शांत, सुंदर ओमारू 

उदय ठाकूरदेसाई
गुरुवार, 8 मार्च 2018

आडवळणावर...
न्यूझीलंडचा दौरा करण्याच्या सुमारास एक वेगळीच घटना घडली आणि आम्हाला एकच का-चांगली दोन-तीन आडवळणावरची गावं-शहरं बघायला मिळाली.

नेहमीपेक्षा जरा वेगळी ठिकाणं पाहायची असतील तर भारतात मुद्दामदेखील आपण मुक्त भटकंती करू शकतो. परंतु परदेशात प्रवासी कंपनीच्या आखीव-रेखीव कार्यक्रमात मुक्त भटकंती करणं शक्‍य होत नाही. तरीसुद्धा परदेशात जरा वेगळी भटकंती करायला मिळाली तर काय बहार येईल, असं मात्र मनात सतत यायचं. आम्ही न्यूझीलंडचा दौरा करण्याच्या सुमारास एक वेगळीच घटना घडली आणि आम्हाला एकच का-चांगली दोन-तीन आडवळणावरची गावं-शहरं बघायला मिळाली. 

खोटं वाटेल परंतु आम्ही न्यूझीलंडला जाण्याच्या दोन दिवस आधी न्यूझीलंडमध्ये (ख्राईस्टचर्च - जिथे आम्ही थांबणार होतो) भूकंप झाल्याचं कानावर आलं. मग काय, फोनाफोनी. धावाधाव. जाणं रद्द. मग आमचं पुन्हा कामावर रुजू होणं. आठ दिवसात परत जायचा पुकारा. पुन्हा पासपोर्ट-व्हिसाच्या चकरा आणि जाण्याच्या अगदी काही तास अगोदर हातात मिळालेला पासपोर्ट आणि भूकंपामुळं बदललेला प्रवासाचा तपशील! 

मुंबई-सिंगापूर-सिडनी-ख्राईस्टचर्च अशा ३९ तासांच्या दीर्घ प्रवासानंतर संध्याकाळी ख्राईस्टचर्च सोडून देखणा कॅंटरबरी हा पहिला थांबा आला. लेक टिकापो, लेक पुकाकी या रम्य तळ्यांचं दर्शन रात्री ८ वाजता घेत (तिकडं अंधार रात्री सव्वा नऊ - साडे नऊला होतो), ट्‌वायझेल मुक्कामी सर्वांनी थकवा घालवला. 

आम्ही ट्‌वायझेलहून ड्युनेडिनला चाललो होतो. वाटेत ओमारू नावाचं अतिशय शांत, नीटस आणि देखणं असं छोटेखानी शहर लागलं. या ओमारुजवळच आम्हाला प्रशांत महासागराचं पहिलं दर्शन झालं. ओमारू या छोट्या शहरानंच व्हिक्‍टोरियन काळातल्या अतिशय देखण्या इमारतींचं दर्शन घडवलं. ओमारूमधेच पेंग्विनविषयी प्रथमच आणि बरंच ऐकायला मिळालं; तसंच ओमारूमधेच बस एकदा सुरू झाली की रस्त्यात मधेच थांबत नाही, हेदेखील समजलं! 

आमच्या बसचा चक्रधर आणि गाइड अशा दोन्ही भूमिका अधिकृतपणे आणि समर्थपणे सांभाळणारा बॉब, हे एक इरसाल व्यक्तिमत्त्व होतं. माहिती देण्याबरोबर ती रंजक करून सांगण्याकडं त्याचा ओढा असे. ओमारामा हे छोटेखानी गाववजा शहर जवळ आल्यावर बॉब मोठ्या मिस्कीलपणं म्हणाला, ‘न्यूझीलंडमध्ये कैक लाख मेंढ्या आहेत त्यातल्या ४५ लाख मेंढ्या स्वतःला माणसं समजतात.’ तो नुसतं असं बोलून थांबला नाही, तर ‘द रिंकली रॅम्स’ या सुंदर रेस्टॉरंटजवळ बस थांबवून, ‘डाव्या हाताला तुम्ही नुसतं जा. लाकडी शिवाराच्या आत बऱ्याच मेंढ्या तुम्हाला भेटायला येतील..’ असं सांगून मोकळा झाला. तेथून पुढील प्रवासात दौरा संपेपर्यंत मेंढ्यांचा संपर्क या ना त्या कारणानं अखेरपर्यंत होत राहिला आणि न्यूझीलंड मेंढीपालनात जगात अग्रेसर आहे, ही गोष्ट लक्षात आली. 

