवार नावाचा युवक बसला होता. त्यांच्याजवळ पोचल्यावर तत्काळ त्याने पोलिसांसह सर्वांनाच पाणी आणून दिले. चहाची विचारपूस केली. त्याच्यातील आपुलकीचा ओलावा दिसत होता. परंतु, गावातील हत्याकांडाबाबत विचारल्यानंतर तो सुन्न होऊन बोलेनासा होतो. 

...तर जीव वाचले असते 
दारूच्या नशेत असलेल्यांनी पाच जणांना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी ते आपण भिक्षेकरी असल्याबरोबरच सर्व कागदपत्रे असल्याचे सांगत होते. परंतु, मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करण्यात दंग असलेले व मारहाण पाहणाऱ्यांनी त्यांची सुटका केली असती तर पाच जीव नक्कीच वाचले असते. पण कोणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. हाताला येईल त्या वस्तूनी त्यांना अक्षरशः ठेचून काढत होते. 

शाळा रिकामी, शिक्षक मात्र हजर 
गावात हत्याकांडाची घटना घडल्यानंतर पोलिस व दंगल नियंत्रण पथक दाखल झाले आहे. पोलिसांनी २५ जणांना अटक केली आहे. परंतु, घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी गाव सोडून जंगलात पळ काढला आहे. गावात वृद्धांशिवाय कोणीही दिसत नाही. गावात जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा आहे. दोन ठिकाणी या शाळांचे वर्ग भरतात. शाळेच्या पटावर ३८ विद्यार्थ्यांची नोंद आहे. पण शाळेत फक्त शिक्षक दिसतात. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ४०० आहे. पण आश्रमशाळाही ओस पडली आहे. घटना घडल्यानंतर मंत्री भेटी देताना दिसतात. यामुळे शिक्षक शाळेतच थांबलेले दिसतात. शाळेत लिहिलेले सुविचार लक्ष वेधून घेतात. 

राज्यभरात मारहाणीच्या घटना 

  • औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्‍यातील चांदगाव भागात ८ जून रोजी चोर समजून सात जणांना बेदम मारहाण करण्यात आली. यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला होता. 
  • औरंगाबादमध्येच १६ जून रोजी पडेगावमध्येही एकाचा अशाच प्रकारामध्ये मृत्यू झाला. ईद मागण्यासाठी आलेल्या दोन बहुरुप्यांना मारहाण करण्यात आली होती. 
  • औरंगाबादमधील कमळापूरमध्ये महिला नव्या घराच्या शोधात असताना मुले पळवण्याच्या शोधातून जमावाकडून मारहाण करण्यात आली. 
  • लातूरमध्ये औसा तालुक्‍यातील बोरफळामध्ये २९ जून रोजी नवरा-बायकोच्या भांडणाला मुले पळवण्याचे स्वरूप देऊन मारहाण करण्यात आली. 
  • लातूर जिल्ह्यातील निलंग्यातील हलगरामध्ये रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आली. जमावाने रिक्षाही जाळली.
  • नंदुरबारमध्ये २९ जून रोजी भिक्षुकी करणाऱ्या पाच जणांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. मुलगी तिच्याच घरात सापडल्याने प्रकरणावर पडदा पडला. 
  • परभणीत २० जून रोजी मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून दोन जणांना मारहाण करण्यात आली आणि नंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 
  • मालेगावमध्ये एका कुटुंबाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली.

राईनपाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुले चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा होती. रविवारी (ता. १ जुलै) राईनपाडा येथे आठवड्याचा बाजार होता. हा बाजारही नुकताच सुरू झाला आहे. बाजारासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक गोंधळ सुरू झाला अन्‌ मारहाण व किंचाळण्याचे आवाज ऐकू येऊ लागल्याने सर्वजण ग्रामपंचायत कार्यालयाकडे पळाले. 
- गुलाब पवार, स्थानिक विक्रेता

फोटो फीचर

संबंधित बातम्या