सेंतेन्द्रेची भुरळ 

उदय ठाकूरदेसाई
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

आडवळणावर...
नेहमीच्या सरळसोट रस्त्यांपेक्षा आडवळणावर एखादे टुमदार गाव, छानसे खेडे, छोटेखानी शहर, पर्यटन क्षेत्रातील वेगळे व्यक्तिमत्त्व दिसण्याची शक्‍यता खूप अधिक असते. अशा आडवळणांवर डोकावून पाहूया...

‘रिकाम्या जागा भरा’ हा प्रश्‍न जसा शाळेत सोडवायचो, तसे आजही आम्ही परदेशवारीवर निघताना कार्यक्रमपत्रिकेवरच्या रिकाम्या जागा भरून आमच्या फिरण्याचा प्रश्‍न सोडवायचा प्रयत्न करीत असतो. 

परदेशवारीतील कार्यक्रमपत्रिकेवरच्या रिकाम्या जागा कुठल्या? तर शॉपिंगसाठी दिलेला मुबलक वेळ किंवा एक दिवस फक्त आरामासाठी ठेवलेला दिवस वगैरे!! आम्ही अशा रिकाम्या जागा शोधतो. मुंबईतच आमचा वेगळा कार्यक्रम आखतो किंवा परदेशवारीच्या आयोजकांची भ्रमंतीची आयती यादी तयार असेल तर त्यातून आवडीची सहल निवडून जास्तीतजास्त परदेश पाहण्याचा प्रयत्न करतो. आमच्या अशा वेगळ्या निवडीतूनच आम्हाला अलास्कामध्ये (अमेरिका) चक्क तीन धाडसी मोहिमा पार पाडता आल्या. व्हिक्‍टोरिया (कॅनडा) येथे देवमाशांचे दर्शन घेता आले आणि अगदी सहा महिन्यांपूर्वी जाऊन आलेल्या पूर्व युरोपातल्या सेंतेंन्द्रे या कलानगरीतल्या, मोहमयी वातावरणातल्या टुमदार शहरातली सकारात्मक ऊर्जादेखील अनुभवता आली. 

सेंतेंन्द्रे आहे ‘पेस्ट’च्या उत्तरेला. ‘पेस्ट’ म्हंजे बुडापेस्टमधले ‘पेस्ट’. याठिकाणी सर्वांत प्रथम एक मजा सांगायला हवी.. मजा अशी, की काही काही वेळा गोष्टी माहिती असूनसुद्धा माहिती नसतात! (म्हंजे अंमळ विस्मरणात गेलेल्या असतात). ज्याप्रमाणे स्लोवाकिया, झेकोस्लोवाकियातून मुक्त होऊन झेक रिपब्लिक आणि स्लोवाकिया अशा दोन राष्ट्रांची निर्मिती झाली हे माहिती असूनसुद्धा जसे अंमळ विसरायला झाले, त्याप्रमाणे बुडा आणि पेस्ट हे दोन वेगवेगळे प्रांत आहेत हे माहिती असूनसुद्धा अंमळ विस्मरणातच गेले होते. आमच्या गाईडने त्याचा उच्चार करताच चटदिशी लक्षात आले, की डोंगराळ ‘बुडा’ एका बाजूला आणि सखल भागाचे ‘पेस्ट’ दुसऱ्या बाजूला ठेवत ‘डॅन्युब’ नदी मधून शांत वाहत राहाते. त्यामुळे बुडापेस्टमध्ये आणखी काय विशेष बघता येईल याचे पर्याय ठरवताना मुंबईतच सेंतेंन्द्रे या कलाकारनगरीला भेट देण्याचे नक्की झाले होते. 

पूर्व युरोप दौऱ्याआधी मुंबईत सेंतेंन्द्रे शहराचे फोटो बघताना बाहुल्यांचे, सोव्हिनिअर शॉपचे असे फोटो पाहिले होते. त्यावरून आम्ही सेंतेंन्द्रेमध्ये काय बघणार आहोत? आणि काय बघायला मिळणार आहे? याचा अंदाज बांधता येत नव्हता. परंतु आमच्या दौऱ्यादरम्यान एकदा सुंदर बुडापेस्ट बघून झाल्यावर मात्र सेंतेंन्द्रे बघायची उत्सुकता वाढली. 

आमच्या बसने बुडापेस्ट सोडल्या सोडल्या आमची गाईड मरिया हिने सेंतेंन्द्रेविषयी माहिती द्यायला सुरवात केली. आमच्या बसचा चालक होता युरा स्लाव. तो स्लोवाकियाचा रहिवासी होता. मारिया हंगेरीची रहिवासी होती. आमच्याशी मारिया हंगेरियन इंग्रजीत बोलत असे. युरास्लावशी रशियन भाषेत बोलत असे; जोडीला भर म्हणून आम्ही पर्यटक बोलत असलेले हिंदी! अशी सगळी मजेदार भाषिक खिचडी ऐकत आम्ही प्रवास करीत होतो. मारियाच्या भाषा आवडण्याच्या गोडीमुळे क्‍लिष्ट तपशील सोप्पे होऊन अलगद उकलले जात होते. 

