गारकोन 

उदय ठाकूरदेसाई
सोमवार, 22 एप्रिल 2019

आडवळणावर...
 

लेह-लडाख सफारीमधील प्रवासाच्या दुसऱ्याच दिवशी अचानक मुश्‍कु व्हॅलीतील ट्रेक करायला मिळाल्याने आम्ही सर्व मित्रमंडळी खुशीत होतो. द्रासवरून निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत आम्ही रमतगमत कारगिलला पोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. संध्याकाळी हॉटेलात सारेजण समोर दिसणाऱ्या व्हॅलीकडे पाहात चहा पीत होते. तेवढ्यात आमचे लीडर नागवेकर म्हणाले, ‘उद्या आपण १२७०० फुटांवरचा हम्बोला पास पार करून, बटालिक विभागसुद्धा पार करून गारकोन येथील आर्य संस्कृती पाहायला जाणार आहोत. गारकोन विशेष परिचित नसल्याने फारसे कुणी तिथे जात नाही; परंतु माझ्या परिचयाचे पुंचोक नावाचे गृहस्थ आहेत. त्यांचे गारकोनमध्ये घर आहे. तिथे आपल्याला भेट देता येईल. वाटेत हॉटेल वगैरे काही नसल्याने आपण प्रत्येकाने थोडे-थोडे खायला घेऊन जाऊया.’ 

तपशील ऐकूनच साऱ्यांना आनंद झाला. त्यानंतरच्या अनौपचारिक गप्पांत नागवेकर म्हणाले, ‘सर्वसाधारणपणे कारगिल युद्धानंतर बरेचजण लेह-लडाखला भेट देऊ लागले. मी मात्र १९८७ पासून लेह-लडाखच्या वाऱ्या करतो आहे. इथले आडवाटेवरचे अद्‌भुत सौंदर्य जमेल तितक्‍या पर्यटकांना दाखवतो आहे. काल मुश्‍कु व्हॅलीत, मुश्‍ताक कसा आपला दोस्त झाला; तसेच गारकोन गावचे पुंचोक नाशिकच्या लष्करी छावणीजवळ ओळखीचे झाले. त्यांना फक्त ‘तुम्ही आर्यन आहेत का?’ असा प्रश्‍न विचारल्यावर ते माझे झाले. मी त्यांचा झालो. इतका ओलावा, इतका गोडवा भारतीय माणसांत अजूनही आहे. हे सारे कसे विसरता येणार?’ नागवेकरांचे बोलणे ऐकून आम्हा साऱ्यांनाच आता दुसरा दिवस कधी उजाडतो असे झाले होते. निरभ्र आकाशातल्या असंख्य चांदण्या पाहताना, कानांनी मात्र समोरून वाहणाऱ्या सुरु नदीचा नाद ऐकत, एका अमूर्त आनंदाच्या स्वप्नलहरींवर आरूढ होऊन आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो. 

