हबर्ड ग्लेशिअरचं सौंदर्य 

उदय ठाकूरदेसाई
गुरुवार, 22 मार्च 2018

आडवळणावर
एक्‍सप्लोर’ या पर्यटन-विषयाला वाहिलेल्या वाहिनीवर अलास्का सफारीचं चित्रण योगायोगानं पाहात होतो. निळ्याशार समुद्रात देखण्या अशा निळ्या ग्लेशिअरमधून एक छोटासा बर्फाचा कडा धस्स करून पाण्यात पडला आणि आम्हा सर्वांचेच डोळे त्यावेळी विस्फारले गेले...

‘एक्‍सप्लोर’ या पर्यटन-विषयाला वाहिलेल्या वाहिनीवर अलास्का सफारीचं चित्रण योगायोगानं पाहात होतो. निळ्याशार समुद्रात देखण्या अशा निळ्या ग्लेशिअरमधून एक छोटासा बर्फाचा कडा धस्स करून पाण्यात पडला आणि आमच्या घरातच केवढे चित्कार निघाले मित्रमंडळींच्या तोंडून! मित्र म्हणाला, ‘आत्ता टीव्हीवर बघतो आहोत ते दृश्‍य डोळ्यासमोर लाइव्ह बघायला मिळालं तर!’ आम्हा सर्वांचेच डोळे त्यावेळी विस्फारले गेले... 

त्यानंतर काही महिन्यांत मी आणि स्वातीनं कॅनडा-अलास्काचा दौरा केला. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे अलास्कामधील वर उल्लेखलेलं दृश्‍य आम्ही उभयतांनी प्रत्यक्ष अनुभवलं. निसर्गसौंदर्य म्हणजे काय? अमूर्त सौंदर्य म्हणजे काय? याचा ‘याचि देही याचि डोळा’ आम्ही अनुभव घेतला. ती अलौकिक अनुभूती शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न! 

कॅनडाच्या प्रदीर्घ दौऱ्यात इतकी निसर्गलेणी पाहिली, की क्रूझवर जायचंय, अलास्का पाहायचंय हेच अंमळ विसरायला झालं होतं. बर्फासंबंधीचे बरेच अनुभव घेऊन झाले होते. शेकडो वर्षांपूर्वीचा बर्फ पाहिला. बर्फातून चाललो. ग्लेशियर चढलो. बर्फ पडताना अनुभवलं. बर्फाचे गोळे एकमेकांच्या अंगावर मारून झाले. उणे तापमानात ४-४ आइस्क्रीम्स खाऊन झाली. त्यामुळं बर्फाविषयी अधिक काही आकर्षणं पुढं वाढून ठेवली असतील याची जरादेखील कल्पना आम्हाला कॅनडाच्या दौऱ्यादरम्यान आली नाही. कॅनडा दौरा संपल्यावर कॅनडा येथील व्हॅन्कुव्हर येथे क्रूझमध्ये बसून अलास्का क्रूझसफारीमधील वेगळ्या विश्‍वाचा आनंद लुटण्यात संध्याकाळ गेली. दुसरा संपूर्ण दिवस क्रूझ कुठंही न थांबता केवळ वाटचालच करीत राहणार असल्यानं आमच्या आनंदाला सीमा नव्हती. तिसऱ्या दिवशी ‘हुना’ इथं क्रूझ थांबल्यावर दोन दिवसांनंतर बऱ्याच प्रवाशांनी जमिनीवर उतरायचा आनंद लुटला. सर्व प्रवासी परतल्यावर क्रूझच्या पायलटनं घोषणा केली, ‘उद्या सकाळी दहा वाजता आपल्याला हबर्ड ग्लेशिअरचं दर्शन होणार आहे. तेव्हा सर्वांना एकाच विनंती की निराशा टाळण्यासाठी सर्वांनी वेळेअगोदर येऊन डेकवर योग्य जागा पकडावी. जेणेकरून तुम्ही हबर्ड ग्लेशियर बघण्याचा आनंद वाढवू शकाल.’ 

