मोहक जास्पर 

उदय ठाकूरदेसाई
गुरुवार, 3 मे 2018

आडवळणावर

बांफनंतर जास्परचं नाव घ्यावंच लागतं. कुणी प्रवासी फक्त बांफ बघून कॅनडाहून परतलाय किंवा कुणी फक्त जास्परचं दर्शन घेऊन कॅनडाहून परतलाय असं आजवर तरी ऐकलेलं नाही. कारण बांफ जितकं निसर्गसौंदर्यानं नटलेलं आहे, तेवढंच - किंबहुना थोडं जास्तच - जास्परदेखील निसर्गसौंदर्यानं नटलेलं आहे. बांफ-जास्पर या दोन निसर्गस्थळांमधील काही साम्य किंवा वेगळेपणा हा सहज लक्षात येण्याजोगा आहे. 

बांफमध्ये सल्फर माऊंटन गोंडोला आहे, तर जास्परमधे स्कायट्रॅम आहे. ज्याप्रमाणं सल्फर माउंटनवरून अप्रतिम, आखीव-रेखीव बांफ दिसतं त्याप्रमाणं जास्परच्या व्हिस्लर माऊंटनवरूनसुद्धा रेखीव जास्परचं सुरेख दर्शन घडतं. बांफमध्ये सुंदर तळी आणि कॅन्यनस आहेत तशीच सुंदर तळी आणि कॅन्यनस जास्परमध्येही आहेत. मग जास्परमध्ये आणखी विशेष ते काय आहे? असा प्रश्‍न पडू शकतो. यावर असं सांगावं लागेल, की जास्परमध्ये ‘विपिंग वॉल’ नावाची एक रडणारी भिंत म्हणजे ज्या अनेक सुळक्‍यांच्या भिंतींवरून झरे वाहतात आणि थंडीत जी ‘बर्फाची भिंत’ म्हणून गिर्यारोहकांना चढाईच्या सरावाला उपयोगी पडते, ती भिंत आहे. गोठलेलं मलिन लेक, जास्पर स्कायवॉक, बर्फानं लगडलेले पर्वत, स्लिपिंग बफेलो माऊंटन, बर्फाळ पर्वतावर स्कीईंग करणारे गिर्यारोहक.. अशी कितीतरी आकर्षणं आहेत. थोडक्‍यात, बांफच्या स्वप्नील वातावरणातून बाहेर पडलो, की आणखी मोठा पसारा असलेलं, अधिक भव्य, अधिक 

विराट, परंतु मोहक जास्पर आपल्या नजरेसमोर येतं. निसर्गाच्या या भव्यतेपुढं आपण नम्र, नतमस्तक - स्तिमित होऊन जातो.  जास्परला जाताना गाइडनं बांफ-जास्परला जोडणाऱ्या रस्त्यांची इतकी माहिती दिली, की ऐकता ऐकता दमछाक झाली. उदाहरणार्थ, हायवे ९३, हायवे १, हायवे अ, आइसफील्ड पार्कवे वगैरे वगैरे.. ट्रान्स-कॅनेडियन रस्त्याबद्दल बोलताना ती गाइड म्हणाली, ‘जवळजवळ ३००० किमी लांबीचा, एकही टोल नसणारा, जगातला सर्वांत लांब पल्ल्याचा हा हायवे जगात खूप लोकांच्या आवडीचा आहे. उद्यापासून तुम्हीदेखील त्या रस्त्याचे दिवाने बनाल. त्या रस्त्याला समांतर असा आइसफील्ड पार्कवे हा लेक लुईस ते जास्पर असा २३० किमीचा रस्ता तर बांधला गेल्यापासूनच पर्यटकांच्या कौतुकाचा विषय बनला आहे.’ रस्त्याबद्दल इतक्‍या प्रेमानं एक ट्रेकरच बोलू शकतो. गाइडनं पुढं विचारलं, ‘तुम्हाला पर्वत कंटाळवाणे वाटतात का? वाटत असतील तर समोर पाहा. नजर स्थिर केलीत की तुम्हाला दिसेल - तिथं काही गिर्यारोहक स्कीईंग करताहेत.’ 

आइसफील्ड पार्कवे रस्त्यावरून जाण्यासारखी मजा नाही. आजूबाजूचे पर्वत, हमखास जवळून दर्शन देणारे वन्यप्राणी (आम्हाला तपकिरी रंगाचं महाकाय अस्वल बघायला मिळालं), गोठलेली तळी, बर्फानं लगडलेल्या पर्वतांवर स्कीईंग करणारे धाडसी गिर्यारोहक अशा किती गोष्टी असतात प्रवासातल्या वाटेवर बघायला! असेच हळू हळू जात आम्ही ‘बिग हिल अँड बिग बेंड’ नावाचं फोटो काढण्यासाठीचं ठिकाण आहे तिथं थांबलो. बसमध्ये हिटर असल्यामुळं सुशेगात असलेले आम्ही बसबाहेर पडल्यावर थंडीने कुडकुडायला लागलो. 