मारिया सांगत होती, ‘१७०० पासून कलाकारांचे आवडते ठिकाण बनत चाललेल्या सेंतेंन्द्रेमध्ये हळूहळू कलाकार लोक मुद्दाम येऊन राहू लागले. सेंतेंन्द्रेचे हवामान आणि एकूण वातावरण हे कलाकार लोकांना त्यांच्या कलेसाठी पोषक आहे असे वाटले. कलागुणांनी युक्त अशा सेंतेंन्द्रेच्या भावविश्‍वाला आजूबाजूच्या परिसरातून आलेल्या सरमिसळ जमातीतल्या कलाकारांनी जपले. १८७२ ला सेंतेंन्द्रेला शहराचा दर्जा मिळाला. १९३० च्या सुमारास सेंतेंन्द्रेमध्ये अधिकृतरीत्या कलानगरी (आर्टिस्ट व्हिलेज) तयार झाली. मग सेंतेंन्द्रेच्या कलावैभवात वाढच झाली. बुडापेस्टपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या सेंतेंन्द्रेमध्ये चर्चेस, म्युझियम्स, कॅफे, फर्निचर, गाड्या, खेळणी यांचे रेट्रो डिझाईन सेंटर, वेगळ्या धाटणीची हॉटेल्स, असे बरेच काही वेगळेपण दिसून येते. (आपल्या बॉलिवूडनेदेखील येथे बरेच शूटिंग केलेले आहे)...’  मारिया बरेच काही सांगत होती. पर्यटकांचे लक्ष मात्र काचेच्या खिडकीबाहेर होते. 

वाटेत एकच वाहन जाऊ आणि येऊ शकेल इतक्‍या छोट्या रस्त्यांच्या दुतर्फा सुंदर हिरवळ, सुंदर घरे, उजव्या बाजूने शांतपणे वाहत जाणारी डॅन्युब... धडाधड कॅमेरे बॅगेतून काढले गेले. मिळेल तेवढे समोरचे अवर्णनीय चित्र कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याची जणू स्पर्धा सुरू झाली. व्हिडिओ काढले गेले. तितक्‍यात कुणीतरी मारियाला प्रश्‍न विचारला, ‘कोणते गाव आहे?’ मारिया म्हणाली, ‘किसोरोझी.’ कुण्या सहप्रवाशाला तो उच्चार ‘किसॉरॉझी’ असा बदलावासा वाटला. तर त्या बदलालाही मारियाची ना नव्हती. मारिया म्हणाली, ‘इथे अक्षरशः अठरापगड माणसे जगाच्या कानाकोपऱ्यातून येतात. त्यांना कितीही सांगितले तरी ते आपलाच उच्चार दामटतात.’ मारिया पुढे म्हणाली, ‘सेंतेंन्द्रेला आम्ही हंगेरियन्स स आणि झ च्या मधला ‘शेंतेंद्रे’ जवळ जाणारा उच्चार करतो. परंतु स्लोवाक ‘स्वातेंन्द्रे ’म्हणतात. क्रोएशिअन्स ‘सेनांद्रिया’ म्हणतात. मुळात सेंट अँड्रयूजवरून सेंतेंन्द्रे हे नाव पडलेय.’ एव्हाना आम्हाला समजले होते, की डोळे गाडीबाहेर ठेवायचे आणि कान मारियाकडे. तरच म्हंजे प्रवासातले पूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहील.   

उजवीकडून डॅन्युब संथ वाहत होती. रस्ता तेवढाच राहून अरुंद बोळकांडीची जागा प्रशस्त आकारात विस्तारू लागली. तेवढ्यात दुसरे गाव आल्याचे कळले. गावाचे नाव विसेग्राड. विसेग्राडला किल्ला पाहायला मिळाला. विसेग्राड किल्ला स्वतःला नीट जपल्याच्या खुणा मिरवीत होता. वाटेत सिबरिक हिल नावाचा भाग लष्करी कारवाईतल्या भग्नावशेषांच्या खुणा दाखवीत होता. या गावाची लोकसंख्या किती असे विचारल्यावर मारिया म्हणाली, ‘सेंतेंन्द्रेची लोकसंख्या २६ हजार, विसेग्राडची १९०० तर किसोरोझीची लोकसंख्या केवळ ९००!’ तिच्या या उत्तरावर आमच्यातला एक जण न राहवून म्हणाला, ‘एवढी कमी माणसे आहेत म्हणून गाव स्वच्छ आहे.’ हां हां म्हणता म्हणता आम्ही अखेर सेंतेंन्द्रे मुक्कामी येऊन पोचलो. मारियाने सांगितले, ‘गाव फिरणे अगदी सोप्पे आहे. डावीकडून डॅन्युबच्या काठाने गेलात तर थोड्यावेळाने उजवीकडे ‘फो तेर’ म्हंजे मुख्य चौक येईल. तिकडून उजव्या गल्लीत वळलात की नयनरम्य वसाहतीचे दर्शन घेऊन सरळ आहोत इथेच याल. त्याउलट उजव्या हाताने गेलात तर, नयनरम्य वसाहतीचे दर्शन घेऊन, ‘फो तेर’कडून डावीकडे वळलात की डॅन्युबच्या काठावर पोचाल. तिकडून डावीकडे वळलात की मग परत आत्ता आहोत तिथे याल.’ झाले. सगळे फटाफट पांगले. ज्याची जशी आवड तसा परिसर फिरू लागले.  

