छान छान ड्युनेडिन

उदय ठाकूरदेसाई    
शुक्रवार, 16 मार्च 2018

आडवळणावर    
आडवळणावरच्या ड्युनेडिन शहरात मनमुराद फिरण्यात मश्‍गुल असताना, एक-एक करून फिरण्यातली आकर्षणं पुढे आली आणि ती पाहता पाहता २-३ दिवस कसे निघून गेले ते आम्हाला कळलेदेखील नाही.

फारसे प्रवासी नसलेल्या आडवळणावरच्या ड्युनेडिन शहरात मनमुराद फिरण्यात मश्‍गुल असताना, एक-एक करून फिरण्यातली आकर्षणं पुढे आली आणि ती पाहता पाहता २-३ दिवस कसे निघून गेले ते आम्हाला कळलेदेखील नाही. 
जो प्रशांत महासागर ओमारू येथे विशेष विलोभनीय वाटला नाही, त्याने आपली अनेक विलोभनीय रूपे ओमारू - ड्युनेडिन प्रवासात दाखवायला सुरवात केली. चालत्या बसमध्ये छाया-प्रकाशाचा खेळ रंगलेला पाहायला मिळाला. वाढत्या लाटांचा रम्य देखावा, तुटक्‍या कड्यांआडून दिसणारे प्रशांत महासागराचं अवखळ रूप नजरेसमोर रेंगाळत राहिलं. 

ड्युनेडिनचा उच्चार खरा डनेडिन आहे. ड्युनेडिनवर स्कॉटिश अंमल होता. त्यामुळं न्यूझीलंडमधील इतर शहरांपेक्षा ड्युनेडिन फार वेगळं वाटतं. इथेदेखील व्हिक्‍टोरियन काळातल्या खूप इमारती आहेत. ड्युनेडिनचं रेल्वे स्थानक बघताना या अप्रतिम इमारतींकडं पाहावं, समोरच्या रस्त्याच्या विभाजकांमध्ये दिसणाऱ्या आकर्षक फुलांकडं पाहावं, की पायपरवर सुंदर धून वाजवणाऱ्या तरुणाच्या अदाकारीला दाद द्यावी? बाजूला एकचित्ताने चित्रं काढणाऱ्या चित्रकारांच्या कलाकृतीकडं पाहावं, की मन विचलित करणाऱ्या आणि दुरून दिसणाऱ्या कॅडबरी वर्ल्डच्या इमारतीकडं पाहावं, की रमत-गमत थाटामाटानं आपल्याच तंद्रीत जाणाऱ्या डबलडेकर बसमधून सिटीटूर करावी? अशा आणि इतक्‍या व्यवधानांचे पर्याय बाजूला सारत एक-एक करून आपापले आवडते पर्याय निवडण्यात सर्वजण गुंगून गेले... मात्र एकाच रेल्वे स्थानकाबाहेर इतक्‍या दर्जेदार पद्धतीचं वातावरण आजवर तरी कुठं पाहायला मिळालं नाही यातच सर्व काही आलं. 

कॅडबरी वर्ल्डच्या मुख्य दारातून आत गेल्यावर समोर दिसणारी ढीगभर चॉकलेटची रास डोळ्यांचा पुरता ताबा घेते. मुख्य प्रवेशद्वारातून आत जाण्यासाठी म्हणून तुम्ही पुढे गेलात की खेळण्यातला साप अचानक वरून उडी मारून, तुम्हाला लांबूनच घाबरवून, पाठी फिरायचा! हमखास धमाल उडवणाऱ्या या दृश्‍यामुळं सगळ्यांची भंबेरी उडालेली पाहायला म्हणून आमचा चक्रधर बॉब आतपर्यंत आला होता. हा थोडासा मजेशीर प्रकार आटोपल्यावर आम्ही चॉकलेट फॅक्‍टरी बघायला आत गेलो. 

कॅडबरी वर्ल्डची टूर ही सव्वा तासांची आहे. कंटाळत बघणाऱ्याला, चॉकलेटचं आकर्षण नसणाऱ्यांनादेखील कंटाळा येणार नाही अशी त्या टूरची आखणी आहे. गत इतिहास, चॉकलेटच्या मूर्ती, छोटी फिल्म या गोष्टी आहेत. तुम्ही कॅडबरी चॉकलेटच्या मुख्य प्रपाताजवळ येता. कपड्याचा आडवा लांबलचक ‘तागा’ कसा मिलमध्ये घरंगळत खाली येतो, तेवढा आणि तसाच कॅडबरीचा दाट रस कपड्याच्या ताग्यासारखा आडवाच्या आडवा घरंगळत प्रपातासारखा खाली कोसळतो ते दृश्‍य आपल्याही मनावर खोलवर बसतं. बघता बघता जीभ ओली करतं. अशा वेळी चॉकलेटप्रेमींच्या तोंडाला पाणी न सुटतं तरच नवल! कौतुकाचा, खुशीचा, आनंदाचा, चित्कारांचा हा सोहळा संपल्यावर, पहिल्यावहिल्या कॅडबरी-गाड्यांची प्रदर्शनीय कथा दाखवून आपण कॅडबरी वर्ल्डच्या जगातून बाहेर पडतो. 