पुढं सर्वांचं लक्ष दूरवर दिसणाऱ्या महाकाय अथाबास्का ग्लेशियरकडं आणि आपल्यासोबत प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या महाकाय आईस एक्‍सप्लोरर, स्नो-कोचकडं गेलं. आपण त्या ग्लेशियरवर कधी पोचणार? स्नो-कोचमध्ये कधी बसणार? याची साऱ्यांनाच उत्सुकता होती. 

अखेर तो क्षण आला. आम्ही जगभरातले प्रवासी विखरून त्या स्नो-कोचमध्ये बसलो. चक्रधर आणि गाइड अशा दोन्ही भूमिका पार पाडणाऱ्या चालकानं माहिती द्यायला सुरवात केली.. ‘आता तुम्ही ६ किमी लांब पसरलेल्या ग्लेशियरवर जाणार आहात. या ग्लेशियरवर खूप भेगा आहेत. धोकादायक फलक लावला आहे त्यापुढं जाऊ नका. सर्वांत प्रथम नीट बसा. कारण आता मोठा उताराचा रस्ता येतो आहे. त्यानंतर वितळणाऱ्या ग्लेशियर्सच्या पाण्याचा पाट काढून रस्त्यावरून अशा तऱ्हेनं नेला आहे की स्नो-कोचचे टायर्स त्यांत आपोआप धुतले जातील. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही आणि ग्लेशियर्सचेसुद्धा नुकसान होत नाही.’ त्याचं बोलणं संपेपर्यंत आम्ही ग्लेशियरवर उतरलो. सर्वांच्या हालचाली मंदावल्या होत्या; तरीदेखील खडबडीत बर्फाळ पृष्ठभागावरून आणि कुडकुडत्या थंडीत चालायचे कष्ट घेऊन स्नो-कोच थांबतात त्यापलीकडं बांधापल्याड जायचा प्रयत्न केला. काही ‘क्रिस्टल क्‍लिअर’ पाणी पिऊ लागले. काही बर्फाचे गोळे परिचितांवर फेकू लागले. मी फोटो काढत या सर्वांची मजा बघत होतो. त्यानंतर आम्ही धोक्‍याची सूचना असलेल्या पाटीपर्यंत जाण्याचं नक्की केलं. परंतु बर्फावरून चालणं रस्त्यावरून चालण्यासारखं सोपं नसतं. पडत, धडपडत, तोल सावरीत आम्ही अगदीच थोडी चाल करून आलो. परंतु दमलो मात्र १० किमी वॉक करून आल्यासारखे! अखेर दीड तासांनंतर आमची अथाबास्का ग्लेशियरची सफर संपली आणि ‘शातो जास्पर’ या आमच्या जास्परमधील मध्यवर्ती भागात असलेल्या हॉटेलात पोचलो. दिसायला बांफसारखं असलं तरी जास्परला स्वतःचा चेहरामोहरा आहे. जास्परमध्ये साहसी मोहिमा करायला अधिक वाव आहे. इथं प्राणीदर्शन जवळून होण्याची शक्‍यता फार जास्त आहे. बांफ-जास्परमध्ये संध्याकाळी पायी फिरणं हा एक आनंदोत्सवच म्हणायचा! 

रात्री जास्पर करी पॅलेस या भारतीय हॉटेलात जेवताना अवघ्या २३० किमीच्या रस्त्यावर काय धमाल आली, किती वेळ लागला, किती वेळा बसमधून उतरलो, असं सांगत एका दिवसात किती दमलो त्याचाच हिशेब सगळे मांडत बसले होते. एवढ्यात आमचा लीडर जवळ येऊन म्हणाला, ‘तब्येतीत जेवून लवकर झोपा. कारण उद्या पुन्हा जास्पर बघून आपल्याला बांफच्या पुढं क्‍यानमोर इथं मुक्कामाला जायचंय..’ 

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच लीडरनं सर्वांना सांगितलं, की मलिन लेक गोठल्यामुळं आपण जास्पर स्काय ट्रॅमनं व्हिस्लर माउंटनवर जाणार आहोत. आमच्यापैकी कुणीच स्काय ट्रॅम पाहिली नव्हती. मग कळलं की गोंडोला राइडचा तो मोठा भाऊ आहे. 

गोंडोला राइडमधून एकावेळी चार जण डोंगरमाथ्यावर जातात. तर स्काय ट्रॅममधून २६ लोक जातात. त्यामुळं बर्फात खेळणं, फोटो काढणं, थोडी पोटपूजा करणं यात इतर प्रवासी मश्‍गूल असताना आम्ही पायवाटेनं अधिकाधिक वर चढत, व्हिस्लर माऊंटन एकदम टोकावरून सर्वांपेक्षा अलग होत, शांतपणे निसर्ग बघू लागलो. 

