अँड्रियाची यशोगाथा 

श्रीनिवास शारंगपाणी 
गुरुवार, 26 एप्रिल 2018

विशेष
 

माझी आणि अँड्रियाची ओळख एका औद्योगिक संमेलनात झाली. तिचं आणि माझं व्यवसायक्षेत्र एकच होतं. मी एका मोठ्या वाहन उद्योगामध्ये प्रतिस्पर्धी वाहनांचा तौलनिक अभ्यास करणाऱ्या प्रभागाचा प्रमुख होतो आणि अँड्रिया वाहनांची तौलनिक माहिती पुरवणाऱ्या जर्मनीस्थित कंपनीची प्रमुख होती आणि आहे. पुढं मी कामानिमित्त जर्मनीला गेलो असता तिच्या आग्रहावरून तिच्या कंपनीला भेट दिली. स्वच्छ आणि मोकळ्या वातावरणात अतिशय शिस्तीनं चाललेलं काम पाहून मला कौतुक वाटलं. अँड्रियानं मला घरीही येण्याचं निमंत्रण दिलं. घरीही तीच स्वच्छता आणि टापटीप. चार गोड मुलींसह संसार व्यवस्थित चालवून ती कंपनीचा गाडाही समर्थपणे हाकते आहे यामागे तिची कष्टाची तयारी आणि असामान्य धैर्य हेच आहे. 

पण या सर्वांपेक्षा ती कंपनीच्या सर्वोच्च पदावर कशी पोचली याची कहाणी ऐकून मी थक्कच झालो. तिची कारकीर्द कुणालाही आदर्श वाटावी.

वाहन-तंत्रज्ञानाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीत ती सुमारे वीस वर्षांपूर्वी काम करू लागली ते भाषांतराचं. तिच्याकडे अनुवादविद्येची पदविका होती. कंपनीचा वाहनांच्या अभियांत्रिकी मोजमापांचा तौलनिक अभ्यास करून ती माहिती जगातील मोठमोठ्या कंपन्यांना विकण्याचा व्यवसाय होता. काही वर्षं या कंपनीत काम केल्यावर अँड्रियाच्या लक्षात आलं की अतिशय भक्कम तांत्रिक पाया असूनही कंपनीचा व्यवसाय ढासळत चालला आहे. कंपनीच्या मालकांचं व्यवसायाकडे होत असलेलं दुर्लक्ष हे त्याचं मुख्य कारण आहे हे तिच्या ध्यानात आलं. त्या क्षणी तिच्या डोक्‍यात एक विलक्षण विचार चमकून गेला. तिनं ती कंपनी विकत घ्यायचा निर्धारच केला. 

त्या हेतूनं या व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा उभा करावा लागणार होता. अँड्रिया बॅंकेकडे कर्जाची मागणी करण्याकरिता गेली. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी कर्ज नुसतं अमान्यच केलं नाही तर तिच्या प्रकल्पाची जवळपास चेष्टाच केली. 

व्यावहारिक कारणं देताना अधिकाऱ्यांनी कंपनी चालविण्याच्या दृष्टिकोनातून आवश्‍यक अशी तांत्रिक अर्हता म्हणजे पदवी किंवा पदविका तिच्याकडे नसल्याचं दाखवून दिलं. अर्थात ही गोष्ट खरी होती. पण अँड्रियानं समजावून सांगितलं, की कित्येक वर्षं कंपनीत काम केल्यानं तिला सगळ्या तांत्रिक बाबी माहीत झाल्या आहेत. अधिकाऱ्यांना ते मान्य झालं नाही. शिवाय त्यांचं म्हणणं असं पडलं की दिवाळखोरीत चाललेली कंपनी तिच्यासारख्या (त्यांच्या दृष्टीनं) unqualified व्यक्तीकडे सुपूर्द करणं धोक्‍याचं ठरेल.  पण इतर कारणं अशी होती की अँड्रिया एक संसाराची जबाबदारी असलेली स्त्री होती आणि गर्भवती होती. ही कारणं बॅंक अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली नसली तरी त्यांच्या कुजबुजीतून आणि देहबोलीतून स्पष्ट होत होती. कालांतरानं अनेक अधिकाऱ्यांनी, या कारणांची चर्चा झाली होती असं खासगीत अँड्रियाकडे मान्यही केलं. 

पण अँड्रिया डगमगली नाही. तिला एक स्त्री असल्यामुळं असेल कदाचित पण अशा आव्हानांना तोंड द्यावं लागेल याची कल्पना होती. अनेक बॅंकांकडे खेटे घातल्यानंतर शेवटी एका बॅंकेकडे तिनं कंपनीला दिवाळखोरीकडून नफ्याकडे नेण्याचा आपलं व्यूहतंत्र (strategy) आणि आपण ते कोणत्या मार्गानं (roadmap) पुढं नेऊ इच्छितो याचा आराखडाच सादर केला. बॅंकेनं तात्त्विकदृष्ट्या तिची मागणी मान्य केली पण एक अट घातली. 

ती अट अशी होती, की कंपनी दिवाळखोरीत निघाल्यावर "दिवाळखोरी व्यवस्थापक'कडूनच तिला कंपनी विकत घ्यावी लागेल आणि दिवाळखोरी व्यवस्थापकानं मान्यता दिल्यावरच बॅंक तिला कर्जाऊ रक्कम देईल. अँड्रियानं ही अट मान्य केली. शेवटी ही सर्व दिव्य व्यवस्थित पार करून अँड्रिया कंपनीची मालकीण झाली. अल्पावधीतच कंपनी अगदी अँड्रियानं सादर केलेल्या योजनेनुसार तोट्यामधून फायद्यात आली. अँड्रियाला आत्मविश्वास होताच. त्यामुळंच तिनं हे पुरुषांचा बालेकिल्ला असलेलं क्षेत्र पादाक्रांत करून दाखविलं. आज अँड्रियाच्या कंपनीकडून जगभराच्या मोटारगाड्या बनविणाऱ्या कंपन्या माहिती विकत घेतात. अगदी ऑडीसारख्या कंपनीपासून ते होंडासारख्या लोकप्रिय कंपन्या तिच्या ग्राहक यादीत आहेत. गेली पंधरा वर्षं अँड्रियाची कंपनी यशस्वी वाटचाल करीत आहे. एका तोट्यातील कंपनीला प्रगतिपथावर नेणाऱ्या या स्त्रीची यशोगाथा खरोखरीच अलौकिक आहे. 

अँड्रियाची आणि जर्मनीच्या अध्यक्ष मेर्केलबाईंची कारकीर्द साधारणपणे एकाच वेळी सुरू झाली त्यामुळं मी अँड्रियाला गमतीनं म्हणतो, "अँजेला मेर्केल आणि तू गेली पंधरा वर्षं आपापल्या आसनांवर घट्ट ठाण मांडून बसलेल्या आहात!' यावर हसून अँड्रिया उत्तरते, "होय ! परंतु आम्ही दोघीही आमच्या ताब्यात असलेल्या संस्थांना प्रगतीच्या मार्गावरून उत्कर्षाकडे नेत आहोत.' अँड्रियानं तिचं म्हणणं आपल्या कृतीनं खरोखर सार्थ केलं आहे.  

संबंधित बातम्या