सागरकिनाऱ्यांची रम्य सफर

उदय ठाकूरदेसाई
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

आडवळणावर... 
रविवार असूनदेखील कळंबच्या सागरकिनारी कुणीही नव्हतं. मोकळा आणि स्वच्छ समुद्रकिनारा पाहून साहजिकच आनंद झाला. कोवळी उन्हं अंगावर घेत लांबवर यथेच्छ रपेट मारली. समुद्राला ओहोटी असल्यानं उन्हं चढायच्या आत जवळच्या राजोडी आणि नवापूर किनाऱ्यांना भेटी द्यायची आणि अर्नाळा किल्ला पाहून संध्याकाळी सूर्यास्ताच्यावेळी पुन्हा कळंबलाच यायचं ऐनवेळी ठरवलं.

सहज म्हणून प्रवासाला निघावं, परंतु अनपेक्षितरीत्या प्रवासात छान छान प्रवासचित्रं बघायला मिळावीत, आकर्षणकेंद्राच्या ठिकाणापेक्षा सुंदर ठिकाण पाहायला मिळावं आणि प्रवास उत्तरोत्तर रंगत जावा, अगदी तसाच काहीसा प्रकार आम्ही मुंबईजवळील कळंब येथील समुद्रकिनारा बघायला गेलो तेव्हा आम्हाला अनुभवायला मिळाला. काही वर्षांपूर्वी थंडीच्या दिवसांत कळंब येथे गेलो असता, समुद्रकिनाऱ्यापेक्षा सूर्यफुलांची शेती पाहिल्याच्या आठवणींचा गडद ठसा मनावर उमटला होता. 

गेल्या महिन्यातील एका रविवारी सकाळच्या सुंदर थंडीत लवकरात लवकर मुंबई सोडण्याचं ठरवलं. नालासोपाऱ्याच्या पेल्हार फाट्यावर ट्रॅफिक जॅम असूनसुद्धा पावणेनऊ वाजता नालासोपारा पार करून, नऊ वाजता आद्य शंकराचार्यांचं मंदिर बघायला निर्मळ इथं पोचलो. 
शंकराचार्यांच्या मंदिरासमोरच निर्मळचं प्रसिद्ध तळं आहे. तिकडं जाताना, एक शेतकरी ट्रॅक्‍टरनं जमीन नांगरतोय आणि ट्रॅक्‍टरच्या मागं बरेच बगळे आहेत, असं चित्र दिसलं. जवळून जाणाऱ्या गावकऱ्यानं ‘ते बगळे जमीन नांगरताना जमिनीतून वर येणारे किडे खाताहेत..’ अशी माहिती पुरवली. 
थोडं पुढं बऱ्याच पक्ष्यांचा किलबिलाट कानी आला. सकाळच्या निःशब्द वातावरणात माशांची टोपली घेऊन तोल सावरीत जाणारी कोळीण, शेतकरी आणि बगळ्याचं सख्य, खोलवर तळ्यात रापण टाकून मासे पकडायला बसलेला कोळी आणि उजव्या हाताला वर दिसणारं शंकराचार्यांचं मंदिर! निर्मळमधील या काही निसर्गचित्रांनीच आमचं मन निर्मळ करून टाकलं. 

रविवार असूनदेखील कळंबच्या सागरकिनारी कुणीही नव्हतं. मोकळा आणि स्वच्छ समुद्रकिनारा पाहून साहजिकच आनंद झाला. कोवळी उन्हं अंगावर घेत लांबवर यथेच्छ रपेट मारली. समुद्राला ओहोटी असल्यानं उन्हं चढायच्या आत जवळच्या राजोडी आणि नवापूर किनाऱ्यांना भेटी द्यायची आणि अर्नाळा किल्ला पाहून संध्याकाळी सूर्यास्ताच्यावेळी पुन्हा कळंबलाच यायचं ऐनवेळी ठरवलं. 
या विभागातली हीच तर मोठी गंमत आहे. कळंब किनाऱ्यावरून मजल-दरमजल करीत तुम्ही थेट अर्नाळा गाठू शकता किंवा कळंबच्या पुढं राजोडी, त्यापुढं नवापूर आणि लागूनच अर्नाळा असं म्हटलं तर चार किनारे स्वतंत्रपणे एक-एक करून बघू शकता. कारण प्रत्येक किनाऱ्याचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. कळंबचा समुद्रकिनारा पर्यटनासाठी लोकप्रिय आहे. राजोडीचा किनारा भेट देण्याजोगा आहे. नवापुरचा किनारा सर्वांत सुंदर, स्वच्छ आणि चारही किनाऱ्यांत देखणा आहे. अर्नाळ्याचा किनारा व्यापारी दृष्टीनं महत्त्वाचा असल्यानं वर्दळीचा आहे. 

