महाराष्ट्राचे क्वीन्सटाऊन 

उदय ठाकूरदेसाई
शुक्रवार, 15 जून 2018

आडवळणावर
 

‘काय हो ठाकूरदेसाई, तुम्ही सगळीकडे फिरता परंतु आमच्या कामशेतला येत नाही?’ 
इंडस पॅराग्लायडिंगचा सर्वेसर्वा संजय पेंडुरकरचा मिश्‍कील मेसेज सोशल मीडियावर आल्यावर, ‘यावेळी शंभर टक्के येणार’ असे त्या मेसेजला उत्तर दिले. 
आम्ही (स्वाती आणि मी ), ८ मार्च २०११ मध्ये क्वीन्सटाऊन (न्यूझीलंड) येथे स्कायडायविंग केल्यानंतर संजयच्या पॅराग्लायडिंगमधील नैपुण्याविषयीच्या बातम्या कानावर येत होत्या. परंतु भाजगाव येथे त्याने ‘इंडस पॅराग्लायडिंग प्रशिक्षण केंद्र’ सुरू केल्यावर मात्र काही कारणांनी भाजगावला जाणे आणि पॅराग्लायडिंग करणे काही जमत नव्हते. यावेळी मात्र जमवायचे मी नक्की केले. 

गंमत अशी झाली, की डिसेंबरच्या सुरुवातीलाच मुंबईला ‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा बसला. ढगाळ वातावरण, पाऊस अशा गोष्टींमुळे आपण डिसेंबरमध्ये कामशेतला जाऊ शकणार की नाही? असा प्रश्‍न पडेपर्यंत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. बरे कामशेतवरूनही तिथे जाण्यासंबंधी ग्रीन सिग्नल मिळेना! शेवटी एका संध्याकाळी संजयलाच विचारून जाण्याचे पक्के केले आणि सकाळी सकाळीच आम्ही कामशेतच्या दिशेने निघालो. 

कामशेतला पोचल्यावर, डावीकडच्या फाट्यावर १८ किमी वर असलेल्या भाजगावला पोचलो. इंडसच्या ‘बेस’ला पोचताच समोर वडिवळे जलाशयाचा विस्तीर्ण परिसर पाहायला मिळाला. समोरचा सुंदर नजारा बघताच मन आणि डोळे शांत झाले. हात चटकन कॅमेऱ्याकडे गेले.. आणि मी कोवळ्या उन्हात ‘इंडस’च्या वास्तूचे आणि रम्य परिसराचे पटापट फोटो घेऊ लागलो. परिसर अतिशय आवडल्याची ती खूण होती. वर आकाशात पाहिले तेव्हा आकाश निरभ्र होते. 

दुपारी जेवत असताना, ‘हवा राइड करण्याजोगी असेल ना?’ असा प्रश्‍न संजयने प्रमुख मार्गदर्शक योगी (गुरुजी) आणि इतर प्रशिक्षकांना विचारला असता, ‘ऐनवेळी जाऊन पाहावे लागेल! एक चान्स घ्यावा लागेल!’ असे उत्तर एकमुखाने तिघांच्याही तोंडून आले. त्यामुळे जेवण झाल्यावर तासाभरात आम्ही पॅराग्लायडिंगच्या राइडला जायला तयार झालो. 

भाजगाव-कामशेत अवघा १८ कि.मी.चा रस्ता असला तरी आडवळणाच्या त्या छोट्याशा रस्त्यावर मोठ्या गाडीने 

जायला चांगली ३५ - ४० मिनिटे लागली. कामशेतला पोचल्यावर सुमोने कच्च्या रस्त्याने डोंगरावर गेलो. तेथून दहा मिनिटांचा छोटासा ट्रेक करून डोंगराच्या पठारावर गेलो.. आणि तिकडून राइड करायला सज्ज झालो. 

योगी (गुरुजी) च्या (ते माझे मदतनीस होते) थोड्या सूचनेनंतर मी आकाशात झेपावलो. खरे सांगायचे तर एकच आनंद झाला. ज्या ८ पदरी एक्‍स्प्रेस वे वरून कामशेतला आलो त्याचे दुरून दिसणारे दर्शन अतिशय लोभसवाणे वाटले. एका फुटपट्टीएवढा तो एक्‍स्प्रेस वे खूप उंचावरून दिसत होता! आकाशात पक्ष्यासारखे तरंगताना झालेला आनंद हा शब्दांपलीकडचा आहे. डोंगरांच्या कड्याकडे झेपावताना किंवा उजवी-डावीकडे सूर मारून झेपावताना होणारा आनंद वर्णनातीतच म्हणायला हवा. मी ‘टॅनडेम राइड’ म्हणजे मदतनीसाबरोबर हवेत तरंगत होतो. परंतु जे एकल किंवा सोलो राइड करतात ते आनंदाने चित्कारण्याऐवजी स्तब्ध राहून अंतर्मुखही होऊ शकतात. कारण हवेत तरंगण्याचा अनुभव अक्षरशः वर्णन करण्यापलीकडचा असतो. परतताना ‘लॅंडिंग’ही म्हणजे जमिनीवर पाय ठेवण्याची क्रियाही काळजीपूर्वक करावी लागते. पॅराग्लायडिंग झाल्यावर आपल्या आनंदाला अगदीच पारावार उरत नाही. वीस मिनिटे हवेत तरंगल्याच्या स्मृती पुन्हा-पुन्हा अनुभवाव्याशा वाटतात. माझ्या अगोदर स्वातीची (माझ्या बायकोची) राइड संपल्याने, माझी राइड संपल्यावर आम्ही ‘इंडस’च्या ‘बेस’ला परतलो. तोपर्यंत संध्याकाळ होत आली होती. गावातली इतर जाणकार ग्लायडर्स मंडळी ‘इंडस’च्या संकुलात जमली होती. चहाचे घोट घेता घेता वडिवळे जलाशयाला साक्षी ठेवून स्कायडायविंग आणि पॅराग्लायडिंग यातील फरक काय अशी चर्चा रंगली होती... 

