मुशकू व्हॅली - द्रास 

उदय ठाकूरदेसाई
गुरुवार, 17 मे 2018

आडवळणावर
 

खूप वेगळेपणानं लेह-लडाख कसं फिरता येईल याचा शोध सुरू असताना, माझ्या मनात तीन गोष्टी तर अगदी पक्‍क्‍या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे नारळी पौर्णिमेला पेंगाँग लेकला मुक्काम करायचा. दुसरी म्हणजे ट्रेक करायला आवडतील आणि कुठल्याही परिस्थितीत सहज वावरतील अशा मित्रमंडळींबरोबर जायचं आणि टूरच्या कार्यक्रमात न बसवता लेह-लडाख चांगलं मोकळं चाकळं फिरायचं अशा दोन गोष्टी पक्‍क्‍या होत्या. शेवटची आणि तिसरी महत्त्वाची अशी मोकळं चाकळं फिरण्याची गोष्ट केवळ विवेक नागवेकरांमुळंच शक्‍य झाली. 

आम्ही आधी श्रीनगरला पोचणार होतो. परंतु दौरा रद्द करावा लागतो की काय, असं वाटण्याजोगी परिस्थिती काश्‍मीरमध्ये निर्माण झाली होती. परंतु सोबतची खमकी मंडळी जायला तयार असल्याचं कळल्यावर जाण्याच्या दिवशी दुपारी १२ वाजता मुंबई सोडली आणि संध्याकाळी ५ वाजता आम्ही तेरा जण दाल लेकमध्ये विहार करायला गेलोसुद्धा! दुर्दैवानं श्रीनगरचं वातावरण संध्याकाळी बिघडलं. संचारबंदी घोषित झाल्याचं कळल्यावर दुसऱ्या दिवशी पहाटेच श्रीनगर सोडायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी पहाटे श्रीनगर सोडून सोनमर्ग आणि मग तेथे एक दिवस राहून तिसऱ्या दिवशी दुपारी द्रासला पोचलो. 

खरं म्हणजे अप्रतिम सौंदर्यानं नटलेलं सोनमर्ग पुरतं पाहून झालं नव्हतं. तेथील सुंदर, नटव्या, देखण्या निसर्गानं भुरळ पाडली होती. परंतु थांबून चालणार नव्हतं. नागवेकर म्हणाले, ‘आपण उद्या द्रासला मुक्काम करूया. जगातल्या सैबेरियापाठोपाठच्या थंड हवामानासाठी गाजलेल्या गावात मुक्काम करूया. तिकडं एखादा ट्रेक करूया.’ सर्वांना ही ऐनवेळेची योजना फार आवडली आणि थंड हवामानाचं द्रास कसं असेल, असा विचार करीत आम्ही सोनमर्ग सोडलं. 

सोनमर्ग सोडल्यावर देखणा निसर्ग बदलू लागला. जोझिला खिंड लागली. अमरनाथ यात्रेला जातात त्या वाट दिसल्या. डोंगर उघडे बोडके, वैराग्यसंपन्न दिसायला लागले. जणू आम्ही बुद्धाच्या राज्यातच प्रवेश करते झालो.. आणि आम्ही अडीच तासांच्या प्रवासानंतर द्रास गावात पोचलो. 

मूळ कार्यक्रमाप्रमाणं द्रासला काही आमचा मुक्काम नव्हता. त्यामुळं राहण्याची सोय नव्हती. ती बघण्यासाठी म्हणून आम्हा सर्वांना एका हॉटेलात नागवेकर द्रासमधील टुरिझम गेस्ट हाऊसमध्ये जागा बघायला गेले. त्यांचा हाताचा ‘या’ असा इशारा झाल्यावर आम्ही सगळेजण हॉटेलमधून समोर दिसणाऱ्या द्रासमधील टुरिझम गेस्ट हाऊसमध्ये निवासासाठी गेलो. जशी संध्याकाळ व्हायला लागली तशी सूर्याच्या किरणांनी आपली कमाल दाखवायला सुरवात केली. फोटोग्राफर्सचे कॅमेरे धडाधड बाहेर येऊन बरेच फोटो घेतले जाऊ लागले. उद्या पहाटे उगवत्या सूर्याच्या कोवळ्या उन्हात फोटो काढण्याचं पक्कं झालं. तेवढ्यात आमच्यातल्या एकानं, ‘हा लोखंडी गोळा कसला?’ एवढा प्रश्‍न विचारला मात्र, त्यावरून बाजूला उभ्या असणाऱ्या गेस्ट हाऊसच्या चौकीदारांनी कारगिल युद्धाच्या आठवणी सांगायला सुरवात केली.. ‘त्या समोरच्या कड्यावरून बराच गोळीबार झाला’ असं सांगताना तो कडा आमच्यासमोरच असल्यामुळं त्या चौकीदारांच्या बोलण्यातला शब्द-न-शब्द थरार निर्माण करीत होता. 

