नगाधिराज माऊंट पिलाटस 

उदय ठाकूरदेसाई
गुरुवार, 5 एप्रिल 2018

आडवळणावर

एप्रिल-मे महिन्यांत स्वित्झर्लंडमध्ये फिरायला किती मजा येते..’ हे सरधोपट वाक्‍य झाले. कारण स्वित्झर्लंडमध्ये फिरायला कधी मजा येत नाही? तिन्हीत्रिकाळ मजाच येते! 

त्यातही ल्युसर्न फिरताना तर फारच. कारण कार, ट्रॅम, क्रूझ, सायकल, रेल्वे, बस आणि चालणे अशा अनेक पर्यायांनी आपण देखणे ल्युसर्न फिरू शकतो. परंतु फारच थोडे जवळच्या माऊंट पिलाटसच्या डोंगरमाथ्यावर जाऊन येतात. तुम्ही जर ल्युसर्न शहरात फिरत असाल तर माऊंट पिलाटसला जरूर भेट द्या. 

ज्याप्रमाणे ल्युसर्न शहर तुम्ही अनेक अंगांनी फिरू शकता त्याचप्रमाणे माऊंट पिलाटसला जातानादेखील तुम्ही अनेक पर्यायांतून निवड करू शकता. तिथे जाण्यासाठी तुम्हाला केबलकार, ‘कॉगव्हील’ ट्रेन, ट्रेक, सायकलने दुसऱ्या थांब्यापर्यंत, तेथून ड्रॅगनराइडने डोंगरमाथ्यावर असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही एका बाजूने ल्युसर्न बघून माऊंट पिलाटसचा डोंगरमाथा गाठून दुसऱ्या बाजूने उतरू शकता. त्याचप्रमाणे एका बाजूने माऊंट पिलाटसचा डोंगरमाथा गाठून दुसऱ्या बाजूने ‘कॉगव्हील’ ट्रेनने उतरून ल्युसर्न शहर बघू शकता. एवढेच काय, माऊंट पिलाटसच्या डोंगरमाथ्यावर राहून दुसऱ्या दिवशी ल्युसर्न शहर सफारी करू शकता. साहजिकच, सर्व सुविधांनी युक्त ल्युसर्न शहर हे जगात सर्वांत जास्त बघितल्या जाणाऱ्या शहरांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. 

ल्युसर्न शहरापासून अवघ्या दहा किलोमीटरवर क्रिन्स लागते. तेथून केबलकारने आपला माऊंट पिलाटसला जायचा प्रवास सुरू होतो. मधे फ्रॅकमुंटेग थांबा लागतो. थोडा वेळ मिळतो आणि समोरचे दृश्‍य पाहून आपल्या नकळत आपण विचार करायला लागतो. अरेच्चा!! असे इतके साधे, सोप्पे, सुटसुटीत.. इन्फ्रास्ट्रक्‍चर-इन्फ्रास्ट्रक्‍चर म्हणतात ते हेच काय? फ्रॅकमुंटेग थांब्याबाहेर साहसी खेळांसाठीचे विविध पर्याय उपलब्ध असतात. त्यातला टोबोगान हा घसरगुंडीचा पर्याय तुम्हाला दीड किमी घसरगुंडी करवतो खरा; परंतु एकदा ‘खाली’ पोचल्यावर तेथून तंगड्या तोडत, दम काढत, धापा टाकत ‘वर’ यावे लागते! मग पुन्हा इच्छा आणि ताकद असेल तर दुसरी घसरगुंडी! 

याशिवाय फ्रॅकमुंटेग थांब्याच्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात एक छानसे हॉटेल आणि स्वच्छ प्रसाधनगृहदेखील आहे. संपूर्ण जमलेला जमाव सॅंडविच-कॉफी पितोय, बर्गर-आइस्क्रीम खातोय आणि मुख्य म्हणजे घाण न करता आनंदात बागडतोय.. हे दृश्‍यच किती सुंदर होते! 

ड्रॅगनराइडमधून सात हजार फुटांचा टप्पा गाठताना बर्फाच्छादित शिखरे दिसायला लागतात. सर्व पर्यटकांचे चेहरे भोवतालचे बर्फाळ दृश्‍य पाहून हसरे होऊन जातात. भारतीय पर्यटकांना तर कधी एकदा डोंगरमाथ्यावर चालतो आणि बर्फ पायदळी तुडवतो असे होऊन जात असावे. 