छोटी छोटी सोव्हिनियर शॉप्स, आकर्षकरीत्या मांडून ठेवलेल्या बाहुल्या, कपडे, लाल मिरच्या, डिशेस, ड्रम्स... काय वाटेल ते.... पण आकर्षकरीत्या. वेगळ्या रंगरूपाची हॉटेल्स, नुसत्या पावाऐवजी ‘बेक’चे असंख्य प्रकार...  

दुकाने तर सगळी चकचकीत होती. दुकानात गर्दीदेखील होती. परंतु खूप काही खरेदी करून कोणी बाहेर पडलेय असे दिसत नव्हते. नाही म्हणायला जगभरातल्या लोकांची तोंडे चालू होती. आइस्क्रीम्स फटाफट संपत होती. तेवढ्यात आमच्यातल्या एका प्रवाशाचे लक्ष दुकानातल्या लाल मिरच्यांवर गेले. म्हणाला, ‘एवढ्या लाल मिरच्या मांडल्यात म्हंजे भन्नाट खप असणार मिरच्यांचा.’ त्याच्या या बोलण्याने आम्हा काही जणांच्या डोक्‍यात भुंगा सुरू झाला की सरसरीत फोडण्यांची युरोपियनांना सवय नाही. मग हे लाल मिरच्या कशात वापरतात? काही म्हणाले, नुसत्या शो साठी ठेवत असतील! न राहवून शेवटी दुकानदारालाच विचारल्यावर त्याने वेगवेगळ्या नावाच्या चांगल्या - डिशेस सांगितल्या! काही सौम्य तिखट तर काही चक्क सौम्य गोड होत्या. तरीही त्यात लाल मिरच्यांचा वापर केला गेला होता. आम्ही आश्‍चर्यचकित होऊन तो विषय तिथेच थांबवला खरा; परंतु बुडापेस्टला परतताना लाल मिरच्या घेऊन जाणारा एक टेम्पो पाहिल्यावर आमच्या गाडीत पुन्हा चर्चेला उधाण आले आणि सौम्य कुजबुजीत रूपांतर होऊन ते बोलणे थांबले. 

फो तेर म्हणजे मुख्य चौकाच्या डावीकडून डॅन्युबच्या काठावरून रमणीय फेरफटका मारण्यासाठी आलो तर तिथे एक छानसा नजारा दृष्टीस पडला. गावातील पौगंडावस्थेतील मुलांनी ऑर्केस्ट्रामध्ये छानसा गायन-वादनाचा कार्यक्रम केला. उपस्थितांच्या हाक मारण्यावरून आणि टाळ्यांचा प्रतिसाद देण्यावरून लोकप्रिय गाण्यांच्या वादनाचा कार्यक्रम असावा असे वाटले. 

संध्याकाळच्या सोनेरी किरणांत डॅन्युबच्या काठावरून बोट रेसिंग बघायची गंमत न्याहाळता आली. नदीच्या काठाबाजूने एक सायकल ट्रॅक आणि मुख्य रस्ता अशी वर्गवारी व्यवस्थित असल्याने व्यत्यय न येता परिसरभ्रमणाचा आनंद लुटता आला. 

अखेर सेंतेंन्द्रेचा निरोप घ्यावाच लागला. छोटासा परंतु पूर्ण परिसर फिरून अखेर सर्वांनी बसमध्ये आपापल्या जागा पकडल्या आणि देखणे बुडापेस्ट बघूनसुद्धा सेंतेंन्द्रेने आपल्याला कशी भुरळ पाडली ते सांगण्यातच सगळे गढून गेले.

  •  हंगेरीची राजधानी बुडापेस्टच्या उत्तरेला सेंतेन्द्र 
  •  बुडापेस्ट - सेंतेन्द्र अंतर २४ - २५ कि.मी. 
  •  बस किंवा ट्रेनने अर्ध्या तासात पोचू शकतो

फोटो फीचर

संबंधित बातम्या