पायलटची घोषणा संपल्यावर सगळे एकमेकांकडं बघायला लागले. त्यातून ‘उद्या काहीतरी खास आहे’ असाच सूर निघत होता. मित्र म्हणाला, ‘भारतातून निघताना किंवा कॅनडात फिरताना हे हबर्डचं नाव निघत नव्हतं. आत्ताच कुठून हे चर्चेत यायला लागलं अचानक?’ 

हा मित्र कॅनडा -अलास्का या सफारीच्या जोडनावामुळं अलास्का प्रांतालादेखील कॅनडातलाच एक भाग समजत होता. अलास्का हे अमेरिकेतील सर्वांत मोठं राज्य आहे हे समजल्यावर मित्र चार फूट उडाला होता. हळूच पुटपुटत तो म्हणाला, ‘म्हणजे आपण वेगळीच अमेरिका बघतोय.’ त्याच्या बोलण्यावर सहप्रवाशांना हसायला आलं खरं; परंतु आमच्यातील जवळजवळ प्रत्येकानं परदेशी सहल करताना कशी फजिती झाली त्याच्या हकीकती त्या रात्री सांगायला सुरवात केली... 

आम्ही ‘हबर्ड ग्लेशियर’ प्रकरण चांगल्या पद्धतीनं बघायचं ठरवल्यानं रात्रीच कॅमेरा, दुर्बीण हाताशी ठेवून होतो. हबर्ड ग्लेशियर येण्याअगोदरचा नजारा बघण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळीच सहा वाजता आम्ही डेकवर गेलो. जाताना सहज म्हणून रिसेप्शन काउंटरवर त्या दिवसाची कार्यक्रमपत्रिका घेतली. त्यात हबर्ड ग्लेशियरची महत्त्वाची माहिती दिली होती. पायलटची अधिकृत घोषणा होईपर्यंत क्रूझबाहेरचा नजारा कसा दिसतो, ते बघायला म्हणून डेकवर आलो.. समोरचा नजारा पाहून स्तंभितच झालो. पहाटेच्या गार वातावरणात पाण्यावर छोटुकले ढग तरंगत होते. धुक्‍याचे लांबलचक पट्टे तयार झाले होते. पाठी वळून पाहिलं तर धुक्‍याचे लांबलचक पट्टे आणि क्रूझनं कापलेल्या पाण्याचे तसेच पांढरे पट्टे, आपला प्रवास अगदी आखीव-रेखीव चालला असल्याचं सूचित करीत होते. समुद्रपक्षी पंखांची संयमित हालचाल करून क्रूझपेक्षा वेगानं अंतर कापीत होते. मनात आलं, हे पक्षी दमले तर थांबणार तरी कुठं? भोवताली कुठंही निवाऱ्याची जागा नव्हती. सर्वत्र पाणीच पाणी होतं. जमीन, पर्वत, इतर क्रूझ वगैरे काहीच दिसत नव्हतं. दीडएक तासानं म्हणजे साडेसातच्या सुमारास दूरवर पर्वताची रेषा दिसू लागली. एव्हाना बरेच पर्यटकही डेकवर जमू लागले होते. साधारणपणे पावणेआठच्या सुमारास क्रूझच्या पायलटची घोषणा झाली, ‘आपण अचूक वेळेनुसार प्रवास करीत असून बरोबर दहा वाजता क्रूझ, हबर्ड ग्लेशियरच्या समोर असेल. काही व्यायाम करणारी मंडळी व्यायाम आटोपता घ्यायला लागली. काही जाकुझीतून बाहेर येऊन पटापट तयार होऊ लागले. क्रूझमध्ये, क्रूझमधील केबिन्समध्ये पळापळ सुरू झाली. ३४०० प्रवाशांपैकी बरेचजण मोक्‍याची जागा पकडण्यासाठी डेकवर २ तास अगोदरपासूनच गर्दी करू लागले. 