‘द रिंकली रॅम्स’ या रेस्टॉरंटला भेट दिल्यानंतर आमच्या जेवणाच्या वेळेला बॉबनं ओमारूच्या मुख्य चौकात बस उभी केली. म्हणाला, ‘जेवण झाल्यावर या सुंदर शहराचं दर्शन घ्या. रपेट मारा. उभे आहोत ती आकाशवाणी केंद्राची इमारत लक्षात ठेवा किंवा समोरचे रेल्वे रूळ ही खूण लक्षात ठेवा. ते रेल्वे रूळ लयदार वळण इथूनच घेतात..’ बॉबचं बोलणं संपायच्या आत सर्व मंडळी गटागटांत पांगली आणि पोटपूजा करण्यासाठी आवडीची रेस्टॉरंट शोधू लागली. आम्हीसुद्धा नवीन मैत्र झालेल्या पुण्याच्या भागली या डॉक्‍टर दांपत्याबरोबर एका छानशा रेस्टॉरंटमध्ये पिझ्झा, पास्ता खायला गेलो. वाटेतल्या इमारती नजर वेधून घेत होत्या. थंड आणि उल्हसित वातावरण होतं. रस्त्याच्या डिव्हायडरमध्ये फुलांचे ताटवे रचून परिसर शोभिवंत केला गेलेला होता. आम्हा पर्यटकांना तो नजारा फारच आकर्षक वाटला. 

आगे दुकान पीछे मकान अशा पद्धतीचं ते रेस्टॉरंट, साधंसुधं न वाटता आधुनिक वाटेल अशा पद्धतीनं सुशोभित केलं होतं. संपूर्ण न्यूझीलंडमध्येच जिथं गर्दी नाही ती रेस्टॉरंटमध्ये कशी सापडणार? त्यामुळं चांगलाच निवांतपणा मिळाला होता. रेस्टॉरंटच्या हसऱ्या बोलघेवड्या मालकीणबाईंना विचारलं, ‘इकडं बघण्यासारखं काय आहे?’ मालकीणबाई म्हणाल्या, ‘पाहायचं असलं तर म्युझियम आहे.आणि पेंग्वीन बघायला आवडत असतील तर पिवळ्या आणि निळ्या डोळ्यांचे पेंग्वीन बघता येतील. डोळ्यांचं पारणं फेडायचं असेल तर ओमारू - ड्यूनेडिन ट्रेननं प्रवास करता येईल.’ 

ओमारूत पाय टाकल्यापासून आपलं असं वेगळंच वळण दाखवणारा तो लोहमार्ग एकूण भोवतालच्या वातावरणात स्वतःची ऐट मिरवत होता. रेस्टॉरंटच्या मालकिणीच्या बोलण्यातून त्यातला थोडासाच भाग तेव्हा लक्षात आला. परंतु भारतात परतल्यावर त्याविषयी जास्त समजलं आणि ओमारूचा मनातील ठसा आणखी खोलवर गडद होत गेला. 

ओमारूच्या रस्त्यांवरून गप्पा मारत हिंडताना मुंबई-पुण्यात दोन दिवसांपूर्वीचे धांदलीत असलेले आम्ही आणि ओमारूत निवांत फिरतानाचे आम्ही हा फरक आमचा आम्हालाच लक्षात येण्याजोगा होता. अखेर उत्साहित करणाऱ्या थंडीतली रम्य रपेट आटोपती घेत आम्ही ओमारूच्या आकाशवाणी केंद्रात शिरलो. 

प्रवेशद्वाराच्या आतल्या दर्शनी भागात रेडिओ-ग्रामोफोन्स-ट्रान्झिस्टर्सची रास रचून ठेवली होती. अति स्वच्छता आणि नीटस मांडणी यामुळं ते दृश्‍य ‘गोडाऊन’ न वाटता अप्रतिम साठवणीचं एक उत्तम उदाहरण म्हणूनच डोळ्यासमोर आलं. जाता जाता एक खरीखुरी गंमत सांगायची, तर आमच्यातल्याच एका काकांना त्यांच्या भारतातल्या ग्रामोफोनसाठी विशिष्ट ‘पिन’ भारतात मिळत नव्हती; ती नेमकी ओमारूत मिळाल्यानं दुर्मिळ गोष्ट मिळाल्याचा त्यांचा आनंद आम्हाला समजण्यासारखा होता. 

सर्व मंडळी एकेक करून बसमध्ये चढेपर्यंत सहज म्हणून बॉबला प्रश्‍न विचारला, ‘ओमारू कशासाठी लोकप्रिय आहे?’ बॉब म्हणाला, ‘जेनेट फ्रेम ही ओमारूमधील लोकप्रिय कादंबरीकार. तिच्या आयुष्याचा शेवट दुःखद झाला. परंतु तिनं ओमारूचं स्थान न्यूझीलंडच्या नकाशात ठळक केलं.’ 