दुपारी जेवणासाठी अर्नाळ्याला जायचं ठरल्यानं कळंब किनाऱ्यावरून राजोडी किनाऱ्याकडं जायला निघालो. अंतर ५ किमीचंच असलं तरी रस्त्यावरची नागमोडी वळणं, मराठी-ख्रिस्ती बांधवांची टुमदार घरं, शानदार बंगले, भोवती फुलबागा पाहून आपण मुंबईजवळच्या प्रदेशात सफर करतोय असं वाटतही नाही. राजोडी किनाऱ्यावर माणसं अशी नव्हतीच! ऐन दुपारचं थोडंसं फिरल्यासारखं करून आम्ही सत्पाळे नाक्‍यावरून आगाशीला गेलो. खूप बदललेलं आगाशी पाहिलं. रविवार असल्यामुळं आगाशीच्या चर्चमधील लगबगही पाहायला मिळाली. चर्च बघून आम्ही अर्नाळ्याला निघालो. वाटेत संत पीटर चर्च लागलं. बाजूलाच असलेला एसटी डेपोदेखील न्याहाळला. अर्नाळा डेपोलगतच्या भागात बरीच रिसॉर्टस बघायला मिळाली. अर्नाळा बीच रिसॉर्टमध्ये जेवत असताना सूर्यफुलाची शेती पाहू न शकल्यानं वाटलेली रुखरुख बोलण्यात येणार तोच सोबत आलेल्या विरारच्या विठ्ठल आवारी या परममित्रानं त्याच्या ओळखीतल्या मंडळींना फोन लावून नवापूर येथे बाग बघायची तजवीज केली. 

कळंब ते अर्नाळा एकच किनारपट्टी असली तरी नवापूर येथून समुद्राचं दर्शन अधिक देखणं वाटतं. अधिक स्वच्छता असल्यामुळं असेल कदाचित! आम्ही गप्पा मारत समुद्र न्याहाळत असतानाच विजय बोडके हे नवापूरचे रहिवासी आम्हाला बाग दाखवण्यासाठी आले. ‘यंदा अजून सूर्यफुलाची शेती ऐन भरात नाही. यावेळी लहान लहान सूर्यफुलं आहेत..’ असं सांगत त्यांनी जर्मन फुलं दाखवली. पंचक्रोशीतली गावकरी मंडळी त्या फुलाला ग्राम्य भाषेत ‘अश्‍टर’ म्हणतात. असं सांगत त्यांनी या मळ्यातून त्या मळ्यात आणि या वाफ्यातून त्या वाफ्यात असा प्रवास घडवीत, केळीच्या बागेत पालक कसा पिकवतात? अलकोलच्या पिकानंतर दुसरं पीक लगेच कसं घेतात? हे सांगता सांगता इथला शेतकरी हा कलाकार आहे. जरासुद्धा जागा वाया घालवत नाही. इवलीशी जागादेखील नवरीसारखी सजवतो, अशी माहिती दिली. 

अर्नाळा किल्ल्याला जर तुम्ही भेट देणार असाल, तर घरून निघण्याआधी छोटीशी तयारी करायला हवी. समुद्रात बोट किंचित अंतरावर उभी राहात असल्यानं गुडघाभर पाण्यातून बोटीची ३-४ पायऱ्यांची छोटीशी शिडी चढून पैलतीरी जायचं असल्यानं पायात बुटांऐवजी चपला असलेल्या चांगल्या. किल्ला बघताना इतिहासाच्या खुणा सांगणारा हा किल्ला अजूनही बऱ्यापैकी शाबूत आहे हे लक्षात येतं. किल्ल्यात त्र्यंबकेश्‍वर आणि भवानीमातेची मंदिरं आहेत. १५१६ मध्ये बांधलेल्या या किल्ल्यावर अनेक सत्तांतरानंतर अखेर १८१७ मध्ये ब्रिटिशांनी कब्जा केला. किल्ला बघून परतताना बोटींसाठी कमी गर्दी असेल असं वाटलं, परंतु अखेर ऐन वेळेला व्हायची तेवढी गर्दी झालीच. बोटीत साधारण ३०-४० प्रवासी भरत असावेत. परंतु एक लक्षात आलं, बोट सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत सगळ्यांचं जग वेगवेगळं होऊन जातं. कोलाहल टिपेला पोचतो. बोट किनारी पोचताच बोटीतून उतरायची एकच लगबग सुरू होते. 