आम्ही नाश्‍ता करून, केबिनमध्ये जाऊन आणखी थोडे गरम कपडे अंगावर चढवून कॅमेरा-दुर्बिणीसह पुन्हा एकवार डेकवर गेलो. साडेनऊ वाजता पायलटनं घोषणा करून सांगितलं, ‘आज हवा एकदम उत्तम आहे. सूर्य असल्यामुळं प्रकाश चांगला आहे. या क्रूझमधील तुम्ही प्रवासी भाग्यवान आहात कारण इतकं सुंदर वातावरण या अगोदर हबर्ड ग्लेशियर इथं फारच कमी वेळेला पाहिलं आहे.’ एव्हाना डेक फुल्ल होऊ लागलं.. 

स्वातीनं (माझ्या पत्नीनं) डोळ्यांना आमच्याजवळील शक्तिशाली दुर्बीण लावताच ती आनंदानं जवळजवळ ओरडूनच म्हणाली, ‘उदय, ते बघ! हबर्ड ग्लेशियर आपल्या दुर्बिणीतून स्पष्ट दिसतंय! म्हणजे साधारण दीडएक किमीवर ते असेल!’ एव्हाना पाहिलं तर आजूबाजूच्या बऱ्याच पर्यटकांनी ज्यांच्याजवळ दुर्बिणी होत्या, त्यांनी हबर्ड ग्लेशियर पाहायला सुरवात केली होती. या ठिकाणी दुर्बिणीविषयी चार शब्द लिहिणं जरुरीचं आहे. परदेशातल्या प्रवासात कॅनेडियन रॉकीज, जंगलसफारी किंवा व्हेलवॉचिंगसारख्या साहसी मोहिमेवर, कंटाळवाणी होऊन नकोशी वाटणारी अडगळ आणि डोळ्यांना लावल्यावर अपार आनंदाचा चिरंतन ठेवा वाटणारी दुर्बीण नावाची अनमोल वस्तू तुम्ही अगदी जरूर जवळ बाळगावी. अर्थातच, जेवढी शक्तिशाली दुर्बीण घ्याल तेवढी चांगली. 

एव्हाना क्रूझमधील संगीताचा आवाज बंद झाला होता. बहुतेक पर्यटक डेकवर असल्यानं डेकच्या काठाला खेटून असलेल्या, रंगीबेरंगी कपडे, जाकिटं घातलेल्या माणसांची रंगीबेरंगी किनार डेकचं सौंदर्य खुलवीत होती. जसजसं हबर्ड ग्लेशियर जवळ आलं, तसतशी पर्यटक मंडळी शांत शांत होत गेली. ज्यांनी ज्यांनी हबर्ड ग्लेशियरचं पहिलं दर्शन घेतलं, त्यांच्या तोंडून निघालेला आश्‍चर्याचा ध्वनी अतिशांत वातावरणात महत्त्वाचा आवाज ठरून गेला. सर्वत्र स्पष्ट ऐकू येऊ लागला. पर्यटक रंगून गेले हबर्ड ग्लेशियर बघण्यात. 

का नाही रंगणार म्हणा? निळ्या रंगाच्या बर्फात न्हालेल्या हबर्ड ग्लेशियरच्या पुढ्यात आम्ही उभे होतो! अमूर्त चित्र पाहणारे कसं चित्र बघतात, समजून घ्यायचा प्रयत्न करतात.. त्याप्रमाणंच हबर्ड ग्लेशियर बघताना तुम्ही सर्वांत प्रथम स्तंभित होऊन जाता. मग समोरच्या ग्लेशियरचे रंग, आकार तुमच्या मनाचा कब्जा घेतात. दरम्यान पायलट ग्लेशियरबद्दल समालोचन करताना सांगतो, की हे ग्लेशियर १२२ किमी लांब आहे. १२०० फूट खोल आहे. हे ऐकल्यावर आपण पुन्हा वेगळ्याच नजरेनं ग्लेशियर बघायला लागतो. 