फ्रॅकमुंटेग ते पिलाटस या आमच्या प्रवासादरम्यान एक गंमत झाली. ड्रॅगनराइडमध्ये आमच्यासोबत १२ - १५ लोक जॅंगो सिनेमातल्या नायकाप्रमाणे एक-एक काळी पेटी (लाकडी केस) आपल्याबरोबर बाळगून होते. आमच्यातले बहुतेकजण संशयाने एकमेकांकडे पाहून काही बरे-वाईट तर होणार नाही ना? हे डोळ्यांच्या इशाऱ्यातून एकमेकाला विचारत होते. त्याहूनही मजा म्हणजे विशिष्ट पोशाखातील ते लोक बिलकूल हसायला-बोलायला तयार नव्हते. त्यामुळे साऱ्यांचा संशय वाढला असावा. आमच्यातल्या एका व्रात्य मुलाने माझ्या कानात येऊन सांगितले, ‘काका, यांनी सुटकेस ओपन करून जॅंगो हिरोप्रमाणे मशिनगन चालवायला सुरवात केली तर आपण इथेच संपलो!’ मला त्याही स्थितीत हसू आले. मी त्याला गप्प राहायचा इशारा केला. नशीब. लवकरच माऊंट पिलाटस दिसायला लागला आणि आम्ही डोंगरमाथ्यावर पोचलो. 

स्वाती (माझी पत्नी) आणि मी डोंगराच्या कड्यावर चढत असताना संगीताचे सूर कानी आले. पाहतो तो काय! मघाचे काळ्या पेट्या घेऊन जाणारे १२ - १५ जण एका सुरात अल्फोर्न वाजवीत होते. आपल्याकडे डोंगररांगांतील आदिवासी जसा तारपा वाजवतात ना; त्याप्रमाणे युरोपातल्या या विभागात अल्फोर्न वाजवतात. अल्फोर्न एवढे लांब असते, की त्याचे एक टोक तोंडात तर दुसरे टोक पार जमिनीवर असते. विशिष्ट सुरावटीमुळे डोंगररांगातल्या बर्फिल्या निःशब्द वातावरणात न कळणारे संगीतसुद्धा ‘कानसेन’ श्रोत्यांची मनोमन दाद घेऊन गेले. मजा म्हणजे जसे ते काळ्या पेट्या घेऊन कोरड्या चेहऱ्याने आले, तसेच करड्या शिस्तीने निघूनही गेले... 

स्वाती आणि मी माऊंट पिलाटसच्या सर्वांत उंच कड्यावर चढत होतो. तेव्हा वातावरणात बदल होत गेला. ‘धुक्‍यात हरवली वाट’ म्हणतात ना त्याचा प्रत्यय येत होता. आणखी थोडे वर चढल्यावर हवा थोडी सर्द, थोडी अधिक थंड झाली. बोचरा वारादेखील सुरू झाला. कड्याला घासून बाजूने सुसाट निघताना सूंऽऽ सूंऽऽऽ असा आवाज करू लागला. या डोंगरावर राक्षस राहातात या कल्पनेला जणू खतपाणी घालणारे पार्श्‍वसंगीत निसर्गाने जणू आपसूक सुरू केले! आम्ही अगदी टोकावर पोचल्यावर हवा एकदम स्वच्छ झाली. ढगाआडून सूर्य आपली करामत दाखवू लागला. लेक ल्युसर्न दिसायला लागले. सगळे आनंदले. सभोवार चहूबाजूंनी ल्युसर्न - स्वित्झर्लंडचे अप्रतिम सौंदर्य दिसू लागले. आम्ही कॉग व्हील ट्रेनचा वेगळा देखावा बघण्यासाठी दुसऱ्या बाजूला चालत आलो. मुंगीच्या गतीने चालणाऱ्या कॉग व्हील ट्रेनमधूनसुद्धा अप्रतिम निसर्गचित्रे दिसल्याचे त्यातून आलेल्या प्रवाशांनी सांगितले. लेक ल्युसर्न आणि रॉईस नदीच्या पाण्याने धारण केलेले विलोभनीय आकार, हिरवाईमधून लयदार वळणे घेणारे नागमोडी लडिवाळ रस्ते, मुंग्यांच्या पावलांनी चढणारी कॉग व्हील ट्रेन, शिस्तप्रिय कलाकारांचे नेटके वादन, थंडगार हवा, हे सर्व सात हजार फूट उंचीवरच्या माऊंट पिलाटसच्या डोंगरमाथ्यांच्याही वर असलेल्या एका उंच कड्यावरून न्याहाळताना ‘डोळ्यांचे पारणे फिटणे’ म्हणजे काय, याचा प्रत्यय आला. 