दुसऱ्या दिवशी पहाटेच सर्वजण कॅमेरे घेऊन हजर होते. सूर्याच्या पहिल्याच किरणानं आम्ही राहात असलेल्या गेस्ट हाऊसच्या पाठच्या डोंगराचा भाग असा काही उजळवला, की बघत राहावंसं वाटलं. एवढंच नव्हे, तर पुढील संपूर्ण दौऱ्यात रोज, हरघडी, इतके सुंदर फोटो उत्कृष्ट निसर्गामुळं आणि अप्रतिम सूर्यप्रकाशामुळं (खरं प्रकाशकिरणांच्या लपाछपीमुळं) सर्वांना मिळाले. 

गेस्ट हाऊसमध्ये सकाळचा नाश्‍ता करून आम्ही मुशकू व्हॅलीचा ट्रेक करायला निघालो. हा ट्रेक काही आमच्या कार्यक्रमपत्रिकेतला भाग नव्हता. नागवेकरांच्या धोरणीपणामुळं काश्‍मीरमध्ये गमावलेला एक दिवसाचा कालावधी द्रासमध्ये राहण्यासाठी वापरता आला. त्यावेळी शॉपिंगसाठी एक दिवस मोकळा ठेवणाऱ्या पर्यटन कंपन्यांची आठवण आली. नागवेकरांना विचारलं, ‘तुमच्या कंपनीचं नाव ‘पदभ्रमंती’ असं का ठेवलं? इतर कंपन्या पर्यटनातून खोऱ्यानं पैसे कमवतात तसे पैसे मिळवायची हौस तुम्हाला कधी वाटली नाही का?’ नागवेकर म्हणाले, ‘कधीच नाही. गावांचं अवीट सौंदर्य, अडनिडी गावं, सहसा न पाहिलेला भारत, सर्वांना दाखवावासा वाटला. अजूनही वाटतोय.. आणि ‘पदभ्रमंती’चं म्हणाल तर कितीही बस, ट्रेन, विमान करून गेलो तरी पर्यटनस्थळी पायी चालणं होतंच! त्यामुळं उलट ‘पदभ्रमंती’ हे नाव सार्थ ठेवलं असंच वाटतं. लोक कारगिल युद्धानंतर म्हणजे १९९९ नंतर लेह-लडाखमध्ये येऊ लागले. आम्ही तर त्याच्याही खूप आधीपासून येतोय. त्यामुळं बरेच वेगळे भाग, वेगळी माणसं चांगल्या परिचयाची झाली आहेत.’ 