मोठ्या मुश्‍किलीनं आपली नजर समुद्रातल्या पाण्यावर जाते आणि तिथंही साचलेलं बर्फ आणि छोट्या छोट्या बर्फाच्या तुकड्यांचे विलोभनीय आकार पाहिल्यावर आपली नजर सतत कुठं काय आहे याचा वेध घेत राहते. काळजाचा ठोकाच (अत्यानंदानं) चुकवणाऱ्या या गोष्टी! 
एवढ्यात एकाच कल्ला होतो. डावीकडच्या बाजूच्या पर्यटकांनी बर्फाचा कडा कोसळताना पाहिलेला असतो. थोड्या वेळात उजवीकडच्या बाजूच्या लोकांचा एकत्रित गजर; त्यांनीही बर्फाचा कडा कोसळलेला पाहिल्याची आपल्याला खात्री पटवतो. अशा रीतीनं एक-एक वेगळीच अशी धमाल पाहायला मिळते. दोन तास आमची क्रूझ हबर्ड ग्लेशियरजवळ थांबलेली होती.. निसर्गाचा हा रंगलेला खेळ पाहताना पर्यटक अगदी खुश होऊन गेले. 

छान सूर्यप्रकाश. प्रसन्न वातावरण. भर दुपारचा गार चावरा वारा. समोर अपार आनंदाचा ठेवा असलेलं हबर्ड ग्लेशियर आणि आमच्या क्रूझच्या सभोवतालचा अद्‌भुत सन्नाटा. त्या सन्नाटासदृश वाटणाऱ्या दृश्‍यात काय आणि किती गोडवा होता तो त्यावेळी उपस्थित असणाऱ्या जगभरातल्या निवडक पर्यटकांच्याच वाट्याला आला असं म्हटलं पाहिजे. 

आडवळणावरचे काही काही प्रवास काळजात घर करतात. हबर्ड ग्लेशियर पाहण्यासाठी झालेला प्रवास हा त्यातलाच एक म्हणायचा! 

अलास्काचे वैभव हबर्ड ग्लेशिअर 

  • हबर्ड ग्लेशियर अलास्काच्या पूर्वेला आहे. क्रुझनं तिथं पोचायला तीन दिवस लागतात. हबर्ड ग्लेशिअरचा बराचसा भाग अमेरिकेत असला, तरी काही भाग हा कॅनडाच्या युकॉन प्रांताला व्यापूनदेखील आहे. १२२ किमीवर पसरलेलं भव्य हबर्ड ग्लेशियर (समजण्यासाठी सांगायचं तर मुंबई-पुणे अंतराएवढं - त्यापेक्षा अगदी थोडंसंच कमी) बघताना अंगावर रोमांच उभे राहतात. 
  • समुद्रसपाटीपासून ११ हजार फूट उंचीवर असलेल्या या महाकाय हिमनगाची खोली १२०० फुटांहूनही अधिक आहे म्हणतात! 
  • या हिमनगाच्या आसपास अनेक प्रवाह वाहात असतात. बर्फाचे कडे वारंवार कोसळत असतात. त्यामुळं मोठ्या क्रुझसुद्धा हिमनगापासून अंमळ लांबच उभ्या राहतात. 
  • एक शक्तिशाली दुर्बीण हिमनग पाहण्याचा आनंद शतपटीनं वाढवते हे मात्र नक्की. 

कसे जावे? 

  • कॅनडातील व्हॅंकुव्हर येथून अलास्का भ्रमंतीसाठी क्रूझ निघत असल्यानं सर्वांत प्रथम कॅनडातील व्हॅंकुव्हर गाठावं लागतं. 
  • अमेरिकेतून आणि कॅनडातून फक्त हबर्ड ग्लेशिअरच्या दर्शनासाठीसुद्धा छोट्या अत्याधुनिक बोटी निघतात. परंतु, तो प्रवास अतिखर्चिक असतो. 

काय पाहाल? 

  • हबर्ड ग्लेशिअरचं सौंदर्य. 
  • आपण क्रुझच्या डेकवर असताना क्रुझवरील खास पाचारण केलेले निसर्गतज्ज्ञ त्यांच्या धावत्या समालोचनातून बरीच माहिती देतात. त्यामुळं हबर्ड ग्लेशियर बघायची रंगात वाढते.

फोटो फीचर

संबंधित बातम्या