दुसऱ्या दिवशी पहाटे अर्थातच सारेजण कोवळ्या सोनेरी किरणांत बर्फीले पहाड चित्रित करू पाहात होते. छायाचित्रकारांसाठी लेह-लडाखसारखा परिसर शोधूनसुद्धा सापडणार नाही. परंतु, हे लिहीत असताना एक गोष्ट मात्र मान्य करायला हवी, की नेहमीप्रमाणे कॅमेऱ्यावरून हात साफ करताना गारकोनच्या वाटेवर आणि गारकोनहून परतताना आम्हाला लक्षणीय निसर्ग पाहायला मिळणार आहे अथवा आम्हाला खूप छान निसर्गचित्रे पाहायला मिळणार आहेत याची जरासुद्धा कल्पना नव्हती. आम्ही आपले चहा-नाश्‍ता करून गाडीत बसलो आणि चक्रधराला सांगून मोकळे झालो की बाबारे, आम्ही काही या आडवाटेवर परत पटकन येऊ शकत नाही; तरी चांगल्या दृष्यांजवळ गाडी थांबवीत जा! त्या बिचाऱ्याने तत्काळ ‘हो’ म्हटले... आणि आम्ही कारगिल सोडून बटालिकच्या दिशेने प्रवासाला लागलो. गाडी सुरू झाल्याझाल्या नागवेकर म्हणाले, ‘कारगिल हा शब्द कसा रूढ झाला, तुम्हाला माहिती आहे का?’आम्ही मानेनेच नकार दिल्यावर ते म्हणाले, ‘पुर्गालिक’ शब्दाचा ‘कारगिल’ हा अपभ्रंश आहे. पुर्गा म्हणजे तिबेटी, लिक म्हणजे दिसणारे; म्हणजे तिबेटी लोकांसारखे दिसणारे ते कारगिलमधील लोक होत. हे सारे अर्थातच नंतर मुसलमान झाले.’ एवढ्यात रखरखीत वाळवंटात हिरवा पट्टा दिसावा असे दृश्‍य दिसले. ते कसे काय? असे विचारले असता नागवेकर म्हणाले, ‘या विभागाला गोमा परिसर म्हणतात. गोमा म्हणजे कारगिलचा वरचा भाग. येथील भटके लोक पाण्याच्या ठिकाणी वस्ती करतात. पाण्यावर थोडी शेती करतात. त्यामुळे मधे मधे असे हे हिरवे पट्टे पाहायला मिळतात.’ थोडे पुढे गेल्यावर एखादा साप जसा सळसळत समोरून जावा तसा नागमोडी वळणांचा रस्ता दिसत होता. पुढे गेल्यावर सळसळत्या सापाच्या मुखाशी एखादे बशीतले गाव दिसावे तसे अद्‌भुत आणि अचाट नगरीतून अकल्पित प्रवास करीत असल्यासारखे वाटले. पुढे तर एक प्रचंड झिगझॅग रस्ता आणि रस्त्याच्या तळाशी कापण्यासाठी तयार असलेली भातशेती यांची इतकी सुंदर चित्रे बघायला मिळाली, की काही विचारता सोय नाही. मनात असादेखील विचार आला, की आपण खरे भाग्यवान! भारतात राहतो. कुठेही थांबतो, कुठेही गाडी उभी करतो! परदेशात कितीही सुंदर दृश्‍य दिसले, तरी तुम्ही रस्त्यात गाडी थांबवू शकत नाही. ‘थांबा’ असेल तिथेच थांबू शकता. 

थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या डाव्या हाताला एक तटबंदी दिसली. आतमध्ये एक मशीद दिसली. प्रवेशद्वाराजवळचे मोडके दार आम्ही तिकडे पोचेपर्यंत हळूहळू किलकिले झाले. त्यातून एक-एक करून माणसे बाहेर पडू लागली. घुंघटवाल्या स्त्रिया, लहान मुले-मुली, तरुण-वृद्ध हातात फुले घेऊन हळूहळू रस्त्यावर येऊ लागली. आम्हा साऱ्यांना एकच आनंद झाला. सगळ्यांचे कॅमेरे थडाथड बाहेर येऊन क्‍लिक क्‍लिक करू लागले. सुंदर व्यक्तिचित्र मिळवण्यासाठी जो तो धडपड करू लागला. काही काही अतिसुंदर चेहरेदेखील मिळाले. आम्ही केवळ छायाचित्रेच घेतो आहोत आणि आमच्याकडील खाऊ मुलांना देतो आहोत हे पाहून ते नागरिकदेखील खुलले. सुरकुत्यावाल्या चेहऱ्यांचे नागरिकही आमच्याशी बोलू लागले. त्यांच्या बोलण्यावरून कळले, की कुणी एक राजकीय व्यक्ती त्या मार्गावरून जाणार आहे. त्यांचा मानसन्मान करण्यासाठी त्या नागरिकांची ही धडपड चालू होती. सर्वांना मनाजोगती छायाचित्रे मिळाल्याने सारेजण खूष होते. त्या साऱ्यांचा निरोप घेऊन आम्ही बटालिक विभागातील दुस्तर घाट चढू लागलो. काही वेळाने उजव्या हाताला, पिवळ्या रंगाच्या फळांची रास मांडलेली दिसत होती. तीन बायका त्या पिवळ्या धनाची राखण करताना दिसल्या. आम्ही सहज म्हणून गाडीतून उतरून चढ चढून वर गेलो असता, पिवळ्या जर्दाळूची ती रास असल्याचे दिसले. त्या बायकांना विचारले, ‘एवढे जर्दाळू विकायला ठेवले आहेत. परंतु, इकडे गिऱ्हाईक कोण येणार?’ तर त्या म्हणाल्या, ‘तुमच्यासारखे पर्यटक वाकडी वाट करून इथवर येतातच. आले की आमचा थोडा तरी धंदा होतोच..’ यावर आमच्यातल्या इच्छुकांनी वाटेत खायला जर्दाळू घेतले, तर मी जर्दाळूच्या ढेरासमोर बसलेल्या बायकांच्या चेहऱ्यावरची पिवळसर छाया टिपण्यात गढून गेलो. थोड्याशा वनराईतली सावली अनुभवून आम्ही हम्बोला पास ओलांडून बटालिक विभागातल्या लष्करी छावणीला भेट द्यायला गेलो. 