बोलता बोलता आम्ही गाव पाठी टाकून टोलोलिंग या गावाच्या दिशेनं चालू लागलो होतो. थंड, प्रसन्न वातावरणात गावाबाहेर पडतानाच फार उल्हसित वाटायला लागलं होतं. परिचित अशी तुकड्या तुकड्यांमध्ये दिसणारी हिरवळ मधूनच दिसत होती. रस्त्याच्या कडीलगतच्या शेतजमिनीत बायका काम करीत होत्या. थोडं पुढं चालताना गोरीगोमटी उजळसर रंगांची हसरी मुलं दिसली. थोडं पुढं दोन युवक दिसले. एकानं आपलं नाव ‘मुख्तार’ असं सांगितलं. त्यानं घरी येण्याचा खूप आग्रह केला. ‘मुशकू व्हॅलीत जाऊन येतो..’ असं सांगून आम्ही टायगर हिलच्या दिशेनं जाऊ लागलो. वाटेत गोळीबाराचे आवाज सतत येत होते. गावकरी म्हणाले, ‘भारतीय लष्कर युद्धसराव करताहेत.’ ११ हजार फुटांवरच्या द्रास गावात आणखी चढ चढून आल्यानं सर्वांची चाल मंद झाली होती. समोर हिरव्या तुकड्यांमधली मुशकू व्हॅली दिसू लागली होती. बोलता बोलता नागवेकरांकडून कळलं, ‘मुशकू व्हॅलीतून वाहणारी मुशकू नदी पुढं द्रास नदीला मिळते. जोझिलानंतर तर ती मोठ्या द्रास नदीचं रूप धारण करते.’ 

मुशकू व्हॅली, टायगर हिल समोर दिसत होते. परंतु पुढं जायला परवानगी नव्हती. त्यामुळं व्हॅलीचं अवलोकन करण्यात बराच काळ गेला. महाकाय निष्पर्ण डोंगरांसमोर, आपली इवलीशी हिरवाई, मुशकू नदीच्या काठाकाठावरून, मानानं मिरवणारी मुशकू व्हॅली एक अल्लड बालिका वाटत होती. गावकऱ्यांच्या बोलण्याचा प्रतिध्वनी चोहोबाजूंच्या पर्वतावरून आदळून मजेशीररित्या परिवर्तित होत होता. 

अखेर, टायगर हिलला मानाचा मुजरा करून परतीच्या वाटेला लागलो. आता उतार असल्यानं पटापट अंतर पार करून टोलोलिंगच्या रस्त्यावर आलो. तिथं मुख्तार आमची वाट पाहत उभाच होता! मुख्तारनं घरातल्या लालभडक गालिच्यावर आम्हाला बसवलं. नक्षीदार पेल्यातून पाणी प्यायला दिलं. त्यानं सर्वांना चहा दिला. हाच मुख्तार पुढं कारगिल सोडेपर्यंत आम्हाला पुढील दोन दिवस भेटत राहिला. मुख्तारनं आता घराजवळ हॉटेल सुरू केल्याचं ऐकतो. 

एव्हाना ऊन चांगलंच जाणवू लागलं होतं. त्यामुळं रेंगाळत, गाव न्याहाळत, गेस्ट हाऊसमध्ये परतलो. आमच्या दौऱ्याची सुरवातच उत्तम झाल्यानं आमचा दौरा उत्तरोत्तर चढत्या श्रेणीत रंगत गेला वेगळं सांगायला नकोच! तुम्हीसुद्धा श्रीनगरवरून सरळ कारगिल किंवा लेह गाठू नका. सोनमर्ग, द्रास, कारगिल असे थांबे घेत घेत पुढं जा. प्रत्येक अपरिचित ठिकाणाचा आनंद लुटत पुढं जा.

काय पाहाल? 
 द्रास गाव. त्यातील वर्दळीचा मुख्य रस्ता. गावाबाहेर पडल्यावर लगेच दिसणारी शेती. रानटी फुलांसाठी प्रसिद्ध असलेली मुशकू व्हॅली आणि पर्यटकांचं स्वागत करणारे हसऱ्या चेहऱ्यांचे गावकरी! 
 युद्धाविषयीचं छानसं संग्रहालय. 

कुठे राहाल? :
आता राहण्यासाठी अनेक हॉटेल्सचा पर्याय उपलब्ध असला तरी आम्ही राहिलो ते द्रासचं टुरिझम गेस्ट हाउस राहण्यासाठी छान आहे. ते मुख्य रस्त्याच्या मागंच आहे. 

कुठे खाल? :
दौऱ्याची सुरवात असल्यानं ११ हजार फुटांवरील वातावरणाशी जुळवून घेत पुढं जायचं असतं. आम्ही गेस्टहाऊसमधील शाकाहारी जेवणाचाच पर्याय स्वीकारला. अर्थात, मांसाहारींसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

फोटो फीचर

संबंधित बातम्या