बोटीतून उतरल्यावर आम्हीदेखील आमचा मोर्चा कळंबकडे वळवला. आता हळूहळू उन्हं उतरायला लागली होती. एव्हाना कळंबच्या किनाऱ्यावर ऊर्जादायक चित्र दिसत होतं. राजोडीला दुपारी आरामात रवंथ करणारे उंट प्रवाशांच्या दिमतीला जणू तयार होते. प्रेमी युगुलांची झुंबड वाढत चालली होती. अतिउत्साही आणि झिंग येऊन नाचून थकलेले युवा हिरो वाढणाऱ्या गर्दीसमोर थोडेसे सौम्य होत जात होते. सूर्य लालिमा धारण करण्याच्या बेतात होता. आकर्षक फोटो काढू पाहणारी तरुण युवामंडळी लालभडक सूर्याला डोक्‍यावर खांद्यावर अशा वेगवेगळ्या पोझेसमध्ये कॅमेराबद्ध करू पाहत होती. वडेवाले, हुरडावाले, चहावाले, कुल्फीवाले या विक्रेत्यांची चांगली चंगळ होती. सकाळी ज्या किनाऱ्यावर अगदी चिटपाखरूही नव्हतं, तिथं रविवारच्या संध्याकाळी छानसा माहोल रंगात आला होता. कळंबच्या त्या समुद्रकिनाऱ्यावर या धामधुमीत वडापावाच्या गाडीच्या दुतर्फा गावातल्या बायका ताज्या ताज्या भाज्या विकायला बसल्या होत्या. कोथिंबीर, लाल माठ, राजगिरा, पालक, चवळी, चंदनबटवा, मुळा अशा अप्रतिम पालेभाज्या त्या विकत होत्या. गंमत म्हणजे, त्यांचा सर्व माल विकला गेला होता. 

आम्ही संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत रपेट मारता मारता अशी दृश्‍यं टिपत होतो. अखेर सूर्यास्ताचे फोटो काढून आम्हीदेखील या सुंदर भागाचा निरोप घेतला. कळंब-राजोडी-नवापूर-अर्नाळा या चार सागरी किनाऱ्यांपेक्षा अधिक सुंदर सागरकिनारे तुम्ही पाहिलेले असू शकतील. परंतु भवतीचा बागायती परिसर, अप्रतिम निसर्गदृश्‍यांनी नटलेला परिसर, टुमदार घरं, शानदार बंगले, नागमोडी वळणाचे गर्दी नसलेले शांत रस्ते, गोड हेल काढून बोलणारे गावकरी यांच्या एकत्रित दर्शनानं या भागातील सफर अवर्णनीय होऊन जाते. 

कसे जाल? 
रेल्वेने जाणाऱ्यांनी पश्‍चिम रेल्वेवरील नालासोपारा स्टेशन गाठावं. नालासोपाऱ्याहून कळंब, तर विरारवरून अर्नाळा गाठण्यासाठी मुबलक सुविधा उपलब्ध आहेत.

काय पाहाल? 
निर्मळ येथील शंकराचार्यांचं मंदिर आणि तळे. अर्नाळा किल्ल्याला बोटीनं जाता येतं. (भाडं १५ रुपये माणशी. जाऊन-येऊन. यात बदल होऊ शकतो.)

काय खाल? 
या परिसरात ‘भुजिंग’ हा पोह्यात चिकन घालून केलेला पदार्थ खूपच प्रसिद्ध आहे.

वाहन घेऊन जाणाऱ्यांसाठी
पश्‍चिम द्रुतगती मार्गावरून पेल्हार फाट्यावरून नालासोपारा. तेथूनच सरळ निर्मळ. निर्मळवरून कळंबसाठी रस्ता आहे. 

अंतर 
 पुणे-नालासोपारा...१९६ 
 मुंबई-नालासोपारा...६६ 
 सोपारा-निर्मळ...........६ 
 निर्मळ-कळंब............४ 
 कळंब-राजोडी........५ 
 राजोडी-आगाशी.....६ 
 आगाशी-अर्नाळा.....५ 
 अर्नाळा-कळंब......२०

परतताना... 
आलो तसेच पेल्हार फाट्यावर जाण्याऐवजी नालासोपारा फ्लायओव्हरला उजवीकडे यू टर्न मारून वसईमार्गे पश्‍चिम द्रुतमार्गाच्या वसई फाट्यावर विनासायास आणि जलद जाऊ शकतो हे लक्षात ठेवावं. वेळ वाचेल.

फोटो फीचर

संबंधित बातम्या