द्रासमधील वास्तव्यात ऐकलेल्या शूरवीरांच्या कथा, सैनिकांची अभूतपूर्व कामगिरी, द्रास-कारगिल युद्धातल्या कथांचे तपशील, हे सारे प्रत्यक्ष अनुभवताना केवळ भावनिक उचंबळून येण्यापेक्षासुद्धा, सैनिकांच्या अनमोल कामगिरीचे मोल कळते आणि ज्या कठीण परिस्थितीत ते आपले कर्तव्य बजावीत असतात, ते प्रत्यक्ष पाहिले की आपला उर अगदी भरून येतो. बटालिकमधील लष्करी छावणी सीमारेषेवरील अत्यंत नाजूक परिसरात असल्यामुळे लष्करी तळ, जवान आणि तो सारा परिसर यांची भेट आटोपती घेऊन आम्ही पुढील प्रवासाला लागलो. 

थोड्या वेळाने आम्ही गारकोन गावात आलो आणि गारकोनमधील पुंचोक यांचे घर नागवेकरांना परिचित असल्याने सरळ त्यांच्या घरीच गेलो. घरात गेल्यावर पुंचोक यांच्या पत्नीने आमचे स्वागत केले. घरात मुले खेळत होती. बोलक्‍या चेहऱ्याची शेंबडी मुलगी हसून आम्हा सर्वांकडे पाहत इकडून तिकडे पळत होती. पुंचोक कुटुंब आर्यन असल्याने सारेजण आर्य संस्कृतीबद्दल एकदम जागरूक होऊन बोलू, विचारू लागले. गारकोन आणि आर्य संस्कृतीबद्दल विचारले असता पुंचोकबाई म्हणाल्या, ‘गारकोन हे हजार-बाराशे लोकांचे गाव आहे. इथल्या बायका डोक्‍यात लाल फुले माळतात. याकचे कातडे पांघरतात. डोक्‍यात पैसे माळतात. आपण आपल्या गुड्डीला सजवू या का?’ असे म्हणत त्या त्यांच्या भाषेत गुड्डीच्या तोंडाला पाणी लावायला गेल्या. त्या मुलीला सजवून चटकन घेऊन आल्या आणि आम्ही सारे चकितच झालो! तोपर्यंत आम्ही जिला शेंबडी मुलगी म्हणत होतो ती एक सौंदर्यवती, रूपवान राजकन्या दिसू लागली. त्या राजकन्येचे आम्ही अक्षरशः असंख्य फोटो घेऊ लागलो. धडाधड फ्लॅश उडू लागले. फटाफट फोटो क्‍लिक होऊ लागले. मुलगी इतकी खुद्‌कन हसली, की काही विचारता सोय नाही. पुंचोकबाई म्हणाल्या, ‘जा, त्यांना आपली बाग दाखव.’ मुलगी आम्हा साऱ्यांना घेऊन बागेत आली. त्यांची बाग पाहून तर आम्ही सर्दच झालो! पुंचोक यांनी कोबी, फ्लॉवर, अल्कोल लावला होता. झाडावरचे जर्दाळू तर इतके खालवर लटकत होते, की नुसते चवडे उंचावले तरी झाडांवरचे जर्दाळू तोंडात येत होते. त्यानंतरचे पुढचे दोन तास आर्य संस्कृतीच्या लोकांत सरमिसळून जाऊन गप्पा करण्याचे होते. निघताना नागवेकर म्हणाले, ‘दरवर्षी आर्य लोकांच्या कलासंस्कृतीचा महोत्सव जोरात साजरा करण्यात येतो. एक वर्ष गारकोनमध्ये, तर दुसऱ्या वर्षी पाकव्याप्त गिलगिटमध्ये! असे आलटून पालटून हे महोत्सव साजरे होतात.’ 