स्काय ट्रॅमनं जास्परला परतल्यावर आम्ही गोठलेल्या मालिन लेकऐवजी ‘पॅट्रिशिया लेक’ पाहून मलिन लेकबाजूच्या एका ‘साइट’वर निसर्गाचा अव्वल दर्जाचा नजारा बघण्यात गुंगून गेलो. सभोवतालच्या बर्फाळ वातावरणात सैर करताना प्रचंड आनंद झाला. कुठलाही ‘पॉइंट’ नसल्यानं किंवा ‘प्रेक्षणीय स्थळ’ नसल्यानं आमच्या ग्रुपशिवाय इतर कुणीही तिकडे नव्हतं. त्या साइटनं फोटोग्राफर्सना इतक्‍या फ्रेम्स दिल्या, लहान मुलांना गोळे करण्यासाठी इतका बर्फ दिला, तरुण जोडप्यांना थोडं नजरेपार, बर्फाच्छादित नागमोडी वळणाच्या रस्त्यातून स्फटिकस्वच्छ, वाहत्या पाण्याचा असा नजारा दिला आणि वृद्धांना पाऊल तर रुतेल, परंतु ते रूतलेलं पाऊल सोडवायला वेळ मात्र लागणार नाही अशा दर्जाचं सुंदर बर्फ दिलं, की सगळ्यांचा वेळ केवळ आणि केवळ जल्लोष करण्यातच गेला. त्यानंतर भुरुभुरु बर्फ पडायला लागलं म्हणून आम्ही बसमध्ये बसलो. 

जो बांफ-जास्पर प्रवास स्वप्नील वगैरे वाटत होता, त्याच्या बरोबर उलट काही लोकांना वाटायला लागलं. ‘बसमध्ये वातावरण गरम होऊ द्या, तापमान वाढवा,’ असे सर्व प्रवासी चक्रधराला सांगू लागले. सगळीकडं बर्फच बर्फ झालं. तशा वातावरणात जास्परचा निरोप घेतला. वाटेत सगळीकडं पूर्ण पांढरं चित्र दिसू लागलं. वाटेत काल बघायचा राहिलेला जास्पर स्कायवॉक लागला. परंतु तो बघायला बसमधून उतरणार कोण? निसर्गानं दारं - खिडक्‍या बंद करून बर्फाची चक्की जणू चालू केली होती. वातावरण त्यामुळं भयप्रद झालं होतं. सगळे प्रवासी चक्रधराला गाडी पिटाळायला सांगायला लागले. त्या थरथराटामध्येच आम्ही एकदाचे क्‍यानमोर मुक्कामी पोचलो. 

कसे जाल? :  जास्परला जाण्यासाठी आधी बांफ गाठावं लागेल. ट्रेनप्रवास अधिक खर्चिक, अधिक आरामदायी आणि अधिक देखणा आहे असं म्हणतात!   बांफ ते जास्पर हा २९० किमीचा रस्ता पावणेचार तासांत पार करता येण्याजोगा असला तरी वाटेतली सगळी सौंदर्यस्थळं पाहून जास्पर गाठेपर्यंत दिवस जातो.   जास्पर बघण्यासाठी किमान दोन दिवस हवेत. 

काय पाहाल? : कोलंबिया आइसफील्ड, जास्पर ट्रामवे, अथाबास्का धबधबा, अथाबास्का ग्लेशियर, मलिन कॅनियन, ग्लेशियर स्कायवॉक... 

कुठे राहाल? : शातो जास्पर. ९६, गिकी रस्ता, जास्पर, अल्बार्टा, कॅनडा. याशिवाय बजेटनुसार राहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 

कुठे खाल? : जास्पर करी पॅलेस, कॉनॉट ड्राईव्ह, जास्पर, अल्बार्टा, कॅनडा. हे भारतीय पद्धतीचं हॉटेल वगळता, इतर आपल्या आवडीनुसार खाण्याचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 

निसर्गस्थळांमधील अंतर : 
बांफ-जास्पर = २९० किमी-पावणेचार तास. 
जास्पर-अथाबास्का ग्लेशियर = १०६ किमी-दीड तास. 
जास्पर-अथाबास्का धबधबा = ३५ किमी-३५ मिनिटं. 
जास्पर-मलिन कॅनियन = ११ किमी-१५ मिनिटं. 
जास्पर-ग्लेशियर स्कायवॉक = १०० किमी-सव्वा तास. 
जास्पर-बिग हिल बिग बेंड = ११८ किमी-पावणेदोन तास. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या