परतताना फ्रॅकमुंटेगला केबलकार पकडण्यासाठी थांबलो असताना पुन्हा सर्वांना ‘चार्ज’ व्हायला झाले. पुन्हा साहसी खेळ दृष्टीस पडले. पुन्हा ट्रेक, रोप, सायकली, झिपलाईन यांचे ऊर्जामय दर्शन झाले. ते चित्र मनात साठवून आम्ही केबलकारने पुन्हा एकदा ल्युसर्न शहराजवळच्या क्रिन्स गावात आलो. नंतर निसर्गरम्य ल्युसर्न शहर बघण्यात दंग होऊन गेलो.

माऊंट पिलाटस 
कसे जाल? 

एकदा तुम्ही स्वित्झर्लंडमधील ल्युसर्न गाठलेत, की माऊंट पिलाटस तीन-साडेतीन किमीवर आहे. म्हणजे दहा मिनिटांत तुम्ही तेथे पोचू शकता. खरे तर ल्युसर्नवरून अनेक मार्गांनी माऊंट पिलाटसला जाता येते... 

  • ल्युसर्न - क्रिन्स - केबलकारने फ्रॅकमुंटेग - ड्रॅगनराइड म्हणजे अजस्र केबलकारने डोंगरमाथ्यावर. 
  • ल्युसर्नवरून जगातील सर्वाधिक कठीण चढ चढणाऱ्या ‘कॉग व्हील ट्रेन’ने डोंगरमाथ्यावर. 
  • क्रिन्सवरून ट्रेक करून, फ्रॅकमुंटेगला टोबोगान, झिपलाईन, रोपवॉक वगैरे साहसी खेळ करून डोंगरमाथ्यावर. 

परंतु अनेक पर्यायातून आनंदाने डोंगरमाथा चढण्यासाठी हवामान मात्र चांगले असणे फारच महत्त्वाचे असते. लहरी हवामानामुळे सफर यशस्वी होईलच याची खात्री देता येत नाही. 

काय पाहाल? 
माऊंट पिलाटसच्या डोंगरमाथ्यावरून ल्युसर्नचे देखणे रूप अधिकच नजरेत भरते. बर्फवृष्टी अनुभवायला मिळाली तर तुमचा दिवस सोनेरी क्षणांचा होऊन जातो. दुपारच्या आत डोंगरमाथ्यावर गेलात तर अल्फोर्न नावाच्या लांबलचक वाद्याचे टोक जमिनीवर टेकलेलं असतं. जसजसे डोंगरमाथ्यावर चालत जाल तसतसे गूढ गहिरे वातावरण बनत गेल्याचे अनुभवता येते. डोंगरमाथ्यावरून लेक ल्युसर्न बघणे हा अनुभव वर्णनातीत आहे. 

घुमक्कडांसाठी
पॅरिस, बेल्जियमवरून हॉलंड करून जर्मनीला ड्युसेलडॉर्फ येथे ऱ्हाईन नदीत क्रूझचा आनंद लुटून प्रसिद्ध ब्लॅक फॉरेस्टच्या रस्त्याने द्रुब्बा गाठून ल्युसर्नला येता येते किंवा जर्मनीत स्टुटगार्ट येथे मर्सिडीज बेंझचे देखणे म्युझियम बघून पुन्हा एकवार ब्लॅक फॉरेस्टच्या रस्त्याने द्रुब्बा गाठून ल्युसर्नला येता येते. 

  •  ड्युसेलडॉर्फ - ल्युसर्न = ६२० किमी - साडेसहा तास. 
  •  ड्युसेलडॉर्फ - द्रुब्बा = ५०० किमी - पाच तास. 
  •  स्टुटगार्ट - ल्युसर्न = २७५ किमी - साडेतीन तास. 
  •  स्टुटगार्ट - द्रुब्बा = १६० किमी - २ तास. 
  •  द्रुब्बा - ल्युसर्न = १३८ किमी - दोन तास.

फोटो फीचर

संबंधित बातम्या