त्यानंतर आम्ही बिना, दाह, हानू, दार्चक या गावांना भेटी देत तेथील उत्फुल्ल युवक-युवतींना भेटलो. या भेटीमुळे आर्यन संस्कृतीची आम्हाला जणू ओळख झाल्यासारखी वाटली. आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. परतताना सिंधू नदीजवळून एक आर्य बाई आरामात चालताना दिसली. नागवेकर मला म्हणाले, ‘ठाकूरदेसाई ही खरी आर्य स्त्री’ मला आणखीन काही कानावर यायची जरूर नव्हती! शक्‍य तेवढे समोरच्या आर्य बाईंना सिंधू नदीच्या साक्षीने आश्‍वस्त करून मी त्या आर्य बाईचे फोटो घेतले. त्यानंतर आम्ही पुन्हा सिंधू नदीच्या काठाने परतीच्या प्रवासाला लागलो. 

कधी कधी काय होते? आपण तपशील ऐकतो. परंतु, तो तपशील आपल्या मनात उतरत नाही. मी काढलेले फोटो पाहिल्यावर लांब वेण्या, माळलेली फुले, माळलेले पैसे हे फोटोत स्वच्छ दिसू लागल्याने बरे वाटले. नागवेकर म्हणाले, ‘आर्य संस्कृतीत पुरुष कान टोचतात. त्यात कोटांची बटणे घालतात. गळ्यात शंकराचे त्रिकोणी यंत्र घालतात. घरात कुणी वारले, तर वर्षभर दुःख पाळतात.’ आर्य संस्कृतीविषयी बऱ्याच छानशा गप्पा मारीत आम्ही संध्याकाळच्या सुमारास कारगिल येथील आमच्या हॉटेलवर पोचलो. 

संध्याकाळी हॉटेलमध्ये आम्ही सारे चहा पीत असताना नागवेकरांना मी विचारले, ‘हा इतका अफलातून वेगळा कार्यक्रम तुम्ही आमच्यासाठी कसा काय आखलात?’ नागवेकर म्हणाले, ‘तुम्ही सारे पक्के घुमक्कड आहात हे मी पहिल्याच भेटीत जाणले आणि म्हणूनच खास तुमच्यासाठी म्हणून हा वेगळा बेत आखला.’ आम्ही सारे आनंदी होतोच. नागवेकरांच्या बोलण्यामुळे साऱ्यांचाच आनंद वाढला हे वेगळे सांगायला नको!

कसे जाल? 

  • गारकोनला नेणारे कोणीही ऐकले नसल्याने नागवेकरांचाच नंबर देतो आहे, विवेक नागवेकर
    : ९८६९६६५५४८.  
  • गारकोन येथे जाण्यासाठी तुम्हाला कारगिल येथे मुक्काम करावा लागेल. जगातले शुद्ध आर्य म्हणून मानाने मिरवणारा आर्य समाज तुम्हाला येथे जवळून पाहता येईल. 

काय पाहाल? 
गारकोनजवळची खाकुक्‍पा, दाह, हानु, दारचक ही गावे, येथील आर्य नागरिक, या परिसरातील झाडांवर लगडलेले जर्दाळू, सफरचंद पाहून तुम्ही खुश व्हाल. कारगिल-गारकोन वाटेवरील निसर्ग महाअप्रतिम आहे. 

विशेष सूचना 

  • कारगिल-गारकोन प्रवास हा खरे तर केवळ ८० किलोमीटरचाच आहे. परंतु, त्यासाठी पुरा दिवस द्यावा लागतो. 
  • वाटेत हॉटेल्स नसल्याने तुमचे खाणे तुम्हाला घेऊन जावे लागते.
  • फोटोग्राफर्ससाठी हा विभाग म्हणजे नंदनवन आहे. त्याचप्रमाणे इतिहासात, निसर्गात, प्रवासात रममाण होणाऱ्यांसाठी गारकोन हे एक सुंदर स्वप्न आहे. तेव्हा स्वतंत्र वाहनाने गेल्यास तुमचा आनंद वृद्धिंगत होईल.

संबंधित बातम्या