बांफचा स्वप्नवत प्रवास 

उदय ठाकूरदेसाई
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

आडवळणावर
 

आपण स्वप्नात तर नाही ना, असं वाटायला लावणारे अनेक स्वप्नील प्रवास प्रत्यक्ष अनुभवलेले असले, तरी ‘बांफ ते जास्पर’ हा अनुभव विलक्षण होता. हा प्रवास करताना आपण जणू नक्षत्रांच्या गावातून प्रवास करतोय असं वारंवार जाणवत होतं. बर्फाच्छादित डोंगर, हिरव्या-निळ्या पाण्याचे तलाव, ताशीव दगडांमधून कोसळणारे धबधबे, बर्फाची चादर अंगावर घेऊन संन्यस्त वृत्ती दाखवणारी निसर्गरम्य तळी, फुटांच्यावर झेप घेणारे बेलाग कडे, एक ना दोन... 

बांफचं वैशिष्ट्य हे की बांफकडे चांगलीच वाकडी वाट करून जावं लागतं. सहज म्हणून कॅनडा फिरायला गेलात आणि बांफ बघून आलात, असं होत नाही. कारण बांफ आहे खरोखरच आडवळणावर! त्यामुळं तिथपर्यंत पोचण्यासाठी तुमच्यापाशी मोकळे दिवस आणि थोडासा जास्त दिवसांचा कार्यक्रम आवश्‍यक आहे. 

आम्ही कॅलगॅरी विमानतळावरून बांफ नॅशनल पार्कमध्ये शिरलो. हे पार्क ६६४१ चौकिमी इतकं मोठं आहे, असं कळल्यावर पहिला धक्का बसला. योजनाबद्ध रीतीने बांफ हे पर्यटन क्षेत्र बनवायचं असं कॅनेडियन सरकारनं १८०० पासून ठरवलं हे ऐकल्यावर दुसरा धक्का बसला. इथं सूर्यास्त रात्री दहाच्या सुमारास होतो, मोरेन लेक १२० एकर जागा व्यापतं, एमिराल्ड लेक योहो नॅशनल पार्कमधील मोठं तळ आहे, लेक मिनिवांका २१ किमी लांब आणि ४५० फूट खोल आहे.. असे कितीतरी माहितीचे धक्के खात खात आम्ही बांफला पोचलो. 

आमच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणं सामान हॉटेल रूमवर टाकून बांफचं पहिलं दर्शन करायला हॉटेलबाहेरच्या हायवेवर आलो. हॉटेलमधून बाहेर पडलं, की उजवीकडं उत्तरेला आणि डावीकडं दक्षिणेला आवाक्‍यातल्या फिरण्यात बांफ बघून होतं. ट्रेक करणाऱ्यांना अडनिडी गावं जशी आवडतात ना तसंच बांफ आहे. कुठं आला आहात त्याचं सतत भान देणारे बर्फाळ डोंगर, अतिथंड हवा हे बांफचं वैशिष्ट्य! बांफचा मुख्य रस्ता हळूहळू कुजबुजत चालणाऱ्या वाटसरूंना व्यापून गेला होता. सूर्यास्त रात्री ९.४९ ला होणार होता. सर्व व्यवहार आरामात चालले होते. 

दुसऱ्या दिवशी ‘सल्फर माऊंटन गोंडोला राईड’ करायला निघालो. एका पाळण्यात ४ जण बसून ८ मिनिटांत ‘सल्फर माऊंटन’च्या डोंगरमाथ्यावर गेलो. डोंगरमाथ्यावरून बांफचा आणि एकूणच बो व्हॅलीचा नजारा पाहून स्तिमित झालो. नगररचनाकारांनी किती योजनाबद्ध रीतीनं बांफची आखणी केली, ते पाहून थक्क व्हायला होतं. अतिथंड वातावरण, भुरूभरू पडलेलं बर्फ, धुक्‍याची लपाछपी, डोंगरमाथ्यावरील गरम पाण्यातले झरे असे सर्व विशेष बघून गोंडोलामधून बांफ गावात येऊन बसमधून बांफ फिरायला निघालो. 

मुख्य कहाणी इथून सुरू होते.. आमची बस (बांफ स्थलदर्शनासाठी) सुरू झाली. गाइड मारिटा ट्रेकर होती. बसमध्ये उशिरा आलेल्यांची नर्मविनोदी भाषेत खिल्ली उडवत तिनं आम्हा साऱ्यांनाच पहिला प्रश्‍न विचारला, ‘तुम्ही बांफमध्ये राहता त्या हॉटेलचं नाव काय?’ यावर एका अतिउत्साही तरुणीनं ‘पिटार्मिगन’ असं म्हटल्यावर, ‘बाळा, त्यातील ‘पि’ सायलेंट आहे. तेव्हा टार्मिगन म्हण,’ अशी जवळजवळ शिकवणी घेत ‘टार्मिगन’ हे पक्ष्याचं नाव आहे. तो अतिथंड प्रदेशात सापडतो वगैरे माहिती दिली. त्यानंतर बांफविषयी, ट्रेकिंगविषयी, डोंगरांविषयी तिनं भरपूर माहिती दिली. 

बसप्रवास सुरू असताना मधेच अस्वल दिसले. थोडे पुढं गेलो तोच बसच्या उजव्या अंगाला मोरेन लेक दिसलं. ते पाहून कधी एकदा खाली उतरतो असं झालं. तळ्याकडं एकटक पाहत असताना तेवढ्यातल्या तेवढ्यात तळ्यातील पाण्याचा रंग हिरवा-निळा असा बदलताना दिसला. ‘आता बसमधून खाली उतरूया,’ असं गाइडनं म्हणताच सगळ्यांनी जल्लोष केला. 