एव्हाना दुपार टळायच्या बेतात होती. चक्रधर आणि गाइड असणाऱ्या बॉबनं सर्वांना बसमध्ये बसायची सूचना केली आणि आम्ही भरल्या मनानं ओमारूचा निरोप घेतला. बस सुरू झाल्यावर अवघ्या दहा मिनिटांत बॉब त्याच्या माईकवरून म्हणाला, ‘डावीकडं दिसतोय तो पॅसिफिक..’ त्याचं वाक्‍य संपायच्या आत बसमधल्या उजवीकडच्या खिडकीजवळचे सगळे प्रवासी धावत उठून ‘पॅसिफिक’ बघायला धावले. ‘गाडी थांबव गाडी थांबव’ असं ओरडू लागले. 

नेमक्‍या या ठिकाणी मिस्कील बॉबला चिमटा काढायची लहर आली आणि तो म्हणाला, ‘तुम्ही न्यूझीलंडमध्ये आहात हे लक्षात ठेवा. दुसरं महत्त्वाचं म्हंजे सीट सोडायची नाही. तुम्हाला एखादं दृश्‍य आवडलं म्हणून बस वाटेत थांबवता येणार नाही. थांबा असेल तिथंच बस थांबेल. पण काळजी करू नका. आपण थांबतोय. तुम्ही मनसोक्त पॅसिफिकचं दर्शन घ्या. मगच आपण निघू. ठीकाय?’ 

बसमधून खाली उतरून प्रशांत महासागराचं दर्शन घ्यायला सगळेच्या सगळे आतुर होते. हायवेपार थोड्या अंतरावर समुद्रदर्शनासाठी खास थांब्याची सोय केली होती. तिथं बस थांबली. आम्ही सारे प्रवासी प्रशांत महासागराचं दर्शन घ्यायला बसमधून खाली उतरलो. 

समोर दिसणारं हिरवं-निळं पाणी, भरून आलेलं आभाळ, सभोवतालचा निर्जन परिसर... खरं तर आम्ही हरखून जायला हवं होतं समुद्रदर्शनानं; परंतु तसं झालं नाही. समोरचा नजारा चांगला असला तरी प्रशांत महासागर म्हटल्यावर सगळ्यांच्या मनात जरा वेगळं चित्र किंवा आकर्षक रूप असावं. मनातल्या दृश्‍याशी या प्रत्यक्ष दृश्‍याचा मेळ बसत नव्हता. कदाचित आमच्या अपेक्षा खूप जास्त असाव्यात. आलोच आहोत तर एक छोटासा फेरफटका मारून, कमी उजेडातही जमतील तेवढे फोटो काढून आम्ही बसमध्ये परतलो. यावेळी मात्र ओमारूला अखेरचा बायबाय करून प्रशांत महासागराचं दीर्घकाळ दर्शन घेत ड्यूनेडिनच्या रस्त्याला लागलो. 

कसे जाल? 
न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावरच्या ओटॅगो प्रांतातल्या वैताकी जिल्ह्यातल्या शांत, सुंदर ओमारू या छोटेखानी शहराला भेट द्यायला जरा वाकडी वाट करून जावं लागतं. वेळेअभावी ट्रेननं आम्ही प्रवास करू शकलो नाही; परंतु ओमारू - ड्यूनेडिन हा प्रशांत महासागराच्या साक्षीनं होणारा ट्रेनप्रवास अतिशय अप्रतिम आहे असंच सर्वांच्या बोलण्यात आलं. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत न्यूझीलंडमध्ये उन्हाळा असल्यानं पर्यटकांना फिरण्यासाठी हा उत्कृष्ट मोसम आहे. 

  •  ख्राईस्टचर्च - ट्‌वायझेल - २९० किमी - साडेतीन तास. 
  •  ट्‌वायझेल - ओमारू - १४५ किमी - पावणेदोन तास. 
  •  ओमारू - ड्यूनेडिन - ११४ किमी - दीड तास. 

काय पाहाल? 
अवघ्या १२ हजार लोकसंख्येच्या इवल्याशा ओमारूत अनेक आकर्षणं आहेत - 

  • व्हिक्‍टोरियन काळातल्या देखण्या इमारती. 
  • इथला रम्य फेरफटकासुद्धा तुमची तबियत खुश करेल! 
  • म्युझियम आणि पेंग्वीन क्‍लब हे ओमारूचं आकर्षण आहे. 
  • ओमारू आकाशवाणी केंद्रात स्टुडिओ आणि ताज्या कार्यक्रमांच्या थेट प्रक्षेपणाशिवाय विविध रंगरूपाच्या आणि सध्या कालबाह्य झालेल्या रेडिओ - ट्रान्झिस्टर्स - ग्रामोफोन्सचे विविध संच आरामात न्याहाळता येतात.

फोटो फीचर

संबंधित बातम्या