पुढचं आकर्षण होतं बोटॅनिकल गार्डन. आम्ही बागेत प्रवेश करणार तोच पावसाची एक सर येऊन गेली. कुठलीही बोटॅनिकल गार्डन सहसा कुणाला नाराज करीत नाहीत. हिरवळ, फुलं, निवडुंग, देशोदेशीची खास वैशिष्ट्य असणारी फुलं वगैरे वगैरे. तरीदेखील असं म्हणावसं वाटतं, की ड्युनेडिनचं बोटॅनिकल गार्डन हे स्वतःचं वैशिष्ट्य मिरवीत होतं. सुंदर प्रवेशद्वार, वळणदार रस्ते, मुक्त वातावरणात वाढलेली रसरशीत झाडं, कळ्यांसोबत पावसाच्या हलक्‍या सरीत न्हालेली फुलं, बंदिस्त वातावरणात आपलं तेज दाखवणारे निवडुंग.. इतक्‍यात एकच गलका झाला.. झाडांच्या खोडापाठून बदकांची फटावळ आपल्या पिल्लांसकट रस्ता ओलांडून फुलं फुलली त्या दिशेला जात होती. मोठं रमणीय दृश्‍य होतं ते. 

बसमध्ये बसल्यावर चक्रधर आणि गाइड बॉबनं सांगितलं, ‘लवकरच आपण बाल्डविन रस्त्यावर पोचू. हा रस्ता जगात सर्वांत तीव्र चढ असलेला रस्ता म्हणून गिनेस बुकात नोंदला गेलेला आहे. तो चढायला सगळेजण तयार आहेत ना?’ आमच्या ग्रुपमधून मी, स्वाती आणि डॉ. भगली असे तिघेचजण तो दुर्गम रस्ता चढायला तयार झालो. बसमधून खाली उतरलो आणि मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या पायऱ्या चढू लागलो. एवढ्यात प्रचंड आवाज करीत एक जीप आपल्या सर्व ताकदीनिशी वर चढली आणि आवाज न करता गुपचूप खाली उतरली. पाऊस असल्यामुळं आणि नेमका चढ कसा चढायचा, हे न कळल्यामुळं मी कॅमेरा किंवा मोबाईल काहीही घेतलं नव्हतं. त्यामुळं त्या विश्वविक्रमी रस्त्यावरच्या चढाचे फोटो काही घेता आले नाहीत. परंतु आणखी एक छानशी रपेट छानशा वातावरणात मारल्याचा आनंद मिळाला. 

त्यानंतर ओटॅगो युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात आम्हाला उतरवून बॉबनं सांगितलं, ‘हा मोकळा अवर्णनीय परिसर तुम्हाला फिरायला आवडेल.’ कोणी निराश, दुःखी जीव ओटॅगो युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात फिरायला आला तर कॅंपसमधील अद्वितीय निसर्गचित्रं पाहून हरखून जाईल. जीवनात सकारात्मक जगायला शिकेल; इतका ओटॅगो युनिव्हर्सिटीच्या आतला भाग देखणा आहे. आवर्जून रपेट मारण्याजोगा आहे. 

एव्हाना सगळ्यांचे पाय बोलायला लागले होते. त्यावर ‘उतारा’ म्हणून आमच्या टूर गाइडनं रात्री ‘तंदुरी पॅलेस’ या भारतीय हॉटेलात तंदुरी चिकनची आणि चमचमीत मेजवानीची बात केल्यावर बसकडं परतण्यासाठी सगळ्यांची पावलं थोडी जोरात पडायला लागली. ‘डनेडिन’ कसं आणि किती छान होतं आणि यापेक्षा उद्या आणखी छान ते काय असणार? याबद्दलच्या गप्पा मारण्यात आम्ही गुंगून गेलो. 

ड्युनेडिन
तुमच्या न्यूझीलंड दौऱ्याच्या कार्यक्रमात ड्युनेडिन शहराचा अंतर्भाव नसला तर तुम्ही वाकडी वाट करून जरूर ड्युनेडिनला (डनेडिन) भेट द्या. फारसे टुरिस्ट नसलेल्या अवघ्या सव्वा लाख लोकसंख्येच्या ड्युनेडिनमध्ये अनेक पर्यटनस्थळं आहेत. 

कसे जाल? 
     ख्राईस्ट चर्च - ड्युनेडिन = ३६० किमी साडेचार तास. 
     क्विन्सटाउन - ड्युनेडिन = २८० किमी साडेतीन तास. 

काय पाहाल? 
 ड्युनेडिन रेल्वे स्थानक (१९०६) 
 कॅडबरी वर्ल्ड (२००३) 
 ओटॅगो युनिव्हर्सिटी (१८६९) 
 ओटॅगो म्युझियम (१८६८) 
 लार्णाक किल्ला (१८७४) 
 पेंग्विन रिझर्व्ह (१९८५)
 अल्बाट्रॉस सेंटर (१९८३)
 बाल्डविन रस्ता 

कुठे राहाल? 
सिनिक हॉटेल -प्रिन्सेस रस्ता - शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे या हॉटेलचा पर्याय उत्तम ठरावा. याशिवाय बजेटनुसार भरपूर हॉटेल्स उपलब्ध आहेत. 

काय खाल? 

  • चीज, सॅंडविचेस, कॉफी, फिंगरचिप्स, पिझ्झा, पास्ता यात बुडणाऱ्यांची येथे चंगळ आहे. 
  • सॅंडविचेसमध्ये लेट्युस घालून खाणे आवडत असल्यास तुम्ही येथे फार चविष्ट सॅंडविचेस खाऊ शकता. 
  • याशिवाय अर्थातच कितीतरी आंतरराष्ट्रीय पदार्थांची चव तुम्ही घेऊ शकता. 

कुठे खाल? 
भारतीय जेवणाची आठवण आली आणि ताव मारावासा वाटला तर खालील भारतीय हॉटेल्सना भेट द्या. १. लिट्‌ल इंडिया ब्रिस्टो अँड तंदूर, मोराय प्लेस. २. तंदुरी पॅलेस - मेलर स्ट्रीट, मॉर्निंगटन.

फोटो फीचर

संबंधित बातम्या