मी फोटो काढत असताना दोन रानटी एडके आपल्या भरगच्च शिंगांनी एकमेकांना जोरदार टकरा मारीत होते. त्यानंतर मोरेन लेकचं गूढ आणि अद्वितीय सौंदर्य पाहण्यांत आम्ही दंग झालो. पुढं लेक लुईसकडं जायचा आमचा प्रवास सुरू झाला. लेक लुईसला पोचताच वातावरणातला गारठा जास्त जाणवायला लागला. तळ्याच्या काठावर भरपूर बर्फ पडलेलं होतं. ते सर्व परिचितांनी एकमेकांना मारायला सुरवात केली आणि जे वातावरण अगदी थंडगार, शांत आणि निःशब्द होतं, ते थोडंसं व्हायब्रंट झालं. 

तेथून एमिराल्ड लेकला जाताना पुन्हा एकदा हिरवं-निळं पाणी पाहण्याचा योग आला. ब्रिटिश कोलंबियाच्या सीमारेषेवर योहो नॅशनल पार्कमध्ये असलेल्या या तळ्याचा बाज काही औरच आहे. अतिशांत वातावरणातल्या विस्तीर्ण जलाशयाच्या हिरव्या-निळ्या पाण्यात लाल रंगाची अतिछोटी नौका आणि त्यात बसलेले दोन ॲथलिट आरामात नौकानयन करताहेत, हे मोठं विलक्षण दृश्‍य पाहायला मिळालं. एकुणातच तो विस्तीर्ण जलाशय पाहणं कधी संपूच नये असं वाटायला लावणारे ते क्षण होते. 

त्यानंतर ताशीव काड्यांच्या मधून फेसाळत जाणाऱ्या जॉन्स्टन कॅन्यनला भेट दिल्यानंतर अखेर बो धबधब्याजवळ आम्ही आलो. बो नदीच्या पाण्यावर असलेला हा धबधबा विशाल रूप धारण करून आडव्या अंगानं; परंतु कमी उंचावरून पडतो. परंतु नेमकं तेच दृश्‍य बघायला, पर्यटकांची उत्तम सोय करून धबधब्याचा परिसर लोकप्रिय करण्याकडं तेथील वनखात्याचा कल असल्याचं दिसलं. 

आम्ही धबधब्याच्या काठावर शांतपणे बसून राहिलो. खरंच सांगतो मजा शतपटीनं वाढली. निर्मनुष्य वातावरण, घनदाट झाडी, समोर आडव्या अंगानं अफाट पाण्याचे लोट फेकणारा धबधबा आणि स्फटिकस्वच्छ पाणी आपल्या समोरून जाताना निर्माण झालेले पाण्याचे खेळ हे सर्व बघण्यात वेळ कसा गेला हे कळलंच नाही! 

जाताना मिनीवांका लेक, दहा हजार फुटांवर उंची असणाऱ्या दहा शिखरांची थरारक दरी, गोठलेलं बो लेक, अशा अनेक निसर्गरम्य स्थळांना भेटी देऊन आम्ही आमच्या ‘टार्मिगन’ हॉटेलकडे रवाना झालो. सगळेजण आनंदून गेले असताना गाइड म्हणाली, ‘हे तर काहीच नाही. उद्या थरारक आडवळणावरील आईस फील्ड पार्कवे, अथाबास्का ग्लेशियर आणि जास्पर बघून तर तुम्ही वेडावूनच जाल...’ 

कसे जाल? 
टोरांटो, ओटावा, नायगारा आदी ठिकाणी असाल तर विमानानं कॅलगॅरी गाठून तेथून लवकरात लवकर बांफ गाठता येईल किंवा ब्रिटिश कोलंबियामध्ये म्हणजे व्हॅन्कुव्हर, व्हिक्‍टोरिया इथं असाल तरी तेथून पुन्हा विमानानं कॅलगॅरी आणि तेथून मग आडवळणावरच्या बांफला जाता येईल. 

काय पाहाल? 
सल्फर माऊंटन गोंडोला राइड, मोरेन लेक, लेक लुईस, बो लेक, बो धबधबा, जॉन्स्टन कॅन्यन, ताकाकाव धबधबा, एमिराल्ड लेक, बो व्हॅली पार्कवे, लेक मिनीवेंका, शिखरांच्या दऱ्याखोऱ्यांतून भटकंती... 

कुठे राहाल? 
टर्मिगन हॉटेल बांफ गावाच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे. बजेटप्रमाणे अर्थातच खूप हॉटेल्स उपलब्ध आहेत. 

निसर्गस्थळांमधील अंतर 

  • बांफ-मोरेन लेक = ४६ किमी - १ तास 
  • मोरेन लेक-लेक लुईस = १४ किमी - वीस मिनिटं. 
  • लेक लुईस-बो लेक = ४० किमी -४० मिनिटं. 
  • बो लेक-जॉन्स्टन कॅन्यन = १८ किमी -२० मिनिटं. 
  • बो व्हॅली-योहो नॅशनल पार्क = २१० किमी - सव्वा दोन तास. 
  • बांफ-एमिराल्ड लेक = ९४ किमी - २ तास. 
  • बांफ-लेक मिनीवांका = १७ किमी - २० मिनिटं.

फोटो फीचर

संबंधित बातम्या