आकाशात चंद्र उगवला होता. त्याचे शीतल चांदणे जलाशयात उठणाऱ्या हळुवार लाटांवर स्वार होत चमचमत होते. ते लोभसवाणे दृश्‍य बघेपर्यंत जेवणाचे बोलावणे आले. अंमळशा विलंबानेच जेवणासाठी जायला उठलो. ‘इंडस’मधल्या पाककुशल (नेपाळी) बल्लवाचार्यांनी हैदराबादी चिकन, अप्रतिम ऑम्लेट आणि इतर वाढलेले जेवण जेवून तबियत खुश झाली. निःशब्द शांततेच्या मधुररात्री आनंदातच असल्यामुळे झोप कधी लागली ते कळलेच नाही. 

दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजल्यापासून प्रशिक्षणार्थींच्या सरावाची लगबग सुरू झाली. आम्ही पण उठलो. संजय म्हणाला, ‘सोमवडी जंगल ट्रेक करू या.’ संजयची आज्ञा शिरसावंद्य मानून स्वाती, मी आणि संजय ट्रेकसाठी निघालो. मोठे मजेदार दृश्‍य होते भाजगावचे! घरालगतच्या खुराड्यातून कोंबड्या आळसावत बाहेर पडून पंख फटफटावीत होत्या. वेगवेगळ्या ठिकाणांहून बांग द्यायची कोंबड्यांची स्पर्धा चालू होती. मात्र गावात ५ डिसेंबर २०१७ रोजी ‘स्पोर्टस डे’ असल्याने विद्यार्थ्यांची शाळा सजवण्याची लगबग सुरू होती. मुली शाळेच्या पटांगणात फुलांची रांगोळी काढण्यात मग्न होत्या. आम्ही त्या चिमुकल्या चिमण्यांचे कौतुक करून ट्रेकला निघालो. रस्त्यात संजय म्हणाला, ‘उन्हाळ्यात येथे चिंचा, बोरे, आंबे, करवंदे, जांभळं असा रानमेवा खायला फारच मजा येते. रस्त्याच्या कडेला डौलाने उभ्या राहणाऱ्या झाडांनी संजयचा मुद्दा प्रत्यक्षात पटवला होता. विविध तऱ्हेची कितीतरी झाडे रस्त्याच्या कडेला डौलाने उभी होती. मुख्य रस्त्यापासून जंगलात शिरल्यावर सर्वांत प्रथम झाडांच्या सावलीमुळे मिळणाऱ्या गारव्याने मन ताजेतवाने केले. समोर धरणाच्या काठावर बरेच बगळे ओळीने बसले होते. आमच्या पायाच्या आवाजाने ते उडतील तो क्षण जलाशयाच्या पार्श्‍वभूमीवर टिपण्यासाठी आम्ही उत्सुक झालो होतो. परंतु छोट्या छोट्या कळपात वेगवेगळ्या दिशेने पांगलेल्या बगळ्यांमुळे आमच्या फोटो काढण्याच्या कल्पनेचा पुरता बोजवारा उडाला. 

जंगलात अतिशय सुरेख अशी निसर्गचित्रे मिळाली. सकाळी मन आधीच आल्हाददायक असते. त्यात निसर्गाची अप्रतिम अदाकारी पाहायला मिळाली, की अगदी भरून पावल्यासारखे वाटते. सकाळच्या ट्रेकनंतर गावात परतलो, तो त्या विद्यार्थ्यांचे सरस्वती-वंदन चालू होते. शाळकरी मुले-मुली, पेटीवर बसलेल्या आणि गाणाऱ्या शिक्षकांच्या सुरात सूर मिसळून गात होती. त्यांच्यातलाच एक जण तबला वाजवीत होता. 

दुपारी जेवणापूर्वी संजयच्या ‘इंडस’ जवळच राहणाऱ्या दोन ग्लायडर्सना भेटून त्यांचे मनोगत जाणता आले. त्यांच्यातल्या एकाला हॉट एअर बलून, तर दुसऱ्याला भाजगावात ‘कलानगरी’ करण्यात रस असल्याचे बघून (ऐकून!) अचंबित व्हायला झाले! 

पुन्हा भाजगावात परततो तो काय, जवळच्याच खळ्यात शाळेचा ‘स्पोर्टस डे’ रंगात आला होता. आम्ही ‘इंडस बेस’ला परतलो. जेवलो.. आणि थोड्याच वेळात कोंडेश्‍वरला आमच्या गाडीने जायला निघालो. कोंडेश्‍वर-ढाक भैरी दर्शन अशी पायी रपेट मारून पुन्हा भाजगावात परतलो.

फोटो फीचर

संबंधित बातम्या